Saturday 27 October 2012

पोरखेळ



पोरखेळ
बळकट शरीरयष्टीचे, बलदंड बाहूंचे ते तिघे तरुण एकदमच दवाखान्यात आले आणि माझ्यासमोर येऊन खुर्चीत बसले तसा मी थोडासा चपापलोच. दवाखान्यासारख्या ठिकाणी एकदम एकत्र इतके ताकदवान जवान पाहण्याची आम्हाला सवय नसते! असे लोक एकत्र पाहण्याची वेळ म्हणजे धोक्याची घंटाच. कुठल्या तरी असंतुष्ट पेशंटने सोडलेली ही अस्त्रे असण्याची शक्यता असते. त्या जवानांना पाहिले तशी क्षणभरात माझ्या डोक्यात विचारांची प्रचंड चक्रे फिरली. कुठलाही असमाधानी धोकादायक पेशंट आठवेना. पण समोर पाहिले तर त्यांचे चेहरे हसतमुख होते, नजरेत पुसटसे आर्जव होते. म्हणजे तसे काळजीचे कारण नसावे असा चाणाक्ष अंदाज मी बांधला आणि स्थिरावलो. प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागलो.
त्यांच्यातला एक जण थोडा जास्त बोलका, हुशार वाटला. पुढे येऊन त्याने माहिती द्यायला सुरुवात केली. ‘सर, आम्ही विजय जवान मंडळाचे कार्यकर्ते आहोत. दर वर्षी आपल्या मंडळातर्फे काही साहसाच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यात जे जिंकतील त्यांना बक्षिसे देण्याचा आमचा उपक्रम असतो. यंदा आम्ही सिंहगड चढण्याची स्पर्धा घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही यावेत अशी आमची इच्छा आहे.’
मी घाबरलोच. मी एक किरकोळ शरीरयष्टीचा मनुष्य. व्यायाम, खेळ अशा गोष्टींपासून चार हात दूर राहणारा. शक्य तो तब्येतीला त्रास देऊ नये अशा विचारांचा! मी अशा स्पर्धेत सहभागी व्हावे असे यांना का वाटावे हे मला समजेना. ते माझी थट्टा वगैरे तर करत नाहीत ना असेही मला वाटून गेले. माझ्या मनातली शंका त्यांनी बहुधा ओळखली असावी. झालेला घोटाळाही त्याच्या लक्षात आला. तो जवान हसला. म्हणाला, ‘सर, तुम्ही आम्हाला एक डॉक्टर म्हणून हवे आहात. त्याचं काये ना की, स्पर्धा चालू असताना कुणाला काही त्रास झाला तर एखादा जबाबदार डॉक्टर तिथे असावा अशी आमची इच्छा आहे. उद्या काही तसला प्रॉब्लेम यायला नको, म्हणून एक डॉक्टर असलेला बरा. तुमच्या मदतीला आमचे काही कार्यकर्ते असतीलच ना. गाडीनं आम्ही तुम्हाला थेट गडावर वरती नेऊन सोडू. तुमचं इ.सी.जी. मशीन फक्त बरोबर असलं म्हणजे झालं. म्हणजे काये की कुणाला काय हार्टचा वगैरे प्रॉब्लेम झालाच तर तुम्ही आहातच, काय?’
माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे मला काही पळापळीचा त्रास असणार नव्हता तर. नुसतीच सिंहगडाची एक वारी. थोडी वेगळी मजा. बरं स्पर्धा तर तरुण मुलांची. त्यांना त्रास तो काय होणार. माझी आपली फुकटात सिंहगडाची वारी. काय वाईट आहे. बरं तेव्हा मीही व्यवसायात नवखा होतो. माझ्यापेक्षा वरिष्ठ अशा माझ्या मित्राने मला एक गुरुमंत्र दिला होता. ‘काही करून लोकांशी संपर्क वाढव. कुठल्याही समारंभाचं निमंत्रण असो, लग्नाचं असो, बारशाचं असो, अगदी मयतीचं का असेना, जात जा. चार लोक भेटतात. लोकांच्या नजरेसमोर रहावं, त्याचा फायदा होतो.’ ही नामी संधी होती, लोकांच्या समोर राहण्याची. बरं हे कुठलंसं जवान मंडळ. त्यांच्याशी थोडासा परिचय झाला तर फायदाच होईल ना. मी लगेचच त्यांना होकार दिला. ती तिघंही पोरं खूष झाली. कृतज्ञतेनं त्यांच्यातल्या प्रत्येकानं माझा हात हातात घेतला. माझे आभार मानले. रविवारी सकाळी सात वाजताच घरी गाडी पाठवतो असं आश्वासन देऊन ते गेले.
ठरल्याप्रमाणे रविवारी अगदी सकाळी गाडी आली. दाराशी एक गाडी येऊन मला घेऊन जाते याचा नाही म्हटलं तरी मला अभिमान होताच. माझी इ.सी.जी. मशीनची मोठी सूटकेस होती. आतल्या सगळ्या ऐवजासकट तिचे वजन सतर-अठरा किलो होत असे. दाराशी आलेली ती गाडी पाहून ते वजनही मला हलके वाटू लागले. गाडीत मागच्या बाजूला माझ्यासाठी खास जागा ठेवून अजून एक-दोघे तरुण गाडीत बसले होते. एकाने माझी सूटकेस उचलून गाडीत घेतली. मागच्या सीटवर पाय थोडे ऐसपैस ताणून मी बसलो, तेव्हा मी अगदी समाधान पावलो होतो. 
गाडी निघाली. एका ठिकाणी थांबून इतर काही गरजेचं सामान आत टाकून आम्ही सिंहगडाकडे निघालो. ‘स्पर्धेसाठी पोरं सकाळपासूनच आली आहेत. आपण गाडीनं वर पोहोचू त्या सुमारास पहिली-पहिली पोरं वर पोहोचतच असतील. पुढची पोरं काय अजून तासाभरात वर पोहोचतील. म्हणजे झालंच आपलं काम.’ गाडीतल्या एका तज्ज्ञ तरुणानं निर्वाळा दिला. आता गाडीत मी चांगलाच विसावलो होतो. काय लागेल तेवढा वेळ, मला काय फरक पडणार होता. मजेत खिडकीबाहेरची दृश्य पाहात मी बसून होतो.
धक्के खात-खात सिंहगडावर जाणारा तो रस्ता आम्ही पार केला. गाडी वाहन तळावर पोचली. मागे-पुढे करत ड्रायव्हर ती गाडी नीट लावत होता. गाडी पुरती थांबली न थांबली तोच दोन पोरं पळत पुढे आली.
‘डॉक्टर हायेत का? कुठायत डॉक्टर?’ धापा टाकत त्यांनी विचारलं.
‘सर, ती पोरं आली बघा.’ असं म्हणत आतल्यांनी मला पुढे केलं.
‘काय रे, काय झालं?’ गाडीतून उतरत मी त्यांना विचारलं.
‘बिगी बिगी चला डॉक्टर, वर आलेलं एक पोरगं पहा कसं तरीच कराया लागलंय. लय धापा टाकतंय, पानीबी मागून ऱ्हायलय.’ धापा टाकत त्यातल्या एकानं मला माहिती दिली.
अरेरे, कुठाय तो पोरगा?’ मी विचारलं.
“त्ये पोरगं लय लांब हाय. पार तानाजीच्या पुतळ्यापाशी. तुम्ही चला डॉक्टर. चला बिगी-बिगी. म्या दावितो तुम्हास्नी’ असं म्हणत त्या पोरांनी उलट्या दिशेनं पळायला सुरुवातही केली.
मी चटकन गाडीतून उतरलो, त्यांच्या मागून जाऊ लागलो, तशी गाडीतल्या एका जवानाने ‘डॉक्टर, तुमची पिशवी’, असं म्हणत माझी ती जडजंबाल सूटकेस माझ्या हातात ठेवली. ती हातात घेतली तर माझा उजवा खांदाच खाली घसरला, तिच्या वजनाने. कशी बशी ती सावरत मी चार पावले पळालो तर असा दम लागायला लागला की ब्रह्मांडच आठवावे! मदतीची याचना माझ्या नजरेत आली असणार निश्चित. पण मागे, आसपास बघावे तर मघाचे सगळे नौजवान कुठे तरी नष्ट झालेले. आता प्रसंग बाका आला होता. माघार घेणे शक्य नव्हते. एका हातात ती जड सूटकेस सावरत अर्धवट पळत अर्धवट चालत मी अंतर काटू लागलो. पुढे ती पोरं पळत होती. पळता-पळता मागे वळून माझ्याकडे पाहात होती. ‘चला बिगी-बिगी’, म्हणत मला जोरात पळायला खुणावत होती.
गडावरचा तो सगळा रस्ता चढ-उताराचा आहे. याआधी एक-दोन वेळा मी नुसताच त्यावरून चालत गेलो होतो तरी दमलो होतो. आता तो सगळा रस्ता पळत पार करण्याची वेळ आली, ते देखील अठरा किलोचे ते असह्य वजन सांभाळत. ही माझी परीक्षाच होती. ती पोरं काही थांबेनात. तानाजीच्या पुतळ्याजवळ अडलेल्या त्या कुणा पोराचे प्राण वाचविणे जणू त्यांच्या पळण्यावर अवलंबून होते अशा त्वेषाने ती पळत होती. माझ्या संथ चालण्याचा त्यांना बहुधा रागही येत असावा. एक तर माझ्या हातातल्या वजनाची त्यांना कल्पना नसावी आणि एक जीव वाचविण्याच्या कल्पनेने ते पूर्ण रोमांचित झालेले होते. भारावले होते. धापा टाकून माझ्या तोंडाला कोरड पडली. तोच उलट दिशेनं अजूनही एक-दोन पोरं पळत आली, ‘डॉक्टर कुठायत? डॉक्टर? पोराला चक्कर आलीय तिकडे, पळा, पळा.’ त्यांनी पुन्हा मला आवाज दिला. काही न बोलता मी पुन्हा माझा वेग वाढविण्याचा प्रयत्न करू लागलो. ‘डॉक्टर, डॉक्टर’, असा जणू एकच घोष सुरु झाल्याचा भास मला होऊ लागला. हातातली पिशवी कधी उजव्या, कधी डाव्या हातात सारत, तर कधी ती साफ डोक्यावर उचलून धरत मी पळत होतो. तरी ते अंतर संपेना. ते चढ-उतार संपेनात. पुढे धावणाऱ्या मुलांच्या आरोळ्या संपेनात. शेपटी पिळून पळवल्या जाणाऱ्या बैलासारखी माझी गत झालेली. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. आता पडतो की काय असे वाटू लागले. एक प्रकारचा बधिरपणा सर्वांगात पसरू लागला. असा किती वेळ गेला, मी किती पळालो हेही मला समजेना झाले. प्राण कंठाशी येणे म्हणजे काय याचा तो प्रत्यक्ष अनुभव होता. पण अजून तो तानाजीचा पुतळा दिसेना. ते चक्कर आलेलं पोरगं दिसेना. कितीतरी वर्षांपूर्वी सिंहगडाचा हा परिसर तानाजीनं आपल्या पराक्रमानं गाजवला होता. शत्रूशी सामना करताना त्याला वीरमरण आलं होतं. आता त्याच परिसरात मीही एक अभूतपूर्व पराक्रम करतो की काय अशी भीती माझ्या मनात यायला लागली.
किती काळ गेला माहीत नाही. खरं तर पुढचं काहीच मला फारसं आठवत नाही. आठवतंय ते इतकंच की कधी तरी मी त्या पुतळ्यापाशी पोचलो. त्या पोरापर्यंत पोचलो. पण तोवर ते पोरगं उठून बसलं होतं, पाणी वगैरे पिऊन आसपास फिरायलाही लागलं होतं. उरस्फोट करून पळत-पळत आपल्याला तपासायला आलेल्या डॉक्टरकडे त्याचं लक्षच नव्हतं. अशी काही वैद्यकिय सेवा उपलब्ध होती हेही त्याला बहुधा माहीत नव्हतं.
माझी ती अति वजनदार सूटकेस मी बाजूला टाकली. धापा टाकत तिथल्याच एका झाडाखाली मी अक्षरशः कोसळलो. आता माझा मी एकटा अगदी शांत होतो. डॉक्टर-डॉक्टर असा घोष बंद झाला होता. गडावरच्या थंडगार वाऱ्याचा सुखद गारवा माझ्या सर्वांगाला स्पर्शत होता. जणू पुनर्जन्म झाल्याची भावना माझ्या मनात आली. हळुवार डोळे उघडून मी वर आकाशाकडे पाहिले. झाडाची पाने मंद सळसळत होती. एक चुकार घार वर मंद घिरट्या घालत होती. आणि वर निळभोर आकाश. मला स्वर्गीय वाटलं.
त्या दिवशी सिंहगडावर झाडाखाली अति श्रमाने विकल होऊन पडल्यावर मला जणू आत्मज्ञान झाले. ब्रह्मज्ञान झाले. काय हा मूर्खपणा. कोण ती तरुण पोरं, ती मला सिंहगडावर बोलावतात काय आणि मीही वेड्यासारखा इ.सी.जी. मशीन घेऊन त्यांच्यामागे धावतो काय. असा कुठला आजार त्या स्पर्धक तरुणांना होणार होता की ज्यावर मी उघड्यावर माळरानात उपचार देणार होतो? असं कुठलं रोगनिदान होतं की जे तेव्हाच तिथेच उघड्यावर माळरानात इ.सी.जी. मशीनद्वारे मी करण्याची गरज होती? सगळाच नुसता पोरखेळ. नसता उपद्व्याप केवळ!

डॉ.संजीव मंगरूळकर
दूरभाष ९४०५०१८८२०


No comments:

Post a Comment