Saturday 20 October 2012

शिबिर कथा



शिबिर कथा


सप्रे साहेब स्वतः माझ्या दवाखान्यात आले आणि त्यांनी स्वतः मला विनंती केली की त्यांच्या एका संस्थेसाठी मी एक आरोग्य शिबिर घ्यावे ही सगळी घटनाच मुळी मला स्वप्नवत्‌ वाटावी अशी होती. सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रातला सप्र्यांचा दबदबा केवढा तरी मोठा होता. त्यांच्या तरुणपणी त्यांनी कितीतरी महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. अगदी तत्कालीन पंतप्रधानांपर्यंत त्यांचा जवळचा संबंध असल्याचाही बोलबाला होता. आजघडीला सप्रे वृद्ध होते, तरी त्यांच्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाविषयी एक आदराची भावना सर्वांच्याच मनात असे. असे हे सप्रे स्वतः माझ्या दवाखान्यात आले. मला कृतकृत्य वाटले. त्यांची मागणी तर काय अगदी साधी होती. एक आरोग्य शिबिर त्यांच्या कुठल्याशा एका सेवाभावी संस्थेसाठी घेण्याची. मी त्यांना तत्काळ होकार दिला.
तो काळ असा होता की अशा प्रकारची शिबिरे घेणे म्हणजे माझा हातखंडा आणि आवडीचा विषय होता. कुठेही जाऊन कुठल्याही प्रकारची आरोग्य शिबिरे मी घेऊ शकत असे. मग ती मधुमेहाविषयी असोत किंवा हृदयविकाराविषयी असोत. खेड्यात असोत अथवा पार कुठे तरी जंगलात असोत. शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी असोत किंवा जरठ वृद्धांसाठी असोत. नुसते शिबिर म्हटले की माझ्यातला डॉक्टर तडफडून जागा होत असे. एकदा का शिबिरात घुसलो की एखाद्या योद्ध्याच्या तडफेने मी लढत असे. ताशी शंभराहून अधिक पेशंट हातावेगळे करणे आणि त्यांना त्यांच्या मूळ अडचणींसकट तसेच परतवून लावणे हे यशस्वी शिबिराचे लक्षण आहे, यातच डॉक्टर म्हणून माझे कर्तृत्व सामावलेले आहे, अशी माझी भावना असावी. अशा शिबिरांमुळे कुणाचे भले होते, ती नक्की रुग्णांच्या सेवेसाठी होतात की कुठल्याश्या तथाकथित सेवाभावी संस्थेच्या आत्मतुष्टीसाठी होतात हे समजण्याचे ते वय नव्हते. शिबिरात मोफत काम करून मी समाज सेवा करतो असे वाटावे इतका भाबडा मी नसलो तरी शिबिरात काम केल्याने आपले नाव होईल, चार चांगल्या लोकांशी संबंध येऊन शेवटी व्यवसाय वाढेल असे वाटण्याइतपत बावळट मात्र होतो. त्यामुळे मी शिबिरात उत्साहाने भाग घेत असे. आणि ही केवळ माझीच अवस्था नसावी, बहुसंख्य नवखे डॉक्टर या ‘शिबिरावस्थेतून’ जात असावेत. जसा काळ उलटत गेला, तसा या शिबिरांमधला फोलपणा मला जाणवत गेला. एका दिवसाच्या अशा वरवरच्या तपासणीतून आपण कुणाचे काहीच भले करत नाही, उलट गरीब असहाय अशा पेशंटना आपण उगीचच आशा लावून ठेवतो, मोफत सेवेची लालूच दाखवत त्यांना चक्क फसवतो असे मला दिसले.
कुठल्याशा एका शिबिरात, दोन्हीही पायांना पोलिओ झालेला एक बारा तेरा वर्षांचा मुलगा त्याच्या किरकोळ यष्टीच्या आईने पाठुंगळी घेतला आणि धापा टाकत कुठल्याशा गावाहून कितीतरी किलोमीटर पायी चालत माझ्यासमोर आणून टाकला, हात जोडून त्याला बरा करण्याची विनंती तिने मला केली तेव्हा मला हे जाणवले.
अशाच आणखी एका शिबिरात छातीचा भाता असहायपणे वरखाली करीत कुठलासा दमेकरी औषधांची याचना करीत माझ्यासमोर कोसळला तेव्हा मला हे जाणवले.
कुठल्या तरी प्रतिष्ठित क्लबद्वारा आयोजित केलेल्या अशाच एका शिबिरात अंगावर अत्तराची फवारणी केलेल्या उच्चभ्रू स्त्रिया जेव्हा एकमेकात गप्पागोष्टी करत पहिल्या नंबरवर येऊन आधी तपासणीसाठी स्वतःच येऊन माझ्यापुढे उभ्या राहिल्या तेव्हाही मला हेच जाणवले.
कुठली तरी फुकटची औषधे, बिन कामाच्या जीवनसत्त्वांच्या गोळ्या जमवून त्या अशा पेशंटना किंवा पेशंट नसलेल्या कुणाला तरी वाटणे ही केवढी तरी घोर फसवणूक होती. पण हे जे मला जाणवले ते सगळे नंतरचे. कितीतरी वर्षांनंतरचे.
सप्रे जेव्हा मला भेटले तेव्हा मी कितीतरी लहान होतो, शिबिरांसंदर्भात माझ्या बाल्यावस्थेत होतो. अगदी उत्साहाने मी त्यांना हो म्हटले आणि शिबिराच्या तयारीला लागलो. शिबिर हृदयविकार आणि रक्तदाब यासंबंधी असावे अशी सप्र्यांची इच्छा होती. त्यादृष्टीने मी योजना केली. अशा शिबिरांच्या संयोजनाचा माझा एक साचाच बसून गेला होता. माझी वहिनी, बहीण (दोघीही वैद्यकीय व्यावसायिक नसल्या तरी) मला या कामात मदत करीत असत. इ.सी.जी. घेणे, तो व्यवस्थित चिटकविणे, पेशंटचे वजन घेणे इ. कामे त्या इमाने इतबारे करीत असत. त्यामुळे मी पेशंट तपासण्यावर आणि त्याला औषधे देण्यावर माझे पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत असे, सर्व कामही वेळेत पूर्ण करू शकत असे.
तर अशा सर्व जय्यत तयारीनिशी आम्ही शिबिरासाठी गेलो. एका प्रशस्त सभागृहात एक दोन ठिकाणी पडदे लावलेले आणि त्यांमध्ये दोन खाटा. एका बाजूला टेबल. एखादे छोटे स्टूल. इतकी तयारी अशा शिबिरांना पुरते. तेवढी इथे होती.
सप्रे स्वतः सामोरे आले, त्यांनी आम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले. चहापान, किरकोळ नाश्ता इत्यादी सोपस्कार झाल्यावर शिबिर सुरु झाले. जणू हत्तीचे बळ अंगी आलेला मी तडफेने कामाला लागलो. माझ्या दोघी सहकारी स्त्रियाही अशाच जोमाने कामाला भिडल्या. शिबिराचा व्याप फार मोठा नव्हताच. सप्र्यांची संस्था तशी नवीन होती, छोटी होती. सुमारे शंभर-सव्वाशे शिबिरार्थी असावेत. आमच्या नेहमीच्या सवयीच्या मानाने हा व्याप किरकोळ होता. अगदी हा-हा म्हणता तीन तासाच्या कालावधीत जवळजवळ रमतगमत आम्ही हे काम पूर्ण केले. संस्थेचे काही तुरळक स्वयंसेवक होते, तेही मधून मधून प्रोत्साहन देत होते. काही रक्तदाबाचे तर काही हृदयविकाराचे पेशंट होते, त्यांचा इ.सी.जी. काढून काही औषधे सुचविणे, काही वेगळ्या तपासण्या करण्यास सुचविणे अशा स्वरूपाचे काम चालू होते.
‘वा, डॉक्टर, तुमच्या कामाचा झपाटा काही औरच आहे, बर का. आणि तुमच्या दोघी सहकारीसुद्धा कामात अगदी तत्पर आहेत बुवा!’, सप्र्यांनी आमची मधे येऊन मुद्दाम स्तुती केली, तसा मला खूपच अभिमान वाटला. सप्रे खूष झाले, ही माझ्यादृष्टीने मोठी गोष्ट होती.
सर्व पेशंट संपत आले, आता शिबीर संपणार अशा वेळेला संस्थेच्या काही सभासदांनी सप्र्यांनाच आग्रह केला की त्यांनीही स्वतःचीही तपासणी करून घ्यावी. ज्या वयोगटाच्या आणि ज्या प्रकारच्या व्यक्तींची तपासणी आम्ही करत होतो, सप्रे त्यात अगदी फिट बसत होते. एका अर्थाने आपल्या घरच्याच शिबिरात त्यांचीही तपासणी होणे अगदीच सयुक्तिक होते. मलाही ती अभिमानाची बाब वाटली. थोडेफार आढेवेढे घेऊन अखेर सप्रे तयार झाले. त्यांचा केस पेपर बनविला. रीतसर तपासणी केली. माझ्या वहिनीने त्यांचा इ.सी.जी. काढला. तो इ.सी.जी. माझ्यासमोर आला. मी तो पाहिला आणि चकितच झालो. इ.सी.जी.त जे काही बदल दिसत होते, ते पाहू जाता, सप्र्यांना नुकताच हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे निदान स्पष्ट दिसत होते! थोडे खोलात जाऊन मी विचारले, तसे त्यांनी हेही सांगितले की दोनेक दिवसांपूर्वीच त्यांच्या छातीत मधोमध दुखून गेले होते. किचित घाम येऊन एक-दोन ढेकर आले होते. पित्त असेल असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. एकूण प्रकार गंभीर होता. स्वतः सप्र्यांनाच हृदयविकार होता  आणि तोही असा की त्यांना हॉस्पिटलमध्ये शक्यतो अतिदक्षता विभागात दाखल करणे गरजेचे होते. आता त्यांना हे सांगणार कोण आणि कसे? जवळ त्यांचा एकही नातलग नव्हता. ते स्वतः विधुर होते. घरी एकटेच असत. माझा आणि त्यांचा एरवी काहीच परिचय नव्हता.
तिथे काम करणारे जे एक दोघे त्यांच्या संस्थेचे कार्यकर्ते होते, त्यांना मी बाजूला घेतले, परिस्थितीची  कल्पना दिली. तेही बावरले. हे भलतेच धर्मसंकट अंगावर आले अशीच आमची सर्वांची भावना झाली. काही तरी गडबड चालू असल्याची जाणीव एव्हाना सप्र्यांना झाली असावी. त्यांचा चेहरा चौकस आणि गंभीर झाला. प्रश्नार्थक नजरेने मला न्याहाळत ते माझ्याजवळ आले.
‘काही विशेष गडबड? रिपोर्ट ठीक आहे ना आमचा? का आहे हार्टचा प्रॉब्लेम?’ त्यांनी हसत हसत  विचारले. त्यांच्या वरवरच्या हसण्यामागे दडलेली काळजी, भीती मला स्पष्ट जाणवली. काही तरी थातूर मातूर बोलून वेळ मारून नेणे आता शक्य नव्हते. मी मनाचा धीर करून बोलू लागलो, ‘खरं तर, सप्रेसाहेब, तुमचा अंदाज बरोबर आहे. तुमच्या इ.सी.जी.त दोष आहे. हृदयाचा रक्त पुरवठा सदोष आहे तुमच्या. तुम्हाला आय.सी.यु. मध्ये ठेवून तुमच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.’ एका दमात मी सगळे सांगून टाकले आणि प्रतिक्रियेसाठी भीतभीतच त्यांच्याकडे पाहू लागलो.
‘छे,छे, असे कसे शक्य आहे. मला तर काहीच त्रास नाही. अगदी ठणठणीत आहे माझी तब्येत!’, सप्रे म्हणाले.
‘परवाच नाही का तुमच्या छातीत थोडे दुखून गेले होते. तुम्ही मघाशीच मला सांगितलेत. तेच हार्टचे   दुखणे होते. तेव्हा दुर्लक्ष झाले, आता असे करून चालणार नाही. आपल्याला आय.सी.यू. मधे जाणे गरजेचे आहे.’ मी माझा मुद्दा पुढे रेटला.
‘अशक्य! मला वाटतं, तुमच्या इ.सी.जी. मशीनमधेच काही तरी घोटाळा असावा. असे कसे शक्य आहे.’
“इ.सी.जी. मशीन उत्तम आहे. आपण आज शंभरावर इ.सी.जी. काढले आहेत. सगळे चांगलेच आले आहेत. आणि मशीन मधे दोष असेल तर तो वेगळ्या प्रकारचे दोष दाखवतो. हा दोष अगदी व्यवस्थितपणे हृदयात दोष असल्याचे दाखवीत आहे.’
सप्रे अस्वस्थ होऊन खुर्चीत बसले. हाताला किंचित कंप. कपाळावर घामाची छोटी धार. ‘अहो, नीट बघा हो. त्या बाई कोण इ.सी.जी. काढत होत्या. त्या काही डॉक्टर नाहीत ना? त्यांची काही तरी चूक असेल,’ अविश्वासाने काहीसे चिडून माझ्या वहिनीकडे बोट दाखवीत सप्र्यांनी आणखी एक आधार शोधण्याचा प्रयत्न केला. ही म्हणजे गंमतच होती. सगळे काही सुरळीत चालू होते, तेव्हा माझ्या ज्या सहकाऱ्यांची ‘तत्पर’ अशी वाखाणणी ते करत होते, त्यांच्यावरच आता सप्र्यांच्या संशयाची सुई रोखली गेली होती. झालेल्या या हल्ल्याने माझी वहिनीही बिचकली. मीही अस्वस्थ झालो. यावर काही प्रतिवाद करणे मला सयुक्तिक वाटेना. आता पुढचा संशय माझ्या ‘डॉक्टरकी’ वर येणार हे मी ताडले. शांतपणे मान खाली घालून पुढच्या हल्ल्याची वाट पाहणे एवढेच काय ते माझ्या हाती होते.
एव्हाना संस्थेच्या काही सेवकांनी त्यांना खाटेवर झोपवले होते. त्यांना थोडे पाणी पाजले. सप्र्यांच्या हार्ट प्रॉब्लेममागचा गुन्हेगार मी ठरतो की काय अशी भीती आता माझ्या मनात येऊ लागली. असाच काही काळ अनिश्चित गेला. सगळेच शांत. सप्रे एव्हाना धक्क्यातून सावरत असावेत. आपल्या सहकाऱ्यापैकी एक-दोघांना त्यांनी शांतपणे बाजूला बोलाविले. त्यांच्या कानात त्यांनी काही तरी सांगितले असावे. त्यातील एक जण तडकच सभागृहातून बाहेर पडला. त्याचा दुसरा सहकारी हळूच माझ्याजवळ आला, माझ्या कानाशी कुजबुजला. ‘सप्रे सर म्हणतायत, डॉ. बापटांना बोलवा. त्यांचे मत घेऊ.’ माझा जीव भांड्यात पडला. डॉ. बापट हे ज्येष्ठ हृदयविकार तज्ज्ञ होते. आता ही केस ते बघतील. म्हणजे माझी मुक्ती झाली. असा आनंद मला आला.
चिंतातूर सप्रे खाटेवर डोळे मिटून पडलेले. बाजूला माझी वहिनी भयभीत होऊन उभी. पलीकडे माझी बहीण तशाच अचंबित अवस्थेत ताटकळलेली. आणि या सगळ्याचा मध्यबिंदू मी. पूर्ण दुर्लक्षित. मला आमचे तिथे हे असे असणे निरर्थक वाटू लागले.
आमच्या सामानाची आवराआवर करून आम्ही बाहेर पडलो. आमची सहानुभूती वाटणारा एक सहायक आम्हाला बाहेर सोडण्यासाठी आला. आमच्या एका यशस्वी शिबिराची ही अशी अखेर झाली.
त्या दिवशी आम्ही ज्या कुणा पेशंटना आम्ही तपासले, त्यात ज्यांना या तपासणीचा खराखुरा उपयोग झाला ते स्वतः सप्रेच होते. पण केवळ त्यामुळेच ते माझ्यावर नाराज झाले आणि अशा शिबिरातून माझा व्यवसाय वाढेल म्हणावे, तर ते दुसऱ्याच कुणा डॉक्टरचे पेशंट होऊन गेले.
हा दैवयोग म्हणावा की अटळ असा शिबीर-योग?

डॉ. संजीव मंगरूळकर
दूरभाष ९४०५०१८८२०

2 comments:

  1. Read all of you new entries. They are simply good reading. A blog entry on experiences of dealing with other doctors during early days of your practice is superb. I wonder how much the 'percentage system' has been' institutionalized since then!

    ReplyDelete
  2. It is very peculiar trait of leaders. They are convinced they do not get ordinary diseases of ordinary people. More so if they get it they don't want to get treated by ordinary dictors in ordinary hospitals in their ordinary city or their ordinary country ! Good satire.

    ReplyDelete