Friday 29 March 2013

गोची



गोची
मेधा माझ्या दवाखान्यात आली, तेव्हा थोडी बिचकतच आली. आधीचा काही परिचय नव्हता, कुणीसं माझं नाव सुचवलं म्हणून आली. सुमारे तिशीचं वय. सडपातळ बांधा. जीन्स आणि टी शर्ट असा साधारण आधुनिक वाटावा असा पेहेराव. गळ्यात मंगळसूत्र वगैरे नव्हतं, पण विवाहित होती. (हे मला अर्थात नंतरच समजलं, तिच्या बोलण्यातून) ती खोलीत आली तसा मंद असा एक सुवास सर्वत्र पसरला. वातावरण प्रसन्न झालं पण ती प्रसन्नता तिच्या चेहऱ्यावर नव्हती. तिच्या हालचालीत नव्हती. तिथे होता एक अवघडलेपणा. एक उदासीनता. अंगावरचा सुवास हा एक बाह्य उपचार असावा. कृत्रिम वातावरण निर्मितीचा प्रयत्न. निव्वळ एक सवय.

मेधा एकटीच होती. हातात एक पिशवी, त्यात काही फाइली. कागदपत्रं, नीटपणे लावलेली. तिच्यामागे मोठा वैद्यकीय इतिहास असणार, हे माझ्या चाणाक्ष नजरेने मी लगेचच हेरले. इतक्या तरुण वयात एवढा मोठा इतिहास आणि तो घेऊन अशी ही एकटीच?

‘सर, मी मेधा- मेधा पुराणिक. मी अमेरिकेत असते. माझा नवरा आणि मी दोघेही तिथेच असतो. गेले काही महिने, महिने काय, एखाद दुसरं वर्ष म्हणा ना, मला बरेच काही प्रॉब्लेम झालेत. तिकडे अमेरिकेत  माझ्या डॉक्टरांना वेळोवेळी दाखवलं, ते म्हणतील तशा तपासण्या केल्या, पण काही फरक पडेना. तिकडे कसे आम्ही दोघंच असतो, कुणी मदतीला नाही, कसलाच सपोर्ट नाही, म्हणून म्हटलं, इकडे इंडियात यावं, इथल्या डॉक्टरांना दाखवावं, त्यांचं मत घ्यावं. इकडे कसा, मोकळेपणा वाटतो, मोकळेपणानं बोलता येतं आणि मुख्य म्हणजे विश्वास वाटतो. शेवटी इथेच असतात ना आपली माणसं -‘

मी काही विचारण्याआधीच मेधानं असं लांबलचक प्रास्ताविक लावलं. हातातली पिशवी बाजूच्या खुर्चीवर ठेवून ती थोडीशी सैलावून खुर्चीत बसली. अवघड विषयाला एकदाचं तोंड फोडलं की एक प्रकारचा सैलपणा येतो, तसा तो तिला आला असावा.

‘मला असं सांग, नक्की काय काय प्रॉब्लेम्स आहे तुला? काय त्रास होतो?’ मी विचारलं.

‘हा उजवा खांदा दुखतो सर. खूपच दुखतो. पार मानेपासून हाताच्या बोटांपर्यंत दुखतो. इतका दुखतो की अशक्य होतं. कधीकधी जाम मुंग्या येतात, मग हा सगळा हात वरपासून बोटांपर्यंत बधीर होतो, जड होतो. नको नको वाटतं. सगळ्या अंगाला घाम फुटतो. काही सुचत नाही. इतकी अस्वस्थ होते ना मी, की एकेक वेळा वाटतं उपटून टाकावा हा हात म्हणजे तरी शांत वाटेल.’

उद्वेगानं मेधा बोलत होती. ती बोलत होती, मी ऐकत होतो. ऐकताना पाहतही होतो. तिचा उजवा खांदा, हात, हाताची बोटं- सगळं काही ठीकठाक दिसत होतो. बोलताना तिच्या हाताच्या हालचाली व्यवस्थित होत होत्या. कुठे खास काही वेदना नव्हत्या.

‘हा उजवा हात आणि खांदा दुखण्याखेरीज आणखी काही तक्रारी आहेत तुला?’ मी विचारलं.

‘नाही, सर, हे दुखणंच काय ते. पण तेच मुळी इतकं सिविअर आहे ना.’

‘आत्ता ह्या क्षणी पण आहेत का वेदना तुला?’ मी विचारलं.

‘ऑफ कोर्स. सर. इम्पॅासिबल दुखतंय. लुक. पहा ना –‘ असं म्हणून तिनं तिचा खांदा मला हलवून दाखवला. पुन्हा एकदा मी ते पाहिलं. खांद्याची हालचाल अगदी निर्दोष होती. सफाईदार होती. आता चेहरा मात्र थोडा वाकडा होता. वेदना दाखवण्यापुरताच वाकडा.

इतर काही तांत्रिक चौकशी करून नंतर मी मेधाची तपासणी केली. अपेक्षेप्रमाणे तो अगदी नॉर्मल होती. पूर्ण निर्दोष.

तपासणी झाली. मी माझ्या जागेवर परतलो. समोर मेधा. आशेनं माझ्याकडे पाहत असलेली.

‘जरा ते सगळे रिपोर्ट्स बघू.’

मेधानं तिची ती पोतडी उघडली. शिस्तीत लावलेले रिपोर्ट्स. पानंच्या पानं नुसता मजकूर लिहिलेला. एखादा कायद्र्शीर मसुदा वाटावा असा आणि त्याच्या खाली कुठे तरी बारीक अक्षरात मूळ रिपोर्ट. रिपोर्टची  ही खास अमेरिकन पद्धत. पूर्ण वाचून पाहिले तर ते सगळे रिपोर्ट नॉर्मल दिसत होते. पानामागून पानं मी वाचत गेलो. वाचताना बधिरता यावी इतके रिपोर्ट. वेळोवेळी केलेल्या रक्त तपासण्या. हाडांचे एक्स रे, सांध्यांचे एक्स रे, मानेचे एक्स रे. मग मानेचा स्कॅन. नर्व्हच्या तपासण्या. सर्व निर्दोष.

‘सर, आणखीही बरेच रिपोर्ट्स आहेत. पण तिकडे, They don’t give any reports to us. तशी पद्धत नाहीये तिकडे ना. सगळे रिपोर्ट्स डॉक्टरकडेच असतात. कशाबशा ह्या काही प्रती मिळवल्यात मी. ओळखीच्या इंडिअन डॉक्टरकडून.’

सगळे रिपोर्ट वरून खालून धुंडाळून झाले. अशा प्रकारच्या आजारासाठी आम्ही इथे ज्या ज्या म्हणून करू त्या सर्व तपासण्या झालेल्या दिसल्या. पण रोग निदान असे काही कुठे लिहिलेले दिसेना. आजाराच्या उपचाराची म्हणून एक दिशा असते, तीही दिसेना.

‘तिकडे त्यांनी काही निदान केलं असेल ना तुझ्या आजाराचं. काय झालंय काय तुला, त्यांच्या मते?’
‘नाही, तसं काही त्यांनी मला सांगितलेलं नाही. काही व्यायाम सांगितले होते सुरुवाती-सुरुवातीला. आता तेही काही फारसे नाहीत. आता एकच महत्त्वाचा सल्ला दिलाय, कम्प्यूटरचा की बोर्ड वापरायचा नाही. I must never use a computer key board, they say!’

‘पण हे कशासाठी? आणि किती दिवस?’ मला आश्चर्य वाटले. हा सल्ला कशासाठी दिला असावा, नक्की काय हेतू आहे या सल्ल्यामागे, हे समजेना
.
‘म्हणून तर आलीय मी तुमच्याकडे सर, you see, I am basically a computer engineer and I am working as a computer programmer in a company there. आता हा म्हणजे मोठा विचित्रच प्रॉब्लेम होऊन बसलाय. डॉक्टरांचा हा सल्ला कंपनीवर बंधनकारक आहे. त्यांनी माझं कामच काढून घेतलंय, नुसतं बसवून ठेवलंय. रोज कंपनीत यायचं, दिवसच्या दिवस नुसतं बसून राहायचं. How boring, you know!’

‘अरे, बाप रे! किती दिवस चाललंय हे असं?’

‘झाले असतील ना सहा महिने. No work. Only attendance. नुसतं बसण्याचा पगारही मिळतोय मला. अगदी पूर्ण पगार.’

‘पण मग खांदा दुखतोय, त्याचं काय? थांबलाय का तो की दुखतोच आहे अजून?’

‘No, it’s just the same. मघाशी मी म्हटलं ना, जाम दुखतोच आहे अजून. डॉक्टरांना सांगून कंटाळले मी. त्यांचं म्हणणं तेच. Just stop using a key board and wait. Wait. दिवसच्या दिवस काम न करता बसणं. It’s a torture, you know. A horrible torture. सगळा दिवस नुसता खायला उठतो. हताश वाटतं. आपण निरुपयोगी आहोत, कुचकामी आहोत असं वाटतं. आसपासचे सगळे कलीग्ज कामात. मी ही अशी रिकामी. त्यांची तिकडे प्रगती होतेय.  And I am getting rusted, doing nothing.’

ती बोलत राहिली आणि तसं या प्रकाराचं गांभीर्य मला स्पष्टपणे समजू लागलं.

‘खरं सांगू सर, मी अगदी सुरवातीला USA ला गेले ना तेव्हा एकच aim होतं माझ्यासमोर. पैसा मिळवायचा होता भरपूर आणि एक attraction होतं, अमेरिकन life style चं. वाटायचं, एकदा पैसा मिळाला की सगळे प्रश्न सुटतील. I learnt a lesson sir, learnt it bad way. Now I know, पैसा म्हणजे काही सर्वस्व नाही. काहीच नाही. तुम्ही पैसे मिळवता याला महत्त्व असेलही, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तो तुम्ही कसा मिळवता याला. It’s a process of earning money that matters. The work satisfaction. Your self respect. It’s these things that matter.’

मेधा काही क्षण शांत झाली. हातातल्या पर्समधून एक छोटा टिशू काढून तिनं चेहऱ्यावर फिरवला. अभावितपणे घड्याळाकडे पाहिलं. तिनं गरजेपेक्षा जास्त वेळ घेतला की काय अशी अपराधी भावना त्यामागे असावी. पण मला घाई नव्हती. मेधाची केस वेगळी होती. Interesting होती. अशा केसेससाठी वेळच वेळ असतो माझ्याकडे.
‘असं पहा, मी तुझी तपासणी केली आहे. त्यात मला कुठलाही शारीरिक आजार दिसत नाही. तिकडे केलेले रिपोर्ट, तुझ्या मते जरी ते अर्धवट असले, तरी मला निदानासाठी पुरेसे वाटतात. त्यातही मला कुठे शारीरिक आजाराचा लवलेश दिसत नाही. अगदी ह्या क्षणीसुद्धा तू तुझा हात खूप दुखतोय असा दावा करतेस, पण तुझ्या त्या हाताच्या एकूण हालचाली, त्यातली सहजता – कुठेच खास वेदना दिसत नाही मला. माझ्या मते तुझा हा संपूर्ण प्रॉब्लेम मानसिक आहे. शारीरिक नव्हे.’

इतकं बोलून मी थांबलो. जाणीवपूर्वक थांबलो. मी केलेलं हे निदान पचवायला अवघड आहे हे मला माहीत होतं. तिला विरोधासाठी वेळ मिळावा म्हणून मी थांबलो.

‘हे असं कसं शक्य आहे? इतकं तीव्र दुखणं आणि ते मानसिक कसं असेल?’,

‘म्हणजे मी हे सगळं मुद्दाम करतीये, असं का म्हणायचंय तुम्हाला?’  असा कुठला तरी प्रतिवाद मला अपेक्षित होता. एखाद्या गंभीर आजाराचं निदान लोक पचवू शकतात. समजू शकतात. पण आपल्याला काही शारीरिक आजार झालेला नाही, आपण निरोगी आहोत ही कल्पना पचवायला मात्र जड जाते, असा माझा आजवरचा अनुभव. त्यामुळे मी अगदी तयारीत होतो, तिचा विरोध झेलायला. त्यावर प्रतिवाद करायला. पण तसं काहीच घडलं नाही. मान खाली घालून ती अगदी शांत बसून राहिली. पूर्ण निश्चल.

काही क्षण शांततेत गेले. तिनं मान वर केली, थेट माझ्याकडे पाहत विचारलं, ‘इलाज काय पण मग याच्यावर? What do I do next? माझ्या डॉक्टरांचा सल्ला ते बदलणार नाहीत. त्यांना तो बदलायला लावीन अशी कुवत माझ्यात नाही. माझा त्यांच्याशी तेवढा संपर्क नाही. it’s so difficult to see a doctor there. Takes so much of time and money. And trying to communicate something as difficult as that. छे! अशक्य आहे हे सगळं,’ एवढ्या बोलण्याचासुद्धा जणू तिला त्रास झाला. पुन्हा शांतता. मला तिचा उद्वेग दिसत होता. वेगानं चाललेला तिचा श्वास तो दाखवत होता. मीही काही क्षण तसेच जाऊ दिले. यात इतकं अवघड ते काय आहे हे मला समजत नव्हतं.

‘You see, मला समजत नाही, तू एवढी उतावीळ का होतेस? बिन कामाचा पगार तर मिळतोय ना तुला. किती दिवस ठेवतील ते तुला अशी? परवडणारे का त्यांना तरी?’, मी तिला समजावत म्हणालो.

‘नाही, सर, त्यांची भीती वेगळीच आहे. मला काढलं तर मी नुकसान भरपाईसाठी दावा लावीन अशी भीती वाटते त्यांना. त्यांच्या कामामुळे मला हा आजार झाला असा दावा मी केला तर? ही भीती आहे त्यांच्या मनात. हा दावा फार महाग पडतो तिकडे. त्यापेक्षा मला असं पाळलेलं परवडेल त्यांना. ते माझ्या थकण्याची वाट पाहतायत. मीच कंटाळावं आणि जॉब सोडवा, अशी इच्छा असावी त्यांची.’

‘हात्तिच्या, मग एवढी वाट तरी कशाची पाहतेस? दे की सोडून हा जॉब. हो मोकळी आणि शोध नवीन जॉब!’
‘ते तरी कुठे सोपं आहे सर. ते तर आणखीनच कठीण आहे. आता ही माझी मेडिकल हिस्टरी, आधीच्या जॉब वरचा हा प्रॉब्लेम, सगळं उघड असतं हो तिकडे. Where do I hide it all? कोण देईल मला जॉब तिकडे?’

अच्छा, काय अडाणी मी तरी, तिची खरी अडचण आता कुठे मला थोडी थोडी कळायला लागली होती. म्हणजे, हा जॉब करावा तर हे असे हाल आणि तरी तो सोडायची सोय नाही कारण पूर्ण पारदर्शकता. ते तिला काढणार नाहीत आणि ती त्यांना सोडू शकत नाही - ही अशी गोची होऊन बसली होती तर. आणि हे सगळं एखाद्या शारीरिक आजाराशी निगडीत असतं, तरी ठीक होतं. त्याला त्याचा एक अंत तरी असता, तो बरा होण्याची काही तरी कालबद्ध शक्यता असती. हा म्हणजे एक कालातीत खेळच होणार जणू. एका नसलेल्या आजाराची सांगता कशी व्हायची आणि त्यातून तो मला वाटत होता तसा हा जर मानसिक आजार असेल, तर अशा वातावरणात तो आणखी खराबच होणार. तिला आज खरं तर गरज होती एका सक्षम मानसिक आधाराची. तिला समजून घेईल असं कुणीतरी तिथं असायला हवं होतं. वेळोवेळी तिला प्रोत्साहन देईल अशा कुणाची तरी गरज होती. कशी भागावी ही गरज? आर्थिक वैभवाच्या जणू शिखरावर असलेला हा देश, व्यक्तिस्वातंत्र्याचा घोष उच्चरवाने जगात करणारा हा देश. विज्ञानाची कठोर आस बाळगणारा हा देश, त्यांच्या वैद्यकीय व्यवस्थेत ही लवचिकता कुठून येणार?

एक तज्ज्ञ डॉक्टर म्हणून मी टेबलाच्या एका बाजूला बसलेलो आणि समोर मेधा. माझा सल्ला ऐकायला उत्सुक. काय सल्ला देऊ शकत होतो मी तिला?  काय उत्तर असणार होते माझ्याजवळ. असं थोडंच सांगू शकत होतो, बाई गं, तू आजारी आहेस हे मान्य आहे, पण खरं आजार आहे तो या व्यवस्थेत. ही व्यवस्था, जिला बळकट करण्यात आपण सारेच सहभागी आहोत, जी अभेद्य आहे आणि ती तशी आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आज अमेरिका प्रगत आहे असं आपण म्हणतो कारण तिची ही व्यवस्था बळकट आहे, म्हणून  तिचाच तर त्यांना अभिमान आहे. तिचाच आपण सर्वांना हेवा वाटतो. ती कोण बदलणार?  खरं तर ही शिकण्याची वेळ होती माझ्यासाठीच. आपणा सर्वांसाठीच.

आणि खरं सांगू? आमची, आमच्या या देशाची एकूण व्यवस्था इतकी बळकट नाही याचा मला तेव्हा प्रथम अभिमान वाटला. वेळ आली तर आम्ही या व्यवस्थेच्याही हातावर तुरे ठेवू शकतो, हे चांगलेच आहे नाही का?


डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०.

Saturday 16 March 2013

मुलाखत



मुलाखत
मुख्य इमारतीचॆ बांधकाम चालू होते. त्या इमारतीच्या बाहेर दुसरी एक तात्पुरती शेडवजा किरकोळ बांधकाम केलेली छोटी एक मजली जागा होती. बाहेरच्या बाजूला साधारण ऐसपैस वाटावा इतपत मोठा व्हरांडा होता, तीनही बाजूंनी खुला असलेला, हवेशीर. सगळ्या डॉक्टर मंडळींच्या मुलाखती तिथे होणार होत्या. मुलाखतीची मला सांगितलेली वेळ सकाळी नऊची होती आणि आत्ता सकाळचा नऊ-सव्वा नऊचा सुमार असावा. पण तरीही मी तिथे पोचलो तेव्हा तिथे पोचणारा बहुतेक पहिलाच इच्छुक डॉक्टर असणार. माझ्याशिवाय इतर कुणीच तिथे आलेले दिसत नव्हते. नाही म्हणायला, सफाई करणारी एक स्त्री इकडे-तिकडे करत होती. बसायच्या सगळ्या खुर्च्यांवर ती हलक्या हाताने फडके मारत होती. जमिनीवरही तिने नुकताच पोछा मारला असावा. त्याची एक प्रकारची ओल तिथे जाणवत होती. ओळीने मांडून ठेवलेल्या पंधरा एक खुर्च्या, बाजूला एक छोटे स्टूल, त्यावर एक पाण्याचा जग ठेवलेला. आम्हा मुलाखतकारांसाठी हीच वेटिंग रूम असणार, हे मी ताडले. थोडासा बिचकतच पुढे झालो. त्यातल्याच एका खुर्चीच्या दिशेने जात राहिलो. बाईशी बोलावे की न बोलावे, बोलावे तर काय बोलावे आणि कुठल्या भाषेतून? आणि ती थोडीच कुणी जाणकार इसम असणार? इथे काही डॉक्टरांच्या मुलाखती होणार आहेत, त्यातून या नव्या हॉस्पिटलचे नवे डॉक्टर नेमले जाणार आहेत, इतके सगळे थोडेच तिला माहित असणार? काय उपयोग आहे तिला काही विचारून? काही गरज नाही तिच्याशी काही बोलण्याची, तिला काही विचारण्याची. बाहेरच्या सुरक्षा कामगाराने ज्याअर्थी इथे जायला सांगितले आहे, ज्याअर्थी इथे पंधरा खुर्च्या आहेत, ज्याअर्थी इथे ही स्वच्छता चालू आहे आणि मुख्य म्हणजे ज्याअर्थी इथे दुसरी कुठलीच पूर्ण बांधलेली इमारत किंवा खोली नाही त्याअर्थी आमच्या मुलाखती इथेच होणार हे अगदी सूर्य-प्रकाशाइतके स्पष्ट असताना हिला विचारण्याची गरजच काय? असा विचार करत मी लटक्या आत्मविश्वासाने पुढे झालो. सरळ एका खुर्चीवर बसलो. बाईने काहीच प्रतिक्रिया दिली नाही, माझ्याकडे पाहिले नाही. आपले काम निर्विकारपणे चालू ठेवले. याचा अर्थ, माझे तिथे येणे, तिथे बसणे तिला मान्य असणार, म्हणजे मुलाखती इथेच होणार. वाः! काय अंदाज आहे! काय तर्कशास्त्र आहे! एक अचूक रोग निदान केल्याचा आनंद मला झाला.

काही न बोलता मी खुर्चीत बसून राहिलो. बांधकाम जवळजवळ पूर्ण झालेली अशी नवीन हॉस्पिटलची इमारत समोरच होती. ती न्याहाळत बसलो. सहा-सात मजली तरी बांधकाम असावे. बाहेरून गिलाव्याचे काम चालू होते. मजल्या-मजल्यांवर कामगारांची तुरळक वर्दळ सुरु झालेली होती. डोक्यावर चकचकीत शिरस्त्राणे घातलेले कामगार आत येऊ लागले होते. त्यांच्या बाजूबाजूने कामावरल्या बायका, कुणाची बारकी पोरे त्यांच्या कडेवर तर कुणाची पोरे त्यांच्या मागेमागे धावत पळताहेत. सगळे एखाद्या अदृश्य दोरीने जणू खेचल्यासारखे त्या इमारतीकडे चाललेले. बाहेरच्या या गडबडीच्या तुलनेत मी बसलो होतो त्या जागेवरचा थंडपणा अगदी अंगात भिनावा इतका ताकदवान होता. पुढे येऊ घातलेल्या मुलाखतीचा ताण जर नसता, तर तिथेच ताणून झोप येईल असा तलम थंडावा होता तिथे. पण हे सगळं फक्त काही मिनिटेच टिकलं असणार. अचानक तिथली वर्दळ वाढू लागली. कचेरीतील कारकून वाटावेत असे दोघे जण कुणी तिथे आले. थेट आतल्या खोलीत जाऊन त्यांनी एक फाईल मिळवली. त्यातली पानं चाळत गंभीर चेहऱ्यानं ते एकमेकात बोलू लागले.

‘गंगूबाई, जगमध्ये पाणी भरलं का?’

‘गंगूबाई, तो पंखा चालू करा आधी.’  एकामागून एक आदेश देत त्यांनी चांगली वातावरण निर्मिती केली.

इतके होईतो त्यांची नजर माझ्यावर पडली. माझ्याकडे बघत, जवळ येत त्यांनी चौकशी केली, ‘गुड मॉर्निंग सर, आपलं नाव?’

मी सांगितलं. पुन्हा एकदा फाईलमधे डोके घालून त्यांनी खातरजमा केली.

‘मेडिसिन ङिपार्टमेंटसाठी अर्ज आहे ना तुमचा?’

मी मान हलवून होकार दिला.

‘बसा सर. ते काये, एक दोघा विश्वस्तांना थोडा उशीर होणारेय, तेव्हा सगळं काम थोड्या उशिरानेच सुरु होणार. तुम्ही बसा, आता होईलच इतक्यात चालू.’ त्यांनी मला दिलासा दिला.

मीही थोडा सैलावलो. हक्कानं खुर्चीवरच जरा पसरून बसलो.

आता घटना वेगाने घडू लागल्या. गळ्यात टाय अडकविलेले कुणी दोघे इंग्रजी संवाद करत लगबगीने आत आले. माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत पलीकडच्या दोन खुर्च्यांवर बसले. त्यांची आपसात अखंड बडबड चालू होती. ते इथल्या वातावरणात सरावलेले असणार. आपलीच निवड होणार याचा आत्मविश्वास त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होता. एक दोन वेळा त्यांनी त्या कारकुनाशी संवाद केले.
‘लेट ना? आजही, नेहमीप्रमाणे? झंवरसाहेबांमुळे असणार. साहेब बिझी. सक्काळी सक्काळी सुद्धा!’
असे म्हणत त्यांनी एकमेकाकडे पाहत डोळे मिचकावले. हसल्या न हसल्यासारखे करत कारकून मात्र आपल्या कामात राहिला.

एव्हाना आणखीही बरेच डॉक्टर आलेले होते. बरेचसे वयाने माझ्यापेक्षा मोठे असणार. माझ्या ओळखीचे कुणी फारसे दिसत नव्हते. ते बहुतेक एकमेकांना ओळखत असणार. एकमेकांशी हस्तांदोलन करीत, कधी एकमेकांच्या पाठीवर थापा टाकत तर कधी एकमेकांना टाळ्या देत त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.

‘काय राव, इथेही तुम्ही आहातच का? एखादं तरी हॉस्पिटल सोडा ना आमच्यासाठी? जिकडे पहावं तिकडे तुमच्याच नावाच्या पाट्या. आमच्या सारख्यांची परिस्थिती अवघड करून सोडता राव तुम्ही मंडळी म्हणजे!’

‘पण तुम्ही त्या डायमंड हॉस्पिटलला असता ना. मग तिथली ओ. पी. डी. शिवाय छोट्या छोट्या हॉस्पिटलमधल्या अॅडमिशन आणि मग संध्याकाळी प्रायव्हेट मधे. ग्रेट. बरं जमतं तुम्हाला इतकं सगळं.’

‘नवीन हॉस्पिटल होतंय. इतकं मोठं हॉस्पिटल एकदम नव्यानं सुरु होणार. जरा वेगळा अनुभव. म्हटलं भेटून तर घेऊ. फार कंजूष आहेत म्हणे हे लोक. शिवाय कास्ट, रीजन असल्या भानगडी पण फार आहेत म्हणे. पण मी म्हणतो, कुठे नाही हो हे? सगळेच बघतात आपापल्या लोकांकडे. आपलेच लोक दळभद्री. जमेल तसे पाय ओढणार आपल्याच लोकांचे. बुद्धिजीवी ना. हुशार माणसं आपण.’
मी ऐकत होतो. इतक्या मोठमोठ्या लोकांबरोबर आपला काय पाड लागणार. कोण घेईल आपल्याला इथे. दोन वर्ष सुद्धा नाही झालेली प्रॅक्टीस चालू केल्याला. ना कुठली ओळख. ना देख. नाही म्हणायला, कुणा एका राठी नामक विश्वस्ताची अगदी दूरची ओळख काढली होती, पण हे राठी कोण, कुठले हेही मी पाहिले नव्हते. समोर आले तर एकमेकांना ओळखण्याचीसुद्धा पंचाईत. पण अशा ठिकाणी जाताना अगदीच बेवारस वाटू नये म्हणून म्हणायची असली ती ओळख, लज्जारक्षणार्थच केवळ.

मी शून्यात बघत होतो. तर मागून पाठीवर थाप आली.

‘वाटलंच मला, तू इथे असणार म्हणून. मागच्या त्या पी टी हॉस्पिटलमधल्या मुलाखतीनंतर आजच भेट, नाही का?’

मागे बघतो, तर आमोद. माझा मित्र, एक थोर सर्जन. पहिल्या वाक्यातच त्याने माझ्या जखमेवरची खपली काढली. नको तिथे नको त्या आठवणी काढण्यात हा महा-पटाईत. पी टी हॉस्पिटलच्या आघाडीवर पराभूत झालेले आम्ही दोघेही योद्धे, पण त्याची ही आठवण इथे अशी चारचौघात आणि तेही अशा उच्चभ्रू चारचौघात काढण्याची काय गरज होती?

मी काही बोलणार तोच आमोद एकदम शांत झाला, गंभीर चेहेऱ्याने समोर पाहत राहिला. कोपराने त्याने मला एक सणसणीत झटका दिल्याचा भास मला झाला. झटका असा जोरदार होता की मी ताडकन उभाच राहिलो. त्यासरशी माझ्या अगदी कानाला लागत आमोद पुटपुटला, ‘समोर बघ, लेका, झंवर शेट आलेत. बघ. बघ. आणि नीट उभा राहा ताठ.’

कसाबसा हेलपाटत मी उभा राहिलो. अंगावर कडक परीट घडीचा झब्बा, तसेच शुभ्र धोतर, गोल चेहेरा आणि त्यावर नजाकतीने चढवलेली चष्म्याची फ्रेम, सोन्याच्या काड्यांची. गळ्यात सोन्याची माळ. बोटांवर  हिऱ्यांच्या अंगठ्या. मी माझा तोल सावरण्याच्या तारांबळीत होतो आणि तोच ही गडबड इतकी झाली की त्या अंगठ्या किती होत्या ते मात्र मी मोजू शकलो नाही. त्यातल्याच एका अंगठीशी नाजूकपणे खेळत झंवर शेट आले. ते आले तर तिथल्या हवेचा नूरच पालटला. मागे पुढे धावणारे दोन हुजरे. त्यामागे आणखी दुय्यम हुजरे. असे ते झंवर शेट आले. कसे आले, कुटून आले तेही कळू नये, असे ते आले. अवतरलेच चक्क. त्यांचा चालण्याला योग्य इतकाच वेग होता. चेहऱ्यावर योग्य इतकेच स्मित होते. आम्हा सर्व उपस्थित डॉक्टरांकडे योग्य इतकेच दुर्लक्ष करीत ते पुढे पुढे चालत होते. आले ते थेट आतल्या खोलीच्या दरवाजापाशीच पोचले. कुणी तरी वेळीच तो दरवाजा त्यांच्यासाठी उघडून धरला, यंत्रवत् तत्परतेनं. शेट आत गेले. दरवाजा पुन्हा बंद झाला आणि वातावरणातला ताणही सैल झाला. अगदी पहिल्याइतका नाही, तरी बराच मोकळेपणा आला. मंद मंद आवाजात बातचीत सुरु झाली, कुठे कुठे दबलेले हसू ऐकू येऊ लागले.

‘झंवर शेट म्हणजे इथले मुख्य विश्वस्त, डोनर अर्थात सर्वेसर्वा आहेत, माहित्ये ना?’ इति आमोद.

‘माहित्ये रे,’ मी म्हणालो, इतक्यात इतरही बरीच मंडळी लगबगीने आत येताना दिसली. पुन्हा एकदा तोच झपाटा. तोच वेग आणि तेच सार्वत्रिक दुर्लक्ष आणि मग दरवाजाची उघडमीट. हे इतर विश्वस्त असावेत. हे मी चाणाक्षपणे ओळखले. एव्हाना सर्व स्थिरस्थावर होते असे वाटणार तोच डॉ. अगरवाल आले. त्यांचा वेग मात्र तुलनेने खूपच कमी होता. अंगावर पाश्चात्य पद्धतीचे कपडे. चेहऱ्यावर सुशिक्षित हसू. एकूण  हालचालीमध्ये लक्षवेधक सफाई. डॉ. अगरवाल म्हणजे अगदी आघाडीचे फ़िजिशिअन. त्यांच्या नावाचा दबदबा शहरभर असलेला. कित्येक हॉस्पिटलमध्ये यांचे पेशंट असत. त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्येही कित्येक पेशंट यांचेच असत. डॉ. अगरवाल आले, तसे आमच्यातले कित्येक डॉक्टर पुढे झाले. डॉक्टरांशी बोलण्यासाठी, त्यांच्याशी हात मिळविण्यासाठी एक प्रकारची चढाओढच जणू सुरु झाली. डॉक्टरांनीही कुणाला नाराज केले नाही. कित्येकांच्या हातात हात देत, कित्येकांवर त्यांच्या खास स्मिताची मोहिनी टाकत ते संथपणे पुढे पुढे आले. ‘हॅलो, एव्हरी बडी’, असे म्हणत त्यांनी आपली मान दिमाखदार प्रकारे डोलावली. आतल्या खोलीचा दरवाजा त्यांनी आपल्या हाताने उघडला आणि ते खोलीत अदृश्य झाले.

‘डॉ. अगरवालना ओळखतोस की नाही? तेच तुला पारखणार आहेत माहित्ये ना? काही ओळख बिळख काढलीस की नाही?’ आमोदचे भेदक प्रश्न सुरु झाले. उगीचच शरमल्यासारखे वाटून मी दुर्लक्ष करीत राहिलो.

‘तुझं काही खरं नाही गड्या. हे बाकीचे सगळे बघ, कसे जानपछानवाले आहेत. बघ, कसे पुढे पुढे करतायत. ते चालले बघ तुझ्या पुढे, पुढे’ आमोद काही सोडेचना.

‘अरे, तू तुझं पहा ना, माझ्या का मागे लागतोस,’ म्हणत मी त्याला फटकारणार तोच पुकारा झाला- ‘डॉ. ठिगळे –‘ कुणा डॉ. ठिगळ्यांना मुलाखतीचे निमंत्रण मिळाले. डॉ. ठिगळे हसत हसत दरवाजा उघडून आत गेले आणि मग एका मागून एक नावांचा पुकारा होऊ लागला.

डॉ. दामले, डॉ इनामदार –

प्रत्येक पुकाऱ्यासरशी कुणी तरी उठे, आत जाई आणि थोड्याच वेळात हसत हसत जणू यशस्वी होऊन बाहेर पडे.

बाहेरची गर्दी कमी कमी होत चालली तसा माझ्यावरचा ताण वाढत चालला. एखाद्या परीक्षेला चालल्यासारखे मला वाटू लागले. किती वेळ हा खेळ चालणार असा विचार मनात आला. तोच माझ्या नावाचा पुकारा झाला. तो झाला तेव्हा मी भानावरच नव्हतो जणू. आमोदनं कोपरानं पुन्हा एकदा ढोसलं तेव्हा कुठं मी अचानक भानावर आलो. माझी बॅग कशीबशी उचलली, तो प्रख्यात दरवाजा उघडला आणि आतल्या खोलीत पाऊल टाकले.

बाहेरून वाटले, त्यापेक्षा खोली बरीच मोठी होती. एक लंबगोल टेबल आणि त्याभोवती खुर्च्या अशी मांडणी. टेबलाच्या एका टोकाशी एक खुर्ची होती. ती रिकामी होती. त्याअर्थी ती उमेदवारासाठी असणार. मी तिथे उभा राहिलो. वाट पाहत. कुणी तरी ‘बसा’ असे म्हणेल अशा अपेक्षेत. खोलीभर शांतता पसरलेली. मगाशी गंगूबाईंनी चालू केलेल्या पंख्याचा काय तो आवाज होता. मंद लयीतला. खर्जातला.

‘बसा, ना बसा, तुम्ही.’ कुणी तरी बहुधा मलाच म्हटले. कुठून आवाज आला, कुणासाठी आला हे कळायच्यासुद्धा आत मी खुर्चीवर बसलो. खोलीत उभा असा मी एकटाच असल्याने ते मलाच उद्देशून असणार असा तर्क मी केला असावा. पण हा विचारही माझ्या मनात नंतर आला. नंतर म्हणजे अगदी नंतर, मुलाखत पूर्ण झाल्यावर मी जेव्हा त्या सगळ्या प्रसंगाची उजळणी माझ्या मनाशी केली तेव्हा आला. त्यावेळी मी फक्त बसलो.

संपूर्ण अपरिचित असे दहा पंधरा चेहरे आपल्यासमोर. आपल्याकडे पाहत असलेले. न्याहाळत असलेले. त्या नजरा इतक्या टोकदार की जणू तलवारीच आत आत खोलवर खुपसलेल्या. त्यातले कुणी दबलेल्या आवाजात आपसात बोलताहेत. कुणी कुठल्याशा फाईलमधे डोके खुपसून निवांत. तर कुणाची नजर पार आढ्याकडे किंवा आढ्याच्याही पार पल्याड अंतराळाकडे लागलेली. मी सगळ्यांकडे पाहत होतो. यात कुणी राठी असतील का, असले तर मदतीला धावतील का असा विचार करीत.

‘हा, तर तू काय फ़िजिशिअन आहेस वाटतं.’ कुणी तरी म्हटलं.

मी भानावर आलो. पाहिलं तर डॉ अगरवाल बोलत होते आणि हे नक्कीच मला उद्देशून होतं.

‘हो सर.’

पुन्हा एकदा फायलींचा, कागदांचा फडफडाट. खुर्च्यांमध्ये काही चाळवाचाळव. सगळ्या सदस्यांनी बहुधा फायलीतले माझ्या नावाचे पान काढले असावे.

‘एम. डी. कधी झालास तू?’

‘दोन वर्ष झाली सर.’

‘आणि करतोस काय सध्या?’

‘प्रायव्हेट प्रॅक्टीस करतोय, सर’.

‘इतर काही हॉस्पिटल अॅटॅचमेंट्स् वगैरे?’

अशी काही जुजबी प्रश्नोत्तरे सुरु झाली तोच कुणी तरी जणू शोध लावला,

‘यांना एम. डी त गोल्ड मेडल आहे वाटतं’

मीही एकदमच भानावर आलो. खरंच की, हे मी जणू विसरलोच होतो की काय. बरं झालं कुणी तरी हे लक्षात आणून देतंय. हे राठीच तर नव्हेत? मी इकडे तिकडे पाहू लागलो. आवाज कुठून आला होता ते कळेना. पण तेव्हढ्यात डॉ. अगरवाल पुन्हा बोलू लागले.

‘Yes, I have noted that. तो मघाचा candidate कोण, तो. दामले का कोण, त्यालाही गोल्ड मेडलच होतं. हल्ली म्हणजे असं झालंय ना की बघावं त्याला मेडल मिळतं की काय कोण जाणे’ अगरवाल असं म्हणाले. हे म्हणताना त्यांनी त्यांच्या खास शैलीत डोळे मिचकावले. शेजारच्या खुर्चीवर जे कोण बसले होते त्यांच्या मांडीवर जोरदार आणि प्रेमळ थाप टाकली आणि जोरजोरात हसत त्यांनी माझ्यावर नजर टाकली. त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू आणि मी जणू जन्मजात बधीर. प्रत्युत्तर द्यायला पूर्ण असमर्थ. एकूण परिस्थिती तंग झाल्यासारखी वाटली. पण अगरवालांना हसू आवरेना. आपल्या विनोदावर ते प्रचंड खूष होते. कसेबसे हसू आवरत ते माझ्याकडे पाहत थांबले, रुमालाने आपले हसरे डोळे त्यांनी पुसले आणि सहानुभूतीने माझ्याकडे पाहत ते म्हणाले, ‘Oh, I hope you know it, I never meant to hurt you. I was just joking.’

काही सेकंद गेले असतील नसतील, आसपास शांतता होती. वरच्या पंख्याचा एक मात्र आवाज होता आणि तो आता मला घणाघातासारखा वाटत होता. आसपासच्या वातावरणात एक प्रकारचा ताण होता असे मला वाटत होते. तो तसा नसावा अशी माझी इच्छा होती. पण यावर मी काय करू शकत होतो. डॉक्टरांच्या विनोदावर मीही जुजबी हसल्यासारखे केले आणि दुसरीकडे पाहत राहिलो.

‘डॉक्टर, आम्हाला एक सांगा, तुमच्या नावानं किती खाटा ठेवायच्या आम्ही या हॉस्पिटलात?’ हा प्रश्न कुणा वेगळ्याच ठिकाणाहून आला होता. प्रश्नाचा रोख मला समजेना.

‘किती खाटा? म्हणजे? सॉरी, मी समजलो नाही.’ मी तिकडे पाहत म्हणालो.

‘डॉक्टर, आपलं हॉस्पिटल नव्यानं सुरु होणार. ते चालायचं तर हॉस्पिटलला पैसा लागणार. कुठून यायचा हो हा पैसा. आपल्या खाटा भरतील तर येतील पैसे ना. म्हणून म्हणतो किती खाटा टाकायच्या तुमच्या नावावर. तेवढ्या भरवायची जबाबदारी तरी तुम्ही घ्यायला पाहिजे ना?’

अरे बाप रे, हा प्रश्नच मला पूर्ण नवीन होता. हॉस्पिटलच्या बेड भरण्याची जबाबदारी डॉक्टरने घ्यायची? छे, हे अशक्य होते. एक तर माझाच व्यवसाय नवीन. पेशंटच्या शोधात फिरणारा मी. ते मला मिळावेत म्हणून हॉस्पिटल हवे तर हॉस्पिटलच मला पेशंट मागते. मला हा विरोधाभास वाटला, विनोद वाटला. पुन्हा हसून वेळ मारून न्यावी म्हणून मी केविलवाणे हसू लागलो. पण ही गोष्ट हसण्याची नसावी. गंभीर असावी.

“हॉस्पिटलमध्ये खाटा किती भरवेन हे मी कसे सांगू? मी एवढी खात्री नक्की देतो की मी माझ्याकडे येतील त्या पेशंटना जास्तीत जास्त चांगले उपचार करीन, चांगली सेवा देईन. याचा फायदा होऊन हॉस्पिटलमधल्या खाटा भरतील.’

माझ्या मते माझा तर्क सुसंगत होता. मुख्यतः नैतिक होता. त्याचा प्रतिवाद करणे शक्य होणार नव्हते.

‘डॉक्टर, तुम्ही काय आणि कशी सेवा देता, याच्याशी हॉस्पिटलला काय घेणे आहे? तो विचार पेशंट करतील. आम्हाला फक्त आकडा हवा, किती खाटा ठेवायच्या तुमच्या नावानं? बोला, आकडा सांगा, मग करू विचार.’

हा प्रश्न जणू अखेरचा होता. आकडा सांगितल्याशिवाय मुलाखत पुढे सरकणार नव्हती आणि असा काही आकडा देणं माझ्या ताकदी बाहेरचं होतं आणि शिवाय ते मला खूप अनैतिक आणि हीन वाटत होतं.

मी शांत बसलो. या पलीकडे काही बोलणं मला शक्य नव्हतं आणि या पलीकडे विचारण्याजोगा प्रश्नही त्यांच्याकडे नव्हता बहुतेक. कारण मग सगळेच शांत बसलेले. माझ्या ओळखीचे म्हणावे असे कुणीच राठी नव्हते बहुधा त्यांच्यात.

पुन्हा एकदा असह्य शांतता सर्वत्र पसरली. तोच तो पंख्याचा निर्विकार आवाज. किती वेळ गेला कुणास ठाऊक.

'All right, तुम्ही जाऊ शकता,’ कुठून तरी आवाज आला.

मी उठलो आणि शांतपणे खोलीबाहेर पडलो. 


डॉ.संजीव मंगरुळकर 
दूरभाष: ९४०५०१८८२० 

Friday 1 March 2013

फसवणूक



फसवणूक
कॉलेजकडे जाणारा रस्ता चढाचा होता. सकाळचे नऊ वाजायला आलेले. लेक्चरला उशीर होणार बहुतेक अशा भीतीने जिवाचा पार आटापिटा करत सायकल ताणत होतो. पेडलवर उभा होत दोन्ही बाजूंना झुकत सगळ्या शरीराचं वजन टाकत गाडीला वेग देत होतो. अशा वेळेला नेमकी रस्त्यावर मरणाची गर्दी असते. रहदारीशी आट्य़ापाट्य़ा खेळत वाट काढावी लागते. एखाद्या तीरासारखा कॉलेजच्या फाटकातून आत घुसलो. वाहनतळावर सायकल लावली. कॉलेजच्या जिन्याच्या दिशेने पळतच निघणार तर पाठीवर जोरदार थाप पडली. इतकी जोरदार आणि अनपेक्षित की पार हेलपाटलोच मी. ही काय आफत म्हणून बघतो तर सम्प्या. तोंड फाकवून दातांचं प्रदर्शन मांडीत माझ्याकडे पाहून विस्तीर्ण हसत असलेला. थोडा वैतागलोच.

‘अरे, चल जाऊ दे ना लवकर. तिकडे मॅडमनी लेक्चर सुरुसुद्धा केलं असेल. चल चल, जाऊ या. उशीर झाला तर त्रास देते राव ती.’ असं म्हणत मी त्याला बाजूला सारत पुढे पळू लागलो. 

‘गुड न्यूज, नो लेक्चर टुडे.  मॅडम आलेल्या नाहीत, येणारही नाहीत. अर्थात आनंदी आनंद गडे. आक्खी सकाळ रिकामी. एवं च पळणे नको. जिवाला त्रास नको.’ माझ्या जवळ येऊन खांद्यावर हात टाकून संप्यानं मला पार आवळलंच.

लेक्चर नाही म्हटल्यावर नाही म्हटलं तरी एक सैलपणाची भावना माझ्या मनात आली. संप्याविषयी प्रेम वाटू लागलं. आसपास सगळीकडे संगीत वाजतंय असं वाटू लागलं. कॉलेजच्या कट्ट्यावर बसलो. आनंदभरानं आसपास पाहत होतो. केवढा तरी आनंद होता चहूकडे. आमच्या वर्गातली आनंदी मुलं ठिकठिकाणी बागडत होती. समोर आमचं हॉस्पिटल होतं. तेही किती आनंदात होतं. एरवी खरं तर त्या हॉस्पिटलकडे मी नीटपणे पाहिलंसुद्धा नव्हतं कधी. मेडिकलच्या दुसऱ्या वर्षाची सुरुवात. अजून हॉस्पिटलमधल्या टर्मची सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे हॉस्पिटल आतून नीट बघण्याची वेळच आली नव्हती. हॉस्पिटलची ती अक्राळविक्राळ इमारत दुरून पाहून होतो. तिथली ती भीषण गर्दी आमच्या कॉलेजमधूनही दिसत असे, जाणवत असे. अशी गर्दी की ती नुसती दुरून पाहिली तरी छाती दडपायची. नको वाटायचं. ती गर्दी नुसती दिसायची असे नाही तर त्या गर्दीला एक वासही असायचा. घामाचा, घाणीचा, गरीबीचा की नुसत्या वेदनेचा, कळायला खूप अवघड होतं. तो वासही अगदी इतका दूरवर आमच्या कॉलेजपर्यंत यायचा. एकेक वेळेला शिसारी वाटायची, त्याची सवय व्हायची होती अजून. पण आज तेच हॉस्पिटल मला आनंदी दिसू लागलं, आनंदी पेशंट, आनंदी सिस्टर्स. सगळा आनंदच सगळीकडे. बिनलेक्चरचा सार्वभौम आनंद.  

कट्ट्यावर बसून मी मोकळा आनंद उपभोगत होतो. शेजारी संप्या. माझ्यासारखाच आनंदमार्गी! किती वेळ गेला ठाऊक नाही. अचानक संप्याला आठवण आली.

‘तब्येत बरी नाही राव माझी. घसा खवखवतोय. ताप येणारे बहुतेक. चल. येतोस? हॉस्पिटलला जाऊ. औषध आणू.’ संप्या म्हणाला. 

‘अरे, हे काय भलतंच. हॉस्पिटलमधे जायचं? राजा, मला तर काहीसुद्धा माहीत नाही तिथलं, कधी आतसुद्धा गेलो नाहीये. कुठली ओ.पी.डी. कुठाय, पेपर कसा काढायचा, कुणाला भेटायचं- काहीसुद्धा माहिती नाही. काय बोअर आयडिया काढलीयेस. म्हणे हॉस्पिटलमधे जाऊ! त्यापेक्षा कँटीन परवडलं. चल. एक कप चहा टाकू. मी विरोधाचा माफक प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग होणार नव्हता. संप्यानं सगळं काही जणू ठरवलंच होतं. 

‘चल, चल. मला माहीत्ये रे सगळं. एक-दोनदा गेलो पण आहे मी तिकडे. काय विशेष अवघड नसतं रे त्याच्यात. तुला माहीत्ये का, आपण विद्यार्थी आहोत ना कॉलेजचे, आपल्याला फुकट असतं सगळं. नुसता एप्रन टाकायचा अंगावर आणि चलायचं पुढे पुढे. जाम भाव असतो राव या एप्रनला, माहित्ये? चल चल.’

माझा नाईलाज झाला. एप्रन अंगावर चढवला आणि निघालो मागे मागे संप्याच्या मार्गदर्शनाखाली. संप्या पहिल्यापासून थोडा जास्त शहाणा होता, धाडसी होता, इतपत मला माहीत होतं. चला, तेवढाच त्या निमित्तानं हॉस्पिटल सफरीचा अनुभव गाठी बांधू या असा व्यावहारिक विचार मी केला आणि हॉस्पिटलमधे घुसलो. 

हॉस्पिटलच्या आवारात पाऊल टाकलं मात्र, तिथली एकूण परिस्थिती जाम अंगावर आली. लांबून जाणवलं तो मघाचा आनंद पार कुठच्या कुठे पळालाच जणू. कुणी तरी सरळ सरळ अंगावर हल्ला करावा असं वाटलं. माणसांचा महासागर. मळक्या कपड्यातली माणसं. दाढीवाली माणसं. लुंगीवाली माणसं. धोतरातली, पायजम्यातली माणसं. तशाच वेगवेगळ्या ग्रामीण पेहरावातील बायका. कुणी शेंबडी पोरं आयांच्या कडेवर घाबरून बसलेली किंवा आयांच्या बोटांना चिकटलेली आणि फरफटत चाललेली. कुणी रडतंय, भेकतंय. मधेच कुणी पेशंट चाकाच्या खुर्चीत बसून पळवला जातोय. कुणी एक दोघे आडवे स्ट्रेचरवर. तो स्ट्रेचरही पळतोय. सगळीकडे एक दिशाहीन धावपळ. गोंगाट. रांगा. पेपरसाठी रांगा. तपासण्यासाठी रांगा. सर्टिफिकेट्ससाठी रांगा. नुसत्या माहितीसाठी रांगा. कुणा एकाच्या नाकात नळी. ती तशीच घालून तो बाकड्यावर बसलेला. निवांत. निःसंकोच. एवढ्या बाजूच्या धावपळीतही निवांत. एक रांग अवघडलेल्या गरोदर स्त्रियांची. त्यांच्याबरोबर त्यांच्या आया, सासवा, त्यांची मुलं. ती तिथल्या त्या फरशीवर मजेत खेळतायत. त्यांचा निर्व्याज आनंद. तर वाहणारी भऴभऴती जखम घेऊन कुणी उभंय. तर कुणी वेदनेनं कळवळत रडतंय. विश्वरूप दर्शन. किंमत एक एप्रन मात्र. बाकी सब मोफत. 

मी भांबावलो. संप्या एकदमच तयार इसम निघाला. एकदम झपाटलेला इसम. सगळ्या रांगात पहिला नंबर पटकावत तो वेगानं पुढे पुढे जात होता. त्यानं एक केसपेपर काढला. नाक-कान-घसा असं लिहिलेली ओ.पी.डी. शोधली. तिथल्या रांगेला हुलकावणी देत तो पार तिथल्या डॉक्टरसमोर जाऊन पोचला सुद्धा. मागे मी.

चष्मा घातलेले मध्यम वयीन असे कुणी डॉक्टर तिथे खुर्चीत बसलेले होते. डोक्यावर अभावानेच दिसणारे केस. नीट कातरलेल्या मिशा. चेहऱ्यावर मंदसं स्मित. एकूण ज्ञानाचं वलय त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असलेलं. हे नाक-कान-घसावाले डॉक्टर डोक्यावर एक वेगळाच आरसा धारण करून बसतात. समोरच्या दिव्यातून प्रकाश परावर्तन करून ते त्या आरशातूनच पेशंटची तपासणी करतात. हा आरसा वरखाली करण्याचीही एक खास लकब असते. त्या लकबीतून तर तुम्ही तुमचा अनुभव, तुमचे श्रेष्ठत्त्व सिद्ध करत असता. ज्या सफाईदारपणे आमचे हे डॉक्टर तो आरसा वरखाली करत होते ते पाहू जाता ते एकदम वाकबगार आणि अनुभवी डॉक्टर असणार यात संशय नव्हता. डोक्यावरच्या आरशाशी चाललेला त्यांचा तो अविरत चाळा, ते अनुभवी आणि ज्ञानी हसू पाहून मी तर खूषच झालो, इतका की पुढे आपणही नाक-कान-घसा तज्ज्ञ व्हायचं असा माझा मनोमन निश्चयच झाला. डॉक्टरांभोवती तीन-चार शिकाऊ डॉक्टरांचा घोळका होता. अंगावर कसेबसे चढवलेले एप्रन आणि चेहऱ्यावर अथांग जिज्ञासा धारण करणारे हे विद्यार्थी सर देतील ते ज्ञान ग्रहण करायला अगदी उत्सुक होते. सर बोलताहेत आणि विद्यार्थी आज्ञाधारकपणे माना हलविताहेत असे ते दृश्य. मला ग्रेट वाटलं.

डॉक्टरांनी संप्याकडे पाहिले. वरपासून खालपर्यंत पाहिले. मग माझ्याकडे पाहिले. पुन्हा तसेच. वरपासून खालपर्यंत. मी उगाच नखशिखांत घाबरून गेलो. आतल्या आत लटपटू लागलो. डॉक्टरांनी केस पेपर हातात घेतला.

‘पेशंट कोण?’ त्यांनी विचारले.

‘मी, सर’ संप्या पुढे होत म्हणाला. काय सॉलिड गट्स आहेत राव, मला मनोमन वाटले.

‘तू? कुठल्या वर्षाचा रे तू?’

‘सेकंड इअर, सर’ 

‘सेकंड इअर काय. हं. काय होतंय तुला?’

‘सर्दी झालीय सर, नाक वाहतंय. घसा दुखतोय. ताप पण आहे. रोज संध्याकाळी डोकं दुखतंय. अंग जड झालंय. खूप अशक्तपणा आलाय, सर.’ संप्यानं लक्षणांची पार सरबत्तीच लावली. हा इतका आजारी असेल मला वाटलं नव्हतं. मला तर कीवच आली बिचाऱ्याची. इतका आजारी आणि तरीही कॉलेजला येतो. कमालच आहे म्हणायची.

सरांनी शांतपणे ते ऐकलं. पुन्हा एकदा एका सफाईदार लकबीनं डोक्यावरचा आरसा खाली घेतला आणि ते संप्याच्या घशाच्या अंतर्गत निरीक्षणात मश्गुल झाले.  इकडून तिकडून चहुबाजूनी निरीक्षण करून समजल्यासारखी मान हलवत ते अखेर संप्याच्या घशातून बाहेर आले. आसपास पाहू लागले.
‘चांगलाच सुजलाय रे घसा तुझा.’ संप्याकडे पाहत ते सहानुभूतीने म्हणाले. आजूबाजूला नजर टाकल्यावर बाजूचे ते विद्यार्थी त्यांच्या नजरेला पडले. ते जणू भानावर आले.

‘Look here, boys, he has acute pharyngitis. You can see the inflamed pharynx, tonsils. Come, all of you have a look.’

सरांनी हे नुसते म्हणायचा अवकाश की ते चारही विद्यार्थी अधाशासारखे पुढे सरसावले. पुन्हा एकदा सरांनी शैलीदारपणे डोक्यावरचा आरसा फिरवला, अशा नेमकेपणे की त्या उजेडात संप्याचा घसा अंतर्बाह्य जणू उजळून निघाला. सरांच्या मागच्या बाजूला दोन विद्यार्थी, बाजूने आणखी दोन विद्यार्थी. सगळ्यांनी संप्याच्या घशाचे मनसोक्त निरीक्षण केले. सारखा ‘आ’ करून संप्याचा घसा परत वेगळ्या प्रकाराने दुखणार की काय असे मला वाटू लागले. बिच्चारा. काही क्षण असेच गेले. निरीक्षण झाले. सगळ्यांचे पूर्ण समाधान झाले याची खात्री झाल्यावरच सरांनी पुन्हा एका सफाईदार हालचालीत डोक्यावरचा आरसा वर ढकलला आणि अखेर संप्याला तोंड मिटायची परवानगी दिली. इतका वेळ उघडे ठेवलेले तोंड मिटायला संप्याला क्षण दोन क्षण जास्तच वेळ लागला की काय अशी शंका मला वाटली. पण तो भास असावा. 

तपासणी झाली. संप्या उठला. सरांनी त्याच्या हातात केस पेपर दिला. त्यावर त्यांनी काही औषधे लिहिली होती. संप्यानं तो कागद हातात घेतला.

‘चल,’ असे मला नजरेनेच खुणावले आणि झपाटल्यासारखा तो खोलीतून बाहेर पडला. त्याच्या मागोमाग मी. इथून पुढचा संप्याचा झपाटा विलक्षणच होता. एखाद्या विजयी योद्ध्यासारखा तो तिथून निघाला. हॉस्पिटलची ती गर्दी त्याला थोपवू शकली नाही. मधे मधे लुडबुडणारी लहान पोरं त्याचा मार्ग रोखू शकली नाहीत. मधून मधून आडवे येणारे स्ट्रेचरसुद्धा त्याचा वेग कमी करू शकले नाहीत. पार दमछाक झाली माझी त्याच्या मागे धावता धावता. आजारपणातही इतके बळ. कमालच म्हणायची. वेगाने आम्ही कुठल्याशा रांगेजवळ गेलो. पुन्हा एकदा एप्रनचा प्रभाव दाखवत पहिला नंबर मिळविला. तिथे कागद दाखवून संप्यानं त्याची औषधं मिळवलीसुद्धा. फारसं काही कळायच्या आत आम्ही हॉस्पिटलच्या बाहेरसुद्धा पडलो.  

कॉलेजात आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर जाऊन पोचलो तेव्हा कुठे संप्या स्थिरावला. कट्ट्यावर विसावला. आणि अचानक मोठमोठ्याने हसू लागला. खिंकाळू लागला. त्याचं हसणं इतकं वाढलं की मला काय करावे हेच कळेना. आजारासाठी औषधं मिळाली आणि तीही फुकटात, याचा आनंद आणि तोही इतका. या संप्याला झालंय तरी काय? मला कळेना. संप्या हसत होता, हसता हसता उठत होता, लोळत होता. त्याच्या डोळ्यातून नाकातून पाण्याच्या नुसत्या धारा लागलेल्या. मी भांबावून पाहत होतो. आता याचे काय होणार अशी काळजी मला लागलेली. याला परत हॉस्पिटलात न्यावे लागते की काय असे मला वाटून गेले. ‘हर्षवायू’ म्हणतात तो तर हा नव्हे. माझे वैद्यकीय ज्ञान तेव्हा यथातथाच होते म्हणून असली काही तरी भन्नाट शंकाही माझ्या मनात येऊन गेली.

थोडा वेळ गेला. संप्या हळूहळू शांत झाला. अगदी अधून मधून एखादा हसण्याचा हुंदका येण्याइतपत त्याची प्रगती झाली. 

‘च्यायला, काय झालंय तरी काय लेका तुला. वेडबीड लागलं का काय?’ मी विचारलं. तसा संप्या उठला. कट्ट्यावर ताठ उभा राहिला. खाली बसून मी वर त्याच्याकडे पाहत राहिलेलो. तर त्याने पुन्हा एक सणसणीत धपाटा माझ्या पाठीत घातला आणि तो म्हणाला, ‘अरे साल्या, सॉलिड कमाल झाली राव. अरे मी आजारी नव्हतोच. सर्दी झालीय माझ्या बहिणीला. आज वेळ होता, म्हटलं, बघू जमलं तर तिला औषध नेऊ फुकटात. म्हणून गेलो तिथं. मी सांगितली ना ती लक्षणं माझी नव्हतीच. माझ्या बहिणीची होती.’ असं म्हटला आणि पुन्हा एकदा तो हसत सुटला. अविरत हसत सुटला.


डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०