Tuesday 2 October 2012

पेसमेकर

पेसमेकर


सकाळची सगळी कामे आटोपली होती. हॉस्पिटलचा राउंड झाला होता. पोटात भुकेची जाणीव सुरु झालेली. कधी एकदा घरी पोचतो अशा आतुरतेत मी. रिसेप्शनपाशी पोचलो तर तिथे दीपा जणू  माझी वाटच पाहात असल्यासारखी होती. मी दिसताच “सर, सर ‘ असा धावा करून तिने माझ्या हातात फोन सोपवला. ‘सर, उमेश म्हणून तुमचा कुणी मित्र आहे लाईनवर. अर्जंट बोलायचंय म्हणतो.’ उमेश? माझा मित्र? किती तरी वर्षं मागे गेल्याची भावना माझ्या मनात आली. उमेश माझा शाळकरी मित्र. इंजिनिअर झालेला. शाळेत असताना आम्ही बरेच एकत्र असू. मात्र गेल्या कित्येक वर्षात काही संपर्क राहिला नव्हता. आज अचानक उमेशचा फोन? तोही काही अर्जंट कामासाठी?
‘हाय, उमेश, मी संजीव बोलतोय’
‘अरे बरा भेटलास. एक अर्जंट काम आहे. माझ्या आजे सासूबाई. वयस्कर, ऐशीच्या पुढे असाव्यात, काही तरी गंभीर आजार झालाय बहुधा त्यांना. बेशुध्द असाव्यात. मी स्वतः काही आता त्यांना पाहिलेलं नाही. पण प्रकरण बहुधा गंभीर असावं. त्यांना मी गाडीतून तुझ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलंय. माझा मेव्हणा अनिल आहेच बरोबर. तू प्लीज तिथंच थांब. त्या तिथंच पोचतायत.’
आता थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. आणखी एक दुपार उद्ध्वस्त झाली होती. थोड्याच वेळात सायरन वाजवत रुग्णवाहिका हॉस्पिटलच्या दारात आली. खाडकन मागचा दरवाजा उघडला आणि ती चिरपरिचित धावपळ सुरु झाली. हॉस्पिटलचे मामा, मावश्या वगैरे पुढे झाले. झपाट्याने हालचाली करून पेशंटला आय. सी. यु. मधे घेण्यात आले.
त्वरेने मीही आय. सी. यु. त पोहोचलो. परिस्थिती गंभीर होती खरी. आजी वयस्कर होत्या. श्वास संथ चाललेला. जवळ जवळ बेशुध्द, अगदी संथ प्रतिक्रिया देत होत्या. प्राथमिक तपासणी आणि इसीजी वगैरे केल्यावरच लक्षात आले. आजींचा नाडीचा वेग अति मंद झाला होता. तोच त्यांचा मुख्य आजार होता. आणि त्यावरचा इलाज म्हणून त्यांना तातडीने पेसमेकर नावाचे यंत्र हृदयात बसविण्याची गरज होती. हा निर्णय अगदी तत्काळ घेऊन त्याची अंमलबजावणी केली तरच त्यांचा जीव वाचणार होता.
त्यांचा नातू अनिल बरोबर होताच. मी त्याला बाजूला घेतले. परिस्थितीची कल्पना दिली. अनिल समजूतदार दिसला. परिस्थितीचे गांभीर्य त्याला जाणवले. किती खर्च येईल, कितपत मोठी शस्त्रक्रिया असेल, करताना काही धोका असतो का असे अगदी वेचक प्रश्न त्याने विचारले. अशा परिस्थितीत जी आवश्यक ती सर्व माहिती मी त्याला दिली. पेसमेकर बसविण्याचे काम दोन पायऱ्यांमध्ये करावे लागते. मुख्य पेसमेकर महाग असतो. तो काही हॉस्पिटलमध्ये कायम तयार ठेवत नाहीत. गरजेप्रमाणे मागविला जातो. ह्यात काही दिवस जातात. तोपर्यंत वेळ भागविण्यासाठी दुसरा एक तात्पुरता पेसमेकर बसवला  जातो. तेव्हा हा तात्पुरता पेसमेकर बसविण्यासाठी त्याने परवानगी दिली. योग्य त्या कागदपत्रांवर त्याच्या सह्या घेतल्या. हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ आले आणि सर्व काही वेळच्या वेळी पूर्ण होऊन तात्पुरता पेसमेकर बसलासुद्धा. अक्षरशः काही क्षणात आजींची प्रकृती सुधारली. नाडीचे ठोके नियमित झाले. रक्तदाब सुधारला. आजी जाग्या झाल्या, त्यांना जणू नवजीवन मिळाले.
माझी सगळी दुपार या कामात गेली खरी, पण एक जीव वाचला, एक काम आपल्या हातून समाधानकारकपणे झाले याचा खूप मोठा आनंद होता. समाधानात मी घरी गेलो. पुढच्या दोन-तीन दिवसांनी आम्ही त्यांना कायमचा पेसमेकर बसविणार होतो.
दुसऱ्या दिवशी आजींना मी भेटायला गेलो. त्यांची प्रगती अपेक्षेप्रमाणे अगदी समाधानकारक होती. आता प्रश्न फक्त नवीन पेसमेकर येण्याचा होता. त्याची मागणीसुद्धा आम्ही नोंदवलेली होती. आय सी यु मधून मी बाहेर पडत होतो, तेवढ्यात मागून आजींचा नातू अनिल आला. कालच आमचा परिचय झालेला. तेव्हा त्याच्या समजूतदारपणावर मी खूष होतो. आता माझी साधी अपेक्षा अशी की त्याने चार कृतज्ञतेचे बोल ऐकवावेत, माझे निदान कसे अचूक आले, मी कशी वेळच्यावेळी योग्य कृती केली आणि म्हणून कसा आजींचा जीव वाचला असे काही तरी त्याने म्हणावे आणि मीही ‘कसचे,कसचे, हे तर माझे कर्तव्यच होते,’ असे म्हणत त्या कृतज्ञतेचा सविनय स्वीकार करावा. असे धन्यवाद ऐकण्याची आम्हा डॉक्टर मंडळींना इतकी सवय झाली असते की आपण खरेच कुणी काही विशेष सामर्थ्याचे वाहक आहोत असा एखाद्याचा गैरसमजही व्हायचा!
पण आजचा दिवस तसा नव्हता.
‘डॉक्टर, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचंय,’ अनिल म्हणाला. मी थांबलो. त्याच्या बोलण्यात काही तरी धोक्याची घंटा वाजत असल्याचे मला जणू स्पष्ट ऐकू आले.
‘डॉक्टर, माझा निर्णय मी बदलू इच्छितो. आजीला आता तुम्ही जो दुसरा कायमचा पेसमेकर बसविणार आहात, तो बसवू नये असं मला वाटतं.’ हे ऐकून मी सर्दच झालो. या गृहस्थाशी कालच केवढ्या सविस्तरपणे मी चर्चा केली होती. वेळच्या वेळी  पेसमेकर बसविणे किती आवश्यक आहे हे समजावले होते, त्याच्या सर्व शंकांना व्यवस्थित उत्तरे दिली होती, या सर्व कामासाठी त्याची लेखी परवानगी घेतली होती, असं सगळं असताना हा मनुष्य आता पुढच्या उपचारांना नाही कसे म्हणू शकतो, आणि तेही आजी इतकी चांगली बरी झाल्याचे दिसत असताना. हे सगळं मला समजण्यापलीकडचं होतं.
मी त्याला समजविण्याचा प्रयत्न करू लागलो. ‘आता आपल्याला पुढचे उपचार थांबविणे शक्य नाही. खरं तर पेसमेकर जरी दोन पायऱ्याध्ये बसविला जात असला तरी खरं तर ती एकच क्रिया आहे. ती आता मधेच थांबविता येत नाही. आणि असं केल्याने आजींच्या जीवाला धोका आहे, म्हणजे किरकोळ धोका नाही, तर मृत्यूच अटळ आहे. तरी हा धोका तुम्हाला का हवा आहे?’ मी विचारले.
अनिल अगदी शांतपणे माझ्यासमोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक मंद आणि आत्मविश्वासपूर्ण हसू होते की काय असेही मला वाटले. आजचा हा अनिल कालच्यापेक्षा अगदी वेगळा होता. या विचित्र निर्णयामागचा त्याचा ठामपणा तर मला आश्चर्यकारक वाटला.
‘आजीचं वय बरंच झालं आहे. एवढ्या खर्चानंतर तिच आयुष्य ते कितीसं असणार? त्यातून मला वडीलही नाहीत. सगळे निर्णय आणि त्यांचा खर्च काय तो मलाच करावा लागणार. एकूण सगळा विचार करून मी हा निर्णय घेतला आहे की मला यापुढे काही करावयाचे नाही. तुम्ही तो लावलेला तात्पुरता पेसमेकरही काढून घेऊ शकता. त्यातून होईल त्या परिणामांना मी तयार आहे. पाहिजे तर मी तसेही तुम्हाला लिहून देऊ शकतो. मी माझ्या आजीचा एकुलता एक नातू आहे. तेव्हा हा निर्णय घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.’ अनिलच्या या थंड उद्गारांनी मी शहारलो.
अनिल म्हणत होता त्यातलं काहीही करणं मला अशक्य होतं. असं करणं म्हणजे एक हत्याच होती. जाणीवपूर्वक केलेली हत्या! कुठल्याही सुजाण व्यक्तीसाठी ही अशक्य कृती होती. मी त्याला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करू लागलो.
‘अशी हत्या करण्याचा डॉक्टर म्हणून मला अधिकार नाही, इतकेच नव्हे, तर कितीही जवळचा आणि एकुलता एक नातलग असला तरी तो कुणाच्या हत्येसाठी अशी परवानगी देऊ शकत नाही. हे वागणे निर्दय आहे, बेकायदेशीर आहे, आणि म्हणून मी तसे करू शकत नाही,’ मी म्हणालो.
अनिल आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. ‘मी काल जी परवानगी दिली ती माझी चूक होती, आणि ती मी सुधारू इच्छितो.’ हा त्याचा तर्क तो सोडत नव्हता. मी त्याला विनवून पाहिलं, थोडं दटावून पाहिलं, काही आध्यात्मिक बोलून त्याच्या सद्प्रवृत्ती जागवण्याचा प्रयत्न केला. पण अनिल हा अशक्य इसम होता. तर्कापलीकडचा इसम होता.
संतापून मी त्याला एक विचित्र पर्यायही सांगून पहिला. आहे हा पेसमेकर मी काढू शकत नव्हतो. जर पुढच्या उपचारांसाठी त्याची तयारी नसेल, तर हा तात्पुरता पेसमेकर त्याने विकत घ्यावा, त्यासकट वैद्यकिय सल्ल्याविरुद्ध आजीला घरी घेऊन जावे आणि घरी जाऊन आजीचे काय वाटेल ते करावे. हा पर्याय तर इतका विचित्र होता की तो सांगताना माझी मलाच लाज वाटत होती. पण ते ऐकून तरी अनिल बधेल अशी खुळी आशा मला होती इतकेच. पण अनिल बधला नाही. पेसमेकर काढा हा त्याचा हट्ट तसाच होता.
काहीशा वैतागाने मी हॉस्पिटलमधून परतलो. मनातून हा विचार मात्र मला सारखा छळत होता. अनिलच्या विकृतीवरचा इलाज मला सापडू शकत नव्हता.
दोन-तीन दिवस असेच तणावाचे गेले. तात्पुरत्या पेसमेकरवर आजी व्यवस्थित होत्या. पुढचा पेसमेकर टाकणे अनिश्चितपणे पुढे ढकललेले. अनिल काय किंवा मी काय, आपापल्या मुद्द्यांवर जाम अडकलेलो. ही एक जीवघेणी लढाई होती. जीवघेणी म्हणजे आजींच्या दृष्टीने जीवघेणी लढाई आम्ही एकमेकात लढत होतो. गंमत अशी की हे सगळं इकडे चालू असताना माझा परमप्रिय मित्र उमेश मला कुठेच दिसत नव्हता. त्याची कुठलीच प्रतिक्रिया मला मिळाली नव्हती. चालू असलेल्या या वेडेपणामुळे मीही असा बिथरलो, की मीही उमेशला भेटण्याचा प्रयत्न केला नाही. निरोपही पाठविला नाही. शेवटी ती त्याचीही आजेसासू होती. त्याच्या बायकोची आजी होती. या प्रकरणात त्याने मध्यस्थी करणे, आपल्या मेव्हण्याला समजावणे त्याचे कर्तव्य होते असा माझा ठाम ग्रह होता. त्यामुळे मीही शांत होतो.
अखेर एकदाचा तो दिवस उजाडला. उमेश मला भेटण्यासाठी चक्क हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.
‘अरे संजीव, त्या अनिलची काही इच्छा नाही आजीला पुढचा उपचार देण्याची. बर आजींना तर अनिलशिवाय कुणी नाही. आता यातून काय मार्ग काढायचा, तूच सांग!’ उमेश म्हणाला, आणि माझा जुना मित्र उमेश तो हाच का असं प्रश्न मला पडला.  ह्या सगळ्या प्रकरणातून हा इतका अलिप्त कसा काय राहू शकतो हेच मला उमगेना. अगदीच हताश वाटावे अशी परिस्थिती होती ही. आतापर्यंत मी खूप प्रकारचे पेशंट पाहिले होते. अशा प्रकारच्या घटनांमध्ये त्यांची वर्तणूक किती सहकार्याची असते हेही पहिले होते. बऱ्याच वेळा मुख्य अडचण पैशाची असते. त्याच्यावरही आम्ही मात करत असू. पण अनिल, उमेशची ही वृत्ती मला पूर्ण नवीन आणि अनाकलनीय वाटली. मी मनोमन चिडलो होतो. पण माझा संताप आतल्याआत दाबत मी उमेशला म्हणालो, ‘उमेश, तुझ्या मेव्हण्याच्या वागण्याचा मला तरी उलगडा होत नाही. तो सांगतो तसे वागणे मला शक्य नाही. आजींच्या उपचारामध्ये आधीच एव्हाना खूप उशीर होतो आहे. याहून जास्त थांबणे मला तरी शक्य नाही. तुझा मेव्हणा म्हणून मी त्याला आजवर सहन केले. आता ते शक्य दिसत नाही. त्याला तू एव्हढेच सांग, पेसमेकर टाकायला त्याने आजच्या दिवसात जर परवानगी दिली नाही, आणि लागणारे पैसे हॉस्पिटलमध्ये भरले नाहीत, तर मी त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करणार. आणि ही तक्रार किरकोळ नसेल, ती मनुष्यवधाच्या प्रयत्नाची असेल.. प्रकरण या टोकाला जावे अशी तुमची इच्छा असेल तर तसे होवो.’
हा मात्र रामबाण ठरला. काहीही न बोलता उमेश माझ्यासमोरून उठला. संध्याकाळपर्यंत सर्व पैशाचा भरणा झाला, दुसऱ्याच दिवशी आम्ही नवा पेसमेकरही टाकला. त्यानंतर आजींची प्रकृती उत्तमप्रकारे सुधारली. झाल्या प्रकाराची त्यांना जराही कल्पना नव्हती. अगदी हसत-खेळत आम्हाला हॉस्पिटलला दुवा देत आजी घरी गेल्या.
हॉस्पिटलमध्ये अनिलने जी वर्तणूक केली त्याचा आजवर मला खुलासा झालेला नाही. मात्र एक गोष्ट घडली ती सांगणे गरजेचे आहे. आजी घरी गेल्यानंतर सुमारे ६ महिन्यांच्या कालावधीने अनिल मला भेटण्यासाठी म्हणून दवाखान्यात आला होता. आजीची प्रकृती उत्तम असल्याचे त्याने मला कृतज्ञतापूर्वक सांगितले. आणि अतिशय संकोचाने तेव्हा झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. खूप उशिराने का होईना, अनिलचे हे कृतज्ञ उद्गार ऐकून माझेही कान आणि मन थंडावले.
डॉक्टर आणि पेशंटमधील परस्पर विश्वास किती गरजेचा असतो, आणि हा विश्वास काही कारणाने ढळला तर कसा अनर्थ संभवतो याचेच दर्शन मला या प्रसंगातून घडले.

डॉ संजीव मंगरूळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०

No comments:

Post a Comment