Tuesday 2 October 2012

न्यायाची गोष्ट

न्यायाची गोष्ट


माझ्या वैद्यकिय व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळातली ही गोष्ट आहे. मध्यम आकाराच्या एका छोटेखानी हॉस्पिटलमध्ये मी तेव्हा माझे पेशंट ठेवत असे. माझ्यासारखेच माझे हे हॉस्पिटलही नवीन आणि अननुभवी होते. तरुण वय आणि नव्याने व्यवसायात जम बसविण्याची ईर्षा- यांच्या जोरदार मिलाफाने माझी कारकीर्द आकार घेत होती. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याजोगा एकेक पेशंट मिळणे तेव्हा दुरापास्त असे. एखादा असा योग्य पेशंट मिळाला तरी माझ्यावर विश्वासून तो हॉस्पिटलमध्ये दाखल होईल असे थोडेच होते? नव्याने सुरु केलेल्या वैद्यकिय व्यावसायिकाचा मार्ग असाच अडथळ्याचा असतो. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची अगदी प्रेमाने सरबराई करावी लागते, त्याच्याशी प्रेमसंबंध जुळवावे लागतात. त्याच्या आजारपणात त्याला गुण यावा म्हणून सर्वतोपरी झटावे लागते. यासाठी नुसते वैद्यकिय ज्ञान पुरत नाही, त्याव्यतिरिक्त इतरही अनेक व्यावसायिक, सामाजिक, भावनिक गोष्टी घडवाव्या लागतात. ही एक अवघड तपश्चर्याच असते जणू! अशा अवघड काळातली ही गोष्ट आहे.
गोडबोले नावाचे हे पेशंट तेव्हा माझ्याकडे दाखल झाले होते. मध्यमवयीन गृहस्थ, नव्याने झालेला मधुमेह आणि त्यातून झालेली थोडीशी गुंतागुंत. सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या पेशंटना ज्या रक्ततपासण्या लागतात त्या करून घेण्यासंबंधी मी केसपेपरवर सूचना देऊन गेलो होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा गोडबोले फारच चिडलेल्या अवस्थेत होते. हॉस्पिटलला शिव्यांची लाखोली वाहात होते.
“अहो डॉक्टर, कसलं हो हे हॉस्पिटल. एक माणूस धड नाही इथं. कसले कसले नुसते बाजारबुणगे आणून भरले आहेत. सगळी साली बिनकामाची माणसं. आज सकाळी रक्त तपासणीकरता म्हणून रक्त घेणारा जो माणूस  आला, माणूस कसला हो, राक्तापिपासूच तो, त्याला किती तरी वेळ माझी नस सापडता सापडेना, दहा ठिकाणी सुया काय टोचल्या, ही अशी अंगाची पार चाळणी केली तेव्हा कुठ त्याला एक छोटी बाटली रक्त मिळवता आलं –“, त्वेषानं त्यांनी मला त्यांच्या हातावरच्या टोचल्याच्या खुणा दाखविल्या. खरोखरच झालेल्या रक्तपाताच्या खुणा त्यांच्या हातभर पसरलेल्या मला दिसल्या. मला त्यांची सहानुभूती वाटली. पण एखाद्या पेशंटचे रक्त घेताना असा त्रास होणे शक्य असते, रक्त काढणाऱ्या व्यक्तीचा हा नालायकपणा आहे असा निष्कर्ष अगदी लगेचच काढणे बरोबर नाही असे मला त्यांना सांगावेसे वाटत होते, पण यानंतर पुढे ते जे बोलले ते फारच विलक्षण होते..
“रक्त घेताना एखाद्या वेळेस त्रास होतो हे मलाही माहीत्ये, डॉक्टर, मी पण माझ्या कामाच्या ठिकाणी एक कामगार नेता आहे. पण एक तर रक्त घेणारे ते गृहस्थ फारच वयस्कर होते, त्यांचे हात मुळातच इतके थरथरत होते, की असा मनुष्य कुणाचे रक्त नीट काढू शकेल असे इथल्या लोकांना वाटलेच कसे हे मला कळत नाही. असा मनुष्य अशा कामाला लावणेच मुळात चूक, त्यातून भरीस भर म्हणून त्या गृहस्थांच्या हातून भरलेली ती रक्ताची बाटली इथे माझ्यासमोरच खाली फरशीवर सांडली. सगळं रक्त माझ्यासमोरच इथं फरशीवर पसरलं. शेवटी इंजेक्शनच्या सुईने त्यांनी ते रक्त पुन्हा त्या बाटलीत कसंबसं भरल आणि ते गेले! “ हे ऐकून मात्र माझी वाचाच बंद झाली. मुळातच एखाद्या म्हाताऱ्या माणसाने पेशंटचे रक्त घेणे, त्यातूनही ते असे सांडणे हे दुर्दैवी होते, पण असे सांडलेले रक्त पुन्हा गोळा करून तपासण्याकरता पाठविणे म्हणजे अजबच प्रकार होता. अशा रक्तातून काय तपासणी होणार आणि काय त्याचे निष्कर्ष असणार! माझे तरुण रक्त त्वेषाने उफाळून यावे असाच हा प्रकार होता.
तसाच मी उठलो आणि हॉस्पिटल प्रमुखांसमोर दाखल झालो. झाला प्रकार आणि त्याबाबतची माझी नापसंती त्यांच्या कानावर मी अगदी स्पष्टपणे घातली. हॉस्पिटलही नवीन असल्याने त्यांनी माझे गाऱ्हाणे अगदी मनापासून ऐकले, झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि तातडीची कार्यवाही करीत त्या ‘रक्तपिपासू’ गृहस्थांना त्यांनी माझ्यासमोरच बोलवून घेतले. त्यांचा काही खुलासा ऐकायच्या आतच हॉस्पिटल-प्रमुख गरजले- “मत आना कामपे कलसे, समझे क्या, मत आना कलसे!” स्तंभित झालेले ते गृहस्थ काही कळायच्या आतच कार्यमुक्त झाले होते! मीही सुन्न झालो. हे असे आणि इतक्या तडकाफडकी काही घडेल आणि असा टोकदार न्याय पदरी पडेल असे मलाही वाटले नव्हते. झाला प्रकार अनपेक्षित होता, न्याय्य असला तरी अनपेक्षित होता. पूर्ण अवाक झालेला मी, कसाबसा त्याचे आभार मानून खोलीतून बाहेर पडलो. घरी जाईपर्यंत झाला प्रकार हीच एकूण गुन्ह्याची रास्त परिणती होती असे स्वतःला पटविण्यात मी यशस्वी झालो होतो, इतकेच  नव्हे, तर या निमित्ताने मला माझ्या एका नव्या सामर्थ्याची ओळख झाली होती, आपल्याला नको वाटणाऱ्या माणसाची नोकरी घालविण्याचे सामर्थ्य! याचा मोठा प्रभाव गोडबोल्यांवर पडणार होता. मी किती न्यायतत्पर आहे हे त्यांना दिसणार होते. मी सर्व साधारणपणे खूष होतो.
दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये गोडबोल्यांना तपासायला गेलो. झाला प्रकार तोवर त्यांच्या कानावर गेलाच असणार. तेही माझी जणू वाट बघत असल्यासारखे मला वाटले. तपासणीच्या अनुषंगाने एक दोन गोष्टी बोलल्यावर लगेचच गोडबोले म्हणाले, “ काय डॉक्टर, कालच्या त्या गृहस्थांना कामावरून काढून टाकलं म्हणे?”
“तर, त्यांची चूकच गंभीर होती. त्यांनीच ओढवून घेतलं ते त्यांच्यावर”, मी.
‘नाही हो, पण एवढ्या चुकीसाठी एवढी शिक्षा आणि तीही इतकी तडकाफडकी, म्हणजे जरा जास्तच होतंय नाही का? अशा वयात एकदम नोकरी जाणे म्हणजे काय हाल हो. मी कामगार नेता आहे, हॉस्पिटलचे हे असले निर्णय मला पटत नाहीत. जरा सहानुभूतीनं पाहायला पाहिजे हो तुम्ही अशा गोष्टींकडे—“
आता पुन्हा अवाक होण्याची पाळी माझ्यावर आली होती. काल त्या कामगाराविरुद्ध गरळ ओकणारे गोडबोले अचानक त्याचे कडवे समर्थक झाले होते. त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी लढणारा मी अचानक त्यांचाच गुन्हेगार झालो होतो.
काही तरी थातूर मातूर बोलून मी तेव्हा वेळ मारून नेली खरी, पण त्यामिषाने निर्माण झालेले प्रश्न आजही मला सतावतात. झाला प्रसंग ही कोणाची चूक होती?- वयोवृद्ध व्यक्तीला अयोग्य कामावर घेणाऱ्या हॉस्पिटल व्यवस्थापनाची की त्याच्या गंभीर चुकीसाठी तत्काळ त्याला कामावरून काढून टाकणाऱ्या प्रमुखांची? गोडबोल्याना त्रास झाला, त्याची त्यांनी तक्रार केली, तेव्हा त्यांच्यातला कामगार नेता कुठे गेला होता? गोड्बोल्यांवर अन्याय झाला होता त्याविषयी त्यांना नक्की चीड होती का नव्हती? एक कामगार नेता म्हणून त्यांनी काय शिक्षा दिली असती अशा गुन्ह्याला? कामगारांना सदोदित पाठीशी घालणे हाच कामगार नेत्याचा धर्म असतो काय? असावा काय? आणि असे गुन्हे पाठीशी घालूनच जर काम करीत राहिलो, तर काय अधिकार राहील आपल्या सगळ्यांना आपल्या एकूण अकार्यक्षमतेवर टीका करण्याचा? कुठल्याही गोष्टीत सतत व्यवस्थापनावर टीका करणे हेच कामगार नेता म्हणून गोड्बोल्यांचे ब्रीद होते काय?
खरी गम्मत तर पुढेच आहे. नंतर बऱ्याच काळाने मला समजलेली बातमी फारच भन्नाट होती. हॉस्पिटल प्रमुखांनी त्या कामगाराला खरं तर कामावरून काढलच नव्हतं, ती माझ्यासमोर केलेली केवळ एक बतावणी होती! रक्तपिपासू कामगारावर खरं तर न्यायच न्याय झाला होता. एकंदरीत थट्टा काय ती माझीच झाली होती!

डॉ. संजीव मंगरूळकर
दूरभाष: ९४०५०१८८२० 

No comments:

Post a Comment