Saturday 15 June 2013

ये रे, ये रे पैशा



ये रे, ये रे पैशा -
खोपकरांच्या एकूण आयुष्याचं वर्णन एका वाक्यात करायचं म्हटलं तरी ते शक्य होतं. त्यांनी आयुष्यभर फक्त पैशावर प्रेम केलं. अगदी मनापासून प्रेम केलं. ते प्रेम नुसतं तीव्र नव्हतं, तर व्यसनी होतं. पैशाशिवाय इतर कशाचं त्यांना जणू भान नव्हतं. जे जे म्हणून या प्रेमाच्या आड येईल अशी भीती त्यांना वाटली त्या त्या साऱ्यांचा त्यांनी मनःपूर्वक धिःकार केला. आमची अगदी पहिली भेट झाली तेव्हापासून ही एकच एक गोष्ट मला जाणवली. आणि अगदी फार नसला तरी पाच सात वर्षांचा तरी आमचा परिचय होता, प्रथम त्यांच्या इच्छेविरुद्ध बहरलेला आणि नंतर त्यांच्या इच्छेनुसार कोमेजलेला.

सुरवातीला माझा दवाखाना मी फक्त संध्याकाळीच चालवीत असे. नंतर काही वर्षांनी मी तो सकाळीसुद्धा चालू ठेवू लागलो. प्रथम प्रथम ही गोष्ट फारशी कुणाला माहीत नव्हती. त्यामुळे सकाळची गर्दी खूपच कमी असे. हाताखाली कुणी मदतनीसही नसे. एकटयानं येऊन दवाखाना उघडायचा, दोन तास वाट पाहून अकराला बंद करायचा असा परिपाठ. इतर दिवसांसारखाच तोही दिवस. घड्याळाकडे नजर ठेवून बरोबर अकराला मी दवाखान्याबाहेर पडत होतो. दवाखान्याचा दरवाजा बंद केला. त्याला कुलूप लावलं आणि वळून बाहेर पडणार, तोच मागून आवाज आला, ‘I hope, you are the doc?’ मी मागं वळून पाहिलं. ते खोपकर होते. ही आमची पहिली भेट. पांढरा स्वच्छ कडक इस्त्री केलेला शर्ट, गोरा वर्ण. तुळतुळीत दाढी केलेला चेहरा. डोक्यावर अगदी मिलिटरी खाक्यानं कापलेले केस. तसेच तुळतुळीत. चौकोनी चष्मा आणि त्यामागे घारे चमकदार डोळे. त्या नजरेत अगदी प्रखरपणे मला तेव्हाही दिसला तो पूर्ण अविश्वास. पूर्ण अविश्वासानं तुम्हाला आतून बाहेरून समग्र जोखणारी अशी ती नजर होती. भेदक. कुशाग्र. अगदी नंतर जसा आमचा परिचय वाढत गेला तेव्हाही ही नजर कायम तशीच आणि तितकीच भेदक होती असं मला वेळोवेळी जाणवत गेलं.  
  
‘Myself, Mr. Khopkar,’ पुढे होत त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला. काही क्षण आम्ही समोरासमोर उभे आणि ते माझ्या सखोल निरीक्षणात दंग. मी किंचित अस्वस्थ झालो.

‘या, ना, मी निघालोच होतो, बरी वेळेत भेट झाली, नाही तर चुकामूक झाली असती.’ उलट फिरत मी दवाखान्याचा दरवाजा उघडू लागलो. पण मला जणू अडवतच खोपकर पुढे झाले.

‘माझ्या मिसेसना दाखवायचं होतं. पण it seems, तुम्ही क्लिनिक बंद करताहात. I am sorry, I have reached late.’

‘नाही, नाही, या ना. It’s Ok. मी थांबू शकतो.’ मी दरवाजा उघडत म्हणालो. एव्हाना दरवाजा उघडला होता. आत पाऊल टाकून मी पुढे होत होतो, पण खोपकर जणू अडल्यासारखे मागे मागेच. दवाखान्यात पाऊल टाकायलासुद्धा नाराज.  

‘Am I going to be charged extra since I have made you wait for long? नाही तर, मी नंतर येऊ शकतो.’ खोपकरांच्या या थेट प्रश्नानं मी थोडा चमकलो. 

‘नाही, तसं काही नाही. तुम्ही या ना, अशासाठी जादा फी लावत नसतो मी,’ मी त्यांना दिलासा देत म्हणालो.

खोपकर थोडे आश्वस्त झाले, दवाखान्यात पाऊल टाकण्याचा धीर त्यांच्यात आला. ते आत आले. पण त्यांच्या मिसेस कुठे दिसेनात. माझ्या नजरेतला शोध त्यांच्या लक्षात आला. 

‘नाही, ती येतेय मागून. She takes long to climb the staircase. तिला वेळ लागतो.’

माझा दवाखाना पहिल्या मजल्यावरचा. चांगल्या अठरा पायऱ्यांचा चढाव. काही पेशंटना त्रासदायक वाटावा असा. मला काळजी वाटली. मी तडक खोलीबाहेर आलो, जिन्यात पाहायला. तर त्या दिसल्या. अगदी हळूहळू जिना चढत असलेल्या. एकटीनंच. जिन्याच्या कठड्याला धरून धरून एकेक पाऊल जपून टाकत, मोजून मापून चढत होत्या. दोन पायऱ्या चढल्या की त्यांना दम लागे. मग थोडी विश्रांती की पुन्हा चढणं चालू. सगळं लक्ष या चढण्यातच केंद्रित झालेलं, इतकं की मी वर वाट पाहत थांबलोय याचं भानसुद्धा त्यांना नव्हतं. सगळी आत्मिक, शारीरिक ताकद एकवटून त्या जिना चढत होत्या. त्यांची असहायता पाहिली. मलाच लाज वाटली. झपाट्यानं चार पायऱ्या उतरत मी त्यांना सामोरा गेलो. जमल्यास त्यांना काही आधार द्यावा, मदत करावी म्हणून. पण त्या चढण्यात मश्गूल होत्या. नुसत्या खुणेनं त्यांनी मला थांबवलं. मी हतबल शेजारी उभा, मुंगीच्या गतीनं त्यांचं मार्गक्रमण चालू. आम्ही एकेक पायरी चढतोय आणि जिन्याच्या अगदी वरच्या पायरीवर श्रीयुत खोपकर उभे. अगदी शुचिर्भूतपणे आमची वाट पाहत, तटस्थ. 

किती तरी वेळ गेला. हळूहळू चढत आम्ही एकदाचे वर दवाखान्यात पोचलो. खोपकर काकू प्रचंड थकल्या होत्या. सगळा जिना एका दमात चढल्याचा प्रचंड थकवा त्यांच्या मंदावलेल्या हालचालीतून, त्यांच्या जोरजोरात चाललेल्या श्वासातून मला जाणवत होता. त्यांच्या हाताला धरून माझ्या समोर खुर्चीवर मी त्यांना बसवलं तेव्हा कुठे माझं प्रथम त्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं. चेहऱ्याची वर आलेली हाडं, रुंदसा जबडा, विस्तीर्ण जिवणी आणि त्यामागे फारोळे दात आणि त्या दातांमध्ये फटी तर केवढ्या होत्या. एके काळी सुंदर असू शकेल असा चेहरा पण कसली तरी नासधूस झाली होती असं वाटावं असं सगळं होतं त्यात. एक प्रकारचा ओबडधोबडपणा आणि तो काही फक्त चेहऱ्यावरच होता असं नाही. सगळं शरीरच ओबडधोबड. जाड जाड बोटं. जाड पंजा. सुजल्यासारखे वाटणारे कोपर. एकूण रूप असं की जणू त्यांचं स्त्रीत्वच हरवलं असावं. हाडांची एकत्र बांधलेली मोळीच जणू. हे सगळं पाहिलं मात्र, एका क्षणातच मला त्यांचं रोगनिदान झालं. काकूंना ‘acromegaly’ नावाचा आजार झाला होता. अगदी पाहता क्षणीच होऊ शकावं इतकं सोपं निदान होतं हे.

काकूंच्या लक्षणात, त्यांच्या दमण्यात आणि त्यांच्या निदानात मी इतका गुंतलो होतो की शेजारी त्यांचे पतीराज आहेत हेही मी काही क्षण विसरलो होतो. पण ते तिथेच होते. दूरस्थ होते. तटस्थ होते. अलिप्त होते. आपल्या पत्नीकडे, मग माझ्याकडे, मग पुन्हा पत्नीकडे आणि मग  पुन्हा – अशी त्यांची नजर फिरत होती. परिस्थितीचा वेध अचूकपणे घेत असल्यासारखी. काकूंचं हे दमणं, त्यांच्या हालचालीतला संथपणा आणि मुख्य म्हणजे त्यांची विरूपता- हे सगळं त्यांच्या अगदी सवयीचं असणार. उठून पुढे होऊन काही मदत करावी हे त्यांच्या जणू गावीही नव्हतं. जे व्हायचं ते आपोआप स्वाभाविकपणे होणारच आहे अशी त्यांची खात्री झाली असणार. आजवरचा त्यांचा अनुभवच मुळी तसा असणार. त्यामुळे  माझ्या समोर खुर्चीत बसून आरामशीर पाठ मागे टेकून ते बसले होते. इकडे तिकडे बघत होते. 

काकू स्थिरावल्या. मी माझ्या खुर्चीत बसलो. एकूण अशी स्थिरता दिसल्यावर खोपकर पुढे आले,
‘ह्या माझ्या मिसेस. ऊर्मिला. She is actually suffering from –‘

“Acromegaly, She has acromegaly,’- ते काहीही म्हणायच्या आतच मी त्यांचे बोलणं तोडत म्हणालो. त्यांच्या तटस्थपणाची मला चीड आली होती, त्यामुळे मी त्यांचं हे बोलणं तोडलं की मला माझ्या तत्काळ निदानाची फुशारकी त्यांच्यासमोर मारायची होती म्हणून मी हे बोललो – मलाही सांगणं अवघड आहे. 

‘Quite, smart! You seem to be a smart doc.’ खोपकर प्रभावित झाल्याचं मला दिसलं. त्यांच्या नजरेत किंचित विश्वास आला असावा किंवा मला तसा भास तरी नक्की झाला. 

‘तर आता तुम्ही म्हणता तसा त्यांना acromegaly चा आजार झाला आहे आणि हे आम्हाला गेली काही वर्षं माहीतही आहे. मुंबईला काही डॉक्टरांना आम्ही दाखवलेलं आहे, ते सांगतील त्या तपासण्या केल्या आहेत आणि एकूण निष्कर्ष असा की या आजारावर आम्ही आता करण्यासारखं काहीही उरलेलं नाही. ‘

एवढं बोलून खोपकर थांबले, एक अर्थपूर्ण विराम. 

‘आज मी तुमच्याकडे आलोय ते त्याहून वेगळ्या कामासाठी. गेले काही महिने उर्मिलाला हा असा दम लागतोय. तुम्ही आताच पाहिलंत किती हळूहळू जिना चढत होती ती. तसं म्हटलं तर, I don’t think there is anything greatly wrong with her. She just panics. Panics for nothing. मला वाटतं आजारपण मनाला फार लावून घेतलंय तिनं. I think a trained doc like you may be in better position to explain it to her.’

म्हणजे खोपकरांनी मला काही फारसं कामच ठेवलं नव्हतं तर. निदान झालेलं, उपचार त्यांनीच ठरवलेला जो की ते करत होते, दुर्लक्ष करून. मी फक्त हे काकूंना समजावून सांगायचं होतं. 

‘मला त्यांना तपासावं लागेल, त्यांचा इ.सी.जी. काढावा लागेल. इतरही काही तपासण्या लागतील. मग काय निदान होईल ते बघून त्यावर उपचार काय करायचे हे ठरवू.’

एका दमात मी हे सगळं म्हणालो खरं पण मी आता टाकत असलेला हा एक बॉम्ब होता याची मला पुरेपूर जाणीव होती. खोपकरांचा चेहरा गंभीर झाला. आतापर्यंत सारं काही समजल्याचं एक परिपूर्ण आध्यात्मिक हास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं ते थोडंसं विस्कटलं गेलं. त्याठिकाणी एक आव्हान येऊन उभं ठाकलं. जणू त्यांच्या विचारांना मी आव्हान देत होतो.

‘नाही, तुम्ही त्यांना तपासा ना. त्यासाठी तर त्यांना आणलंय ना इथे. तुम्ही तपासून पाहा. पण ते इ.सी.जी. काय किंवा त्या इतर तपासण्या काय, त्याची काही गरज आहे असं नाही वाटत हो. झालंय हे सगळं करून दोन-तीन वर्षांपूर्वी. काय नाहीये त्याच्यात, आमचे मुंबईचे डॉक्टर म्हणालेले. She only has acromegaly.’

खोपकर बोलत होते. मला पटवत होते. सगळ्याचा सूर असा की मी हे सगळं थोडक्यात मिटवावं, नवीन व्याप, नवीन खर्च काढू नयेत. मला हे दिसत होतं. रागही येत होता. पण खोपकर जसे स्पष्ट बोलू शकत होते, ते मला जमत नव्हतं. जमणारही नव्हतं. 

‘मी सांगतो त्या तपासण्या झाल्याशिवाय मी काही करू शकेन असं मला वाटत नाही.’ एवढंच मी बोललो आणि शांत बसलो. प्रतिक्रियेची वाट पाहत. 

खोपकर शांत बसले. माझ्याकडे पाहत. मधून पत्नीकडे पाहत. काकू शांत होत्या. आत्ममग्न. त्यांना या साऱ्यात बोलण्याचा जणू काहीच हक्क नव्हता. एकदा आजारी पडून तो त्यांनी गमावलेला होता. आता त्यांचं काम जणू एकच- श्वास घेत राहणे. श्वास सोडत राहणे. तेवढं त्या अगदी नेमानं करत होत्या.

‘ओके. Let’s have it your way. किती खर्च येईल याचा?’

मी खर्चाचा अंदाज सांगितला. पुन्हा एक सौम्य विराम आणि अखेर खोपकरांनी संमतीदर्शक मान हलवली. त्यानंतर कुठे मी माझ्या कामाला सुरुवात केली. काकूंकडून सगळी माहिती मिळवली. त्यांना तपासलं. इ.सी.जी काढला. सर्वसाधारण अनुमान स्पष्ट होतं. काकूंच्या हृदयाला सूज आली होती आणि हा आजार गंभीर अवस्थेत होता. अगदी हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल अशा तीव्रतेचा.
  
पुन्हा एकदा खोपकरांना समजावणं, खर्चाचा नवीन अंदाज मग त्यावर त्यांची नाराजी, हॉस्पिटल टाळता नाही का येणार अशी शंका आणि अखेर नाराज संमती. सगळा खेळ तसाच बरहुकूम झाला आणि काकू हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. 

हॉस्पिटलमधला काळ मात्र खूपच छान गेला. काकूंच्या तपासण्या झाल्या. औषधोपचार सुरु झाले आणि त्यांच्या प्रकृतीत आश्चर्य वाटावं अशी सुधारणा झाली. एक डॉक्टर म्हणून समाधान वाटावं अशी प्रगती. दुसऱ्याच दिवशी त्या अंथरुणात उठून बसल्या, गप्पा मारू लागल्या, पुढच्या दिवशी खाटेभोवती खोलीत मोकळेपणानं चालणं सुरु झालं. आधाराची गरज वाटेना. दम तर जवळजवळ नव्हताच. काकूंच्या चेहऱ्यावर हसू आलं. ते पाहून मीही मी खूष होतो. 

काकू हॉस्पिटलमधे असतानाचीच गोष्ट. वेळ संध्याकाळची. मी माझ्या दवाखान्यात होतो. पेशंटची साधारण गर्दी होती. काम वेळेत आटोपण्याच्या गडबडीत होतो, तर गीता आत आली, संध्याकाळच्या वेळेला गीता माझी मदतनीस असे.

‘सर, खोपकर नावाचे कुणी गृहस्थ आलेत. भेटायचं म्हणतायत. पेशंट नाहीयेत पण नुसतंच बोलायचं म्हणतायत. त्यांना आधी आत पाठवू?’

मी ओळखलं. खोपकर आले आहेत. त्यांना काकूंच्या तब्येतीविषयी बोलायचं असणार. ती अपेक्षेबाहेर सुधारली होती. तेव्हा आता ते खूष असणार. आता कृतज्ञतेचे चार शब्द ऐकायला मिळणार. खोपकरांच्या करारी मुद्रेवर कृतज्ञता कशी दिसेल हा माझ्या दृष्टीनं मोठ्या उत्सुकतेचा भाग होता. नाही तरी सौ.ना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून स्वतः खोपकरांचा तिथे पत्ताच नव्हता, कुणी तरी एक आया त्यांनी नेमली होती, चोवीस तास तीच तिथं असे. स्वतः खोपकर तर दिसलेच नाहीत पण इतरही कुणा नातलगाची, परिचिताची ये-जा नव्हती. काकू एकट्या होत्या. अगदी तेच त्यांचं दुखणं म्हणावं इतक्या एकट्या होत्या. मी आता खोपकरांना भेटायला उत्सुक होतो. या भेटीला आता एक नवा संदर्भ होता.  
  
‘पाठव त्यांना आत. त्यांचं काम किरकोळ आहे,’ मी गीताला म्हणालो.

थोड्याच वेळात दरवाजा उघडला. पण आत आलेली व्यक्ती खोपकर नव्हती. कुणी दुसराच तरुण होता. विशीतला. पोरगेलासा वाटणारा. गोरापान. बालिश पण गोड चेहऱ्याचा. किंचित बिचकत तो आत आला. खुर्चीत तो बसला तोही मागे न टेकता, अस्वस्थ अधीरतेनं, जणू कुठली तरी अपराधी भावना त्याला घेरून होती. 

‘मी अजित खोपकर. माझी आई तुमच्याकडे अॅडमिट आहे. तिच्याविषयी चौकशी करायला आलो होतो.’
क्षणार्धात मला सगळा खुलासा झाला. खोपकरांना एक मुलगा आहे ह्याची नोंद मी घेतली होती. अगदी पहिल्या दिवशीच मी जेव्हा त्यांना त्यांची माहिती विचारली तेव्हाच काकूंनी मला ते सांगितलं होतं. पण त्याविषयी नंतर ना कधी त्यांनी उल्लेख केला, ना कधी मला ते विचारण्याची वेळ आली. किंचित संताप आला मला. आई इतकी आजारी. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली. बाप असा विक्षिप्त आणि हा इतका धडधाकट तरुण मुलगा, आज मला असा चोरटेपणानं भेटतो? इतक्या दिवसात त्याच्या अस्तित्वाची जाणीवसुद्धा मला होऊ नये इतका दुरावा? माझ्या कपाळावर आठी आली असणार, कारण आता अजित आणखीच बिचकला असं मला दिसलं. त्याच्या हाताला एक सूक्ष्म कंप सुटला.

‘आईंची तब्येत बरी आहे, पण हे विचारायला इथे- ‘ मी काही पुढे बोलायच्या आतच अजित बोलू लागला, अस्वस्थ उतावीळपणानं.

‘I am so sorry, sir, मला कळत नाही, मी हे तुम्हाला कसं सांगू आणि सांगू की नको. मी माझ्या आई-वडलांबरोबर राहात नाही. वेगळा राहतो. माझं माझ्या वडलांशी जमत नाही. He is too strict. Too dominating.  मला सांगा, सर, माझी आई कशी आहे? बरी आहे ना ती? मला हे विचारायला इथंच यावं लागलं कारण मला परवानगी नाही, तिला भेटण्याची, तिच्याशी बोलण्याची. मी चोरून जरी तिला भेटलो आणि हे पपांना समजलं तरी आईचे हाल होतात. मला ते नकोय, आईचा त्रास मी नाही सहन करू शकत. You won’t believe, he beats her physically, even in this state he beats her. I cann’t take it. मला सांगा, सर, बरी आहे ना आई माझी?’

माझा अंदाज साफ चुकला होता. खोपकर प्रकरण गंभीर होतं, वेगळं होतं. अजितवर राग धरण्यात मी चूक केली होती उलट त्यालाच सहानुभूतीची गरज होती.

‘तुझ्या आईची तब्येत सुधारत आहे. त्यांचा आजार गंभीर आहे, पूर्ण बरा होणार नाही असा हृदयाचा आजार आहे तो. पण औषधं घेतली, नीट काळजी घेतली तर आटोक्यात राहील, अगदी वर्षानुवर्षं आटोक्यात राहील असा आहे.’

‘Thanks, Thanks a lot, Sir, माझी आई आज तुमच्यामुळे आहे. मला याची जाणीव आहे. Do help her, Sir. तुम्ही सांगाल ती औषधं मी तिला आणून देईन. बाहेरून जे जे जमेल ते करीन पण तुमचं लक्ष असू द्या, सर.’ 

असं म्हणत अजित उठला पण माझं कुतूहल चाळवलं होतं. 

‘आईंची औषधं तू आणतोस?’ मी विचारलं.

‘हो सर, कधी कधी. आणावी लागतात. My dad is a brute. He thinks only of money. आईच्या तब्येतीवर फार खर्च होतो, नाराज असतात ते त्यामुळं. नाही आणत औषधं मग ते एकेक वेळेला. मग मी पोचवतो ती घरी, अशीच चोरून मारून. You don’t know my dad. I hate him. तुम्हाला कल्पना येणार नाही सर, ते खूप श्रीमंत आहेत. खूप पैसा करून आहेत. He is filthy rich, I tell you. एक chemical factory आहे त्यांची. इथे एक-दोन घरं आहेत. आम्ही गोव्याकडचे. तिकडंही बरीच property आहे. पण पैसे खर्च नाही करणार ते. आता आई आजारी आहे इतकी वर्ष पण घरात कामाला बाई ठेवायची तयारी नाही त्यांची. आईलाच करावी लागतात ही सगळी कामं. आई आजारी आहे हे पटतच नाही मुळी त्यांना. तिला मारतात. मधे एकदा आमची कार रस्त्यात बंद पडली तर, you won’t believe, त्यांनी तिला मागून ढकलायला लावली. Can you believe it? He made her do that. I know, one day he will suffer for all this, I hope he will’ केवढा त्वेष, केवढा आवेग होता अजितच्या बोलण्यात. 

खोपकरांचं कुटुंब म्हणजे एक अभ्यास विषय वाटावा असं होतं. इन-मीन-तीन माणसं पण प्रत्येकाचं तोंड वेगळीकडे. प्रत्येकाची समस्या वेगळी आणि प्रत्येक जणच मुळी दुसऱ्याची समस्या बनून राहिलेला. कठीण आहे. मला वाटलं.

अजितचं बोलून झालं असावं बहुधा. तो खुर्चीतून उठू पाहत होता. पण आता माझीही उत्सुकता चाळवल्यासारखी झाली होती. खोपकर आणि त्यांचं कुटुंब.

‘अरे, तू तर वेगळा राहतोस. करतोस तरी काय तू?’ मी त्याला विनाकारणच विचारलं.

‘मी? मी विद्यार्थी आहे. Law student आहे मी.’ तो म्हणाला.

‘पण मग हा सगळा खर्च वगैरे. मगाशी तू म्हणालास तो, आईच्या औषधांचा खर्च. तो कसा करणार तू?’ माझा पुन्हा एक अनाहूत प्रश्न.

अजित संकोचला. काय बोलावं, काय सांगावं हे कळत नसल्यासारखा.

‘I am not single, I am married, sir. लग्न झालंय माझं.’

हा म्हणजे मोठाच धक्का होता. किरकोळ विशीतला वाटावा असा हा मुलगा. आई वडलांपासून वेगळा, एकटा राहतो आणि लग्न झालंय म्हणतो.

‘I am married and my wife is senior to me. माझ्यापेक्षा पाचेक वर्षांनी मोठी आहे ती. ती नोकरी करते. She is a divorcee and has a kid from her previous marriage.  तोही आमच्या बरोबर आहे. सध्या मी शिकतोय आणि she supports our family, financially’ 

सहज बोलल्यासारखा तो बोलत होता आणि इकडे मी धक्क्यांवर धक्के खात हेलपाटत चाललो होतो. माझ्या अवस्थेची त्याला कल्पना आली असणार आणि अशा अवस्थेचा अनुभव त्याला पूर्वीही आला असणारच, कारण तो स्वतः हे सगळं सांगताना अगदी शांत होता. स्थिरचित्त होता. पण माझ्या चेहऱ्यावरचं मोठं थोरलं प्रश्नचिन्ह त्यानं ओळखलं. आता माझं अज्ञान दूर करणं गरजेचं आहे हेही त्यानं ओळखलं. त्याखेरीज आता कुणालाच मुक्ती शक्य नव्हती. खुर्चीतल्या खुर्चीतच तो किंचित मागं सरकून बसला. जास्त बोलण्यासाठी त्याला ते गरजेचं होतं. 

‘प्राची, माझी बायको, माझ्या law च्या क्लासमधे माझ्याबरोबर होती. आमची खूप चांगली मैत्री जमली. ती मला भेटली त्याच्या आधीच तिचं सगळं झालं होतं, म्हणजे घटस्फोट वगैरे. तिच्या घरची परिस्थिती तिनं मला सांगितली. माझ्या घरची परिस्थिती मी तिला सांगितली. I do not know whether it was our sorrow that got us together. पण आम्ही हे असे जवळ आलो. मला तर तिचा खूप आधार वाटला. आमचं लग्न झालं. माझे पपा अर्थातच upset झाले पण ते काही मला नवीन नव्हतं. मी तर त्या आधीच घराबाहेर पडल्यासारखा झालो होतो. यानिमित्तानं पुरताच हाकललो गेलो. खूप त्रागा केला पपांनी. पण मी बधलो नाही. ते ओरडत होते. धावून धावून अंगावर येत होते. जमलं असतं तर अंगावर हातसुद्धा टाकला असता त्यांनी माझ्या. पण आता ते जमणार नव्हतं. आपला मुलगा हरवला अशी जाणीव तेव्हा प्रथम त्यांच्या डोळ्यात मला दिसली आणि खरं सांगू, एक विचित्र आनंद झाला मला त्या दिवशी. एक सूड उगवल्याचा आनंद. म्हटलं तर तो आनंद होता पण हा आनंद मला होतोय याचीही लाज वाटत होती मला.’

अजित शांत झाला. थोडाच वेळ. एक गंभीर शांतता पसरली माझ्या खोलीत. 

‘प्राची अगदी समजूतदार आहे. आई-पपांच्या या असल्या संघर्षात माझे काय हाल होतात ते ती समजून आहे. माझ्या आईसाठी खूप काही करायची इच्छा असते तिची. पण पपांमुळे – कसं शक्य आहे ते? एकदा आईनं पाह्यलंय तिला. हळूच चोरून आम्ही घरी गेलो होतो तेव्हा. तेव्हा आमचं लग्नही झालं नव्हतं. पण आईला पसंत होती ती. केवढी रडली ती तेव्हा. तिला तिचे काही लाड करता आले नाहीत, म्हणून. आमच्या लग्नालाही यायची तिची इच्छा होती.’

पुन्हा एकदा अजित शांत झाला. टेबलाची कड घट्ट पकडून बसला. समोर शून्यात पाहत.

‘ओके. येतो सर.’ असं म्हणून अचानक तो उठला आणि वेगानं खोलीबाहेर पडला. 

गीतानं पुढचा पेशंट आत पाठवला. कोण होतं ते, काय होती तक्रार त्यांची? मला थोडा वेळ लागला असणार पुन्हा भानावर यायला.

काही दिवस उलटले. खोपकर दवाखान्यात आले. सपत्नीक. ‘हाय डॉक.’ म्हणत. माझा हात हातात घेत. नजरेनं मला जोखत. खोपकर समोर आले की मला एक प्रकारची अस्वस्थता येते हे माझ्या तेव्हा लक्षात आलं. पण आता त्यांचं येणं अटळ होतं. मला त्यांची सवय करून घ्यावी लागणार होती.

काकू आता तशा बऱ्या होत्या. वरवर आनंदी. दमही खूपच कमी. आडव्या झोपू शकत होत्या. सांगू त्याप्रमाणे श्वास घेऊ शकत होत्या. रोखून धरू शकत होत्या. माझी तपासायची खोली थोडी स्वतंत्र म्हणता येईल अशी आहे. पेशंट तपासताना त्यांना मोकळेपणा वाटावा म्हणून. मिस्टर खोपकरांसारख्या नातलगांना दूर ठेवायला याचा उपयोग होतो. हा अर्थात जास्तीचा फायदा. बोनस.

तपासणी झाली. काकू उठल्या. मी खोलीबाहेर जाण्यासाठी वळलो. इतक्यात अचानक त्यांनी माझा हात घट्ट पकडला. इतका घट्ट की तो सोडवणं मला अशक्य होतं.

‘अजित आला होता ना, तुम्हाला भेटायला?’ थेट माझ्या डोळ्यात पाहत त्यांनी विचारलं. काही क्षणच गेले असतील फक्त. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहायला लागल्या त्यांच्या. नजर हळूहळू खाली झुकली. त्यांच्या हाताची पकड सैल होत गेली. काय बोलावं, कसं सांत्वन करावं? त्यांच्या दुःखासमोर मी लहान होतो. मी शांत उभा राहून त्यांना पाहत होतो. एक शब्दही न बोलता त्या शेजारी भितीकडे पाहत होत्या. हुंदके देत होत्या. शेजारी पडलेला त्यांचा छोटा रुमाल मी उचलला आणि त्यांच्या हातात दिला. मी बाहेर पडलो तेव्हा त्यांनी तो त्यांच्या नाकावर धरला होता. हुंदक्यांचा आवेग कमी कमी होत चालला होता.

बाहेर आलो तर खोपकर होतेच. असणारच होते. खुर्चीत बसलेले. माझी वाट पाहत. आत जे काही घडत होतं त्याबाबत पूर्ण अनभिज्ञ.

‘काय म्हणते, ऊर्मिला? All Ok?’ त्यांनी विचारलं.

‘Yes, Sir. She is fine’ मी म्हणालो. मला माझ्या दांभिकपणाची लाज वाटली. काकू हळूहळू तपासण्याच्या खोलीतून बाहेर आल्या. नजर खाली घालून समोर खुर्चीवर बसल्या. तशाच मूक. मी औषधं लिहून कागद त्यांच्या हातात ठेवला. मि. खोपकरांनी तो तत्परतेनं उचलला. तो वाचल्यासारखं केलं, वर पाहून माझ्याकडे हलकंसं स्मित केलं, डोळे मिचकावले. ‘See you again,’ असं म्हणत ते उठले आणि वेगानं खोलीबाहेर पडलेसुद्धा. खोपकरांच्या सगळ्याच हालचालीत एक सफाईदारपणा असे. त्यांना बहुधा एकसारखं यशस्वी वाटत असावं, मी अंदाज केला. काकू संथपणे उठल्या. आपलं जड शरीर आणि जड मन उचलत हळूहळू कष्टानं खोलीबाहेर पडल्या. माझी इच्छा होती, एकदा तरी त्यांनी वळून पहावं, अनिच्छेनं का होईना हसावं. नाही म्हटलं तरी त्यांचं एक खोल रहस्य, खोलवरचं दुःख मला माहीत होतं. पण यातलं काहीही त्यांनी केलं नाही. त्या फक्त बाहेर पडल्या.

आणि त्यानंतरही त्या वेळोवेळी येत राहिल्या. तपासून घेत राहिल्या. खोपकर स्वतः कमालीच्या शिस्तीचे गृहस्थ असणार. काकूंची एकही तारीख त्यांनी कधी चुकवली नाही. नेहमी वेळेपूर्वी हजर. तीच खोचक नजर. तोच कमालीचा आणि कमावलेला सफाईदारपणा. काकूंसाठी हे सगळं करणं ही काही त्यांची आवड खासच नव्हती. अगदी न पटणारी गोष्ट होती ती त्यांच्या दृष्टीनं. पण हे असं असूनही वरकरणी सगळं यथासांग करत राहायचं आणि तरीही त्यापासून अलिप्त राहायचं ही त्यांची खास हातोटी. का कोण जाणे, त्यांच्याकडे पाहून नेहमी मला ‘शुचिर्भूत’ या शब्दाची आठवण येई. खोपकर म्हणजे मूर्तिमंत शुचिर्भूतता! 

पण हे सगळं किती दिवस चालणार? काकूंचा आजार हळूहळू वाढत जाणार होता. आताशा त्यांचा वेग पुन्हा मंदावत चालला होता. दम लागण्याचं प्रमाण वाढत होतं. तपासायला म्हणून झोपवावं तर त्यांना फार काळ झोपवतही नसे. धडपडून त्या पुन्हा उठून बसायला बघत. आता फार दिवस त्या दवाखान्यापर्यंत येऊ शकणार नाहीत, आमचा जिना चढू शकणार नाहीत हे मला स्पष्ट दिसत होतं. स्वतः खोपकरांनाही याची जाणीव असावी बहुधा कारण एक दिवस दवाखान्यातून बाहेर पडता-पडताच त्यांनी मला विचारलं, ‘ डॉक, गरज पडली तर तुम्ही घरी तपासायला वगैरे येता की नाही?’

‘हो, येतो की. गरज पडली तर होम-विझिट करतो ना मी.’ मी उत्तरलो.

‘फी काय असते तुमच्या होम-विझिटची?’ खोपकरांनी त्यांच्या खास शैलीत अगदी थेटच विचारलं. एव्हाना मी खोपकरांना सरावलो होतो. असे प्रश्न निर्विकारपणे झेलण्याइतपत कोडगा झालो होतो. मी माझी फी त्यांना सांगितली. ती फार नव्हती पण वैद्यकीय कारणासाठी, विशेषतः पत्नीच्या प्रकृतीसाठी होणारा खर्च म्हणून त्यांना बहुधा ती जास्त वाटली असावी कारण तो आकडा ऐकून आश्चर्य आणि नापसंती यांचं मिश्रण असलेली एक भावना त्यांच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे दिसली. खोपकर तसं काही बोलले नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पुरेसे बोलके होते, त्यातून बोध घेत मीच आपसूक माझी फी कमी करावी अशी त्यांची इच्छा असावी बहुधा. पण मी निर्विकार होतो.

‘तुम्हाला नेण्यासाठी कारची व्यवस्था करू शकतो मी. तसं केलं तर? तर काय फी असेल तुमची?’ खोपकरांनी विचारलं. 

एरवी खोपकर एवढे चतुर, स्मार्ट वाटणारे. आता मात्र एकदम बालिश वाटले. मी हसलो. 

‘विझिटच्या फी मधे वाहतुकीचा वेगळा दर नसतो, सर. विझिट फी ही संपूर्ण विझिटचे शुल्क म्हणून घेतो आम्ही. एक सांगू, आम्ही डॉक्टर जेव्हा पेशंट तपासतो तेव्हा खर्च करतो तो वेळ, त्याचं मोल म्हणून फी घेतो आम्ही. त्यासाठी लागणारा पेट्रोल खर्च, वीज खर्च असा हिशेब नसतो. अगदी एखाद्या निदानासाठी लागणारं ज्ञान, ते तरी असं कुठे खर्च होत असतं. सगळा हिशेब वेळाचा असतो, सर’ मी नको इतक्या स्पष्टपणे बोललो. मलाच नंतर कसं तरी वाटलं त्याचं. पण हा खोपकरांचा प्रभाव होता. इतकं व्यावहारिक होण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय होता माझ्यासमोर?

ती वेळ काही दिवसातच आली. खोपकरांच्या घरी मला जावं लागलं. काकूंसाठी होम-विझिट करावी लागली. त्यांनी गाडी अर्थातच पाठवली नाही. मीच गेलो माझ्या वाहनानं.

शहराच्या सुखवस्तू भागातलं घर. टुमदार बंगला. बाहेर एक कार. चांगल्या चवीनं सजवलेलं अतरंग. बेड-रूममधे काकू पडलेल्या. वाढत चाललेला दम. घटत चाललेलं वजन. पायावर, अंगावर चढत चाललेली सूज. काकूंच्या खालावत चाललेल्या प्रकृतीचे हे सगळे निदर्शक. खोपकर माझ्या मागे उभे. त्यांच्या नेहमीच्या शोधक पवित्र्यात. मी माझी तपासणी उरकली. बाहेर दिवाणखान्यात आम्ही दोघं समोरासमोर बसलो. खोपकर आणि मी.

‘तब्येत खराब आहे त्यांची. आता मी काही औषधं वाढवून देतो. बघू कसा प्रतिसाद मिळतो. नाही तर पुन्हा अॅडमिट करावं लागेल,’ मी म्हणालो.

खोपकर अर्थातच नाराज होते. अॅडमिट करण्याचा माझा पर्याय त्यांना जणू ऐकूच गेला नाही. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत त्यांनी थंडपणे मी दिलेली औषधाची चिट्ठी आपल्या हातात घेतली. वरवर वाचली.
‘ठीकाय, देतो ही औषधं. बघू या काय होतं ते. ओके? कळवतोच मी तुम्हाला.’ असं म्हणत उभ्या-उभ्याच त्यांनी मला निरोप दिला. खोपकरांच्या बंगल्याच्या दरवाजातून बाहेर पडलो तेव्हा उशीर रात्र झाली होती. बाहेर चांगलाच काळोख होता. वळून पाहिलं तर सगळा बंगलाच सुनसान काळोखानं वेढल्यासारखा दिसला. भीतीदायक.

फार दिवस जाणारच नव्हते. माझी खात्री होती, तसंच झालं. मध्यरात्रीची वेळ. अचानक दम वाढलेल्या अवस्थेत खोपकर काकू थेट हॉस्पिटलमध्येच आल्या. परिस्थिती अशी गंभीर की आय.सी.यू. मधे घ्यावं लागलं. मग सगळे सोपस्कार, ऑक्सिजन. सलाईन. पुन्हा सगळ्या तपासण्या. खोपकरांची वाढती नाराजी. पण सगळ्याला तोंड देत काकू सुधारल्या. उठून बसल्या. बोलू लागल्या. आय.सी.यू. मधून बाहेर घेतलं. बरोबर कुणी आया आणि काकू असा जुना नित्यक्रम सुरु झाला. आसपासची सगळीच परिस्थिती अशी प्रतिकूल, विचित्र. पण काकूंचं दैव बलवत्तर (?). त्या बचावल्या. घरी जाण्याइतपत सुधारल्या.

मधे एकदा अजितही असाच दवाखान्यात येऊन गेला. आईच्या तब्येतीची चौकशी. माझ्याविषयी कृतज्ञता. हेही रीतसर झालं. काकूंची एक अॅडमिशन अशा प्रकारे संपन्न झाली. 

आणि हेही एकदा नाही, दोनदा- तीनदा झालं. पुन्हा पुन्हा आय.सी.यू. ऑक्सिजन. नाकातोंडात नळ्या. आणि त्यातून शेवटी दुःखकारक प्रगती. काकू हताश होत चालल्या. अधून-मधून खोपकरही दिसायचे. चेहऱ्यावर एक उर्मट नाराजी. काकूंचं वारंवार उलटणारं दुःख हा जणू माझाच गुन्हा असावा, असा आविर्भाव. काकूंना वारंवार अॅडमिट करावं लागतं होतं याचा मलाही खेद होताच, पण माझाही नाईलाज होता. ते दुखणंच मुळी तसं होतं.

अशाच एका अॅडमिशन दरम्यानची गोष्ट. संध्याकाळची वेळ. दवाखान्यात गर्दी आणि अचानक खोपकर उगवले. गीता बाहेर होतीच. तिच्यावर वजन टाकून लगेचच आत आले. आता हे जमवण्याइतकी प्रतिष्ठा त्यांनी बाहेर कमावली होती.

‘You see, Doc. She is admitted in hospital again.’

मी शांत, निरुत्तर. थोडा वेळ अंदाज घेऊन ते म्हणाले,

‘डॉक, फार खर्च होतोय माझा. आतापर्यंत किती खर्च झालाय माहित्ये?’ असं म्हणून खर्चाचा आकडाच त्यांनी माझ्या तोंडावर फेकला. त्यांनी जो खर्च ‘जास्त’ म्हणून सांगितला तो तेव्हाच्या संदर्भात फार जास्त म्हणावा असा नव्हता, आणि खोपकरांसाठी तर तो मुळीच जास्त नव्हता हे मला दिसत होतं, तरी मी शक्य तेवढी सहानुभूती माझ्या चेहऱ्यावर जमवली आणि शांत वाट पाहत राहिलो.

‘You must give me a discount in all your charges henceforth. I don’t think it is justifiable to charge for repeated admissions just the same way.’

हे जरा जास्तच होत होतं. सवलत मागणं मी समजू शकत होतो पण फी घेण्याच्या हक्कावरच शंका घेणं म्हणजे जास्तच झालं. तरीही मी शांत बसलो. 

‘काकूंच्या बिलात माझ्याकडून काही शक्य असेल ती सवलत देण्याचा प्रयत्न मी करीन,’ एवढं सांगून मी गप्प बसलो. पण एवढ्यानं खोपकरांचं समाधान होणार नव्हतं. त्यांना बहुधा ठोस आश्वासन हवं होतं. कदाचित पूर्ण सुटका हवी होती बिलातून. इतकं काही करणं मला शक्य नव्हतं, ते मला गरजेचंही वाटत नव्हतं आणि ह्या सगळ्यात केठे तरी खूप दुखावल्याची भावना माझ्या मनात आली होती. वाटत होतं, काहीच करू नये. सवलतीचं काम करण्यासाठी खोपकर ही काही योग्य केस नव्हतीच मुळी. 

थोडा वेळ थांबून, किचित त्रागा करून खोपकर उठले आणि गेले. त्यांचा नेहमीचा सफाईदारपणा आज त्यांच्या वागणुकीत, हालचालीत तितकासा नव्हता. 

काकू अजूनही हॉस्पिटलमध्ये होत्या. आता इथून पुढे बिलाचा प्रश्न भेडसावणार हे उघड होते. या प्रश्नाची सोडवणूक कशी करावी या विचारात मी. हॉस्पिटलमध्ये गेलो तर काकू खाटेवर बसलेल्या. अलीकडे नेहमीच असत तशा उदास, खिन्न. मी त्यांना तपासलं. तब्येत ठीक होती. दोनेक दिवसात कदाचित घरी जाऊ शकतील अशी. तपासून मी परत निघणार तसा काकूंनी माझा हात घट्ट पकडला. पुन्हा एकदा तोच भावनांचा आवेग. डोळ्यात पाणी भरलेलं. हात तसाच पकडून ठेवत त्या म्हणाल्या-, ‘डॉक्टर, तुम्हीच तपासाल ना मला नेहमी? मला सोडणार नाही ना एखाद दिवस?’

त्यांच्या प्रश्नाचा रोख मला समजेना. काय प्रतिक्रिया द्यावी याविषयी मी साशंक. मी त्यांच्या हातावर हात थोपटला. ‘मी कुठे जाणारेय? असणारे इथेच. तुम्ही नका काळजी करू.’असं काही तरी म्हणत मी माझा हात सोडवला. बाहेर आलो. तरी काकूंचे उसासे चालूच होते. 

हॉस्पिटलमधून बाहेर पडणार इतक्यात विजय भेटला. विजय माझा मित्र, आमच्याच हॉस्पिटलमधला माझा डॉक्टर मित्र. गडबडीत होता पण तरी तो थांबला आणि म्हणाला- ‘त्या कोण खोपकर पेशंट आहेत न तुझ्याकडे. त्यांचा काही प्रॉब्लेम आहे का?’

‘नाही, आता बऱ्या आहेत त्या. काही दिवसात घरीसुद्धा जातील.’- मी.

‘मग त्यांचे मिस्टर का उगाच धावपळ करतायत. मला भेटले, म्हणाले तुम्ही घ्याल का आमची ही केस? आम्हाला तुमची treatment हवी आहे म्हणून. कमालच आहे, म्हणजे इकडे पेशंट बरा होतोय तर तिकडे नवरा डॉक्टर बदलायची भाषा करतोय.’ 

हसत हसत विजय निघून गेला. त्याला हे कोडं वाटलं. पण माझ्या लक्षात आलं. खोपकर डॉक्टर बदलू पाहत होते. इथेही ते भाव करत डॉक्टर निवडणार होते. त्याची ही तयारी होती. खोपकर एक अवली माणूस होता खरं!

पुढचे दोन दिवस असेच शांतपणे गेले. काकू बऱ्या होत गेल्या. आता घरी पाठवण्याची वेळ आली. त्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये गेलो तर आमचे शंकरमामा धावतच माझ्या मागे आले. 

‘सर, एरंडे सरांनी लगेचच भेटायला बोलावलंय. काही तरी अर्जंट काम आहे सर,’ मामा म्हणाले.

‘चला, येतोच,’ असं म्हणून मी त्यांच्या मागोमाग तडक ऑफिसात गेलो. एरंडे आमच्या हॉस्पिटलचे अधीक्षक. सहसा ते असं कधी बोलावत नाहीत. काय काम असावं अशा शंकेत मी.

‘या, सर, बसा’ एरंड्यांनी माझं स्वागत केलं. एरंडे एकदम दिलखुलास माणूस.

मी बसलो. एरंडे थोडे गंभीर वाटले.

‘ते खोपकर काल येऊन गेले. त्यांच्या मिसेस म्हणे तुमच्याकडे अॅडमिट आहेत. कशा आहेत त्या?’

खोपकर हा विषय निघाला आणि मी हताश झालो. आता पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा अंदाज येईना. मी सगळा पाढा पुन्हा वाचला.

‘I see. नाही. त्यांचे मिस्टर म्हणत होते की बायकोची तब्येत सारखी बिघडते. सारखं अॅडमिट करावं लागतं. खर्च फार होतो. त्यांची अशी इच्छा आहे की त्यांना तुम्ही नाही पाहिलं तरी चालेल. त्यानं काय होईल की त्यांचं बिल तेवढंच कमी होईल. नाही तरी आता केसमध्ये काही फार आशादायक असं काही नाहीच्चे. तर हा विझिट फीचा खर्च तरी वाचेल असं त्यांचं मत. तुम्हाला काय वाटतं?’ एरंडे म्हणाले.

मी चपापलोच. खर्च वाचवण्यासाठी मला बाजूला सारून पेशंट नुसताच हॉस्पिटलमध्ये ठेवायचा, जुजबी उपचार चालू ठेवायचे. आणि अशा प्रकारे पैशाची बचत करायची, अशी अभिनव युक्ती शोधून काढली होती खोपकरांनी. आणि अनवधानानं एरंडे त्यांना साथ द्यायला निघाले होते की काय?

‘कुठल्याही डॉक्टरचे इलाज चालू नसलेला पेशंट आपण हॉस्पिटलमध्ये कसा काय ठेवणार? हे काय हॉटेल आहे की काय?’ मी त्राग्यानं विचारलं. 

‘मीही तोच विचार केला. खोपकराना मी म्हणूनच नाही म्हटलं आहे आधीच.’ एरंडे म्हणाले आणि मला धीर वाटला. पण ते अजून बोलतंच होते-

‘पण मी काय म्हणतो, एवढा कडूपणा घेण्यापेक्षा तुम्हीच का नाही बघत त्यांना. द्या की सवलत काय मागतात तेवढी.’ एरंडे म्हणाले. त्यांच्या मते प्रश्न सोडवण्याचा हा एक व्यावहारिक मार्ग होता.

‘सर, सवलती द्यायला आपण सगळेच वेळोवेळी तयार असतो. आतापर्यंत अशा गोष्टीला मी कधीच नाही म्हटलेलं नाही. पण खोपकर हे वेगळं प्रकरण आहे. पैशाच्या वेडानं पछाडलेला विकृत इसम आहे तो. अशा माणसाच्या विकृत समाधानासाठी काहीही त्याग करण्याची माझी इच्छा नाही. ही केस माझ्याकडे राहते की नाही, याच्याशी मला काही घेणं-देणं नाही पण खोपकरांच्या विकृतीचा बळी होण्याची माझी इच्छा नाही.’ कधी नाही इतक्या निक्षून मी हे सांगितलं. जास्त काही बोलायच्या आत तिथून उठलो आणि बाहेर पडलो.

नंतर पुढे खरं तर काहीच घडलं नाही. मी माझी फी जराही कमी केली नाही. खोपकरांचा या एका बाबतीत मी जणू पराभव केला असं मला वाटलं. पण पुन्हा माझा अंदाज चुकला.

पंधरा एक दिवसांनंतरची गोष्ट. हॉस्पिटलमध्ये माझा राउंड चालू होता. मी माझ्या गडबडीत व्हरांड्यातून चाललो होतो तोच एक मध्यमवयीन स्त्री माझ्या मागून धावत आली. कुठं तरी पाहिल्यासारखं वाटणारी. आठवत नव्हतं मला कुठे मी पाहिलं होतं त्यांना.

‘सर, तुम्हाला बोलावतायत,’ असं काही तरी पुटपुटत ती माझ्या मागं येत होती. कुणाचं काय काम असावं माझ्याशी असा विचार करत मी तिच्या मागे गेलो. खोलीत गेलो. बघतो तर तिथे खोपकर काकू होत्या. म्हणजे त्या अॅडमिट होत्या आणि मला माहित नव्हतं. म्हणजे कुणी दुसराच डॉक्टर त्यांना पाहत असणार. मला सगळं उमगलं. अखेर खोपकरांनीच बाजी मारली होती. त्यांनी दुसरा कुणी डॉक्टर शोधला होता. स्वस्तातला.

काकूंची तब्येत आणखीच खालावलेली. चेहरा म्लान. उतरलेला. अशक्तपणा तर इतका की रडण्याचंही बळ नसावं त्यांच्यात. त्यांना तसं पाहिलं आणि नक्की काय वाटलं मला? ते मलाही समजेना. सवयीप्रमाणे काकूंनी माझा हात धरून ठेवला अगदी गच्च. डोळ्याच्या कडा थोड्याशा पाणावल्या. काहीच बोलेनात. 

‘काकू तुमची लय आठवण काढताती. माज्या डॉक्टरला बोलवा म्हनत्यात. तुम्हास्नी पायलं म्हनून आलिया बागा मी. येत जावा तुमीबी, अशी इनती करत्यात त्या.’ आया बाईच सगळं बोलत होत्या.
मी निःशब्द. काकूंची फक्त पाठ थोपटली. 

‘येईन नं मी. येत जाईन ना तुम्हाला भेटायला अधूनमधून.’ मी म्हणालो. माझा घसा जणू आवळल्यासारखं वाटलं मला. मला वाईट वाटत होतं. मला राग आला होता. माझा मोठा अपमान झाल्याची भावना माझ्या मनात होती. 

काही तरी समजूतीचं बोलत मी तिथून बाहेर पडलो. पुन्हा येईन असं आश्वासन त्यांना दिलं. पण खरं सांगू. नंतर पुन्हा कधीही मी काकूंना भेटलो नाही. अगदी पूर्णपणे त्यांना पुसून टाकलं मी माझ्या मनातून. नंतर काही दिवसांनी असंच समजलं मला इकडून तिकडून. खोपकर काकू गेल्या होत्या. मी त्यांना नंतर कधीच भेटलो नाही याची खंत मागे ठेवून त्या गेल्या होत्या. 

काकूंची गोष्ट इथं संपली. पण खोपकरांची गोष्ट संपली नाही. ती संपायला अजून एक-दोन वर्ष जावी लागली. तोपर्यंत मी खोपकरांना विसरलोही होतो.

दवाखान्यात असताना एक तरुण असाच तपासण्यासाठी म्हणून आला. मी त्याला तपासलं. औषधं लिहून देण्यासाठी म्हणून त्याचं नाव विचारलं, तसा तो चमकला आणि माझ्याकडे पाहत हसत म्हणाला, ‘ सर, तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही.’

बुचकळून मी त्याच्याकडे पाहत राहिलो. कोण असावा हा?

‘सर, मी अजित. अजित खोपकर.’

तो हे म्हटला मात्र, मला सगळं सगळं साफ आठवलं. खोपकर आठवले. काकू आठवल्या. सगळ्या जुन्या आठवणी. तेव्हा त्या क्लेशकारक वाटल्या असतील. पण आता त्या होत्या निव्वळ आठवणी.
माझं कुतूहल पुन्हा चाळवलं. मी काही विचारणार तोच अजित म्हणाला-

‘माझी आई गेली ते तुम्हाला कळलंच असेल. बिचारी, जाईपर्यंत एकटी होती. तुमची आठवण काढायची. मीही जवळ नव्हतो. एकटी गेली बिचारी.’

एक आवंढा गिळून अजित थांबला.

‘आणि तुझे वडील? ते कुठे असतात आताशा?’ मी विचारलं.

‘ते आहेत तिथंच जुन्या घरी. एकटेच असतात. मी वेगळाच राहतो अजून. त्यांना paralysis झालाय आजकाल. अंथरुणावर खिळून असतात. एक पोरगा असतो त्यांच्याबरोबर. तो पाहतो त्यांचं सगळं. जन्मभर माझ्या आईला छळलं. तेव्हा मला वाटायचं यांचेही असेच हाल व्हावेत. अगदी मरेस्तोवर हाल व्हावेत. पण आता एखाद्या वेळेस मी घरी जातो. त्यांची ही अवस्था बघतो. वाईट वाटतं. कुणाचंही असं होऊ नये असं वाटतं आता, सर.’

अजित गेला. जुन्या आठवणी जागवून गेला. मला खोपकर आठवत होते. रुबाबदार मनुष्य. आयुष्यभर निव्वळ पैसा मिळवला. नक्की काय उपयोग झाला त्यांना त्या पैशाचा?

लहानपणी पावसाळ्याच्या पहिल्या वहिल्या सरी पडायच्या. सगळं आसमंत पावसासाठी आसावलेलं. आम्हीही त्याच असोशीनं गोलगोल गिरक्या मारत म्हणायचो-
‘ये रे, ये रे पावसा, तुला देतो पैसा.
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा.’

खोपकरांनी  सगळं आयुष्य गिरक्या मारल्या. पैशासाठी. सरीवर सरी आल्या. मोठा पैसा आला, पण तो सगळा खोटा होता. आयुष्याच्या अखेरीला तरी त्यांना हे उमगलं असेल का?

डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०