Saturday 29 December 2012

विम्याची ऐशी तैशी -७



किस्सा कितवा?
(मागील लेखावरून पुढे चालू-

विम्यासंदर्भात किती तरी किस्से मी सांगितले, इतके की कदाचित त्यात एक प्रकारचा तोच तोपणा येईल की काय अशी भीती वाटावी. कितीतरी वेगवेगळी आहेत ही माणसे, सुशिक्षित, म्हटलं तर काही अशिक्षित, वयस्कर, तरुण, समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातली ही माणसे, उत्पन्नाचा स्तरही म्हणावा तर प्रत्येकाचा वेगळा, पण विमा हा विषय निघाला की त्यांचे वर्तन कसे एका समान स्वार्थी पातळीवर येते, त्यांचे वैचारिक संतुलन कसे एकाच प्रकारे हीन होते, हे बघण्यासारखे आहे. मग तुम्ही पेशंट असा, डॉक्टर असा किंवा एखाद्या हॉस्पिटलचे चालक असा, विमा जणू एक प्रकारचे चेटूक करतो तुमच्यावर. तुम्हाला पटो अथवा न पटो, जणू एका विशिष्ट कटाचा भाग बनून तुम्हाला त्याच्या तालावर नाचणे भाग पडते.

मध्यंतरी माझ्या एका डॉक्टर मित्राचा मला फोन आला. बरीच वर्षे भारताबाहेर राहून तो भारतात परतला होता, नव्याने इथे राहून व्यवसायाची जमवाजमव करीत होता. नव्याने वैद्यकीय व्यवसायात जम बसविणे सोपे नाही आणि तेही अशा थोड्या वाढत्या वयात. साहजिकच स्वतःच्या व्यवसायाबरोबर इतरही काही उद्योग करावे लागतात. त्याचा एक भाग म्हणून तो एका विमा कंपनीसाठी वैद्यकीय सल्लागार म्हणूनही काम पाहत असे. बरेच वेळा माझ्या विषयाशी संबंधित काही बाबींवर तो माझ्याशी बोलत असे. त्या दिवशी त्याचा फोन आला तेव्हा तो थोडासा वैतागल्यासारखा वाटला.

‘अरे, ते कोण दाते नावाचे डॉक्टर माहित्येत का तुला? ते गावातच असतात, तिकडे शनिवार पेठेत का कुठे तरी जवळच त्यांचा दवाखाना आहे? बऱ्यापैकी सिनिअर असावेत, काही कल्पना आहे कसा आहे मनुष्य याची?’ त्याने विचारले.

माझ्या माहितीचे डॉक्टर दाते बरेच वरिष्ठ व्यावसायिक होते, चांगली मोठी प्रॅक्टिस असलेले, चांगले नाव कमावून असलेले. मी जेव्हा माझा व्यवसाय नव्याने सुरु करीत होतो, तेव्हा डॉ. दाते अगदी ऐन भरात असलेले डॉक्टर होते. प्रॅक्टिस असावी तर अशी, दात्यांसारखी, असे आम्हाला वाटावे असा रुबाब त्यांचा होता. मित्राच्या बोलण्यात उल्लेखलेले डॉक्टर हे तेच होते अशी खात्री मी करून घेतली. पण मला हे कळेना की हा त्यांचा असा एकेरी उल्लेख का करत असावा? असे चिडण्यासारखे काय झाले असावे?

‘च्यायला, काय माणूस आहे रे. अरे, त्यांची नुकतीच हार्टची बायपास झालीये, माहित्ये का तुला?’

मला ही कल्पनाच नव्हती.

‘हो?, काही कल्पना नाही बुवा.’ मी उत्तरलो.

‘अरे त्यांची बायपास झाली, त्याची कागदपत्रं आलीयेत माझ्यासमोर. अरे काय वाटेल तशी बिलं लावलीयेत माहित्ये? सर्जनची फी सुद्धा त्याच्या नेहमीच्या फीपेक्षा किती तरी जास्त आणि अॅन्टिबायोटिक्सचा खर्च तर काही विचारूच नकोस, कुठलीही औषधं, कुठल्याही डोसमध्ये वापरल्यासारखी दिसतात. अरे यांना काय वाटतं, आम्हाला काय डोकी नाहीत का काय? आता सांग, कुठला सर्जन अशा सिनिअर डॉक्टरला आपली फी लावेल? पण ठीक आहे, आहे विमा म्हणून लावली फी, तर ती अशी लावेल, नेहमीच्या दीडपट? आणि ही असली इतकी औषधं? ते बिल पाहिलं अन डोकंच सरकलं राव माझं. साले नुसते लुबाडायलाच बसलेत. मी सांगतो, मी तर सॉलिड कात्री लावलीये त्या बिलावर. बघतो काय बोंबा मारतो ते. जाऊ दे ना अपिलात. बघूच काय होतंय.’
दोस्त चांगलाच चवताळला असावा. दात्यांचं बिल जणू एक आव्हान म्हणून त्यानं स्वीकारलं असावं असं वाटलं मला. मी चकित झालो. फारशी प्रतिक्रिया न देता मी फोन खाली ठेवला. काय झाले आहे हे समजणे काही अवघड नव्हते. डॉ. दात्यांनी आपल्या व्यवसायाचा, आपल्या प्रतिष्ठेचा वापर करून बिल आपल्या सोयीनुसार बनवले होते. आपलं आजारपण म्हणजे जणू लागलेली लॉटरी अशी भावना. वेळ आली की डॉक्टर कसा विमासुर बनतो हेच जणू दात्यांनी सिद्ध केलं होतं!

किती तरी महिन्यांनी मी माझ्या दोस्ताजवळ चौकशी केली. डॉ. दात्यांनी काही निषेध केला का, गेले का कुठे अपिलात वगैरे. मला एक खवचट उत्सुकता होती. पण दात्यांनी पुढे काहीही केले नव्हते. विमा कंपनीने जो काही परतावा दिला, तो विना तक्रार स्वीकारला होता. आपल्या गुन्ह्याची ही अप्रत्यक्ष कबुलीच त्यांनी दिली अशी मला वाटले किंवा कदाचित असेही असेल की विम्याचे म्हणून जे काही पैसे मिळाले तेही ‘चोराच्या हाताची लंगोटी’ अशा भावनेने त्यांनी घेतले असतील. एकदा विमाडाव खेळायचेच असे ठरवल्यावर असल्या किरकोळ मानापमानांची ती काय मातब्बरी? वैद्यकीय व्यवसायातल्या खाचाखोचांचा दात्यांचा अनुभव मोठा, माझा मित्र भले कितीही फुशारक्या मारो, दात्यांनी त्यांच्या बिलाचा व्यवहार त्यांच्यादृष्टीने पूर्ण फायद्याचाच केला असणार, अगदी कंपनीच्या नाकावर टिच्चून!

माणसाचा स्वभाव, त्याचे वर्तन एकेक वेळेला कमालीचे स्वार्थी असते. अगदी टोकाच्या स्वार्थाचे दर्शन घडवणारी एक म्हण मराठीत आहे, ‘मेल्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे.’ ही वृत्ती म्हणजे मानवी अधःपाताचा नीचांक अशी समजूत तेव्हा असावी, जेव्हा या म्हणीची रचना कुणा द्रष्ट्या रचनाकाराने केली. डॉ. दात्यांची ही वागणूक पाहिली तर ही म्हणही फिकी पडेल असे नाही वाटत?

आरोग्य विम्यासंदर्भात माझी मते थोडीशी टोकाची विरोधात्मक आहेत आणि आरोग्य विमा हे आजचे दुर्दैवी वास्तव आहे, ती पाश्चात्य संस्कृतीची देणगी आहे. जे जे पश्चिमेकडून येते ते उत्तम असते अशी परतंत्र मानसिकता असणारा आपला समाज आणि हा समज आपल्या मनात दृढ करणारी सरकारी प्रचार यंत्रणा असे असल्यावर याहून वेगळे ते काय घडणार?

‘विमा खपविण्यात सरकारला तो काय रस असणार? आपले सरकार तर लोककल्याणकारी लोकनियुक्त सरकार आहे. विमा हा अर्थ नियोजनाचा भाग आहे. आरोग्य विमा उतरवून लोकांनी आर्थिक नियोजन करावे आणि आजारपणाच्या अडीअडचणीच्या वेळी रास्त आर्थिक लाभ उठवावा अशी लोकहितकारी भावना विम्यामागे आहे, तूच त्याविषयी विनाकारण उलटा विचार करतो आहेस.’ असे म्हणून मध्यंतरी माझ्या मित्राने मला समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा त्याच्या हे लक्षात आले नव्हते की विम्याच्या हप्त्याद्वारे मिळणारा निधी मोठ्या प्रमाणात सरकारी कर्ज रोखे आणि सरकारी योजनांमध्ये गुंतविणे विमा कंपन्यांवर बंधनकारक असते. आणि जेव्हा जेव्हा सरकारी महसुलाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तेव्हा नैतिकता किंवा लोक कल्याणाला तिलांजली देत आर्थिक महसुलाला प्राधान्य देणारे निर्णय तथाकथित लोककल्याणकारी सरकारकडून घेतले जातात. नाही तर मटका बंद करून सरकारी लॉटरी चालू राहिली नसती, एकीकडे बैलांच्या शर्यती बंद करताना घोड्यांच्या शर्यतीला सरकारी प्रोत्साहन मिळाले नसते. व्यसनांकडे सहज झुकू शकणाऱ्या समाजात दारू निर्मितीला परवानगी मिळू शकली नसती. सिगारेट बनवणाऱ्या कंपन्यांना केवळ वैधानिक इशारे लिहून सिगारेट निर्माण करता आली नसती आणि एकदा सरकारी प्रचार सुरु झाला की आजकाल कुठल्याही गोष्टीला जणू धार्मिक सत्याचे स्वरूप येते. मग तो आयोडीन युक्त मिठाचा आग्रह असो किंवा पोलिओ मुक्तीच्या दोन थेंबांचा प्रचार असो. त्याच पवित्र भावनेने समाज विम्याच्या सरकारी आग्रहाकडे बघणार. एके काळी धर्म संस्थांना समाज मनात जे स्थान होते ते आज सरकारी संस्थांना आहे. ती लोकशाहीची गरजही आहे, पण दुर्दैवाने तेव्हाही धर्मसंस्था लोकहितकारी नव्हत्या आणि आजही सरकार लोकहितकारी असेलच अशी खात्री देता येत नाही अन्यथा ज्यातून खूप मोठा वैद्यकीय भ्रष्टाचार निर्माण होतो, वैद्यकीय सेवांच्या किमती वाढतात आणि त्या सेवा सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातात अशा आरोग्य विम्याला अशी सरकारमान्यता मिळालीच नसती, त्याला लगेचच अधिक चांगला पर्याय शोधला गेला असता.
सरकारी प्रचार यंत्रणा जेव्हा आरोग्य विम्याचा प्रचार करते तेव्हा आरोग्य विमा हे एक स्वतंत्र मूल्य होते, त्याला सामाजिक अधिष्ठान प्राप्त होते आणि पर्यायाने लोक विमाशरण होतात. त्याची एक दोन उदाहरणे सांगून हे विमाख्यान आटोपते घेतो.

माझी एक डॉक्टर मैत्रीण आहे. बराच काळ दुबईला राहणारी. मध्यंतरी भारतात आली होती. एक दिवस घाबऱ्या घुबऱ्या अवस्थेत तिचा मला फोन आला. भारतात आल्यावर इतकी गडबड झाली, धावपळ झाली की तिच्या आरोग्य विम्याचे नूतनीकरण करायचे राहूनच गेले. आणि ते करायला जावे तर विमा कंपनी बऱ्याच जाचक अटी लावू पाहत होती. नव्याने वैद्यकीय तपासणी, वाढीव विमा हप्ता असा भूर्दंड तिला पडणार होता. या प्रकाराने ती व्यथित तर होतीच, पण झाल्या प्रकारात विमा कंपनी तिला फसवीत असल्याची भावनाही तिच्या मनात होती. ‘आता मी काय करू?’ असा तिचा एकूण प्रश्न.

मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, यात विमा कंपनी तिला फसवत असण्याचा प्रश्न नव्हता. तिचा जुना विमा आता कालबाह्य झाला होता आणि आता जो विमा उतरविला जाईल त्याचे संदर्भ नवीन असणार होते. तिचे वय आता पन्नाशी ओलांडून पुढे गेले आहे तेव्हा आता नव्याने विमा उतरविताना तो असाच महाग पडणार होता. ‘विमा कंपनीचा आग्रह मान्य करून नव्याने विमा उतरवावा लागणार याला पर्याय एकच, तो म्हणजे विमा न उतरविणे!’

 माझा हा अजब पर्याय ऐकून ती चमकलीच. विम्याशिवाय जगणे कसे शक्य आहे असा यक्षप्रश्न जणू तिच्यासमोर उभा राहिला होता.

तिला समजावताना मी तिला विचारले,’ किती वर्षं झाली तुला हा विमा उतरवल्याला? कल्पना कर, हेच पैसे आज जर तू एखाद्या बँकेत तुझ्याच नावाने गुंतविले असतेस तर अशी वेळ आली असती का? ते पैसे कायम तुझे तुझ्या नावाने तुझ्या पूर्ण अधिकारात तुझ्याजवळ राहिले असते. आजवर तू भरलेल्या विम्याच्या हप्त्यांचे आजचे फलित शून्य आहे हा केवढा तरी तोटा नाही का?’

माझ्या या प्रश्नाने शक्यतांचे एक नवेच दालन जणू तिच्यापुढे उघडले गेले.

 ‘अगो बाई, हा विचारच मी आधी कधी केला नव्हता. आता तू म्हणतोस तसेच करते, नव्याने विमा चालू करण्यापेक्षा बँकेत खातेच उघडते!’ मी खुश झालो, कुणी तरी आपले ऐकले, माझा मुद्दा प्रभावी ठरला याचा आनंद! माझा विजय झाला होता जणू!

मधे बरेच दिवस गेले. ती परत दुबईला गेली असणार. तिच्या विम्याचा विषयही माझ्या डोक्यातून गेला होता, तेव्हा तिचा परत असाच फोन आला. ख्यालीखुशालीचं बोलणं झालं, तेव्हा माझं कुतूहल पुन्हा एकदा जागं झालं.

‘काय झालं गं तुझ्या त्या विम्याचं?’ मी तिला विचारलं.

‘अरे काही विशेष नाही. मी काढलाच शेवटी तो विमा! म्हणजे कायेना, माझ्या नवऱ्याचा विमा होता, आमच्या अनिकेतचाही होता. म्हणजे फक्त माझाच नाही असं झालं असतं ना. मग शेवटी काढलाच मी विमा! शेवटी कशाला उगीच रिस्क घ्यायची, नाही का?’

तिनं विमा काढला याचं मला विशेष आश्चर्य नाही वाटलं, हा एकेकाचा दृष्टीकोन असू शकतो, पण त्यामागे जे कारण तिनं दिलं ते केविलवाणं होतं, वैचारिक दारिद्र्याचं निदर्शक होतं. विमाशरण अवस्था मी जी म्हणतो ती हीच!

आणखी एक प्रसंग आहे. एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये उच्च पदस्थ डॉक्टरांची बैठक चालू होती. हॉस्पिटलची आर्थिक धोरणे ठरविण्याचा कार्यक्रम चालू होता. प्रश्न होता, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना  हॉस्पिटलद्वारे मिळणारी वैद्यकीय सेवा मोफत करावी का या विषयीचा. चर्चा बरीच खळबळजनक होती. दोन गट पडले होते, एकाचं मत होतं, ही सेवा मोफतच असावी. कारण डॉक्टर मंडळी हॉस्पिटलसाठी इतकं काही करतात, तेव्हा कुठं ते व्यवस्थित चालतं, तेव्हा मोफत सेवा हा त्यांचा हक्कच आहे वगैरे.

दुर्दैवाने हॉस्पिटलच्या संचालकांचं मत वेगळं होतं. त्यांच्या मते अशी काहीच गरज नव्हती. ‘प्रत्येक डॉक्टरने आपापला विमा उतरवावा आणि पैसे विमा कंपनीकडून घ्यावेत. विमा प्रोसेस करण्याची मदत फार तर हॉस्पिटल करील.’

काही डॉक्टरांनी याला विरोध केला, विमा काढण्याची सक्ती हॉस्पिटल करू शकत नाही, असा तांत्रिक मुद्दा काढला, तेव्हा मात्र संचालक संतापले आणि म्हणाले-‘ हा विषय याहून अधिक चर्चेला येऊ नये. ज्या डॉक्टरांना आपल्या प्रकृतीची चिंता आहे, जे आपल्या आरोग्याची कदर करतात, ते विमा काढतील, ज्यांना ती कदर नसेल ते नाही काढणार. हॉस्पिटल याहून अधिक काही करणार नाही.’

ही म्हणजे अगदी गंमतच झाली. उत्तम आहार, विहार, व्यायाम यातून आरोग्य राखले जाते, ही एके काळची(?) आमची कल्पना, ती आता जणू कालबाह्य झाली आहे आणि त्या ऐवजी आरोग्य विमा काढणे हीच जणू आरोग्याची गुरुकिल्ली आहे असे झाले आहे काय? आणि हे असे एका हॉस्पिटलच्या डॉक्टर संचालकाचे मत असावे ही किती गंभीर आणि विनोदी गोष्ट आहे. समाज किती विमाशरण होत चालला आहे, याचे याहून समर्पक उदाहरण दुसरे कुठले असेल?
(समाप्त)
 डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०

Saturday 22 December 2012

विम्याची ऐशी तैशी -६



 (मागील लेखावरून पुढे चालू-

किस्सा पाचवा

तिखे नेहमीप्रमाणे दवाखान्यात आले. जेव्हा ते आत आले तेव्हा मी आधीच्या पेशंटच्या नोंदी उतरवून घेण्यात गर्क होतो. माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या पेशंटच्या नोंदी नेहमी अगदी अद्ययावत ठेवलेल्या असतात. माझ्याकडच्या कॉम्प्युटरवर त्या तपशीलवार नोंदलेल्या असतात. माझी स्मरणशक्ती थोडी कच्ची असल्यामुळे असेल कदाचित, पण या तपशिलांचा मला माझ्या कामात मोठा उपयोग होतो. इतका की, एखाद वेळेस कॉम्प्युटर चालू नसेल तर मला काम करणेही अशक्य होईल! माझ्या या परावलंबित्वाची मला अगदी पुरेपूर जाणीव आहे, त्यामुळे अगदी मी मन लावून ह्या नोंदी ठेवत असतो.

तिखे आले तेव्हाही बहुधा मी माझ्या कामात असाच पूर्ण गर्क असणार, नाही तर त्यांचा रागावलेला अवतार माझ्या नक्की लक्षात आला असता. मी सावध राहिलो असतो. तयार राहिलो असतो. पण तसे झाले नाही. दृष्टी कॉम्प्युटरच्या पडद्यावर खिळलेली, अशाच अवस्थेत मी निव्वळ अंगुली निर्देश करीत त्यांना खुर्चीवर बबसण्याची विनंती केली.

‘या, बसा,’ इकडे तिकडे न बघताच मी त्यांचे स्वागत केले.

पण कुठलाच प्रतिसाद नाही. आवाज आला तो फक्त खुर्ची सरकावल्याचा, आणि तोही जरा जास्तच जोरात सरकावल्याचा. खुर्चीत तिखे बसल्याची अर्धवट जाणीव मला होत होती, पण अजून माझे पूर्ण लक्ष तिख्यांकडे गेले नव्हते. मी माझ्या कामात व्यग्र होतो. काही सेकंद असे गेले असतील, पण मोठ्याने खाकरण्याचा आवाज आला म्हणून मी बाजूला पाहिले, तेव्हाच खरं तर प्रथम माझी आणि तिख्यांची नजरानजर झाली. आणि तेव्हा कुठे मला जाणवले, आजचे तिखे वेगळे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे चिरपरिचित हसू आज दिसत नव्हते. तो मिश्किल भाव आज नव्हता. मी चपापलो. काही तरी बिनसले होते नक्की, एरवी तिखे म्हणजे केवढा तरी दिलखुलास माणूस, दवाखान्यात येणार तेच मुळी चहू अंगाने हसू उधळत. ‘नमस्कार, डॉक्टर साहेब.’ अशी गर्जना करत. आल्याबरोबर हातात हात घेतील आणि हस्तांदोलन करतील तेही अशा प्रेमभरानं अन् जोशानं की माझा हातच दुखावतो की काय असं मला वाटे. आज त्यातलं काहीच नव्हतं. चेहऱ्यावर एक रागीट आविर्भाव धरून तिखे जणू फुरंगटून माझ्यासमोर बसले होते. त्यांच्या नजरेत एक प्रकारच आव्हान होते.

‘नमस्कार, तिखे साहेब, काय विशेष? काही गडबड?’, मी अंदाज घेत विचारले.

‘काय डॉक्टर साहेब, काय हो तुमचं हे हॉस्पिटल, नुसतं डोकं फिरवलं हो तुमच्या लोकांनी काल माझं.’ एवढं बोलूनच तिखे थांबले, माझ्याकडे रागावून बघत राहिले, जणू माझ्या प्रतिक्रियेची अपेक्षा करत थांबले.

मग मला आठवलं. कालपर्यंत तर तिखे हॉस्पिटलमध्ये अँडमिट होते. त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना आम्ही अँडमिट केले होते त्यांच्या पूर्ण तपासण्या केल्या होत्या. त्या सगळ्या अगदी निर्दोष आल्या होत्या.

‘तुमचे सगळे रिपोर्ट्स पूर्ण नॉर्मल आहेत. You are now free to enjoy your life!,’ असं म्हणत त्यांच्या पाठीवर हात ठेवून मी तेव्हा उभा होतो, तेव्हा केवढ्या तरी आनंदानं, कृतज्ञ नजरेनं त्यांनी माझ्याकडे पाहिलं होतं. 

कालच्या या प्रसंगानंतर हे असं काय झालं होतं. तिखे एवढे नाराज कशानं झाले होते? मला कळेना. काहीही प्रतिवाद न करता प्रश्नार्थक नजरेनं मी फक्त त्यांच्याकडे पाहत राहिलो. रागावलेल्या पेशंटला शांत करण्याचा हा एकुलता एक प्रभावी मार्ग असतो असं माझ्या लक्षात आलेलं आहे. त्या मौन नीतीचा वापर करत मी शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिलो.

‘डॉक्टर, अहो, काल अगदी सक्काळी सक्काळी तुम्ही आलात, आपण रिपोर्टविषयी बोललो. सगळा रिपोर्ट चांगला आला होता. तो आपण पहिला आणि तुम्ही मला डिस्चार्ज दिलात, आठवतंय?’
‘हो तर’, मी पूर्ण संभ्रमात होकार देत म्हणालो. आता यात इतकं रागावण्यासारखं काय होतं ते मला कळेना.

‘तुम्ही परवानगी दिल्यावर साधारण किती वेळानं त्यांनी मला घरी सोडावं? किती वेळानं?’
आता मला थोडंसं समजायला लागलं होतं.

‘खरं सांगू का, तिखे साहेब, एकदा का डिस्चार्ज केला की पुढच्या कामाला हॉस्पिटलमध्ये किती वेळ लागेल याच्यावर आम्हा डॉक्टरांचा काहीच कंट्रोल नसतो. ते खाते पूर्ण वेगळे आहे. एकेक वेळा खूप काम असतं त्यांना, लागू शकतो वेळ!’ मी समजावणीच्या सुरात म्हणालो.

‘अहो, वेळ लागू शकतो, हे मला मान्य आहे. पण किती वेळ लागावा? त्याला काही सुमार? सकाळी आठला तुम्ही मला सोडल्यावर रात्री नऊ साडे नऊ वाजवले ह्यांनी मला सोडायला, माहित्ये? आणि तेही सोडलं तेसुद्धा सरळ नाही, मला बिलाचे आगाऊ पैसे भरावे लागले तेव्हा कुठं सोडलं, माहित्ये? हे म्हणजे साला हॉस्पिटल आहे की तुरुंग हे कळेना झालं आम्हाला हो! ’

आता मात्र मी अवाक झालो. हा म्हणजे भलताच उशीर झाला होता. अगदीच अक्षम्य म्हणावा असा उशीर. याचे काय समर्थन करणार? ‘चौकशी करतो,’ असे मी म्हणणार तोच तिखे पुन्हा बरसले-
‘आणि बिल तरी कसं करावं, किती करावं, याला काही नियम आहेत की नाहीत हो तुमच्याकडे? सगळा नुस्ता स्वैर कारभार हो. तुम्हाला माहित्ये, यांनी मला पहिला अंदाज दिला होता, कितीचा होता तो?’

तिखे जणू माझीच उलट तपासणी करीत होते. खरं तर पेशंटच्या बिलाविषयी मी बऱ्याच वेळा अगदी अडाणी असल्यासारखा असतो. हॉस्पिटलचे दर ठरलेले असतात, त्याप्रमाणे बिल होते. त्यात माझी ढवळाढवळ कशाला असा माझा हिशेब. त्यामुळे तिख्यांच्या या प्रश्नालाही माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते. म्हणजे पुन्हा एकदा मौन, आता असहाय मौन एवढाच काय तो फरक! माझ्याकडून काहीच उत्तर येत नाही असे पाहून तिखे पुन्हा म्हणाले,

‘अहो, यांनी मला अंदाज दिला होतं चाळीस पंचेचाळीस हजारांचा. आणि प्रत्यक्ष बिल किती आलं असेल? किती आलं असेल?’

पुन्हा एकदा तिख्यांचं आव्हान आणि पुन्हा एकदा माझं मौन.

‘प्रत्यक्ष बिल आलं ऐशी हजार! अहो, कुठं पंचेचाळीस हजार आणि कुठं ऐशी हजार! ही असली बिलं केल्यावर विमा कंपनी काय वेडी आहे पैसे द्यायला? त्यांनी अडवलं ना ते बिल. मग नुसती पळापळ.’
आता मात्र मला पुरतंच समजायला लागलं होतं. तिख्यांना विम्याचे पैसे न मिळाल्याचा राग आला होता. हा राग किती तीव्र आणि भयानक असतो हे मला अनुभवाने माहित झालं होतं. एखाद्या रोगाचं निदान झालं की डॉक्टरचा जीव भांड्यात पडतो, मग तो रोग भले असाध्य का असेना, जीवघेणा का असेना, पण त्याचं एकदा निदान झालं की डॉक्टर सुखावतो. हा रोग निदानाचा निष्पाप आनंद असतो. तो आनंद मला झाला. शांत चित्ताने मी तिख्यांना आता झेलू शकत होतो.

‘खरं सांगू, डॉक्टर, हल्ली या हॉस्पिटल बिलांना काही ताळतंत्र राहिलेलं नाही. त्यातून ही विम्याची बिलं म्हणजे अगदी मोकळं रानच हो. विमा आहे? मग कितीही लावा बिलं, ओरबाडा लेको आम्हाला. लोक म्हणतात ते काही उगाच नाही. सगळे नुसते लुटायचे धंदे झालेत.’ तिखे बोलत होते. त्यांचे बाण बाजूबाजूने माझेही लचके तोडत होते. पण मी शांत होतो. रोग निदान झालेलं होतं.

‘डॉक्टर, तुम्ही होता, एका परीनं तुमचंच हॉस्पिटल म्हणून मी शांत राहिलो. विमा कंपनीनं तर बिल दिलं नाहीच. शेवटी, आमचा आनंद म्हणाला, (आनंदा माझा मुलगा बर का), तर शेवटी रात्री आनंदा  म्हणाला, पपा ते विम्याचे पैसे मरू दे, ते मी बघतो नंतर, आधी रोख बिल भरून या तुरुंगातून बाहे पडू, मग बघतो मी यांच्याकडे! शेवटी पदरचे पैसे भरले, तेव्हा कुठे रात्री उशिरानं घरी पोचलो, माहित्ये?’

मी अपराधी चेहरा करून होतो. इकडे तिकडे बघत होतो. एकीकडे मला चुचकारत तिख्यांनी माझं व्यवस्थित शिरकाण चालवलं होतं ते उपभोगत होतो.

‘पण एक सांगतो डॉक्टर, मी काही हॉस्पिटलला सोडणार नाही. बिलाचा खुलासा नाही झाला तर पाहूनच घेणार एकेकाकडे. साले, सांगतात पंचेचाळीस आणि लावतात ऐशी, वा रे वा! बघतोच ना काय करतात ते.’ जणू मलाच आव्हान देत देत तिखे बाहेर पडले आणि मी निःश्वास सोडला आणि पुढचा पेशंट घेतला.

तो दिवस उलटला, नंतरही काही आठवडे उलटले. तिख्यांचा हा सगळा प्रसंगच विस्मरणात जाणार, तर पुन्हा एकदा तिखे उगवले. दरवाजा उघडून ते आत आले तेव्हा मी किंचित काळजीतच होतो. आज तिखे कुठे प्रहार करतील, कसा करतील अशा चिंतेत होतो. पण आजचा दिवस वेगळाच होता. तिखे त्यांच्या नेहमीच्या आनंदी झपाट्यात होते. खुश होते. आमच्या आधीच्या भेटीची कुठलीच कटुता त्यांच्यात नव्हती.

‘हँलो डॉक्टर,’ म्हणत नेहमीच्याच तडफेने त्यांनी माझा हात हातात घेतला, जोरदार हस्तांदोलन केले, मीही हात दुखवू नये इतक्याच बेताने त्यांना तो हलवू दिला आणि नंतर शिताफीने सोडवूनही घेतला. रीतसर तपासणीचे सोपस्कार पार पडले. त्यांची तब्बेत उत्तम होती. तसे मी त्यांना सांगितले त्यावरही ते निर्मळ हसले, पण माझे एवढ्याने समाधान होईना. त्यांच्या बिलाचे, विम्याचे काय झाले होते? ते काही कळेना. तिखेही त्यावर काही बोलेनात. आता माझी उत्सुकता अगदी शिगेला पोचलेली. आता तिखे खोलीतून बाहेर पडतील, तर माझे निदान अपुरे राहील अशा काळजीत मी होतो.

खुर्चीतून उठून ते दाराकडे जाणार, शेवटी मीच पुढे झालो आणि त्यांना थांबवत म्हणालो,’ शेवटी, काय झालं हो तुमच्या त्या बिलाचं? दिले का विमा कंपनीनं की पडला भुर्दंड तुम्हालाच?’

माझ्या या प्रश्नावर तिखे थांबले, किचित वळून त्यांनी माझ्याकडे पाहिले, डोळे मिचकावत ते मला म्हणाले,’ ते हॉस्पिटल बिल होय? ते विमा कंपनीनं भरलं ना दुसऱ्या दिवशी. मला मी भरलेले पैसे दिले हॉस्पिटलनं परत. झालं ते काम एकदाचं. काय कुणाशी भांडण्याची वेळ आली नाही!’

तिख्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची ख़ुशी नुसती ओसंडून वाहत होती. विमासाफल्यच मूर्तिमंत केवळ!

‘पण, ते हॉस्पिटल बिलाचे तपशील? त्यांनी किती तरी जास्त केलं होतं ना बिल तुमचं? त्याचा काही खुलासा केला का हॉस्पिटलनी?’ मी माझी बाळबोध शंका विचारली.

‘बिलाचा खुलासा?’ फिसकन हसत त्यांनी विचारले. ‘तो कुणा लेकाला हवाय आता, एकदा विमा कंपनीच बिल भरतेय म्हटल्यावर! जितकं बिल जास्त तितका फायदा जास्तच नाही का?’ त्यांनी हसत मलाच विचारले. ते ज्या खुशीनं आणि लाडानं माझ्याकडे पाहत होते तेव्हा ‘चल, बुद्दू कहींका’ असं हिंदीत म्हटल्यावर कसं वाटेल अगदी तस्सं मला वाटून गेलं, लटकं आणि निरागस!

(क्रमशः पुढे चालू

डॉ संजीव मंगरुळकर
दूरभाष ९४०५०१८८२०





Saturday 15 December 2012

विम्याची ऐशी तैशी -५


किस्सा चौथा 

(मागील लेखावरून पुढे चालू-

शिल्पा गावडे, सुमारे तीस वर्षांची अविवाहित मुलगी. तिला नक्की कुणी माझ्याकडे पाठवले ते आठवत नाही. पण कुठल्या तरी चांगल्या परिचयातून ती आली होती एवढे मात्र नक्की. शिल्पाची तब्ब्येत बरी नसे, वारंवार उलट्या, जुलाब होत. बारीक सारीक बरेच उपचार झालेले तरीही बरे वाटेना म्हणून एकदा माझे मत घ्यावे अशा हेतूने कुणा भल्या माणसाने तिला माझ्याकडे पाठवले होते. (माझी गणना आता थोड्या वरिष्ठ डॉक्टरांमध्ये व्हावी अशा काळातली ही गोष्ट आहे!)

संध्याकाळची वेळ. दवाखान्यात फारशी गर्दी नव्हती, तेव्हा ती आली. समोरच्या खुर्चीत बसली. सावळा वर्ण. थोडी सडसडीत पण आटोपशीर वाटावी अशी अंगकाठी. चेहऱ्यावर कुठली कुठली सौंदर्यप्रसाधने चोपडलेली. भडक रंगाचे लिपस्टिक ओठावर. अंगावर कपडेसुद्धा थोडे भडक रंगाचे, छानछोकीचे. सहज पाहिले तरी लक्ष वेधून घेतले जावे असा एकूण आविर्भाव. एकटीच होती. समोर बसली तसे मी तिच्याकडे पाहिले.

‘काय खास प्रॉब्लेम?’- हाच एक प्रश्न मी माझ्या सगळ्याचा पेशंटना प्रथम विचारतो, अशासाठी की त्यांनी बोलते व्हावे.

‘पचनाचा प्रॉब्लेम हाये सर, कायबी पचत नाय. मधनं मधनं सारख्या उलट्या नाय तर जुलाब, उलट्या नाय तर जुलाब, असा प्रकार चाललाया. भूक तर काडीची नाय, थोडं काय खायाला जावं तर हे निसते जुलाब, नाय तर वांत्या. दोन तीन वरीस झाली बघा, तब्बेत सुदिक बघा ना पार उतारली,’ असं म्हणत तिनं आपला दंड उचलून दाखवला खरा, पण कुपोषणाचं कुठलंच चिन्ह ना त्या दंडावर होतं ना कुठं इतरत्र शरीरावर होतं. सर्वसाधारण ‘सौष्ठवपूर्ण शरीर’ असं ज्याचं वर्णन केलं जाऊ शकेल अशा यष्टीची होती शिल्पा. तरीही वरकरणी काही प्रतिक्रिया न देता पण सहानुभूतीने तिचा दंड पाहत मी संमतीदर्शक मान हलवली. माझ्या या सहानुभूतीने शिल्पा खुलली, मोकळेपणाने बोलू लागली.

चौथी-पाचवी पर्यंतचं शिक्षण झालेली, लग्न न होताच कुठल्याशा छोट्या कंपनीत जॉब ऑपरेटर सारखे अर्धतांत्रिक काम करणारी शिल्पा. दारूची सवय असलेला बाप. धुण्याभांड्याची कामे करणारी आई. कुठल्या तरी केबलवाल्याकडे कामाला असलेला एकुलता एक भाऊ. शिल्पाची कौटुंबिक पार्श्वभूमी ही अशी. मुलगी मिळवती असल्यानं आई-बापाची लाडकी असणार. नाही तर थोडीच तिच्या दुखण्याची एवढी दखल त्यांनी घेतली असती?

जास्त माहितीसाठी म्हणून शिल्पानं तिची जुनी कागदपत्र आणली होती. कुठली कुठली चुरगाळलेली कागदपत्र, चिठ्ठ्या चपाट्या, त्यावर लिहिलेली सांकेतिक औषधांची नावं. मेडिकल स्टोरची नावं असलेले कागद. त्यांच्या खाली छापलेल्या जाहिराती- ‘वरील औषधे रास्त भावात मिळतील’ अशा सारख्या. असा सगळा पुरावा धुंडाळत मी बसलो होतो. कुठे काही तरी धागा दोरा मिळतो का की जेणेकरून तिच्या आजारावर प्रकाश पडेल. पण आजारपण म्हणावे असा कुठलाच पुरावा हाती लागेना. सगळाच नुसता डॉक्टरी कचरा.

हे असले पेशंट साधारणपणे मानसिक विकारग्रस्त असतात. तक्रारी ऐकाव्यात तर अशा आणि इतक्या की वाटावे कसे बरे जगत असतील हे लोक आणि खोलात जाऊन तपासावे तर आजाराचा पत्ताच लागू नये. ‘शरीरदृष्ट्या निरोगी’ हेच खरे तर यांच्या रोगाचे निदान. पण हे त्यांना पटवायला फार अवघड. महाकठीण. आता हे कठीण काम करायचे कसे आणि तुझी तब्बेत चांगली आहे हे शिल्पाला पटवायचे कसे - अशा अवघड विवंचनेत मी होतो, तर शिल्पाने कागदाची आणखी एक थप्पी माझ्यासमोर टाकली. या कागदांवर तिचा अगदी दोन दिवसांपूर्वीचा वैद्यकीय इतिहास लिहिलेला होता. कुठल्याशा ‘भास्कर’ रुग्णालयाची कागदपत्र होती ती. पुन्हा एकदा तसल्याच चिठ्ठ्या. कुठलीतरी औषध विकत आणण्यासाठीच्या सूचना. म्हणजे शिल्पा या कुठल्या तरी हॉस्पिटलात अॅडमिट होती तर. पण हॉस्पिटलमध्ये जाऊन राहण्याएवढा कुठलाच आजार मला दिसेना.  दीड दोन वर्ष अधून मधून जुलाब, उलट्या असा आजार, यासाठी अॅडमिट?

‘अगदी अॅडमिट होण्यासारखं इतकं काय झालं होतं तुला? किरकोळ तर तक्रारी दिसतात’, मी पुटपुटलो अर्धवट स्वतःशी, म्हटलं तर अर्धवट प्रश्नार्थक शिल्पासाठी उद्देशून.

‘नाय सर, मी काम करती, तिथ त्येंनी माझा विमा काढलाय नव्ह. त्येचा पैका नाय भेटत त्येच्या बिगर. दवाखान्यात ऱ्हावच लागतंय ना, म्हून थितं ऱ्ह्यायलेली. दवाखान्याचा मालक माझ्या भावाचा दोस्त हाय ना त्यो म्हटला तू ऱ्हाय हिथं खाटंवर येक दोन दिसाकरता. विम्याचं मी बघतुया. त्येची ही समदी कागदं!’

शिल्पा भाबडेपणानं सांगत होती. आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे विम्याच्या परताव्यात सगळा खर्च उरकून तपासण्या करून घेण्याचा ‘विमाडाव’ खेळत होते हे लोक. एव्हाना मीही अनुभवी डॉक्टर झालो होतो. अशा युक्त्या माझ्या तत्काळ लक्षात येत असत (असं मला वाटे!). शिल्पा आणि तिचा डॉक्टर खेळत असलेला डाव मी ओळखला यावर मी खूष झालो. कुणाचाही बनाव ओळखला की एक मिश्किल आणि समजूतदार हसू आपल्या चेहऱ्यावर येतं तसं हसू माझ्या चेहऱ्यावर आलं असणार. माझी उत्सुकता चाळवली. काय काय उद्योग करतात हे लोक, अशा भावनेने मी ते कागद चाळू लागलो. तर आणखी एक धक्का माझी जणू वाटच पाहत होता.  कारण त्यातल्या बऱ्याचशा कागदांवर हृदयरोगाची औषधे लिहिलेली होती.

हे कसे शक्य आहे? एक तर शिल्पाचा आजार पूर्णपणे पोटाच्या तक्रारींशी निगडित होता. अगदी दुरूनसुद्धा हृदयाशी संबंध वाटावा असं त्याच्यात काही नव्हतं, आणि तीस वर्षाच्या तरुणीला थोडाच हृदयाचा आजार होतो, तरी ह्या हृदयरोगाच्या औषधाच्या चिठ्ठ्या इथे येण्याचं काय कारण? चुकून दुसऱ्या कुणाच्या चिठ्ठ्या तर नाही आणल्या हिने?

एव्हाना माझ्यातला गुप्तहेर जागा झाला होता. मी त्या चिठ्ठ्या वरून खालून पडताळून पहिल्या. त्यांवरची औषधे तपासली. वर लिहिलेले पेशंटचे नावं तपासले. सर्व गोष्टी ठाकठीक होत्या. चिठ्ठ्यांवरील मजकुरानुसार ही सर्व औषधे शिल्पा गावडे याच पेशंटसाठी वापरलेली होती. अगदी दोन तीन दिवसांपूर्वीच जणू हृदयाच्या आजारासाठी शिल्पा दवाखान्यात दाखल झाली असून तिला हृदयरोग झाला असल्याचे स्पष्ट दिसावे अशी ती सर्व कागदपत्रे होती.

आता मात्र मला त्या डॉक्टरची कीव येऊ लागली होती. कुठली लक्षणे, कुठला आजार आणि काय ही औषधे- हे असे डॉक्टर असतात? इतके अडाणी?

‘या हॉस्पिटलमधून बाहेर पडताना, हॉस्पिटलने तुला डिस्चार्जचे काही कागद दिले असतील. त्यावर तुझ्या  आजाराचे निदान, त्यावर घेण्याची औषधे वगैरे गोष्टी लिहिलेल्या असतात, ते कागद कुठायत?’- मी तिला विचारले.

‘त्येच्यासाठी दोन दिसांनी बलीवलय, ते नंतर करून ठिवतो म्हनल्येत. ते विमा कंपनीला द्यायचे हाईत नं,’ शिल्पा उत्तरली.

एव्हाना माझी मती गुंग झाली होती. निरोगी शिल्पाच्या आजाराचे रहस्य माझ्या पूर्ण बुद्धीला व्यापून ‘दशांगुळे’ उरले होते! या रहस्यात मी असा गुंतलो की मला शिल्पाच्या मूळ आजाराचा विसर पडला. शिल्पाशी काही तरी इकडचे तिकडचे बोललो, त्या हॉस्पिटलचे डिस्चार्ज कार्ड मिळाल्यावर मला भेट असे तिला सांगून मी तिची बोळवण केली. आणि पुढच्या कामाला लागलो.

काही दिवस गेले. मधून मधून शिल्पाची आठवण येई. ती कागद पत्रे आणेल आणि मगच एकूण प्रकारावर उजेड पडेल असा विचार करून मी माझे समाधान करून घेत होतो. पण शिल्पा काही आली नाही. तो रहस्यभेद करण्याचे माझे स्वप्न तसेच अर्धवट राहिले.

नंतर कधी तरी माझा मित्र विनोद मला भेटला. विनोद डॉक्टर आहे. माझ्यापेक्षा वयाने मोठा, व्यवहाराने चतुर आहे. मला एकूणच तो ‘जगण्याला लायक’ असा वाटतो. गमतीने मी त्याला माझा ‘व्यावहारिक गुरु’ असे म्हणतो. (इतर कुणाला जसे आध्यात्मिक गुरु असतात, तसं हा माझा ‘व्यावहारिक’ गुरु! प्रत्येकाची आपली अशी एक स्वतंत्र गरज असतेच ना. माझी गरज व्यवहार ज्ञानाची आहे!) विनोदशी गप्पा मारत होतो. त्याला मी हा किस्सा सांगितला, ‘कसे अडाणी डॉक्टर असतात’ अशा आविर्भावात.

किस्सा ऐकला, तसा विनोद मोठ्याने हसूच लागला.

‘अजाण बालका, कधी रे मोठा होणार तू? कसं सांगू तुला. कुठला डॉक्टर इतका बावळट असतो? हार्टचा आजार, पोटाचा आजार एवढं समजू नये इतका वेडा असतो? अरे ही विमा मिळवण्याची युक्ती आहे रे. दोन पेपर करायचे. एकावर खरा आजार आणि त्याचा उपचार लिहायचा आणि दुसरा पेपर बनावट, विमा कंपनीसाठी. त्याच्यावर हार्टची औषधं लिहायची. नाहीतर विम्याचे पैसे कसे मिळणार? तू लेका झंप्या तो झंप्याच! नसती चौकशी करत गेलास आता कुठची येते शिल्पा परत तुझ्याकडे. वाट बघा वाट!’

मी अजूनही शिल्पाची वाट पाहतोच आहे!
(क्रमशः पुढे चालू-

डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०