Saturday 24 November 2012

विम्याची ऐशी तैशी - २


  मागील लेखावरून पुढे चालू-

पहिला किस्सा


श्री. नगरकर, वय वर्षे सुमारे अठ्ठावन. नगरकरांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. माझ्याकडे हॉस्पिटलमध्ये दाखल होते. वेळीच औषधोपचार झाले. अगदी कुठल्याही विशेष अडचणी न होता नगरकर बरे झाले. आपला पेशंट असा विना तक्रार बरा झाला की डॉक्टरला एक समाधान असतं, त्या समाधानात मी होतो. आज नगरकरांना डिस्चार्ज देणार होतो. हार्टचा पेशंट बरा होतो, घरी जातो, ही घटना डॉक्टर म्हणून आम्हाला विशेष नव्हे, पण पेशंटच्या, त्यांच्या नातलगांच्या दृष्टीने ती एक मोठी घटना असते, तो एक सुवर्णक्षणच वाटतो त्यांना. आपल्याला बरे करणाऱ्या डॉक्टरविषयी अतिशय कृतज्ञ वाटावे असा काळ असतो तो.

 ‘डॉक्टर, तुम्ही होतात म्हणून बर’, ‘तुमच्यामुळेच बर का, मी नेहमीच हिला म्हणतो, आपले डॉक्टर आहेत ना, तोवर आपल्याला काही काळजी नाही’ असले उद्गार ऐकायचे, आणि त्यावर काही तरी आध्यात्मिक प्रतिक्रिया द्यायची- ‘त्यात कायेहो, डॉक्टर म्हणून आमचं कामच असतं ते.’ ‘शेवटी डॉक्टरच्या तरी काय हातात असतं, जे काय व्हायचं ना ते सगळं वर ठरतं, आम्ही काय नावाचे धनी फक्त’ असलं काही तरी साचेबंद उत्तर द्यायचं अशी प्रथा. कितीही निरिच्छतेचा आव आणला, वर्षानुवर्षे हेच काम करून कितीही निगरगट्ट झालो म्हटले तरीही असे चार उद्गार ऐकल्याशिवाय चैन पडू नये इतकी त्यांची सवय झाली असते.

नगरकरांच्या खोलीत गेलो तेव्हा माझी अशीच अपेक्षा असणार. पण आजचा दिवस वेगळा होता. माझी अपेक्षा पूर्ण न करणारा होता.

मी नेहमीच्या सराईतपणे खोलीत गेलो. नगरकर, त्यांच्या पत्नी माझी वाटच पाहत होते.

‘काय म्हणतेय तब्बेत? ठणठणीत दिसते. जायचंय ना घरी? की आवड लागली हॉस्पिटलची? राहणार इथेच?’ मी माझ्या नेहमीच्या थट्टेखोर आवाजात विचारले. यावर अपेक्षा अशी की नगरकरांनी, त्यांच्या पत्नीने एक सुरात ‘छे छे  डॉक्टर, तुमचीच तर वाट पाहतोय सकाळपासून, कधी एकदा घरी जातोय असं झालंय आम्हाला.’ असं म्हणावं आणि मग मी खुदकन हसून ‘हो’ म्हणावं. नेहमीचाच लपंडाव. पण मी मघा म्हटलं ना, तसा आजचा दिवस वेगळा होता. नगरकर काय, किंवा त्याच्या सौ. काय, कुठल्याच विनोदी मनःस्थितीत नव्हते. थोडे गंभीरच होते. घरी जाण्याची लालूच त्यांना खूष करू शकली नाही.

‘नाही, ते ठीक आहे, डॉक्टर, पण हल्ली हार्ट पेशंटची ती काय ‘angiography करतात  ती नाही का करायची आपण? कुणी तरी म्हणत होतं की ती एकदा केली की बर असतं. म्हणजे काय की मनात शंका नको. जे काय व्हायचं ते लगेचच होऊन जाईल, म्हणजे समजा बायपास ऑपरेशन किंवा तसलं काही लागणार असेल तर लगेचच होऊन जाईल. नाही का?’ नगरकरांनी मला प्रश्न केला खरा पण ती सूचना आहे हे ओळखण्या इतपत हुशार मी नक्कीच होतो.

नगरकरांना ‘angiography’ करून घ्यायची होती हे मी ओळखले, इतकेच नव्हे, तर जरूर असेल तर बायपास ऑपरेशनसुद्धा त्यांना हवे होते इतके सगळे ह्या बोलण्यातून मला समजले. खरं तर या सगळ्याच विषयावर आमचं वेळोवेळी बोलणं झालेलं होतं, हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर दोन-तीन आठवड्यांनी आपण एक stress test करणार, त्यात जर काही दोष आढळला तरच पुढच्या तपासण्या करणार हे सगळं खरं तर त्यांच्याशी वेळोवेळी बोलून झालं होतं, ‘डॉक्टर, आम्ही काही तुमच्या शब्दाबाहेर नाही’ असं आश्वासनही त्यावर त्यांनी मला दिलं होतं. आज अचानक हा बदल का व्हावा हे मात्र मला कळेना. ही तर चक्क कोलांटउडीच होती. आणि त्यातूनही विशेष हे की इथे चक्क पेशंटच हौसेनं ऑपरेशनची मागणी करत होता. डॉक्टरला आग्रह करून आडून आडून ऑपरेशनच्या दिशेने ओढू पाहत होता. मी थोडासा वैतागलो. पुन्हापुन्हा त्याच विषयावर तेच चऱ्हाट लावायचे म्हणजे काय? डॉक्टर म्हटलो तरी किती सहन करणार असला काही तरी विचार माझ्या मनात आला असावा. 

माझ्या कपाळावर छोटी आठी आली.

‘हे पहा, या विषयावर आपण वेळोवेळी बोललोच आहोत. पुढच्या तपासण्या करण्याची गरज आहे किवा नाही हे ठरवायला आपल्याला थोडा वेळ थांबावं लागणार आहे. शेवटी पुढची तपासणी काय किंवा ऑपरेशन काय, या सगळ्यात धोका असतो, शेवटी तो जिवाचा खेळ आहे. असे निर्णय उगाच घाईने घेत नाहीत.’ वरकरणी न रागावता मी नगरकरांना समजावले, त्यांच्या पत्नीला समजावले.
‘नाही, आम्ही काही तुमच्या शब्दाबाहेर नाही. कुणीकुणी कायकाय बोलतं, आम्ही ते तुम्हालाच विचारणार नाही का? आणि खरं सांगायचं तर यांच्या नोकरीचे आता दोन महिनेच उरलेत, म्हणजे तेव्हा त्यानंतर त्यांचा विमा तेव्हा संपणार. म्हणून काही खर्च उपटणारच असेल, तर तो त्या आधी झाला तर बरा. असा आपला आमचा विचार. पण शेवटी, काय आपली तब्बेत महत्त्वाची. त्यात थोडाच पैशाचा विचार करून चालेल?’  सौ. नगरकर म्हणाल्या.

आता कुठे माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे विम्याचा परतावा मिळावा, यासाठी नगरकरांची धावपळ चालली होती, त्यासाठी वेळ पडली तर घाई करूनसुद्धा ऑपरेशन करण्याची त्यांची तयारी होती. हे विमा माहात्म्य मला प्रथमच समजले. पण तरीही मी त्यांना योग्य तोच सल्ला दिला आणि त्यांनीही तो विश्वासाने मानला यात मी खूष होतो. कितीही झालं तरी ऑपरेशन कुणाला आवडेल असा माझा कयास होता. दोन आठवड्यांनी पुढल्या तपासणीचा दिवस ठरवूनच मी नगरकरांना घरी पाठविले.

कामाच्या गडबडीत दोन आठवडे कसे गेले ते समजले नाही. ठरल्या दिवशी नगरकर तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आले. आम्ही वाटच पाहत होतो. ‘चला, बेडवर तयारीसाठी या,’ असे मी म्हणतो तर नगरकर काही जागचे हलेनात. माझ्याकडे पाहत संकोचाने उभेच राहिले. काही तरी घोटाळा असावा असे मला वाटले. 

‘करायची ना टेस्ट?’ मी म्हणालो, तसे कसेबसे पुढे होत नगरकर म्हणतात, ‘डॉक्टर, मी बराच विचार केला. मला वाटतं तुम्ही मला आपली angiogrphyचीच चिट्ठी द्या. ही तपासणी नको. मला वाटतं थेट angiographyच करावी.

आता मात्र मी चकित झालो. नगरकरांनी पुन्हा निर्णय बदलला होता.

‘अहो, आलाच आहात तर आधी ही तपासणी करूनच ठरवू ना. ह्यात दोष आला तर आहेच की पुढे ती तपासणी.’ मी म्हणालो.

‘नकोच ते, डॉक्टर, ही तपासणी चांगली आली तर? नकोच. मला तुम्ही सरळ angiographyचीच चिट्ठी द्या.

नगरकर अगदी पूर्ण ठरवून आपला निर्णय ठामपणे घेऊनच आलेले दिसले. माझा कुठलाच युक्तिवाद त्यांच्यासमोर चालणे आता शक्य नव्हते. एव्हाना मीही वैतागलो होतो. पिसाळलो होतो. विम्यासाठी चाललेला त्यांचा हा खटाटोप मला असह्य वाटू लागला होता. पेशंटच्या असल्या आग्रहाला बळी पडून मी माझी तत्त्वे सोडावीत असे मलाही वाटेना. मीही हट्टाला पेटलो.

‘मिस्टर नगरकर, मला जी चूक वाटते, अश्या तपासणीसाठी मी तुम्हाला चिट्ठी देऊ शकत नाही. तुम्ही एक तर मी सांगतो तसे वागा, ही stress test करून घ्या, नाही तर इतरत्र कुठेही जाऊन तुम्हाला पाहिजे तशा तपासण्या करून घ्या.

‘पण तुमच्या चिट्ठीशिवाय कोण करेल माझी angiography?’ नगरकर म्हणाले.

‘त्यात काहीच अडचण नाही. कुठल्याही हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांना विनंती केलीत तर कुणीही करेल ही टेस्ट. त्यासाठी काही माझी चिट्ठी लागत नाही.’ मी निक्षून म्हणालो. मला वाटत होतं की हा रामबाण ठरावा. याने तरी नगरकरांचा विवेक जागा व्हावा.

पण ते होणे नव्हते. नगरकर ताडकन उठले. काहीही न बोलता माझ्यासमोरून उठून निघून गेले. एकदाही वळून माझ्याकडे न बघता ते निघून गेले. त्यांचा चालण्याचा वेग आणि त्वेष असा होता की मलाच अपमानित वाटावे.

नगरकरांचे पुढे काय झाले हे मला आजतागायत समजलेले नाही. विम्याच्या परताव्यासमोर त्यांना आपला विवेक जागवता आला नाही. आपल्या प्रकृतीच्या सुरक्षेपेक्षा त्यांना विमा महत्त्वाचा वाटला हे महत्त्वाचे!  म्हणजे गंमत पाहा, बायपासचे ऑपरेशन फुकट होईल ही आशा इतकी प्रबळ ठरली की त्यापुढे त्यांना इतर सगळे तुच्छ वाटले. अगदी एखाद्या वेळेस बायपास करावीसुद्धा लागू नये अशी आपली तब्बेत असेल, इतकी चांगली असेल ही शक्यता अजमावणे सुद्धा त्यांना धोक्याचे वाटले. तोट्याचे वाटले. हा विमाजनक अधःपातच म्हणायचा, नाही का?

आपल्या विमा शब्दकोषात नगरकरांची गणना आपण ‘विमासुर’ अशी करू शकतो.

क्रमशः पुढे चालू

डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०



Friday 16 November 2012

विम्याची ऐशी तैशी -१



विमा शब्द कोश

आरोग्य विमा हा आजकाल परवलीचा विषय झाला आहे. हा विमा उतरवणे म्हणजे सुज्ञपणा. सुजाणपणा. अशी समजूत आहे, ज्या कोणाची तशी नसेल त्यांची ती करून देण्यात येत आहे. यात विमा कंपन्यांचा सहभाग आहे, सरकारचा सहभाग आहे. तथाकथित अर्थ तज्ज्ञांचा आहे. आणि इतरही बऱ्याच सामान्य लोकांचा आहे जे स्वतःला समजूतदार आणि हुशार समजतात. या आरोग्य विम्यातून घडणाऱ्या गमती-जमती ऐकणे हा एक मनोरंजक आणि उद्बोधक खटाटोप ठरेल. आरोग्य विमा समजण्यासाठी काही नवीन शब्द समजावून घ्यावे लागतील. हा शब्दकोश थोडक्यात पाहू म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट व्हायला मदत होईल.

विमाधारक: हा सर्वज्ञात जुना शब्द आहे. विमा काढणाऱ्या सर्व व्यक्तींना लागू.

विमाकांक्षी: विम्यातून धनलाभाची अपेक्षा ठेवणारे, भरलेल्या हप्त्यापेक्षा सतत अधिक धनलाभ मिळेल अशा अपेक्षेत असणारे (दुर्दैवाने बहुतेक सर्वच) विमाधारक. हे विम्यातील गुंतवणुकीकडे उत्पन्नाचे साधन म्हणून बघतात. विमा उतरवल्यावर येणारे आजारपण म्हणजे यांना लॉटरी वाटते.

विमासाफल्य: वर निर्देश केल्याप्रमाणे आजारी पडून विम्यातून एकदाचा अपेक्षित आणि पुरेपूर धनलाभ झाला की मनात येणारी भावना. ही एक अशी अवर्णनीय आनंदावस्था असते की त्यात मूळ आजाराचा विसर पडावा.

विमावलम्बित्व: एखादे मोठे आजारपण होऊन एकदा का विमासाफल्य झाले की अपरिहार्यपणे विमावलम्बित्व येतेच. काढलेला विमा चालू ठेवण्यासठी पुनःपुन्हा हप्ते भरत राहण्याची गरज असणे म्हणजे ही अवस्था होय. हे न केल्यास आज आलेले विमासाफल्य पुढच्या आजारपणात विफल होण्याचा धोका असतो. यावरच तर विमा कंपनीचे व्यवहार भरभराटीला येतात.  

विमात्रस्त: विमा उतरवल्यावर प्रत्यक्ष आजारपण आले की ही अवस्था येते. यामध्ये विम्याचे पैसे मिळतील की नाही या विचाराने विमाधारक त्रस्त होतो. हे विम्यामुळे निर्माण झालेले मानसिक आजारपण आहे. हे मूळ आजारापेक्षा प्रबळ ठरू शकते. त्यामुळे मूळ आजाराकडे दुर्लक्ष होण्याचा धोका संभवतो.

विमाग्रस्त: आजारपणात विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर विमात्रस्तांचे विमाग्रस्तात रूपांतर होते. ही या आजाराची अधिक निराशाजनक अवस्था होय. या अवस्थेतून मुक्ती नाही.

विमासुर: हा बकासुराच्या जवळ जाणारा शब्द आहे. त्यात काही अर्थ-साधर्म्यही आहे. हे विमासुर विम्यातून परतावा मिळविण्यात कमालीचे निष्णात असतात. बकासुर जसा बकाबका अन्न गिळत असे तसे हे लोक आजारी पडून (किंवा न पडताही) बकाबका विम्याचे पैसे मिळवितात. ही एक अवघड पण गरजेची कला आहे. प्रत्यक विमाकांक्षीचे एकमात्र ध्येय असते की आपण विमासुर व्हावे.

विमाकर्षक: विमा विकणाऱ्या कंपन्या विमा विकण्यासाठी म्हणून जी वर्तणूक करतात त्यासंबंधीचे विशेषण. या प्रकारचे काम सरकारही करते. विमाकांक्षी लोकांना प्रलोभने दाखवून त्यांना विमा उतरविण्यास भाग पाडणे आणि त्यांच्याकडून पैसे मिळविणे यासाठी या वर्तनाचा उपयोग होतो.

विमाशरण: समाजातील विमाकर्षण जसजसे काढत जाते तसतशी समाजात ही अवस्था प्रबळ होते. यामध्ये सर्व वैद्यकीय सत्यांचा विम्याच्या संदर्भात विचार होतो. आजाराचे निदान, आजाराचे उपचार, या उपचारावर येणारा खर्च हे सर्व विमा कंपनी ठरवते. वैद्यकीय पाठ्यपुस्तकांच्या जोडीने आजारांविषयी विमा कंपन्यांची कल्पना काय आहे, त्यांच्या शर्ती काय आहेत हे शिकण्याची वेळ डॉक्टरांवर येते. विमामान्य अशा आजारांना विमामान्य असे उपचार देऊ शकेल तो चांगला डॉक्टर अशी भावना सर्वसामान्य लोकांची होते. समाज विमाशरण करणे हे विमा कंपन्यांचे (आणि दुर्दैवाने सरकारचेही) ध्येय असते, कारण त्यात त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतात. अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये या अवस्थेचा परमोत्कर्ष झालेला आढळून येतो.

विमोत्सारक: विमाधारक आजारी पडला की त्याचा विमा परतावा देण्यासंबंधी जी प्रचंड टाळाटाळ विमा कंपनी करते, त्याला उद्देशून वापरले जाणारे विशेषण. या वर्तनावरच विमा कंपनीचे अस्तित्व अवलंबून असते. नाही तर विमासुर अशा कंपनीला खाऊन टाकतील असा धोका असतो.

विमाडाव: हा लपंडाव या शब्दाशी जुळणारा थोडा समानार्थी शब्द आहे. विमा व्यवसायामध्ये विमाधारक, विमा विक्रेत्या कंपन्या, विम्याचे दलाल, डॉक्टर, हॉस्पिटल एकमेकांमध्ये जो लपंडावाचा खेळ खेळत एकमेकांना फसवत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात त्या खेळाचे हे नाव. या खेळाचे वैशिष्ट्य असे की यात कुणाचेही मनोरंजन होत नाही आणि खेळणारे सर्व गडी वेगवेगळ्या प्रकारे हरतात. आणि हे लक्षात न येऊन ते पुन्हा पुन्हा हा खेळ खेळत राहतात. हे एक प्रकारचे वैद्यकीय जगाला अद्याप अज्ञात असलेले पण तरीही आर्थिक दृष्ट्या प्रगतिशील समाजात सर्वदूर पसरलेले असे व्यसन आहे.

विमामुक्ती: वर उल्लेखिलेल्या विमाडावाचे वास्तविक स्वरूप आकलन झाल्यावर येणारी आनंदी भावावस्था. ही जर समाजात येईल तर समाज अधिक निरोगी आनंदी होण्याची शक्यता आहे. समाजातील काही अपप्रवृत्तींचे उच्चाटन होण्यास विमामुक्तीने मदत होईल. आजच्या प्रगतीशील आणि भौतिक सुखाच्या हव्यासाने पछाडलेल्या जगतात विमामुक्त अवस्थेची कल्पना अशक्यप्राय वाटते किंबहुना ती प्रतिगामी वाटण्याचीसुद्धा शक्यता आहे. ‘कालाय तस्मै नमः’ एवढेच त्याबाबत बोलणे शक्य आहे.

विम्यासंबंधी इतपत प्रास्ताविक करून त्यासंबंधी काही मनोरंजक किस्से सांगण्याचा प्रयत्न मी पुढच्या काही लेखांमधून करणार आहे

लेख क्रमशः वाचा आणि विमानंद मिळवा!
क्रमशः पुढे चालू

डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०

Saturday 10 November 2012

जीवन मूल्य



जीवन मूल्य
डॉ. दातार वयाने माझ्यापेक्षा बरेच मोठे होते. मी अगदीच नवथर तरुण तर ते मध्यम वयीन म्हणावेत असे. ते मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करणारे सर्जन होते. त्यांचं एक छोटेखानी हॉस्पिटल होतं त्यात ते मूत्रपिंडाच्या अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करीत. इतक्या छोट्या हॉस्पिटलमध्ये इतक्या कमी मदतीवर आणि इतक्या कमी उपकरणांनिशी अशा शस्त्रक्रिया करायला एका निधड्या छातीची गरज होती, तशी ती त्यांची असावी. अन्यथा सर्वसाधारण वकुबाच्या इतर कोणाही डॉक्टरची अशी हिंमत झाली नसती. हे सर्व ज्या काळात घडत होतं त्या काळाचाही हा महिमा असावा. म्हणजे असं की फारशी अद्ययावत हॉस्पिटल्सच त्या काळात नसत. लोकांच्या अपेक्षाही कमी होत्या. एकदा का एखाद्या डॉक्टरवर विश्वास बसला की डोळे झाकून लोक त्याच्या स्वाधीन होत. डॉक्टरला कधी उलट प्रश्न विचारावा अशी मानसिकताच मुळी तेव्हा नसावी. तर अशा प्रकारे दातारांचं हॉस्पिटल बिनबोभाट चालत होतं. कुठलेही खास प्रशिक्षण नसलेल्या परिचारिका, अल्पशिक्षित, दुसऱ्याच शाखेचे शिक्षण घेतलेले कनिष्ठ डॉक्टर, एखाद्या छोट्या स्वयंपाकघराएवढे ऑपरेशन थिएटर आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी अगदी अत्यावश्यक अशी आणि एवढीच तुटपुंजी उपकरणे अशा ऐवजावर त्यांच्या शस्त्रक्रिया चालत, एवढेच नव्हे तर त्या यशस्वीही होत.

डॉक्टर दातारांच्या हॉस्पिटलमध्ये मला वारंवार बोलावणे येत असे. ऑपरेशनपूर्वी रुग्णाची तपासणी करणे आणि रुग्णाच्या प्रकृतीत काही धोकादायक विकार असतील तर ते निदर्शनाला आणून देणे, त्यावर आवश्यक ते उपचार करून त्याला शस्त्रक्रियेसाठी तयार करणे असे माझ्या कामाचे स्वरूप असे. माझ्यासारख्या तरुण डॉक्टरला ही एक बरी संधी होती. मी अगदी तत्परतेने ही कामे करत असे.

त्या दिवशी दातार हॉस्पिटलचा फोन आला तेव्हा मी नुकताच घरी परतलो होतो. रिकामाच होतो. हॉस्पिटलची कुणी सिस्टर फोनवर बोलत होती. ‘सर, एक अर्जंट कॉल आहे. सरांनी तुम्हाला ताबडतोब यायला सांगितलंय. जमेल?’ तिच्या स्वरात एक प्रकारचं धपापलेपण होतं. एक प्रकारची भीती होती. काही तरी गडबड आहे, याचा अंदाज मला आला.
‘हो, मी निघालोच. पण गडबड तरी काय आहे?’ मी विचारलं.
‘नाही, ऑपरेशन टेबलवर घेतलेला पेशंट अचानक खराब झालाय, त्याला दम लागलाय. तुम्ही प्लीज लवकर या. असाल तसे या. ऑपरेशन थांबलेलं आहे. डॉ. कानडेही तुमची वाट पाहतायत. येताय ना?’ त्या सिस्टरचा ‘या,या’ असा धोशा चालूच होता. डॉ. कानडे हे तिथले भूलशास्त्रतज्ज्ञ डॉक्टर होते. एकूण परिस्थिती गंभीर असावी. डॉ. कानडेही काळजीत पडावेत इतकी गंभीर. मी तत्काळ निघालो. इ.सी.जी. मशीन घेतलं आणि स्कूटरला किक मारली.

रस्त्यावरची एरवी हलकी वाटावी अशी दुपारची गर्दीसुद्धा अशा वेळी नको नको करते. कुठला कोण पेशंट ऑपरेशनमधे अडलेला. त्याच्या आयुष्याची दोरी जणू आपल्या हातात. अशी भावना एकदा का मनात घुसली की मन एकीकडून अस्वस्थ होतं, तर दुसरीकडून एक प्रकारच्या थोरपणाच्या जाणीवेनं उभारूनही येतं. युद्धावर निघालेल्या एखाद्या शूर सैनिकाचा बाणा माझ्या मनात संचारतो आणि एखादा सराईत घोडेस्वार ज्या तडफेने युद्धभूमीवर चालून जाईल त्या तडफेने मी रस्ता कापू लागतो. रस्त्यावर येणारे सर्व अडथळे लीलया पार करीत मी माझ्या इच्छित मुक्कामी ज्या त्वरेने पोहोचतो तो जणू एक चमत्कारच वाटावा. त्या दिवशीही हे सगळं असंच घडलं. आणि वायूवेगानं मी दातार हॉस्पिटलमध्ये पोचलोसुद्धा.

हॉस्पिटलमध्ये पोचलो तशी गंभीर परिस्थितीची कल्पना आली. तिथले एकूण एक कर्मचारी माझी अगदी आतुरतेने वाट पहात असलेले. दार उघडून एक जण उभा. तर दुसऱ्याने धावत पुढे येऊन माझी इ.सी.जी.ची सूटकेस उचलली. ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडून एक सिस्टर उभी, तर दुसरीने माझ्या हातात ऑपरेशन थिएटर मधे लागतात ते मास्क आणि कॅप त्वरेने कोंबले. ते मी डोक्यावर चढवणार तोच त्या सिस्टरने पुढे होत माझ्या अंगावर गाऊन चढवायला सुरुवातसुद्धा केली. वाः, काय राजेशाही अनुभव होता. इतर कशासाठी नाही तरी किमान अशा अनुभवासाठी तरी डॉक्टर व्हावंच व्हावं असं वाटावं असा लोकोत्तर अनुभव!

मीही वेगानं पुढे होत परिस्थितीचा अंदाज घेतला. पेशंटपाशी पोचलो. कानडेही चिंताग्रस्त होते. काय झाले याचा त्यांनाही अजिबात अंदाज येत नव्हता. पेशंट पूर्ण भूलेच्या अमलाखाली बेशुद्ध होता. धापा टाकत होता. त्याच्या गळ्यात श्वासासाठी नळी टाकलेली. त्यातून कसं तरी त्याचं श्वसन चालू होतं.

पुढे होऊन मी पेशंटला तपासले. त्याचा इ.सी.जी. काढला. त्याच्या आजाराचे निदान करणे अजिबात अवघड नव्हते. त्याला हृदयाच्या एका झडपेचा आजार होता. अगदी अरुंद झालेली होती ती झडप. ऑपरेशन टेबलवर अतिशय अडचणीत आणि प्रतिकूल परिस्थितीत तपासातानाही सहज समजावा इतका उघड आजार होता तो. ऑपरेशनच्या आधीच खरं तर अशा आजाराचं निदान व्हायला हवं होतं आणि त्यानुसार काही उपाय योजना व्हायला हवी होती. झाला हा प्रकार थोडा हलगर्जीपणाचाच म्हणावा असा होता. ऑपरेशनपूर्वी पुरेशी तपासणी झाली नाही आणि कानड्यांचही थोडं दुर्लक्ष झालं. त्यातून घडलेली ही घटना. अजून उशीर होता तर कदाचित पेशंटच्या जीवावर बेतलं असतं. मी एक किरकोळ इंजेक्शन द्यायला सांगितलं आणि काही मिनिटातच पेशंटची प्रकृती स्थिरावली. लागलेला श्वास कमी झाला. पुढची शस्त्रक्रियाही बिनबोभाट झाली.

असे काही मोजकेच क्षण डॉक्टरच्या आयुष्यात येतात. सोन्यानं मंतरलेले क्षण. जेव्हा आपल्या डॉक्टरकीचा अभिमान वाटावा. धन्य धन्य वाटावं. तो दिवस माझ्यासाठी हे क्षण घेऊन आला. काय नशा होती त्याची. किती दिमाखदार वाटलं मला. कुणी आपली अशी आतुरतेने वाट पहावी, आपणही एका मस्तीत येऊन आपलं काम करावं आणि असं एक जीवनदान देऊन जावं!

डॉ. दातार खूष झाले. कानडे खूष झाले. दोघांच्याही नजरेत मला कृतज्ञ भावना दिसली. हॉस्पिटलच्या सिस्टर, तिथले मामा सगळे माझ्याकडे कौतुकाने पाहात आहेत हेही मला जाणवले. मी शांतपणे माझे इ.सी.जी. मशीन आवरले. गाऊन उतरवला. मास्क काढला. आणि थिएटरबाहेर आलो. मागोमाग दातार, कानडेही आलेच. दोघांनीही प्रेमाने माझा हात हातात घेतला. मला निरोप द्यायला जणू सगळे हॉस्पिटलच आल्याची भावना मला झाली.

हॉस्पिटलमधून निघालो तसे दातार सर माझ्याजवळ आले. ‘Thanks  for all that you have done today!’  ते म्हणाले. ‘तुझ्या आजच्या फीचे काय? किती लावायचे?’ त्यांनी विचारले.

‘काही विशेष नाही. आपले नेहमीप्रमाणेच व्हिजिटचे आणि इ.सी.जी.चे मिळून चारशे सांगा,’ मी म्हणालो.
‘काय म्हणतोस? नेहेमीसारखेच आणि फक्त चारशेच?’ दातार उद्गारले. ‘अरे, आजच्या तुझ्या कामाचं मोल वेगळं आहे. आज तू वेळेवर आलास, अक्षरशः धावून आलास. आमच्या पेशंटचा जीव वाचवलास. तू माग किंवा नको मागूस. मला त्याचं मोल आहे. मी तुला खास जास्तीचे पैसे देणार आहे, समजलं? मी देणार आहे!’

‘त्याबद्दल मी काय बोलू? ती तुमची मर्जी.’ असं म्हणत मी तिथून बाहेर पडलो. डॉ. दातार अगदी बाहेरच्या दरवाजापर्यंत आलेले दिसले मला सोडायला. दातारांनी माझ्या कामाचं मोल जाणलं, इतकंच नाही तर त्याचा खास मोबदला देण्याची तयारी दाखवली. याहून जास्त मला तरी काय हवं होतं? आणि दातार स्वतः सुद्धा एक महागडे म्हणावेत असेच डॉक्टर होते. त्याकाळीसुद्धा त्यांची ऑपरेशनची फी दहा हजारांवर सहज जात असे. आणि त्यांच्याकडे येणारे पेशंटही बरेचसे धनदांडगे असत. शहराबाहेरचे गावाकडचे असत, पण श्रीमंत असत. अशा संपन्न पेशंटच्या संपन्न डॉक्टरांनी माझे कौतुक केले होते. साहजिकच मी सुखावलो. आनंदावर जणू तरंगतच मी स्कूटर हाकली आणि घरी परतलो.

सुमारे महिन्याभराचा कालावधी लोटला असेल. ठरलेल्या तारखेला दातार हॉस्पिटलचा चेक आला. माझ्या मनात एक अनामिक उत्सुकता होती. किती रक्कम असेल त्या चेकवर? अगदी तातडीने उघडून मी चेक पाहिला. चेकवर रक्कम होती- रु. चारशे वीस फक्त.

मी केलेल्या धावपळीचे तोंडभर कौतुक करून दातारांच्या हिशेबी त्याचे पैशातील रूपांतर फक्त जास्तीच्या वीस रुपयात व्हावे? हे कौतुक होते की थट्टा याचा उलगडा आजवर मला झालेला नाही. असो. वाचलेल्या एका जीवाचे एवढे तरी मोल दातारांना वाटले, हेही काही थोडके नव्हे.

डॉ. संजीव मंगरूळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०