Tuesday 2 October 2012

सुरुवातीचे दिवस

सुरुवातीचे दिवस


मी जेव्हा वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात केली  त्यावेळच्या म्हणजे सुमारे तीस वर्षापूर्वीच्या काळातल्या काही घटना मी आता सांगणार आहे. कुठल्याही व्यवसायाची सुरुवात हा एक अगदी वेगळा आणि स्वतंत्र  अनुभव असतो. बऱ्याच वेळा हा अनुभव खेदजनक असतो, व्यवसायाची पुढे जी काही वाटचाल झाली तिच्याशी विसंगतही असतो. पण या अनुभवातून जे काही शिक्षण होते त्यातूनच तर त्या व्यवसायाची आणि व्यावसायिकाची जडणघडण होत असते,

मी माझ्या डॉक्टरकीची सुरुवात पुण्यात करायचे ठरविले याची करणे अगदी उघड आणि सरळ होती. मी इथलाच राहणारा, दोन तीन पिढ्यांचा या शहराशी संबंध. सगळे नातलग, परिचित इथलेच राहणारे, मला अगदी लहानपणापासून ओळखणारे. माझी शैक्षणिक गुणवत्ता जाणणारे. मी स्वतः एम. डी. मध्ये सुवर्णपदक मिळवून उत्तीर्ण झालेलो, त्यामुळे माझे डॉक्टर म्हणून पुण्यात होणारे आगमन ही जणू काही सनसनाटी बातमीच ठरेल आणि संबंधितांमध्ये आजारी पडण्याची अगदी चढाओढ लागून माझा व्यवसाय अगदी पहिल्या दिवसापासून तुफान चालेल अशा बाळबोध आणि भ्रामक कल्पनेत मी तेव्हा होतो. माझ्या बरोबरीचे किती तरी मित्र जरा छोट्या गावांमध्ये गेले, जिथे कुणी आधीचे डॉक्टर नाहीत आणि म्हणून आपल्या शाखेला चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज घेऊन त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरु केला. अगदी राहण्याच्या जागा शोधण्यापासून ते दवाखाना सुरु करण्यापर्यंत त्यांना ज्या अडचणींचा सामना करावा लागणार होता त्याची इथे बसून कल्पना करूनच मला त्यांची कीव करावीशी वाटत होती. त्यांच्या धाडसाचे कौतुकही वाटत होते. मी किती सुखात आहे, माझा पुढचा मार्गही कसा सोपा आहे अशी सुखद भावना तेव्हा माझ्या मनात होती. पण असे काहीही  घडले नाही. अगदी जवळचे वाटावे असे मित्र, नातलगसुद्धा आपल्याला मित्र किंवा नातलग म्हणूनच ओळखतात, आणि ही ओळख आणि डॉक्टर म्हणून लागणारा विश्वास या दोन भिन्न गोष्टी असतात आणि त्यामुळे अगदी जवळची वाटणारी ही मंडळीसुद्धा लगेचच पेशंट म्हणून तुमच्याकडे येत नाहीत (येऊ धजावत नाहीत!) हे मला मी व्यवसायात पडल्यानंतर किती तरी दिवसांनी कळले. तात्पर्य, पुण्यात अगदी माझ्या शहरात राहूनसुद्धा मला माझ्या व्यवसायात बस्तान बसविण्यासाठी अगदी भरपूर वेळ द्यावा लागला, अगदी इतका की पुण्याबाहेर गेलेले माझे मित्रच माझ्यापेक्षा हुशार होते असे थोड्याच कालावधीत मला वाटू लागावे!
माझी वैद्यकिय शाखा ‘कन्सल्टिंग फिजिशिअन’ ची. त्यामुळे लागणारी भांडवली गुंतवणूक खूपच कमी. एक भाड्याची छोटी जागा( माझी ही जागा केवळ १०० चौ.फू.होती!) आणि एक इ.सी.जी. मशीन एवढ्या गुंतवणुकीवर मी ह्या लढाईत उतरलो. माझ्याकडे येणारे पेशंट हे अगदी प्रथम व्यक्तिगत ओळखीतून येणारे, कधी फुकट सल्ल्याच्या अभिलाषेने तर कधी ‘बघू तरी कसा डॉक्टर आहे ते’ अशा चिकित्सक बाण्याने येणारे असेच असत. म्हणजे एकूण भावना अशी की मी त्यांना तपासण्याऐवजी तेच माझी उलट तपासणी करणार आणि वेळ आल्यास मलाच वर्तणुकीचे सल्ले देणार! थोड्या दूरच्या घरगुती परिचयातून आलेल्या माझ्या पहिल्या-वहिल्या एका पेशंटने तर मी त्याच्याकडून फीपोटी पैसे घेतले अशी तक्रार चक्क माझ्या आईकडेच नोंदवली. आणखी एका पेशंटला मी काही तपासण्या करायला सांगितल्या तर त्याने त्या करायला चक्क नकार दिला कारण- ‘मी डॉक्टर असलो तरी अजून खूप लहान आहे. किती तपासण्या कराव्यात हे अजून मला शिकण्याची गरज आहे, जमेल हळूहळू.’ असे त्याचे माझ्याविषयीचे मत होते. माझ्या लहानखोऱ्या यष्टीवर त्याने ही जी प्रतिक्रिया दिली त्यामुळे मी खूप खचलो, रागावलो, इतका की ‘असे असेल तर त्याने माझ्याकडे पुन्हा येऊ नये’ असेच मी त्याला (माझ्या मते!) ठणकावले. त्यावर त्याची प्रतिक्रिया फारच बोलकी होती – ‘नाही तरी मी कुठे पुन्हा येणार होतो’- अशी!
अगदी प्रथम येणाऱ्या अशा पेशंटमध्ये फीचे पैसे बुडविण्याचे प्रमाणही जास्त असे. अगदी रविवारी सकाळी खास वेळ देऊन एखाद्याला तपासावे, तर त्याने फीविषयी काहीही न बोलता उठून चक्क चालू लागावे असेही घडे. एकदा तर कमालच झाली. ‘तुम्ही गेल्या तपासणीच्यावेळी माझ्याकडून जास्त पैसे घेतले होते, तेव्हा मी संकोचाने बोललो नाही. पण आता सांगतो’, असे म्हणून एका अगदी वयस्कर काकांनी उलटे माझ्याकडूनच पैसे मागितले आणि विशेष म्हणजे मीही ते त्यांना दिले, संकोचाने! मागे वळून पाहताना मला या घटनेचे राहून राहून आश्चर्य वाटते. डॉक्टर पेशंट यांचे हे उरफाटे नाते विरळाच, नाही का? अगदी सुरवातीच्या या काळात मला आठवते त्याप्रमाणे काही काही वेळा ‘उत्पन्नाच्या मानाने थकबाकीच जास्त’ असेही घडत असे. तीस वर्षांच्या माझ्या पुढच्या व्यावसायिक सफरीत परिस्थिती केवढी तरी बदलली, डॉक्टर- पेशंट असे सौहार्दपूर्ण नाते जमले की थकबाकीचा हिशेबही ठेवावा लागत नाही, अगदी मी विसरलो तरी आठवणीने पैसे आणून देणारे लोक असतात. अगदी बहुसंख्येने असतात.
पेशंट येण्याचा दुसरा मार्ग, इतर (family doctor) डॉक्टरकडून सल्ल्यासाठी पाठविले जाणारे पेशंट. पेशंट मिळविण्याचा हा अगदी राजमार्ग आहे अशी माझी समजूत होती. पहिल्या काही दिवसात कामही फारसे नसे. हाताशी वेळ मुबलक. त्यामुळे अशा डॉक्टरांना भेटण्याचा सपाटाच मी लावला होता. पानसरे (नाव काल्पनिक, नाही तर कुणी भलतेच पानसरे चकित होऊन जायचे!) नावाचे एक मध्यमवयीन डॉक्टर माझ्या जवळच्याच भागात चांगला जम बसवून होते. थोडीफार घरगुती ओळखही होती. त्यांना भेटलो. त्यांना माझ्याविषयी आधीचीच माहिती होती. त्यांच्या बोलण्यातून हे मला जाणवले. मी खूष झालो. यांच्याशी आपले जमणार अशी आशा वाटू लागली, तोच त्यांनी मुद्द्याला हात घातला. “कट वगैरे देणार की नाही?’ अशीच सरळ विचारणा. वैद्यकिय व्यवसायातल्या कमिशनला कट म्हणण्याचा प्रघात आहे. सरळच अंगावर आलेल्या या प्रश्नाने मी पुरताच हडबडलो. अशा प्रश्नाला काय उत्तर द्यावे याचा गृहपाठ न करताच मी गेलो होतो. काही तरी थातुरमातुर उत्तर देऊन उठू लागलो, तर त्यांनी पुढचाही सल्ला दिला. ‘जरा बरी रक्कम जमली की एकदमच दिली तरी चालेल. उगाच पाच-दहा रुपये घेऊन येत जाऊ नका. तुम्हालाही त्रास, मलाही उगाच संकोच!’
जवळच्याच भागात एक मध्यम आकाराचे हॉस्पिटल होते. हॉस्पिटलचे चालक मालक भूलशास्त्राचे तज्ज्ञ होते. त्यांना एकदा भेटण्याचा प्रयत्न केला. गेल्यावर त्यांनी आधी सुमारे अर्धा तास बाहेरच बसवून ठेवले. त्यांच्या खोलीतून येणारे हसण्याचे आवाज, चहाची चाललेली देवाणघेवाण आणि मग मला आत बोलाविण्याचा आदेश- या वातावरणात मला मी एखादी परीक्षा देत असल्याचाच जणू भास आला. गंभीर उभ्या चेहेऱ्याने माझ्याकडे न बघताच डॉक्टरांनी माझे स्वागत केले. कप-बश्यांची आवराआवर चाललेली. एक दोन कनिष्ठ डॉक्टर सहकारी माझ्याकडे चोरटे कटाक्ष टाकत उभे. मी माझा परिचय करून देणार एवद्यात डॉक्टरांना कसली तरी आठवण आली. कनिष्ठांना उद्देशून डॉक्टर म्हणाले,
‘अरे, कालच्या त्या केसचं काय झालं? पण ते आज आले कसे नाहीत?’
‘नाही सर, ते परवा येतो म्हणालेत’
‘अच्छा, अच्छा, त्यांना जरा लवकरच यायला सांग, काय?’ सर.
तेव्हढ्यात सिस्टर एका पेशंटला घेऊन आल्या. मग त्याची माहिती, बसल्या बसल्या तपासणी सुरु झाली. औषध देऊन पेशंटची रवानगी झाली. आता मला वेळ मिळेल म्हणून मी पुढे सरसावणार, तोच डॉक्टरांनी बेल मारली. कुणी शिपाई आत आला. त्याला आदेश देणे सुरु झाले. मान हलवत तो उभा, ‘हो, सर’, असं म्हणून तो बाहेर पडला. आता मला बोलण्याची संधी होती, तोच फोन वाजला. मग फोनवर गप्पा सुरु.
‘अरे हो येतो म्हटलं नं. च्यायला, तुम्हा लोकांना म्हणजे, लाथा घाला पायजेत सालेहो.’
‘बोला, बोला, काय वाट्टेल ते बोला! तुम्हाला कोण आवरणार?’
असले प्रेमळ संवाद फोनवर चालू झाले आणि मलाच माझे तिथे असणे गैर वाटू लागले. खुर्चीतून मी उठण्याचा प्रयत्न करणार, तोच डॉक्टर महाशयांनी अंगुलीनिर्देश करीत मला बसण्याचा आदेश दिला. मी तसाच बसलो.
एकदाचा फोन झाला. डॉक्टरांची दृष्टी माझ्याकडे वळणार अशा कल्पनेने मी लगेचच माझ्या येण्याचे कारण सांगू पाहात होतो, पण तोच ‘बस, बस’ असे प्रथमच मला उद्देशून पण माझ्याकडे न बघताच डॉक्टर म्हणाले, आणि त्यांनी हॉस्पिटलच्या कामाची वेगळीच फाईल चाळायला सुरुवात केली. आता कित्येक क्षण शांततेत गेले, आणखीही काही जाणार तोच मी हिय्या करून म्हणालो, ‘सर, आज जर आपल्याला वेळ नसेल तर मी नंतरही कधी येऊ शकतो.’
‘एक मिनिट’, सर वाचण्यात दंग मी हा असा अस्वस्थ लोंबलेला. किती क्षण गेले आठवत नाही. पण त्यांना माझी शेवटी आठवण झाली असावी. वाचता वाचताच नजरही न हलवता त्यांनी विचारले, ‘येस?’
हे बहुतेक मलाच उद्देशून असणार, कारण खोलीत इतर कुणीच नव्हते. एव्हाना मी पुरताच खचलेलो, काही तरी स्वतःविषयी बोललो. ते मलाही ऐकू आले नाही, कदाचित त्यांनाही!
‘हो, हो, पाठवीन हो पेशंट मी तुझ्याकडे, पाठवीन!!’ असे ते काहीसे ते बोलल्याचे मला आठवते. मी जो तिथून उठलो तो बाहेर येऊन स्कूटरवर बसलो तेव्हाच भानावर आलो. झाला प्रसंग माझ्यादृष्टीने फारच क्लेशकारक होता. अगदी जाणून बुजून अपमान केल्यासारखा वाटणारा. म्हटलं तर माझा आणि या डॉक्टरांचा आधी काहीही परिचय नव्हता की म्हणून त्यांचा माझ्याविषयी काही पूर्वग्रह असावा. कुणीतरी आपल्याला अकारण हाकलून द्यावं असं मला वाटू लागलं होतं. आता इथून पुढे कुठल्याच डॉक्टरला भेटू नये असं ठरवण्यापर्यंत मी पोहोचू लागलो होतो.
पण हा निर्णय घेणे सोपे नव्हते. व्यवसायाचा जम फारसा बसलेला नव्हता. दिवसाचे रिकामे तास पुढे जाता जात नसत. काही तरी करावे, हातपाय हलवावे म्हणजे काही तरी घडेल, असे वाटत राही. अशाच एका दुपारी टुमणे नावाच्या माझ्या मित्राच्या दवाखान्यात पोहोचलो. टुमणे माझ्या वर्गातला मित्र. प्रत्येक वर्गात मागच्या बाकावर बसणारा विद्यार्थ्यांचा एक गट असतो. ह्या गटात वर्गातली टारगट मुले, चावट मुले अभिमानाने मिरवत असतात. टुमणे या गटातला. मी अशा मुलांपासून दूर असणारा, ‘घासू’ म्हणता येईल अशा प्रकारचा. कॉलेजात असताना टुमणेचा आणि माझा जवळपास काहीच संबंध आला नाही, इतक्या वेगळ्या विश्वात आम्ही वावरत असू. खरं तर मी त्याला एरवीही भेटावं असं कुठलच नातं आमच्यात नव्हतं. पण मी ते साकारण्याचा  प्रयत्न केला. आधीच्या अनुभवांवरून काहीही बोध न घेता मी तो प्रयत्न केला. आणि फसलो.
त्याचं असं झालं. टुमणेचा दवाखाना शहराच्या मध्यवर्ती भागात चांगला जोरात चालतो असं माझ्या काही मित्रांकडून मला समजलं. एम्. बी. बी. एस पर्यंत शिकून लगेचच दवाखाना टाकल्याने टुमणे त्याच्या भागात चांगला प्रस्थापित डॉक्टर झाला होता. त्याच्या दवाखान्याजवळ मोठी झोपडपट्टी होती. या झोपडपट्टीतून त्याला खूपच पेशंट मिळत असत. दवाखाना नेहमीच गजबजलेला असे. टुमणे मुळातच बिनधास्त, या वातावरणात तर त्याची चांगलीच बरकत झालेली होती. कुठल्याही परिस्थितीसमोर तो माघार घेत नसे. समोर येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाला (त्याच्यादृष्टीने ती गिऱ्हाईक मंडळीच होती, पेशंट नव्हे!) सुई टोचायचीच हा त्याचा अलिखित नियम. कुणी म्हातारा किंवा म्हातारी काचकूच करू लागली, संकोचाने धोतर किंवा साडी वर करायला विरोध करू लागली, तर हा सरळ धोतरा-साडीतून सुई खुपसत असे, पण सुई टोचल्याशिवाय सोडत नसे. असा हा टुमणे.
मी पोहोचलो तेव्हा दवाखाना तुडुंब भरलेला होता. एवढ्याश्या जागेत दहा-वीस माणसं ही गर्दी करून बसलेली. मधल्या जागेत पोराबाळांचा राडा. कुणी रांगतायत, कुणी उभ्यानं आईचा पदर ओढतायत, आणि बहुतेक सगळीच रडतायत असं एकूण वातावरण. माणसांच्या गर्दीचा, मुलांच्या मुतण्याचा नि काही स्पिरीटचा असा दर्प नाकाला झोंबत होता. कसाबसा गर्दी बाजूला करत मी डॉक्टरच्या खोलीपर्यंत पोचलो. दरवाजा ढकलून आत सरकलो. पण आतली परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. छोट्याशा त्या खोलीत विविध माणसं वेगवेगळया अवस्थांमध्ये अडकलेली. एकुलत्या एक खाटेवर कुणी कुशीवर झोपून सुई टोचण्याच्या प्रतीक्षेत होते,  तर कुणी नुकत्याच टोचलेल्या सुईच्या वेदनेला हाताने कुरवाळत होते. तिथेच कुणी आया एकाच्या जखमेवर मलमपट्टी करत होती, आणि वर तो पेशंट वेदनेने विव्हळत होता. या परिस्थितीचा अंदाज घेऊन आत पोचलेली एक-दोन कार्टी विनाकारणच आकांत करत होती. या वातावरणात आपला निभाव लागणे कठीण आहे, याचा एव्हाना मला अंदाज येऊ लागला होता. पण गर्दी अशी होती की परतीचा मार्गही बंद झाला होता. होईल ते पाहणे, भोगणे एव्हढेच माझ्या हातात राहिले होते.
या गर्दीत टुमणे नक्की कुठे आहे याचा अंदाज येत नव्हता. आतल्या अंधाराला डोळे जसे सरावले तसा तो मला दिसला. उभ्या उभ्यानेच तो एका वेळी बऱ्याच गोष्टी करत होता. कुणाला सुई टोच, कुणाच्या खांद्यावर थोपट, कुणा पोरावर डोळे वटारून दटाव तर कागदाच्या चिठोरीवर काही तरी खरडून तो कुणाच्या हातात कोंब अशा अनेक हालचाली तो एकाच वेळी लीलया करत होता. टाच उंच करून, कधी हात वर करून त्याचे लक्ष वेधण्यात अखेर मी यशस्वी  झालो. त्याने माझ्याकडे पाहिले, पण नुसतेच पाहिले. नजरेत ना ओळख, ना देख. चेहऱ्यावर एक शून्य भाव. माझ्या अंगावर शहारा आला. हा आपल्याला ओळखतो की नाही. नाही तर गिऱ्हाईक समजून एकदम मलाच सुई टोचायचा अशी भीती! पण टुमणेने माझी भीती खोटी ठरवली. त्याने बहुधा मला ओळखले असणार, कारण प्रश्नांकित चेहऱ्याने त्याने माझ्याकडे पाहिले, इतर गिऱ्हाईकाकडे पाही, त्यापेक्षा जास्त वेळ पाहिले आणि ‘काय रे?” असा प्रश्न केला. त्याअर्थी त्याने मला ओळखले, आणि हे मीही चाणाक्षपणे ओळखले.
‘काही नाही, भेटायला आलो होतो. एम्.डी. झालोय, दवाखाना सुरु केलाय, म्हटलं तुला भेटावं, म्हणून आलो होतो.’ मी म्हटलो खरं, पण त्या गोंगाटात ते माझं मलासुद्धा ऐकू आलं नाही तर त्याच्यापर्यंत कितीसं पोचलं असेल हे तोच जाणे. त्याच्या चेहऱ्यावर प्रतिक्रिया मात्र शून्यच होती. टुमणेपर्यंत पोचण्याचा माझा प्रयत्न चालूच होता. त्याचेही काम चहूअंगाने चालू होते. कसाबसा त्याच्या टेबलपर्यंत मी पोचलो. पूर्ण टुमणे दिसला खरा, पण काहीही कळायच्या आत त्याने एक कागद माझ्या हातात सरकवला.
 ‘लिही, लिही, याच्यावर एक औषध लिही, आणि या पोराला दे.” टुमणे म्हणाला.
‘अरे पण, कुठला पेशंट, कसलं औषध?’ मी क्षीणपणे विचारले.
‘च्यायला, लिही ना काही तरी आणि दे त्याला’, टुमणे म्हणाला आणि त्याच्या पुढच्या टोचकामाला लागला. हा प्रसंग अभूतपूर्व होता. माझ्या ताकदीबाहेरचा होता. धरणी दुभंगेल आणि मला सोडवेल तर बरे अशा विचारात मी होतो. एका अर्थाने टुमणे मला त्याचा बिनपगारी कनिष्ठ सहकारी बनवू पाहात होता असे मला जाणवले. गेलो कशासाठी आणि घडले काय अशी अवस्था माझी झाली. पुढे काय झाले ते मला आठवत नाही. कसा तरी मी सुटलो असणार. नंतर ना कधी टुमणे मला दिसला, ना कधी मी त्याविषयी कुणाशो बोललो! पण झाल्या घटनेचा सल आजतागायत माझ्या मनात कायम टिकून आहे.
टुमणेकडून परतलो, तेव्हा मी बदललेलो होतो. ह्या असल्या भेटी-गाठी कशा निष्फळ असतात हे मला उमगून चुकले होते. आता गप-गुमान राहून आपल्या वाट्याला येईल ते काम करायचे, काही कुणी उपाशी मरत नाही, अशा आध्यात्मिक निष्कर्षाला मी पोचलो होतो. आणि माझे कामही एव्हाना आपसूकच वाढत चाललेले होते. काही महिने उलटले असतील, पुन्हा एकदा काही मंदीचा काळ आला बहुधा. पुन्हा एकदा पेशंट कमी होत चालल्याची अपराधी भावना माझ्या मनात निर्माण झाली, कुणी आपल्यावर नाराज तर नाही ना झाले अशी अनामिक भीती अशा वेळी वाटते. तेव्हा पुन्हा एकदा जनसंपर्क वाढवावा असे माझ्या मनात आले.
तेव्हा मी माझ्या दवाखान्यात एक सायकल ठेवलेली होती. ती पेशंटला चालवायला सांगून त्यावर व्यायाम करताना त्याचा इ.सी.जी. काढायचा अशी एक टेस्ट मी नव्याने सुरु केली होती. सध्या अशी तपासणी ट्रेडमिल सारख्या साधनाने केली जाते. तेव्हा अशा ट्रेडमिल फारशा नव्हत्या. माझी टेस्ट हा ट्रेडमिलला सोपा आणि स्वस्त पर्याय होता. आपण या टेस्टविषयी बोलले पाहिजे, त्याची कल्पना जवळपासच्या डॉक्टरांना दिली पाहिजे असा विचार माझ्या मनात आला. माझ्या दवाखान्याजवळ तुपे नावाच्या डॉक्टरांचा दवाखाना होता. डॉक्टरांच्या नावाची मोठी थोरली पाटी रस्त्याने येता-जाता मला दिसत असे. पाटीच्या आकारावरून तुप्यांचा व्यवसाय समृद्ध असावा असा कुणाचाही समज व्हावा इतकी ती मोठी होती. मी करत असलेल्या टेस्टची एक नमुना प्रत मी घेतली आणि त्यांच्या दवाखान्यात गेलो.
पाटीच्या आकारमानाने मला वाटला तसा दवाखाना अजिबात मोठा वगैरे नव्हता. अगदी दोन-तीन व्यक्ती एका वेळी बसू शकतील एवढा बाक बाहेरच्या बाजूला आणि त्याला लागूनच डॉक्टरांची खोली, मधे एक तकलादू लाकडी फळीचा आडोसा. दवाखान्यातल्या सर्वच व्यक्ती सतत एकमेकांना दिसू शकतील इतका उघडेपणा. लाकडी फळीआड तुपे डॉक्टर बसलेले. चष्मा घालून पेपर वाचत होते. दाराशी मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. डॉक्टरांशिवाय दवाखान्यात कुणी मदतनीस नव्हता. किंबहुना एखाद्या ठिकाणी माणसांचा वावर असल्याची जी भावना आपल्याला नेहमीच जाणवते तसले काहीही इथे नव्हते. एक प्रकारचा कोरडा रूक्षपणा सर्वत्र भरलेला.
डॉक्टरांसमोरच्या खुर्चीत मी बसलो. माझा परिचय करून दिला. तिथून जवळच माझा दवाखाना असल्याचे मी त्यांना सांगितले. माझ्या बोलण्याचा प्रभाव तुप्यांवर पडत नव्हता, कुठेतरी काहीतरी विसंवाद होता, अशी भावना माझ्या मनात सारखी येत होती.
‘किती दिवस झाले तुम्हाला दवाखाना सुरु करून?’-माझे बोलणे अर्धवट तोडून डॉक्टरांनी मला विचारले.
‘झालं असेल एखाद वर्षं वगैरे’, प्रश्नाचा रोख माझ्या लक्षात न येऊन मी उत्तरलो.
‘एक वर्षं उलटलं आणि तुम्ही आज मला भेटता?’ डॉक्टर गरजले.
हा पवित्रा मला नवीनच होता. काय उत्तर द्यावे मला समजेना. एखाद्या अडाण्यासारखा आ वासून मी डॉक्टरांकडे पाहात राहिलो. त्यांना नक्की काय सुचवायचे होते मला उमगेना.
‘डॉक्टर, वर्षं झालं म्हणता तुम्हाला इथे दवाखाना टाकून आणि तुम्हाला आज माझ्याकडे यावंसं वाटलं – कमालच आहे म्हणायची!’ तुप्यांनी त्यांचा मुद्दा स्पष्ट केल्याच्या अविर्भावात पुन्हा तीच वाक्ये म्हटली.
‘म्हणजे काय आहे, वेळात वेळ काढून जमेल तसा डॉक्टरांना भेटण्याचा प्रयत्न करत असतो मी. आज तुमच्या-‘
डॉक्टरांनी माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत पुन्हा मला अडवलं, म्हणाले –‘अहो, ते सगळं ठीक आहे. पण तुम्ही आज मला भेटायला येता म्हणजे-‘ एक प्रकारचा तुच्छतादर्शक आविर्भाव करत तुप्यांनी खांदे उडवले. त्यांच्या लेखी माझी किंमत विनाकारणच शून्य होत चालल्याची भावना मला येऊ लागली.
मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. मी करत असलेल्या टेस्टची नमुना प्रत त्यांच्या समोर टाकली. त्यावर बोलून पाहिले. पण आता त्याच्यात काही जान राहिली नव्हती. तुप्यांना भेटण्यात मी जी अक्षम्य दिरंगाई केली होती त्यामुळे आता माझे मलाही क्षुद्र वाटावे इतपत माझी मानसिकता घसरली होती. काही तरी इकडचे तिकडचे बोललो, पुन्हा एकदा टेस्टचे कागद त्यांच्यासमोर वर-खाली केले आणि तिथून उठलो. दवाखान्यातून बाहेर पडलो, तेव्हा आपण संपूर्ण पराभूत झाल्याची भावना मनात पसरली होती. तुप्यांचा राग काही शमत नव्हता. अगदी दवाखान्याच्या दारातून पूर्ण बाहेर पडलो तरी तुप्यांची आश्चर्याने विद्ध झालेली नजर माझा  पाठलाग करत होती असे मला वाटले.
तुपे प्रकरणातून मी बरंच काही शिकलो. इतक्या उशिरा भेटून मी तुप्यांचा अहं दुखावला होता. आपल्या रिकाम्या दवाखान्याचं दुर्दैवी वास्तव ते विसरू पाहात होते. एक वर्षं उशिरानं भेटून मी ते त्यांच्यासमोर अधोरेखित केलं होतं. ते त्यांना कसं आवडणार? वस्तुतः जे घडलं होतं, तो एक अपघात होता, माझ्या व्यक्तिगत परिस्थितीतून घडलेला अपघात. पण तुप्यांचा पूर्वग्रह आडवा आला. माझा उशीर भलत्याच गैरसमजाने त्यांनी मनाला लावून घेतला आणि मला बाद करून टाकले!
माझ्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या काही अनुभवांची ही फलश्रुती मी इथे मांडली आहे. कुणा डॉक्टरांवर व्यक्तिगत टीका करावी असा माझा हेतू नाही. आपण सर्वजण जे असतो, जसे असतो, त्याला परिस्थिती कारणीभूत असते. आपल्या कित्येक प्रतिक्रिया निर्हेतुक असतात, पण परिस्थितिवशात् त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त होतो. इतक्या वर्षांच्या व्यावहारिक अनुभवानंतर मला ही समज नक्कीच आली आहे. आयुष्याच्या या टप्प्यावरून मागे वळून पाहिलं की या गतगोष्टींची मजा काही और आहे असं आता वाटतं. या घटना जेव्हा घडल्या तेव्हा त्यांनी मला दुःख दिले, क्लेश दिले, यातना दिल्या, एक प्रकारचं नैराश्य दिलं. पण याच घटनांनी मला तेव्हा प्रेरणाही दिली, उभं राहण्याची, स्वतंत्रपणे झगडण्याची, ज्यातून पुढचा भविष्यकाळ घडला, हे नाकारून कसं चालेल?

डॉ. संजीव मंगरूळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०


No comments:

Post a Comment