Saturday 10 November 2012

जीवन मूल्य



जीवन मूल्य
डॉ. दातार वयाने माझ्यापेक्षा बरेच मोठे होते. मी अगदीच नवथर तरुण तर ते मध्यम वयीन म्हणावेत असे. ते मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करणारे सर्जन होते. त्यांचं एक छोटेखानी हॉस्पिटल होतं त्यात ते मूत्रपिंडाच्या अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करीत. इतक्या छोट्या हॉस्पिटलमध्ये इतक्या कमी मदतीवर आणि इतक्या कमी उपकरणांनिशी अशा शस्त्रक्रिया करायला एका निधड्या छातीची गरज होती, तशी ती त्यांची असावी. अन्यथा सर्वसाधारण वकुबाच्या इतर कोणाही डॉक्टरची अशी हिंमत झाली नसती. हे सर्व ज्या काळात घडत होतं त्या काळाचाही हा महिमा असावा. म्हणजे असं की फारशी अद्ययावत हॉस्पिटल्सच त्या काळात नसत. लोकांच्या अपेक्षाही कमी होत्या. एकदा का एखाद्या डॉक्टरवर विश्वास बसला की डोळे झाकून लोक त्याच्या स्वाधीन होत. डॉक्टरला कधी उलट प्रश्न विचारावा अशी मानसिकताच मुळी तेव्हा नसावी. तर अशा प्रकारे दातारांचं हॉस्पिटल बिनबोभाट चालत होतं. कुठलेही खास प्रशिक्षण नसलेल्या परिचारिका, अल्पशिक्षित, दुसऱ्याच शाखेचे शिक्षण घेतलेले कनिष्ठ डॉक्टर, एखाद्या छोट्या स्वयंपाकघराएवढे ऑपरेशन थिएटर आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी अगदी अत्यावश्यक अशी आणि एवढीच तुटपुंजी उपकरणे अशा ऐवजावर त्यांच्या शस्त्रक्रिया चालत, एवढेच नव्हे तर त्या यशस्वीही होत.

डॉक्टर दातारांच्या हॉस्पिटलमध्ये मला वारंवार बोलावणे येत असे. ऑपरेशनपूर्वी रुग्णाची तपासणी करणे आणि रुग्णाच्या प्रकृतीत काही धोकादायक विकार असतील तर ते निदर्शनाला आणून देणे, त्यावर आवश्यक ते उपचार करून त्याला शस्त्रक्रियेसाठी तयार करणे असे माझ्या कामाचे स्वरूप असे. माझ्यासारख्या तरुण डॉक्टरला ही एक बरी संधी होती. मी अगदी तत्परतेने ही कामे करत असे.

त्या दिवशी दातार हॉस्पिटलचा फोन आला तेव्हा मी नुकताच घरी परतलो होतो. रिकामाच होतो. हॉस्पिटलची कुणी सिस्टर फोनवर बोलत होती. ‘सर, एक अर्जंट कॉल आहे. सरांनी तुम्हाला ताबडतोब यायला सांगितलंय. जमेल?’ तिच्या स्वरात एक प्रकारचं धपापलेपण होतं. एक प्रकारची भीती होती. काही तरी गडबड आहे, याचा अंदाज मला आला.
‘हो, मी निघालोच. पण गडबड तरी काय आहे?’ मी विचारलं.
‘नाही, ऑपरेशन टेबलवर घेतलेला पेशंट अचानक खराब झालाय, त्याला दम लागलाय. तुम्ही प्लीज लवकर या. असाल तसे या. ऑपरेशन थांबलेलं आहे. डॉ. कानडेही तुमची वाट पाहतायत. येताय ना?’ त्या सिस्टरचा ‘या,या’ असा धोशा चालूच होता. डॉ. कानडे हे तिथले भूलशास्त्रतज्ज्ञ डॉक्टर होते. एकूण परिस्थिती गंभीर असावी. डॉ. कानडेही काळजीत पडावेत इतकी गंभीर. मी तत्काळ निघालो. इ.सी.जी. मशीन घेतलं आणि स्कूटरला किक मारली.

रस्त्यावरची एरवी हलकी वाटावी अशी दुपारची गर्दीसुद्धा अशा वेळी नको नको करते. कुठला कोण पेशंट ऑपरेशनमधे अडलेला. त्याच्या आयुष्याची दोरी जणू आपल्या हातात. अशी भावना एकदा का मनात घुसली की मन एकीकडून अस्वस्थ होतं, तर दुसरीकडून एक प्रकारच्या थोरपणाच्या जाणीवेनं उभारूनही येतं. युद्धावर निघालेल्या एखाद्या शूर सैनिकाचा बाणा माझ्या मनात संचारतो आणि एखादा सराईत घोडेस्वार ज्या तडफेने युद्धभूमीवर चालून जाईल त्या तडफेने मी रस्ता कापू लागतो. रस्त्यावर येणारे सर्व अडथळे लीलया पार करीत मी माझ्या इच्छित मुक्कामी ज्या त्वरेने पोहोचतो तो जणू एक चमत्कारच वाटावा. त्या दिवशीही हे सगळं असंच घडलं. आणि वायूवेगानं मी दातार हॉस्पिटलमध्ये पोचलोसुद्धा.

हॉस्पिटलमध्ये पोचलो तशी गंभीर परिस्थितीची कल्पना आली. तिथले एकूण एक कर्मचारी माझी अगदी आतुरतेने वाट पहात असलेले. दार उघडून एक जण उभा. तर दुसऱ्याने धावत पुढे येऊन माझी इ.सी.जी.ची सूटकेस उचलली. ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडून एक सिस्टर उभी, तर दुसरीने माझ्या हातात ऑपरेशन थिएटर मधे लागतात ते मास्क आणि कॅप त्वरेने कोंबले. ते मी डोक्यावर चढवणार तोच त्या सिस्टरने पुढे होत माझ्या अंगावर गाऊन चढवायला सुरुवातसुद्धा केली. वाः, काय राजेशाही अनुभव होता. इतर कशासाठी नाही तरी किमान अशा अनुभवासाठी तरी डॉक्टर व्हावंच व्हावं असं वाटावं असा लोकोत्तर अनुभव!

मीही वेगानं पुढे होत परिस्थितीचा अंदाज घेतला. पेशंटपाशी पोचलो. कानडेही चिंताग्रस्त होते. काय झाले याचा त्यांनाही अजिबात अंदाज येत नव्हता. पेशंट पूर्ण भूलेच्या अमलाखाली बेशुद्ध होता. धापा टाकत होता. त्याच्या गळ्यात श्वासासाठी नळी टाकलेली. त्यातून कसं तरी त्याचं श्वसन चालू होतं.

पुढे होऊन मी पेशंटला तपासले. त्याचा इ.सी.जी. काढला. त्याच्या आजाराचे निदान करणे अजिबात अवघड नव्हते. त्याला हृदयाच्या एका झडपेचा आजार होता. अगदी अरुंद झालेली होती ती झडप. ऑपरेशन टेबलवर अतिशय अडचणीत आणि प्रतिकूल परिस्थितीत तपासातानाही सहज समजावा इतका उघड आजार होता तो. ऑपरेशनच्या आधीच खरं तर अशा आजाराचं निदान व्हायला हवं होतं आणि त्यानुसार काही उपाय योजना व्हायला हवी होती. झाला हा प्रकार थोडा हलगर्जीपणाचाच म्हणावा असा होता. ऑपरेशनपूर्वी पुरेशी तपासणी झाली नाही आणि कानड्यांचही थोडं दुर्लक्ष झालं. त्यातून घडलेली ही घटना. अजून उशीर होता तर कदाचित पेशंटच्या जीवावर बेतलं असतं. मी एक किरकोळ इंजेक्शन द्यायला सांगितलं आणि काही मिनिटातच पेशंटची प्रकृती स्थिरावली. लागलेला श्वास कमी झाला. पुढची शस्त्रक्रियाही बिनबोभाट झाली.

असे काही मोजकेच क्षण डॉक्टरच्या आयुष्यात येतात. सोन्यानं मंतरलेले क्षण. जेव्हा आपल्या डॉक्टरकीचा अभिमान वाटावा. धन्य धन्य वाटावं. तो दिवस माझ्यासाठी हे क्षण घेऊन आला. काय नशा होती त्याची. किती दिमाखदार वाटलं मला. कुणी आपली अशी आतुरतेने वाट पहावी, आपणही एका मस्तीत येऊन आपलं काम करावं आणि असं एक जीवनदान देऊन जावं!

डॉ. दातार खूष झाले. कानडे खूष झाले. दोघांच्याही नजरेत मला कृतज्ञ भावना दिसली. हॉस्पिटलच्या सिस्टर, तिथले मामा सगळे माझ्याकडे कौतुकाने पाहात आहेत हेही मला जाणवले. मी शांतपणे माझे इ.सी.जी. मशीन आवरले. गाऊन उतरवला. मास्क काढला. आणि थिएटरबाहेर आलो. मागोमाग दातार, कानडेही आलेच. दोघांनीही प्रेमाने माझा हात हातात घेतला. मला निरोप द्यायला जणू सगळे हॉस्पिटलच आल्याची भावना मला झाली.

हॉस्पिटलमधून निघालो तसे दातार सर माझ्याजवळ आले. ‘Thanks  for all that you have done today!’  ते म्हणाले. ‘तुझ्या आजच्या फीचे काय? किती लावायचे?’ त्यांनी विचारले.

‘काही विशेष नाही. आपले नेहमीप्रमाणेच व्हिजिटचे आणि इ.सी.जी.चे मिळून चारशे सांगा,’ मी म्हणालो.
‘काय म्हणतोस? नेहेमीसारखेच आणि फक्त चारशेच?’ दातार उद्गारले. ‘अरे, आजच्या तुझ्या कामाचं मोल वेगळं आहे. आज तू वेळेवर आलास, अक्षरशः धावून आलास. आमच्या पेशंटचा जीव वाचवलास. तू माग किंवा नको मागूस. मला त्याचं मोल आहे. मी तुला खास जास्तीचे पैसे देणार आहे, समजलं? मी देणार आहे!’

‘त्याबद्दल मी काय बोलू? ती तुमची मर्जी.’ असं म्हणत मी तिथून बाहेर पडलो. डॉ. दातार अगदी बाहेरच्या दरवाजापर्यंत आलेले दिसले मला सोडायला. दातारांनी माझ्या कामाचं मोल जाणलं, इतकंच नाही तर त्याचा खास मोबदला देण्याची तयारी दाखवली. याहून जास्त मला तरी काय हवं होतं? आणि दातार स्वतः सुद्धा एक महागडे म्हणावेत असेच डॉक्टर होते. त्याकाळीसुद्धा त्यांची ऑपरेशनची फी दहा हजारांवर सहज जात असे. आणि त्यांच्याकडे येणारे पेशंटही बरेचसे धनदांडगे असत. शहराबाहेरचे गावाकडचे असत, पण श्रीमंत असत. अशा संपन्न पेशंटच्या संपन्न डॉक्टरांनी माझे कौतुक केले होते. साहजिकच मी सुखावलो. आनंदावर जणू तरंगतच मी स्कूटर हाकली आणि घरी परतलो.

सुमारे महिन्याभराचा कालावधी लोटला असेल. ठरलेल्या तारखेला दातार हॉस्पिटलचा चेक आला. माझ्या मनात एक अनामिक उत्सुकता होती. किती रक्कम असेल त्या चेकवर? अगदी तातडीने उघडून मी चेक पाहिला. चेकवर रक्कम होती- रु. चारशे वीस फक्त.

मी केलेल्या धावपळीचे तोंडभर कौतुक करून दातारांच्या हिशेबी त्याचे पैशातील रूपांतर फक्त जास्तीच्या वीस रुपयात व्हावे? हे कौतुक होते की थट्टा याचा उलगडा आजवर मला झालेला नाही. असो. वाचलेल्या एका जीवाचे एवढे तरी मोल दातारांना वाटले, हेही काही थोडके नव्हे.

डॉ. संजीव मंगरूळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०

1 comment: