Saturday 19 January 2013

मृत्यू



मृत्यू
अनिल माझा डॉक्टर मित्र होता, माझ्याबरोबर एकाच हॉस्पिटलमध्ये काम करणारा माझा सहकारी होता. त्याच्या भावाच्या हॉस्पिटलमध्ये एका लहान बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि ही घटना त्यांचे एकूणच आयुष्य घडवणारी, बिघडवणारी ठरली. अगदी खरं तर असं का घडलं, त्यात डॉक्टर म्हणून अनिलच्या भावाची काही चूक होती का याची फारशी काहीच कल्पना मला तेव्हा नव्हती, आजही नाही. इतक्या खोलात जाऊन मी त्याची कधी चौकशीही केली नाही. अनिलच्या बोलण्यातून वरवरचं जे काही दिसलं, ऐकू आलं त्याला सहानुभूतीनं मान हलविणं आणि जे काही झालं होतं किंवा होत होतं त्याविषयी दुःख व्यक्त करणं एवढंच काय ते मी करत होतो.

अनिलचा भाऊ एक सर्जन होता. शहराबाहेर थोड्या दूर अंतरावर त्यानं एक स्वतःचं छोटेखानी हॉस्पिटल नव्यानंच चालू केलं होतं. एका नवीन होतकरू डॉक्टरला ज्या अडचणींचा जो काही सामना करावा लागतो तो करत त्याची प्रगती चालू होती. अनिलच्या बोलण्यातून मला वेळोवेळी ती समजत असे. अनिल स्वतः अतिशय सचोटीचा प्रामाणिक गृहस्थ होता, कुणालाही न दुखावणारा, आपल्या मर्यादा ओळखून काम करणारा. त्याचा भाऊ वृत्तीने त्याच्यासारखाच पापभीरू असावा असा आपला माझा अंदाज.  त्याच्या नव्यानेच बहरू पाहणाऱ्या दवाखान्यात ही अशी दुर्दैवी घटना घडावी, हा एक मोठाच आघात होता आणि त्यात विशेष दुःख अशाचं होतं की ते बाळ ज्यांचं होतं ती त्या भागातली एक प्रतिष्ठित असामी होती, त्यांचा तिथे एक सामाजिक दबदबा होता. त्यांचे वृत्तपत्रांशी संबंध होते, राजकारण्यांशी लागेबांधे होते. साहजिकच घटनेचा मोठा क्षोभ झाला. दवाखान्यासमोर निदर्शने, सौम्य बाचाबाची, प्रच्छन्न दमदाटी, पोलिसात तक्रारी, वृत्तपत्रात लेख, शेरेबाजी असा प्रकार सुरु झाला. अनिल काय किंवा त्याचा भाऊ काय असल्या प्रकारांना तोंड देण्याइतके कोडगे, बनेल नव्हते. ह्या असल्या घटनांमुळे ते अगदी हैराण होऊन गेले. रोज दुपारी एकत्र डबा खाण्याच्या निमित्ताने माझी अनिलशी भेट होई. त्या काळात त्याचे एकूण कुटुंब ज्या असह्य ताणात वावरत होते त्याची कल्पना मला त्याच्या त्या वेळच्या बोलण्यातून येई. खेद वाटे. कितीतरी महिने हा प्रकार चालू असावा. दर काही दिवसांनंतर काही ना काही तरी नवनवीन युक्त्या योजून त्यांना संबंधित व्यक्ती भंडावून सोडीत. अशा प्रकारे कुणाला त्रास देण्याचे एक विकृत तंत्रच असावे. ही मंडळी त्या तंत्रात निष्णात असावीत. अगदी रीतसर शास्त्रोक्त असा छळवाद मांडला होता त्यांनी अनिलचा आणि त्याच्या भावाचा.

अशातच एक दिवस ते घडलं. एक रजिस्टर्ड टपाल त्यांच्या घरी आलं. ते टपाल म्हणजे एक लेखी तक्रार होती. मेडिकल कौन्सिलकडे केलेली. वैद्यकीय निष्काळजीपणा, फसवणूक असे विविध आरोप करणारी. स्वतः सर्जन असून आपल्या विषयाशी संबंध नसलेला रुग्ण हॉस्पिटलमधे दाखल करून घेणे, त्याला अत्यावश्यक सेवा पुरविण्यामध्ये कुचराई करणे असे विविध आरोप करणारी ही तक्रार याचिका त्या मंडळींनी मेडिकल कौन्सिलकडे दाखल केली होती. त्याची ती प्रत. ती हातात पडल्यावर पुन्हा एकदा अनिलचे धाबे दणाणले. पुन्हा एकदा पळापळ. इकडच्या तिकडच्या ओळखी काढणे असे प्रकार सुरु झाले. कौन्सिलच्या सदस्यांची एक यादी अनिलने मिळविली. म्हणजे त्यात कोणी परिचित असेल तर ते शोधावे असा हेतू. आपली बाजू आधीच कुणासमोर मांडली तर बरे असा भाबडा आशावाद त्यामागे होता.

आमच्या दुपारच्या डबा खाण्याच्या वेळी हा विषय निघाला. कौन्सिल सदस्यांची यादी त्याने माझ्यासमोर टाकली.

‘पाहा बरं त्यात कुणी तुझ्या माहितीचं, ओळखीचं दिसतंय का ते,’- अनिलच्या स्वरात काळजी होती, उत्कंठा होती.

मेडिकल कौन्सिल सदस्य म्हणजे प्रभावशाली डॉक्टरांचा गट. त्यात आपल्या ओळखीचे कुणी थोडेच असणार, अशा विचारात अगदी तटस्थ भावनेने मी ती यादी चाळत होतो. तर अचानक मला एक नाव दिसले.  डॉ. पोळ. डॉ. अविनाश पोळ. अरे, हे तर माझ्या चांगल्याच परिचयाचे होते. सर्जन  पोळ. शहरात स्वतःचे केवढे तरी मोठे हॉस्पिटल त्यांनी नुक्तेच चालू केले होते. माझ्यापेक्षा वयाने ते बरेच वरिष्ठ होते पण किती तरी वेळा मला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते बोलवीत असत आणि मीही किती तरी वेळा  त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट तपासण्यासाठी जात असे. अगदी नुकतीच कौन्सिल सदस्य म्हणून त्यांची निवड झाल्याचेही मी ऐकले होते. कमाल आहे. इतका ताकदवान डॉक्टर, तोही माझ्या परिचयातला आणि मला त्यांचे नावही आठवू नये. मला माझीच लाज वाटली.

पोळांच्या नावावर मी बोट ठेवले.

‘हे पोळ आपल्या चांगल्या ओळखीचे आहेत. आपण जाऊ शकतो त्यांच्याकडे. नक्कीच भेटतील ते आपल्याला. किती तरी अडचणीतले अवघड पेशंट पाहिलेत मी त्यांच्याकडे. आपला सॉलिड वट आहे हां तिथे!’ मी फुशारकी मारीत म्हणालो.

अनिलच्या अडचणीत आजवर मी निव्वळ कोरडी सहानुभूतीच दाखवत आलो होतो. आता माझा काही ठोस उपयोग होईल असे समाधानही माझ्या मनात होते.

मी तिथूनच तत्काळ पोळांना फोन लावला. कामाचे साधारण स्वरूप सांगितले आणि भेटण्याची वेळ ठरवून टाकली. पोळ जमेल ती मदत करणार हे नक्की होते, त्यांचा फोनवरचा सूरच किती तरी आश्वासक होता. वरिष्ठ असले तरी त्यांचा स्वभाव थट्टेखोर, आपुलकीने वागण्याचा असे. बोलण्यात ओलावा असा की अगदी जन्मोजन्मीचा परिचय आहे असे वाटावे.

‘येस सर, या ना, आम्ही हजर आहोत आपल्या सेवेसाठी!’ हे ‘सर’ हे संबोधन मला उद्देशून बर का!

‘आता तुमचे दोस्त म्हणजे आमचे दोस्तच नाहीत का? त्यांना नाही मदत करायची तर कुणाला?’

‘छे, छे, तुम्ही काय मला सांगता, ते प्रामाणिक आहेत म्हणून, अहो तुमचे दोस्त आहेत यातच नाही का आलं सगळं? नाही नाही, या ना या तुम्ही, त्यांना घेऊन या. आपण बघून टाकू काय करायचं ते.’

असे त्यांचे फोनवरचे उद्गार ऐकून भारावलोच मी. काय माणूस आहे. उगाच नाही असे निवडून येत आणि माणसांचा गोतावळा जमवत. मदत करण्याची वृत्ती असणार तेव्हा कुठे जमतं हे सारं.
मी अनिलला सांगितलं सगळं. सगळी कागद्पत्रं घेऊन येतोच म्हणाला तो, ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी. त्याच्या चेहेऱ्यावर केवढं तरी समाधान दिसलं, कृतज्ञता दिसली मला तेव्हा. आशेचा एक किरण, नव्हे मोठा प्रकाशझोतच जणू दिसला त्याला, पोळांच्या रूपात.

तीन मजली चकचकीत पांढरी स्वच्छ इमारत. अगदी वाहत्या हमरस्त्याला लागून. आत वाहन जाण्यासाठी अर्ध चक्राकार सिमेंटचा रस्ता. त्यापलीकडे मोठेसे पोर्च. पूर्ण पारदर्शक काचेचे आपोआप उघडमीट करणारे दरवाजे, गुळगुळीत फरश्यांनी मढवलेल्या पायऱ्या आणि जमिनीवरच्या फरश्या तर अशा चकचकीत की त्यात चेहेरा पाहून घ्यावा. फार जपून पाऊल टाकावे लागते अशा फरशीवर, नाही तर कधी फसगत व्हायची आणि साष्टांग दंडवत घालून फजिती व्हायची सांगता येणार नाही. असा थाट होता पोळांच्या हॉस्पिटलचा. खालच्या दोन मजल्यांवर हॉस्पिटल आणि सगळ्यात वर घर. वेळोवेळी पेशंट तपासायला आल्याने मला तशी सवय होती या झगमगाटाची. किंबहुना हे सगळं जणू मला अगदी नैसर्गिक आणि सुटसुटीत वाटत आहे असे अनिलच्या मनावर ठसविण्याचाच प्रयत्न करीत मी त्या चकचकीत चक्राकार जिन्यावरून वर चढू लागलो. पोळांचे वैभव ही जणू एक सामान्य सवयीची गोष्ट होती माझ्यासाठी असे भासवत आणि अनिल बिचारा गरजवंत. या ऐश्वर्याने दबून हळूहळू पावले टाकत माझ्यामागे जिना चढत वर येत होता. त्याच्या हातात त्याने त्याच्या कागदपत्रांची बॅग अगदी जपून धरली होती.

वर आपल्या तितक्याच अलिशान दिवाणखान्यात बसून डॉ. पोळ आमची वाटच पाहत होते. पूर्ण दोन भिंतीच्या अंगाने पसरलेला गुबगुबीत सोफासेट. त्यासमोर लाकडी कलाकुसरीने मढविलेल्या मेजावर ठेवलेले काचेचे टीपौय. मागे भिंत नव्हेच, पूर्ण रुंदीचे काचेचे दरवाजे आणि ते झाकणारे पूर्ण उंचीचे उच्च दर्जाचे पडदे. वजनदार, गुबगुबीत.

‘या, साहेब, या, या. बसा. आज तुमची भेट म्हणजे अगदी अलभ्य लाभच म्हणायचा! आणि हे कोण- तुमचे दोस्त नाही का?’ पोळ सरांनी हात पुढे करीत अनिलशी हस्तांदोलन केले. हातातली कागद पत्राची बँग इकडे तिकडे करत तिचे काय करावे हे न कळून अनिलने शेवटी अख्खी बँगच हातात धरून तिच्यासकट पोळांच्या हातात हात दिला.

‘बसा सर बसा,  - -अनिता, सर आलेत पहा आपल्याकडे. ‘ यातला सर म्हणजे दस्तूरखुद्द मी आणि अनिता या पोळ सरांच्या सौ होत्या, हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात यावे.

लगबगीने पुढे येत अनिता मॅडमनी आम्हा दोघांना सस्मित नमस्कार केला आणि पुन्हा एकदा बसण्याचा आग्रह केला. पोळ कुटुंबियांच्या आदरातिथ्याने अनिल पार बुजल्यासारखा झाला होता. माझ्याकडे असहायपणे पाहत होता. मी नजरेनेच त्याला बसण्यासाठी खुणावले आणि एकमेकांना जणू धीर देतच आम्ही त्या सोफ्यावर बसलो. बसलो कसले त्या सोफ्यात आम्ही पार हरवलोच. इतका गुबगुबीत होता तो. हे असले उंची सोफे किती सुख देतात माहिती नाही पण त्याहून जास्त ते तुम्हाला तुमच्या क्षुद्रतेची जाणीव करून देतात. पार कणा मोडून जातो त्यात बसून.

आम्ही बसलो तशा स्वतः मॅडम पुढे आल्या हातात पाण्याचे ग्लास असलेले ट्रॆ घेऊन. संकोचून हातात ग्लास घेत मी तो तोंडाला लावला. तोवर हातात रिमोट घेऊन डॉ. पोळ समोरच्या टी. व्ही. च्या चॅऩलशी खेळू लागले. पाण्याचा घोट तोंडाशी गेला न गेला, तोच खालून हॉस्पिटलमधून कुणी मामा धापा टाकत वर आला.

‘सर, खाली एक पेशंट आलाय. दोन बाया आन बाप्ये आहेत त्याच्याबरोबर. डॉक्टरांना भेटायचं म्हणतायत.’ तो म्हणाला.

‘अरे, बाळा, दिसतंय ना, माझ्याकडे पाहुणे आलेत. जरा थांबवून घे त्यांना. येतोच मी’- सर त्या बाळ्याला उद्देशून म्हणाले खरे, पण त्यांची नजर आमच्याकडे होती. ‘काय हा त्रास’ असा आविर्भाव होता तिच्यात.

‘सर, परवा मी म्हटलं तो हा माझा मित्र अनिल,’ मी विषयाला हात घातला.

‘अहो, माहित्येय मला ते, परवाच बोललेलो की आपण त्याविषयी. बघू ना काय ते. आधी चहा तर घ्याल की नाही?’ डॉक्टरांचा प्रेमळ आग्रह. नाही काय म्हणणार.

आमच्या समोर लगबग धावपळ झाली. पांढरी साडी नेसलेल्या एक-दोघी स्त्रिया (एरवी खाली हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करीत असाव्यात अशा दिसणाऱ्या) आणखी एक दोन ट्रॆ घेऊन आल्या, त्यात काही फळे होती. बिस्किटे होती. काजू अक्रोड होते. आता हा एवढा आदरसत्कार कुणाचा आणि कशासाठी आम्हाला उमगेना.

संकोचाने त्यातली काही फळे तोंडात टाकत मी विषय सुरु होण्याची वाटच पाहत होतो तोच पोळ सर म्हणाले-‘ हल्ली फार अवघड होऊन बसलंय बघा. ही प्रँक्टिस म्हणजे अगदी तारेवरची कसरत झालीय बघा. डॉक्टरला काही त्याचे म्हणून हक्क आहेत, त्याचं असं काही आयुष्य आहे असं वाटेनाच झालंय बघा लोकांना. – डॉक्टर, तुम्ही घ्या ना, डिश रिकामीच दिसते तुमची. घ्या हो डॉक्टर घ्या तुम्हीही घ्या. इथे संकोच वगैरे नाही ठेवायचा हां!’ संभाषणाचा उत्तरार्ध आम्हा दोघांना उद्देशून होता.

डॉक्टरांचा आग्रह मोडवेना. खाण्याची मनःस्थिती तर ना माझी होती ना अनिलची. तरीही फळाची आणखी एक फोड आम्ही तोंडात टाकली. डॉक्टरांनाही हवा तो चॅनेल बहुधा मिळाला म्हणून तेही थोडे टी. व्ही. त स्थिरावले, शांत झाले, तोच मगाचाच हॉस्पिटलमधला मामा धापा टाकीत वर आला.

‘सर, ते पेशंट बरोबर आलेले नातलग त्रास द्याया लागलेत. लगीचच्या लगीच डॉक्टर हवा म्हणत्यात.’

‘अरे राजा, दिसतंय ना रे तुला. मी इथे कामात आहे. पाहुणे आलेत ना इथे. जरा थांबव त्यांना. इतकं कसं रे जमेना तुला राजा. किती दिवस झाले इथे लागून, आं? आज रविवार आहे म्हणावं. डॉक्टर उशिरा येतात, काय?’ डॉक्टर पोळ हे बोलले त्याला उद्देशून पण नजर पुन्हा एकदा आमच्यावर मिश्किलपणे रोखून ठेवत. ‘हे असं असतं पहा. डॉक्टर म्हणजे जसा यांचा नोकरच, त्याला ना काही सुट्टी, ना काही विश्रांती. मघा मी म्हटलं नाही तुम्हाला? तेच हे.’

डॉ. पोळ जे काही बोलले त्याला मी संमतीदर्शक मान हलविली. अनिलनेही हलविली. पोळ खुश झाले. फळाची एक फोड तोंडात टाकत म्हणाले, ‘तुमच्या केसचे डीटेल सगळे एकदा बघू. माझं काये, मी आता नुकताच कौन्सिलवर आलोय. थोडा अंदाज घेतोय. मग बघू, काय?’

‘केसचे डीटेल’ म्हटल्याबरोबर अनिल एकदम जागा झाला. हातातली बॅग उघडू लागला. पोळ सरांनी त्याला खुणेनेच थांबविले. ‘नंतर भेटूच ना आपण, जरा सविस्तरपणे.’ चाचपडतच अनिलने त्याची बॅग पुन्हा खाली ठेवली.

तोवर टी व्ही वर पुन्हा काही तरी खास सुरु झाले असावे. पोळ पुन्हा टी व्ही च्या अधीन झाले. आम्ही दोघेही तसेच निरुद्देश बसलेले. एकमेकांचा अंदाज घेत.

किती काळ गेला माहीत नाही. हॉस्पिटलच्या जिन्यावरून पुन्हा कुणी तरी आल्याचा आवाज आला. आता तो मामा नव्हता, एक सिस्टर होती.

‘सर, खाली एक केस आल्ये. सिरिअस वाटते. यंग मुलगा आहे. बेशुद्ध असावा. काही चांगला रिस्पॉंन्स वगैरे नाही देत्ये. आणि त्याचे रिलेटीव तर फारच दंगा करून राहिल्येत. पलीकडच्या झोपडपट्टीतले दिसतात सर.’ तिने जास्तीची आणि तिच्या मते महत्त्वाची माहिती दिली.

डॉ. पोळ आता मात्र खवळले. ते ताडकन उठले. सिस्टरकडे पाहत म्हणाले, ‘सिरिअस आहे म्हणजे मेलेला तर नाही ना, सिस्टर? नाकावर सूत धरलं का? हलतंय का सूत, हलतंय? ते तरी पाहिलं का? की आले नुसतेच सांगत, सिरिअस आहे, सिरिअस आहे म्हणून? जा जरा नीट पहा. येतात म्हणावं डॉक्टर.’

सिस्टर बिचकली. काही क्षण अनिश्चित तिथेच रेंगाळली आणि सावकाश जिन्याने उतरत खाली गेली. डॉ पोळांचा हा अवतार मला नवीन होता. आपल्यामुळेच जणू हा प्रसंग निर्माण झाला अशा भावनेने अनिलही उदास झाला. माझ्याकडे कुचंबून पाहू लागला. ‘चला, आता निघू या परत’ असे आर्जव आता त्याच्या नजरेत मला दिसू लागले.

पण तसे काही विशेष घडलेच नव्हते जणू. सिस्टर जिना उतरू लागली मात्र, पोळ सर मागे वळून आमच्याकडे पाहू लागले. तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावरून पुन्हा तेच मिश्किल हसू ओसंडून वाहात होते. ‘अरे, तुम्ही का उठलात? बसा ना बसा. हे आपलं नेहमीचंच आहे. अहो, यांना कितीही शिकवा. पण उपयोग शून्य! सगळे नुसते माठ लेकाचे. – ते असू दे. तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी?’ पोळांनी विचारले.

हे मात्र फारच झालं. खाली तगादा लावणारा तो कुणी पेशंट डॉक्टरांची वाट पाहत असलेला आणि वर हे असं कॉफीपान- माझाच जीव टांगणीला लागल्यासारखा झाला. पण पोळांसमोर आमचं काही चालू शकणार नव्हतं. मुकाट्याने बसून आम्ही कॉफीचा आस्वाद घेतला. कॉफी इतकी किती कडू जहर असते हे मला त्या दिवशी प्रथमच जाणवलं.

शेवटी एकदाची आम्ही ती कशी बशी घशाखाली ढकलली आणि उठलो, पोळही उठले. जिन्यापर्यंत येत म्हणाले, ‘चला, बघू या, कोण आहे तो सिरिअस पेशंट.’ ‘सिरिअस’ हा शब्द त्यांनी अशा काही आविर्भावाने उच्चारला की त्यांच्या अभिनय कौशल्याला दाद द्यावी!

चक्राकार चमकदार जिन्यावरून आपला तोल सांभाळत आम्ही खाली उतरलो.

पोळ सर आल्याचे जसे दिसले तशी खाली धावपळ सुरु झाली. एक-दोन सिस्टर, मघाचा तो मामा सगळे पुढे आले. आत्मविश्वासाने सफाईदार पावले पुढे टाकीत पोळ पुढे चाललेले आणि मागून आम्ही, उगीचच नजरा चुकवीत सगळ्यांच्या.

दवाखान्यात गेलो तर बेडवर तो पेशंट पडलेला दिसला. तापाने फणफणलेला असावा बहुधा. खूप अशक्त झालेला. बेहोष होता की काय असे वाटणारा. डॉ. पोळ हसत हसत पुढे गेले, ‘काय रे काय होतंय तुला?’  असे त्याला विचारत. पुढचा संवाद मी ऐकला नाही कारण एव्हाना माझा वेग मंदावला होता. आम्ही दोघेही मागे राहिलो होतो. नातलगांशी काही तरी गोड बोलून पोळ सर पुन्हा वळून मागे आमच्याकडे आले.

Look, Doc, Here is a case for you.  अरे, सर हा तर तुमचाच पेशंट आहे. घ्या पाहून. Think of a physician and there he is!’  खो-खो हसत पोळ हे म्हणाले, तेव्हा हसून हसून त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलेलं होतं.

मी चमकलोच. हा पेशंट? आणि मी बघायचा? का? कशासाठी?

निर्धाराचे असे फार थोडेच क्षण माझ्या आयुष्यात आले असावेत, त्यातला तो एक होता. अचानकच माझा निर्धार झाला.

‘नको, सर, असू दे, आज नको. हा पेशंट नको सर, नंतर येईन मी एकदा, कधीही, तुम्ही बोलवाल तेव्हा, पण हा नको, सर, हा नको.’ असं काही तरी बोलत मी दूर सरकू लागलो. डॉ. पोळ चकितच झाले, पेशंट पहायला मी नाही म्हणतोय ही कल्पना काही त्यांना मानवेना. एरवी बोलावणं येताच जणू पळत येणारा मी, आज हे असे काय वागतोय हे समजणे त्यांना अवघड जात होते.

‘असं काय करता सर, तुमचाच पेशंट आहे, टाका की बघून.’ पोळ हसत हसत माझ्याकडे बघत म्हणाले. ‘सिस्टर डॉक्टरांना काय पाहिजे ती मदत द्या’ असे परस्पर फर्मान सोडून डॉक्टर बाहेर जाऊ लागले, पण मी कसचा ऐकतो. जास्त न बोलता मी थेट हॉस्पिटलचा दरवाजा गाठला. मागे वळूनही मी पाहिले नाही तरी माझ्या मागून येणाऱ्या अनिलची चाल मला जाणवली. पोळ सरांच्या चेहेऱ्यावर उभं राहिलेलं प्रश्नचिन्ह मला जाणवलं पण त्यातल्या कशालाही जरासुद्धा प्रतिसाद न देता मी पुढे चालत राहिलो आणि थेट हॉस्पिटलबाहेर पडलो.

बाहेर पडलो. हवेच्या गारव्याने थोडा सुखावलो. जे घडले त्यातले काहीच न कळल्याने गोंधळलेला अनिल मागे मागे येत होता. ‘काय, राव, असा काय निघून आलास तू? म्हणत होते एवढं, तर पाहून टाकायची ना ती केस. एवढा कसला माज आला होता तुला?’

बिचारा अनिल, केवढ्या आशेनं आला होता माझ्याबरोबर आणि मीच त्याचं काम असं बिघडवून टाकावं? त्याची नाराजी मला समजली पण माझाही नाईलाज होता.

मी त्याला म्हणालो, ‘अरे त्यांना जर मला ती केस दाखवायचीच होती तर आधीच नाही का दाखवायची? जेव्हा आपण वर बसून तो पाहुणचार झोडत होतो. आता एवढा उशीर करून झाल्यावर ती केस माझी म्हणून मी ती बघायची, म्हणजे झाल्या उशिराला मीच जबाबदार ठरतो ना त्या नातलगांच्या दृष्टीने? आधीच जर सांगितलं असतं तर तेव्हाच खाली गेलो असतो आणि पाहिली असती ती केस. कमीत कमी नंतरची ती कॉफी तरी गोड लागली असती ना! अनिल, अरे एक गुन्हा तुझ्या भावाने केलाच नाही हे सिद्ध करावे म्हणून आपण त्यांची मदत मागायला आलो, तर हे डॉ. पोळच आपल्यासमोर स्वतः तो गुन्हा आपल्यालाच करून दाखवत होते असं नाही तुला वाटत? आपण कसे बिनधास्त आहोत याचं कसलं विकृत प्रदर्शन मांडलं होतं त्यांनी आपल्यासमोर. वैताग नाही आला तुला?’

मी उद्वेगाने जे हे म्हणालो ते अनिलला समजलेही असावे कदाचित. पण ‘आता माझ्या त्या कामाचे काय’ असा प्रश्न निश्चितच त्याच्यासमोर उभा राहिल्याचे मला त्याच्या नजरेत दिसले. माझा नाईलाज होता. अनिलच्या कामात माझा हातभार लागण्याचा योग नसावा बहुधा.

अनिलच्या कामाचे नंतर काय झाले हे मला समजले नाही. कारण मी ती नोकरी सोडून नंतर लगेचच बाहेर पडलो आणि त्या नंतर माझी त्याच्याशी भेट नाही.

अनिलच्या भावाच्या हॉस्पिटलमधे एका बाळाचा जो मृत्यू झाला तो त्याचा एकट्याचा नव्हता, डॉ. पोळ यांनी त्या प्रकरणाचा न्याय करायला बसणे म्हणजे त्या संपूर्ण न्यायप्रक्रियेचाच जणू तो मृत्यू होता असे मला वाटले.

डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०




1 comment:

  1. मनाला भिडलं.... माणसाचा विवेक हरवत चाललाय समाजात; असं दर पावलाला जाणवतं. आपल्यासारखी सजग, सहृदय व्यक्ती पाहून हरवलेला विश्वास पुन्हा सापडतो. धन्यवाद __/\__

    ReplyDelete