Saturday 5 January 2013

पंक्चर





पंक्चर
दुपारचे बारा वाजले असतील नसतील, अशी वेळ. आज कधी नव्हे तो जरा लवकरच दवाखान्याचे सकाळचे काम आटोपले. चक्क अख्खी दुपार आज रिकामी मिळणार अशा आनंदात मी दवाखान्यातून उतरून रस्त्यावर आलो. सकाळच्या वेळेचं एक बरं असतं, गाडी लावायला अगदी खालीच रस्त्यावर जागा मिळते. काम झाल्यावर गाडी काढायला एकदम सोपं पडतं. अगदी रस्तासुद्धा ओलांडायला नको, नुसतं उतरलं की  आलीच गाडी. अगदी थेट आपलीच गाडी! काय मजा!

(कुणी म्हणेल, यात कसली आलीये मजा? गाडी खाली लावली यात कसली आलीये मजा? पण हे असं इतकं सोपं नाही. कारण आज परिस्थिती अशी आहे, की एक वेळ गाडी मिळवणं सोपं आहे, पण ती गाडी रस्त्यावर लावायला एक जागा मिळवणं आणि तीही अशी इतकी जवळच्या जवळ मिळवणं म्हणजे एक दैवदुर्लभ योगायोगच म्हणावा लागेल आणि खरं तर अशा वरकरणी छोट्या वाटणाऱ्या पण तरीही दुर्लभ होऊन बसलेल्या गोष्टींचा आनंद घेत घेत तर आपण आपलं जीवन आनंदी करतो ना? नाही तर तुम्हा आम्हा सामान्यांना अशा कुठल्या असामान्य आनंदाचा परीसस्पर्श अनुभवायला मिळणार आहे? आहे उत्तर?) 

तर मुद्दा असा की, काम लवकर आटोपल्यावर गाडीही अशी खाली जवळच लावलेली म्हणजे अगदी लवकरच घरी पोचणार आणि अख्खी दुपार आरामात लोळत काढणार अशा समाधानात मी गाडीत बसलो, चावी मारली आणि गाडी चालू करून अलगद रस्त्यावरच्या गर्दीत सोडली. ए सी लावला, गाडीतल्या सी डी प्लेअरवर कुठल्या तरी स्टेशनवर संगीत म्हणून जे काही लागले होते त्याचा आस्वाद घेत चाललो होतो. एवढ्यात आठवण झाली, उद्या बावीस तारीख शुक्रवार, म्हणजे कोल्हापूरला जाण्याचा दिवस. मित्राच्या मुलाचे लग्न होते, मित्र असा जवळचा की जाण्यावाचून पर्यायच नव्हता. आणि जायचे होते माझ्याच गाडीने, म्हणजे घरी जाण्याआधी गाडीची थोडी सेवा, शुश्रूषा करणे गरजेचे होते. हवा भरणे, पेट्रोल भरणे अशी किरकोळ कामे आधीच करून ठेवलेली बरी असतात.

एक चौक ओलांडला की जवळच एक पेट्रोल पंप आहे. तिथे जाऊन किमान हवा तरी आत्ताच भरून घ्यावी, पेट्रोल काय, प्रवासात रस्त्यावर उद्याच भरता येईल, कॉर्पोरेशन हद्दीच्या बाहेर, थोड्या स्वस्त दरात, तेवढीच बचत होईल (पुन्हा एकदा तोच सामान्य आनंद, वर सांगितल्याप्रमाणे!) असा विचार करून गाडी डावीकडच्या पेट्रोल पंपाकडे वळवली. हवा भरण्याच्या मीटरकडे जाऊ लागलो तर तिथे शांतता होती, नेहमीचा हवेवाला दिसेना. गाडीचा वेग कमी करत इकडे तिकडे पाहत होतो, तर पलीकडे झाडाखाली तो बसलेला दिसला, तिथूनच मला पाहून हात हलवत होता, खुणेनेच ‘नाही, नाही’ असे सुचवत होता. या पंपावर हवा बंद आहे आणि जवळपास दुसरा कुठलाच पेट्रोल पंप नाही, म्हणजे थोडी पंचाईतच झाली.

आता लवकर हवा भरायची तर एखाद्या पंक्चरच्या दुकानात जाण्याखेरीज पर्याय नव्हता. एरवी मी सहसा हवा भरायला टायरच्या दुकानात जात नाही, एक तर त्यांच्याकडे अशी मोकळी जागा नसते, म्हणजे कुठे तरी रस्त्यावर मधेच उभे राहून हवा भरायची, रस्त्यावरच्या रहदारीला अडथळा आणायचा आणि सगळ्यांची दूषणे घेत घेत ते काम उरकायचे- हा सगळा प्रकार नकोसा वाटतो, आणि मुख्य म्हणजे तिथे विश्वास नाही वाटत. न जाणो ह्यांचे मीटर किती बरोबर असेल, किती हवा भरली जाईल, काही विश्वास नाही वाटत. पण आज पर्याय नव्हता, अगदी जवळच थोड्या अंतरावर एक टायरवाल्याचे दुकान होते, त्या दिशेने गाडी घेतली.

फुटपाथच्या कडेला टायरचे दुकान आणि त्यात आधीच्याच कुठल्या तरी कामात गर्क असलेला टायरवाला. गाडीचा वेग कमी केला, खिडकीची काच खाली केली, जोरजोराने कर्कश्श हॉर्न वाजवला तेव्हा कुठे टायरवाल्याचे माझ्याकडे लक्ष गेले. माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत हातवारे करत त्याने विचारले, ‘क्या चाहिये जी?’

अरे भाई, जरा हवा चेक करनी थी.’ जरा जोराने ओरडूनच बोललो तेव्हा कुठे त्याच्यापर्यंत ते बहुधा पोचले.

‘ठेहेरो जी, अभी आया,’ अशा अर्थाची खूण करत तो उठला, हातातले टायर बाजूला टाकले. एक सफाईदार पिंक बाजूला टाकत, एका हातात हवेची नळी आणि दुसऱ्या हातात मीटर अशा अवतारात माझ्या गाडीशी पोहोचला. काळाकभिन्न इसम, मळकटपणाची कमाल वाटावा असा फाटका तुटका गणवेश घातलेला, वेडेवाकडे वाढलेले दाढीचे खुंट, तोंडात पानाचा तोबरा भरलेला, बळकट दंड, त्यावर तरारून फुगलेल्या शिरा, नजरेत एक प्रकारची बेफिकिरी, असे वाटावे की हा चिडलाय की काय. खरं तर अशी माणसं पाहिली की एक प्रकारची नकोशी भावना निष्कारण माझ्या मनात येते. असे वाटणे चूक आहे असे समजूनसुद्धा माझा नाईलाज होतो.

एव्हाना माझ्या गाडीने रस्त्यावरची वाहतूक अडवायला सुरुवात केली होती. मी भर रस्त्यावर माझ्या गाडीत हवा भरतोय हे एक दुष्कर्म आहे, हे एक समाज विघातक कृत्य आहे, असे वाटून माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेने पाहणारे इतर वाहनचालक आणि त्यांच्या रागीट नजरा टाळत जणू माझ्याच कामात गर्क असल्याची बतावणी करणारा पण आतून अधीर उतावळा झालेला मी. कधी एकदा हा इसम हवा भरेल आणि मी माझी गाडी काढून रस्ता मोकळा करीन, अशी अपराधी भावना माझ्या मनाला व्यापून होती.

टायरवाला खाली बसला, पहिल्याच टायरला त्याने हवेची नळी लावली, थोडा फार काही तरी ‘फुस्स’ असा आवाज काढला, मीटर जोडले आणि जोरजोराने नकारार्थी मान हलवत पुन्हा एकदा पिंक टाकत तो उद्गारला- ‘इसमे पंक्चर है. पंक्चर निकालना पडेगा. गाडीको साईडमें लो.’

हे म्हणजे अतीच झालं. उद्या गावाला जायचं म्हणून मी सहज गाडीत हवा भरायला आलेलो आणि हा पठ्ठा म्हणतो, पंक्चर है. मी खाली चाकाकडे पाहिलं, अगदी रोखून पाहिलं, एखाद्या अवघड पेशंटकडे ज्या चिकित्सक नजरेने मी पाहिलं असतं त्या चिकित्सक नजरेने पाहिलं. टायर तर अगदी चांगलं, गोल गरगरीत दिसत होतं, पंक्चर झालेलं चाक कसं चपटं दिसायला हवं, तसं काही दिसत नव्हतं. हा लेकाचा मला गंडवतोय बहुतेक. पैसे काढायला बघतोय फुकटचे. असा विचार करून त्याला काही तरी सुनवावे असा विचार करून मी वर पाहिले, तर हा पठ्ठ्या पार दुकानात पोचलेला. हातात कुठला तरी बळकट पाना घेऊन माझ्यासमोर येत ‘जरा गाडीकी चाभी दो,’ असं म्हणत माझ्याकडे जणू गुर्मीत पाहत असलेला. पंक्चर काढायला कशाला हवी किल्ली, अशी शंका माझ्या मनात येते न येते तोच पुढे येत त्याने माझ्या हातातून ती किल्ली जणू हिसकलीच. गाडीच्या मागे जाऊन तिच्या मागच्या डिकीचा दरवाजा उघडला आणि चाक काढण्याच्या दृष्टीने लागणारी इतर अवजारेही त्याने काढायला सुरुवात केली. त्याच्या कामाचा वेग, झपाटा विलक्षण होता. मला विरोधाची काय किंवा कुठल्याही चौकशीची थोडीसुद्धा संधी तो देत नव्हता.

गाडीच्या चाकापाशी बसून जेव्हा त्याने गाडीचे चाक वर करायला सुरुवात केली, तेव्हा कुठे मला तोंड उघडण्याची एकुलती एक संधी मिळाली.

‘ये टायर जो है, वो ट्यूबलेस है, नयी किसमका, मालूम है ना?’ मी म्हटले. मला शंका होती की हे असले पंक्चर काढायची कुवत तरी आहे की नाही याची. म्हणून हा खोचक प्रश्न मी विचारला.  उत्तरादाखल त्याने एक आणखी मोठी पिंक टायरशेजारीच टाकली. काय समजायचे ते मी समजलो.

‘इसका पंक्चर तो ऐसेही खडे खडे निकलता है. पहले एक दफा ऐसेही किया था. वो चाक नाही निकालना पडता’- मी पुन्हा एक विरोधाचा प्रयत्न केला.

‘नही, इसकू निकालना मंगता है,’ त्याचे त्रोटक उत्तर आणि वर पुन्हा खात्रीची पिंक.
आता माझा नाईलाज होता. जे घडेल पाहणे क्रमप्राप्त होते. एव्हाना त्याने तो भला थोरला पाना चाकाच्या नटभोवती आवळला होतं, कचाकचा लाथा घालून तो सैल केला होता आणि ही कृती सर्व नटांवर करीत करीत काही कळायच्या आत त्याने गाडीचे चाक सोडविलेसुद्धा. त्याचे बलदंड बाहू आणि त्यावर टरारून फुगलेल्या शिरा त्याचे सामर्थ्य दाखवायला पुरेशा होत्या.  

एका झटक्यात त्याने चाक सुटे केले, त्याचे सर्व सुटे भाग बोल्ट एका थाळीत टाकले आणि गरागरा चाक फिरवीत तो आपल्या टपरीकडे निघाला. मी त्याच्या मागे मागे, एखाद्या लहान मुलासारखा त्याचा खोळंबा करीत जाणार तोच एका सराईत नजरेने त्याने मागे माझ्याकडे पाहिले, ‘उस थालीपे नजर रखो’ त्याने मला आदेश दिला. मी उलट फिरलो, ती थाळी गाडीच्या खाली सारली आणि थोडंसं पळतच त्याच्या मागोमाग त्याच्या टपरीत गेलो. उगाच नसलेले पंक्चर हा काढेल आणि पैसे उकळेल, त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे असा सुज्ञ विचार त्यामागे होता.

गाडीचे चाक असे बाहेर काढले की फारच मोठे थोरले वाटते. ते तो अगदी लीलया हाताळीत होता. एका ठिकाणी सहज स्पर्श केला, काही तरी टणक लागले म्हणून त्याने ते टोकरले तर तो छोटा खिळा निघाला, पकडीने त्याने तो उचकला, फुस्स आवाज करत हवा बाहेर आलेली जाणवली, लगेच एक मोठा दाभण तिथे खुपसून त्याने ते पंक्चर बंद केले, माझ्याकडे विजयी मुद्रेने पाहत. मी कौतुकाने त्या खिळ्याकडे पाहत होतो, तोच आधीच्या खिळ्याशेजारी पुन्हा एकदा टोकरल्यासारखे करीत त्याने आणखी एक टणक वस्तू बाहेर काढली आणि मला काही कळायच्या आत पुन्हा एकदा त्या दाभणाने तेही पंक्चर काढले.

‘काफी पुराना पंक्चर है. हवा डाले बगैर वैसेही गाडी चलायी है,’ माझ्याकडे रागाने बघत तो म्हणाला. ते थोडे बरोबरही होते. महिनाभर सहज झाला होता मागे मी हवा भरली होती त्याला. पण दुसरे पंक्चर म्हणून जे त्याने काढले ती हातचलाखी तर नव्हती असा संशय मला आला. पण आता उशीर झाला होता. दोन पंक्चर झाल्याचे मला मान्य करणे भाग होते.

मी असा विचार करेतो त्याने ते टायर अजून थोडे फिरविले, पुन्हा एका ठिकाणी टोकरले आणि पुन्हा एकदा तो दाभण खुपसला. तिसरे पंक्चर. मी अवाक होऊन पाहतो तर त्याने पुन्हा माझ्याकडे मागे वळून पाहत विचारले, ‘वो थाली बोल्टवाली, कहॅा छोड आये? लेके आव.’

अरे बाप रे, गडबडीत ती थाळी रस्त्यावर गाडीखालीच ठेवून मी त्याच्या दुकानात आलो होतो नाही का? ती परत आणणे गरजेचे होते. जवळ जवळ धावत मी परत गाडीकडे गेलो, थाळी उचलली. मनात विचार आला, हा त्याचा डाव तर नाही, मला दूर पाठविण्याचा. आता मी परत जाईपर्यंत हा आणखी किती पंक्चर काढून दाखवतो, देव जाणे. या विचाराने अस्वस्थ मी, अगदी धावतच परत त्याच्या टपरीत पोहोचलो, तर तो पर्यंत त्याने आणखीही काही पंक्चर काढल्याचे त्याच्या आविर्भावावरून मला स्पष्ट दिसले.

आता त्याचेही हात सरावल्यासारखे एका मागून एक पंक्चर काढत होते, दाभण खुपसत होते, काढत होते आणि मी एखाद्या अडाण्यासारखा ते पाहत उभा होतो. एक प्रकारची बधिरता माझ्या सर्व शरीरभर पसरलेली आणि त्याचे हे पंक्चरकांड अविरत चालू. मला कळेना, हे असे कुठवर चालणार. हा असा सगळे टायर पोखरतो की काय? त्यातून हे पडले नव्या पद्धतीचे ट्यूबलेस टायर, पूर्वीच्या टायरचे एक बरे होते, ट्यूब काढून पाण्यात बुचकळली की कसे झकास हवेचे बुडबुडे येत आणि पंक्चर झाल्याची खात्री पटे. असला काही प्रकार इथे नव्हता. नुसता दाभण खुपसायचा की झाले पंक्चर बंद! आणि ही अशी त्याने काढलेली सगळी पंक्चर खरी की हातचलाखी केवळ, हेही समजेना. बरे हे असे पूर्ण पोखरलेले टायर आता कितपत काम देऊ शकेल असाही विचार माझ्या मनात होता. पण माझ्या कुठल्याच प्रश्नावर पिंक टाकण्याखेरीज त्याच्याजवळ काहीच उत्तर नव्हते. अखेर एकदाचे ते टायर पूर्ण फिरवून झाले, ठिकठिकाणी टोचून ते अगदी विद्ध झाले. पूर्ण समाधानी असा तो त्यामध्ये हवा भरू लागला तेव्हा कुठे हे पंक्चरकांड संपले असल्याची जाणीव मला झाली. मी सुटकेचा निःश्वास टाकला.

चाकात हवा भरून त्याने माझ्याकडे मागे पाहिले. आणि मागे पाहतच त्याने चाकाच्या व्हाल्व्हला स्पर्श केला, तर पुन्हा एक फुस्स असा आवाज!

‘ये व्हाल्व्हभी गया हुआ दिखता है.’

काहीही कळायच्या आत तो उठला, एक नवीन व्हाल्व्ह आणून त्याने जुन्या व्हाल्व्हच्या भोकात खुपसला. आता बहुतेक त्याचे काम पूर्ण झाले होते. बदलण्याजोगे, नव्याने करण्याजोगे असे त्या चाकात बहुधा काही उरले नसावे. तेव्हा पूर्ण हवा भरून त्याने ते उभे केले, गोलगोल फिरवत पुन्हा एकदा रस्त्यावर, गाडीशेजारी. मागे धावत धावत मी.
गाडीला चाक बसवता बसवता मागे वळूनही न बघता तो म्हणाला, ‘एक हजार एक सौ पचास हो गये इसके.’

‘क्या? कितना?’  माझी बोबडी वळली, काय प्रश्न विचारावा हेही मला न कळेना.

‘टोटल ग्यारह सो पचास हो गये’, तो म्हणाला.

पंक्चरचे अकराशे पन्नास? मला समजायला अवघड असा आकडा होता तो.

‘तो फिर नये टायरकी कीमत क्या होती?’

‘पाच हज्जार,’ त्याचे निर्विकार उत्तर आणि पुन्हा एक दूरवर टाकलेली पिंक. त्यात आता मला तिरस्कार असल्यासारखे वाटले.

त्याचे पैसे दिले. गाडी घेऊन घरी आलो, तेव्हा एक प्रकारची उद्विग्नता माझे मन व्यापून राहिली होती. प्रश्न पैशाचा होताच पण त्याहून जास्त महत्त्वाची होती फसविले गेल्याची भावना. मला जराही विश्वासात न घेता त्याने माझी जी फरफट केली ती भावना जास्त उद्वेगजनक होती. त्याने केलेले काम चोख असेलही कदाचित, पण मला हा विश्वास कसा वाटावा? त्यासाठी त्याने काय प्रयत्न केला होता? सगळा व्यवहार असा की त्यात मला जणू गृहीतच धरल्यासारखे, कुठे माझ्या निवडीला, माझ्या विचाराला वावच नाही.

मधे किती तरी तास गेले, संध्याकाळ गडद होत गेली, तसा मी थोडा शांत झालो. मन शांत झाले. विचारक्षम झाले. एक यःकश्चित टायर ते काय, त्याने माझ्या मनात एवढी अस्वस्थता येते. आज डॉक्टर म्हणून व्यवसाय आम्ही करतो, तेव्हा आमच्या पेशंटची इतकी काळजी आम्ही घेतो? त्यांना विश्वासात घेतो? तिथे त्यांचा अनमोल असा जीव पणाला लागलेला असतो. आर्थिक आव्हानं तर याहून किती तरी मोठी, त्यांच्यासमोर आ वासून उभी असतात. किती गांभीर्यानं, किती सहानुभूतीनं आम्ही त्यांच्या या समस्यांकडेही पाहतो? कुठे कुणाचा पाय तोडायचा असो, कुणाची सर्जरी करायची असो, एखादी महागडी तपासणी करायची असो आणि आणखीही किती तरी प्रकारचे निर्णय! केवढे तरी कठीण असतात हे निर्णय. केवढ्या तरी प्रचंड परस्पर विश्वासाची गरज असते हे निर्णय त्यांच्या गळी उतरवताना. एक डॉक्टर म्हणून किती वेळा आम्ही त्यांच्या या गरजेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करतो? त्यांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा म्हणून किती प्रयत्नशील असतो. आणि किती वेळा आम्ही त्यांच्यावर लादत असलेल्या निर्णयाच्या नैतिक आणि शास्त्रीय योग्यतेविषयी आमची स्वतःची तरी आंतरिक खात्री पटलेली असते? तेवढे नैतिक आत्मबळ आमच्यात असते? 

एकदा तरी शांतपणे विचार करावा अशी गोष्ट ही आहे खरी!

डॉ संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०

2 comments:

  1. ___/\___ सामान्यांना म्हणूनच डॉक्टर देवासारखाच वाटत असतो :-)

    ReplyDelete
  2. ___/\___ सामान्यांना म्हणूनच डॉक्टर देवासारखाच वाटत असतो :-)

    ReplyDelete