Saturday 2 February 2013

खेळ मनाचे




खेळ मनाचे
उषाताईंचा आणि माझा तसा काही फारसा प्रत्यक्ष संबंध आला नव्हता. त्यांचे पती वामनराव हे खरे माझे पेशंट. गेली काही वर्षे अगदी नियमित येणारे. एकुलत्या एक मुलाला भेटायला म्हणून वामनराव सपत्नीक अमेरिकेत गेले तेव्हा तिथेच कधी तरी त्यांनाही नकळत त्यांना हार्ट अॅटॅक आला. कुठल्या तरी कारणाने तपासणी करताना हे तिथे लक्षात आले. मग अशा वेळी जी पंचाईत होते तिचा कटू अनुभव घेऊन वामनराव अक्षरशः पळून भारतात परत आले. पेशंट म्हणून त्यांचा आणि माझा परिचय असा झाला. अर्धवट प्रवास सोडून निघून यावे लागल्याने आलेली एक प्रकारची उदासीनता, त्यातून ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती अशा आजाराचे नव्यानेच मागे लागलेले झंझट आणि त्यातून निर्माण झालेली असुरक्षितपणाची तीव्र जाणीव. एक प्रकारची केविलवाणी भावना भरून राहिली होती दोघांच्याही मनात तेव्हा. भारतात एकदाचे येऊन सुरक्षित पोचलो या आनंदाची एक कोमट किनार एवढीच काय ती जमेची बाजू होती त्यांच्या दुःखी जीवनाला. त्या पहिल्या भेटीत त्यांना माझ्या रूपाने ‘आपलं माणूस’ भेटलं, जणू माहेरचं माणूस. अशा वेळी डॉक्टर म्हणजे एक आपला खराखुरा सहचर वाटतो. तसा मी त्यांना भावलो. आमची तारच जुळली. वामनराव माझे अगदी घट्ट पेशंट झाले. नियमितपणे येणारे. गप्पा मारणारे. उषाताई नेहमी त्यांच्या बरोबर असत, आमच्या संवादात सहभाग घेत. माझ्याकरवी वामनरावांना सूचना देत, त्यांना वळण लावायचा प्रयत्न करीत.

‘’त्यांना जरा सांगा. अगदी एवढं पहाटे पहाटे उठून फिरायला जाण्याची काय गरज आहे? काय थंडी असते हो सकाळच्याला. उगा काही तरी नसतं आजारपण उपटलं म्हणजे? हे काय वय आहे का असं अवेळी फिरण्याचं? मी म्हणते, थोडं उशिरानं निघायचं, थोडी उन्हं वर आली की निघावं ना. तुम्हीच सांगा म्हणजे पटेल त्यांना.”

‘अहो, परवा तर कमालच केली ह्यांनी. चक्क खुर्चीवर उभे राहून माळ्यावरची कागदपत्रं काढत बसले. आता तुम्हीच सांगा, काय नड पडली होती यांना हे असले उद्योग करायची? पाय-बीय घसरला म्हणजे आली का पंचाईत? डॉक्टर, तुम्हीच सांगा, म्हणजे ऐकतील ते!”

हे असले प्रेमळ संवाद. मी ते ऐकावे, त्यावर कौतुकानं हसावं आणि सोडून द्यावं एवढयानंसुद्धा उषाताईंचं समाधान होई. खरं तर या सूचना म्हणजे काही वैद्यकीय सल्ले नसत. त्या असत केवळ प्रेमळ सूचना. नवऱ्यावरचा प्रेमळ हक्क सिद्ध करणाऱ्या सूचना. त्यातून त्यांच्या परस्पर प्रेमाची ऊब माझ्यापर्यंत पोहोचे. कुठे तरी दुरून मीही त्यांच्या प्रेमळ कुटुंबाचा एक घटक बनून गेलो आहे, अशी सुखकारक भावनाही मला होई. एकूण काय तर वामनरावांचं आणि माझं असं अगदी घरगुती नातं निर्माण झालं होतं.

त्या दिवशी वामनराव आले तेव्हा हसत प्रथमच म्हणाले, ‘डॉक्टर, आज पेशंट मी नाही. नवीन पेशंट आणलाय तुमच्याकडे. जरा हिला तपासा. पेशंट आज ही आहे. हिला तपासा. काय काय बऱ्याच तक्रारी आहेत हिच्या. आजवर कधी डॉक्टर लागलाच नाही. कुठली तपासणीपण नाही झालेली तिची. जरा बघा तरी काय होतंय तिला ते.’ असे म्हणून त्यांनी उषाताईंकडे अंगुलीनिर्देश केला.

प्रश्नार्थक नजरेने मी उषाताईंकडे पाहिले. चेहरा पार उतरलेला. विस्कटलेले केस. नेहमीचा नेटकेपणा पार हरवलेला. अशा विमनस्क अवस्थेत होत्या उषाताई तेव्हा. एकदम दुःखमग्न. सगळ्या हालचाली मंद झालेल्या. एक पुसटसा कंप सुटला होता त्यांच्या शरीराला.

‘डॉक्टर, सकाळपासून छातीत धडधडतंय. काही कळत नाही काय होतंय ते. डोकं नुसतं जड झालंय. पोटात कसंसंच होतंय. डावा हात जड झालाय.’ बारीक आवाजात उषाताई बोलत होत्या. त्या बोलत होत्या खरं, पण कुठल्याही क्षणी रडतील की काय अशी भीती वाटावी अशी परिस्थिती होती.

त्यांना तपासणीसाठी बेडवर घेतलं. तसा कुठलाच खास आजार दिसत नव्हता. एक प्रकारची अदृश्य, अनामिक भीती त्यांचं मन व्यापून होती जणू. रक्तदाब मात्र बऱ्यापैकी वाढलेला, एवढाच काय तो दोष. बाकी सर्व ठीक होतं. इ.सी.जी. सुद्धा तसा निर्दोष होता पण हृदयावर किचित सूज होती. ब्लड प्रेशरमुळे सुद्धा कदाचित अशी सूज येऊ शकते.

‘काळजीचं काही कारण नाही. तुम्ही उगाच घाबरलेल्या दिसता. थोडं ब्लड प्रेशर वाढलंय, बघू यात, थोड्या तपासण्या करू. तूर्त धोका नको म्हणून मी ब्लड प्रेशरची पण एक गोळी देतोय, बघू या, ती पुढे चालू ठेवायची की बंद करायची ते.’

‘अगो बाई, ब्लड प्रेशर? उषाताई जवळपास ओरडतच म्हणाल्या. विजेचा झटकाच बसला जणू त्यांना. 
‘डॉक्टर, पण मला कधीच काही त्रास नव्हता हो पूर्वी. हे एकदम असं ब्लड प्रेशर कसं काय निघालं हो?’ त्या घाम पुसत म्हणाल्या. त्यांच्या हाताचा कंप आता वाढला होता. त्या कमालीच्या खचल्यासारख्या झाल्या होत्या.

‘अहो, ब्लड प्रेशर झालं असेलंच असं नाही. नंतर होईलही ते नॉर्मल एखाद्या वेळी. आपण बघू ना काय होतं ते. या निमित्तानं काही तपासण्या होतील. तुमच्या तब्येतीचा अंदाज येईल. आणि असेल ब्लड प्रेशर तरी त्यात घाबरण्यासारखं काय आहे? तो काही गंभीर आजार नाही. काही गोळ्या लागल्या तर लागतील इतकंच. तुम्ही फक्त शांत राहा. घाबरू नका.’ माझ्या मते मी त्यांना दिलासा देत म्हणालो.

पण उषाताई त्रस्त होत्या. माझा दिलासा नुसता त्यांच्या कानापर्यंत पोचला. मनापर्यंत नाही. औषधांचा कागद अगदी नाराजीनेच हातात घेऊन त्या दवाखान्याबाहेर पडल्या. मला खात्री होती. उषाताईंना काही खास आजार असणार नव्हता. त्या भयग्रस्त झाल्या होत्या. काळ हेच त्यावरचं औषध असणार होतं. तपासण्या होतील. पुढच्या भेटीला त्या येतील तेव्हा पुन्हा पूर्वीसारख्या आनंदात येतील, वामनरावांच्या लाडिक तक्रारी सांगतील. मला खात्री होती.

पण माझा अंदाज चुकला. दुसऱ्याच दिवशी उषाताई पुन्हा दवाखान्यात आल्या. तीच ती अस्वस्थता. कदाचित थोडी जास्तच, कालच्यापेक्षा. तोच तो कंप. उतरलेला, विस्कटलेला चेहरा. मूर्तिमंत भीती.
‘अजिबात बरं नाही हो डॉक्टर. रात्रभर बघा, डोळ्याला डोळा नाही लागला. आणि तुमचं ते बी. पी. चं काय ते औषध -, भलताच त्रास झाला हो मला त्याचा. डोकं पार जडशीळ होऊन बसलंय. नाही हो झेपत, ती प्रेशरची गोळी मला. सवयच नाही कुठल्या गोळ्या घेण्याची. ती एक गोळी काय घेतली आणि माझी तब्येतच बिघडली पहा. दुसरी कुठली तरी नाही का चालणार गोळी मला? ही नको. भारी त्रास झाला बाई मला तिचा.’

सगळ्या आजाराचं खापर उषाताईंनी त्या गोळीवरच ठेवलं होतं जणू. इतकं की, ती गोळी घेण्यापूर्वी सगळं काही अगदी आलबेल होतं असं वाटावं.

‘अहो, तुम्हाला होतोय, तो त्रास गोळीचा नाही, तो तुमच्या आजाराचाच भाग आहे. ती गोळी अगदीच किरकोळ आहे. अक्षरशः लाखो लोकांनी यापूर्वी खाल्लेली. तिनं असं काही होणार नाही. तुम्ही बिनघोर ती गोळी घ्या, विश्वास ठेवा, तुम्हाला बरं वाटेल.’ मी समजावण्याचा प्रयत्न केला खरा. पण उषाताई पटवून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. अगदी नाईलाजाने मला दुखवू नये म्हणूनच जणू ‘मी गोळी घेऊन पाहीन’ असे आश्वासन मला देऊन त्या गेल्या.

कशीबशी संध्याकाळ उजाडली तोच उषाताईंचा पुन्हा फोन आला.

‘डॉक्टर, तुम्ही म्हणाला म्हणून ती गोळी घेतली बघा. पण नाही हो, भलताच त्रास होतोय. सगळ्या अंगभर नुसत्या मुंग्या आल्यात. आता मी जाते की राहाते कळेना झालंय. जीव नको झालाय मला. मी म्हणते माझी गोळी बदला. नको बाई ती गोळी मला.’

एव्हाना मीही थोडा वैतागलोच होतो. ह्यांना काही समजवावे तर माझाच वेळ जाणार. नसता वितंडवाद. माझ्यासमोर दवाखान्यात पेशंटची ही गर्दी झालेली. विषय मिटवावा म्हणून मी त्यांना दुसऱ्या एका गोळीचे नाव सांगितले. उद्यापासून आता ही गोळी घ्या असा सल्ला देऊन एकदाचा फोन खाली ठेवला. एका अर्थाने हा माझा पराभवच झाला होता. माझ्या स्वभावाप्रमाणे मी त्यांना समजवायला हवे होते. ते न करता, त्यांच्या गैरसमजापुढे मी जणू मान तुकविली होती. त्यांच्या गैरसमजाला बळ दिले होते. एक डॉक्टर म्हणून हे वागणे चूक होते. पण माझा नाईलाज होता. एका पेशंटसाठी याहून जास्त वेळ देणे मला शक्य नव्हते. उषाताईंचा विषय मी मनातून झटकला आणि कामाला लागलो.

कसाबसा तो दिवस उलटला असेल तोच दुसऱ्या दिवशी वामनराव एकटेच दवाखान्यात येऊन हजर झाले. चेहरा गंभीर. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच. आता काय नवीन ऐकायला मिळणार अशी भीती. उषाताईंचा आजार हा जणू माझाच गुन्हा आहे असे आता मला वाटू लागले होते.
‘डॉक्टर, अजून काही हिची तब्बेत बरी नाही. तुमची ती दुसरी गोळी- तीसुद्धा नाही झेपत हो तिला. अगदीच गळून गेलीय. कालपासून दिवसभर नुसती तिची उलघाल चाललीये, कॉटवरून खालीसुद्धा उतरत नाहीये. रडतीये सारखी. बघवत नाही तिची ही अवस्था. तिला ना ती अॅलोपथीची औषधं घ्यायची सवयच नाही कधी. उष्णता होते अंगात तिच्या. काही आयुर्वेदिक औषध असेल तर-‘
आता मात्र हद्द झाली होती. काय हा उतावीळपणा. इतका कसा दम निघत नाही यांना. उषाताईंना ब्लड प्रेशर असेल किंवा नसेल, ते पुढे कालांतराने स्पष्ट होईलही पण सध्या तरी त्या मनोरुग्ण झाल्या होत्या याविषयी आता माझी खात्रीच झाली होती त्यामुळेच आपल्या सगळ्या आजाराचा दोष त्या औषधांना देऊ लागल्या होत्या आणि यात त्यांना समजावणे तर दूरच, खुद्द वामनरावही त्यांना सामील झाले होते.

यावर आता मी काय करू शकत होतो. एक डॉक्टर म्हणून मी देत असलेल्या उपचारांवर, औषधांवर माझी निष्ठा होती. त्यांचा हा असा अकारण होणारा पराभव एका परीने मलाच झोंबला. आता पुन्हा औषध बदलणे म्हणजे पुन्हा एकदा उषाताईंच्या चुकीच्या आरोपांसमोर मान तुकविण्यासारखे होणार. बरं अशी एका पाठोपाठ एक औषधे बाद करून बदलावीत तर अशी फार काही औषधेही नसतात रक्तदाबासाठी. मग यांना द्यावे तरी काय. आता खंबीर होणे गरजेचे आहे, उषाताईच्या गैरसमजाचा खंबीर प्रतिवाद करणे गरजेचे आहे. औषधे देणे म्हणजे काही कुणाचे चोचले पुरविणे नव्हे. असे बंडखोर विचार आता माझ्या मनात येऊ लागले.

‘वामनराव, उषाताईंचा सध्याचा आजार मानसिक आहे. त्यांची लक्षणे पूर्णपणे मानसिक आहेत. ती ना त्यांच्या ब्लड प्रेशरमुळे आहेत ना औषधामुळे. आपण असं करू यात, तूर्त त्यांची सगळीच औषधे थांबवू. एवीतेवी सगळा त्रास गोळयांचाच आहे अशी त्यांची समजूत आहे, तर थांबवू या आपण त्या गोळ्या काही दिवसांसाठी. कालांतराने त्यांचं मनही स्थिर होईल मग शांतपणे निर्णय घेऊ तोपर्यंत पाहिजे तर त्यांचं मन शांत राहील अशा काही गोळ्या मी देतो.’ मी म्हणालो.

‘पण तिचं ब्लड प्रेशर? ते वाढेल त्याचं काय?’ वामनराव म्हणाले.

‘अहो, ब्लड प्रेशर म्हणजे काही भयानक इमर्जन्सी नाही. थोडं थांबल्याने त्याला काही धोका होत नाही. तुम्ही निवांत घरी जा. वहिनींना सांगा. जरा दमानं घ्या म्हणावं. नंतर काय ते ठरवू.’ मी म्हणालो. औषध बंद केल्याने उषाताईच्या आजाराचे तात्कालिक उच्चाटन तरी नक्कीच होईल अशा समाधानात मी होतो. थंड डोक्याने मी माझे पुढचे पेशंट पाहत राहिलो.
अर्धा एक ताससुद्धा गेला असेल नसेल. दवाखान्याचा फोन खणखणला.

‘डॉक्टर?’ पलीकडून कुणी तरुणी विचारणा करीत होती.

‘येस, मी स्वतः डॉक्टरच बोलतोय,’ मी म्हणालो.

‘मॉर्निंग सर, मी डॉ. थिटे बोलतीये, ओळखलं का? मी तुमची विद्यार्थिनी आहे जुनी.’ कोण ही थिटे? मला तर जाम आठवेना.

‘येस?’ –मी.

‘सॉरी सर, तुम्हाला त्रास देतीये. मघाच तुमच्याकडे त्या उषाताई येऊन गेल्या ना, मावशी आहेत त्या माझ्या. त्यांच्यासाठी फोन केला होता. म्हणजे काये ना, त्यांच्या बी पी च्या गोळ्या थांबवल्यात ना, तर त्या खूप घाबरल्यात त्या थांबविल्यामुळे. काही दुसऱ्या गोळ्या दिल्या तर नाही का चालणार. कायेना, म्हणजे रिस्क नको हो घ्यायला.’

कोण ही थिटे? म्हणे माझी विद्यार्थिनी? तिला एवढे कळू नये? बी पी च्या गोळ्या काही दिवस नंतर घेतल्या तर काही बिघडत नाही हेही तिला कळू नये? माझी विद्यार्थिनी असून? मावशीला समजवायचं, धीर द्यायचा तर मलाच औषध बदला म्हणते?

आजचा दिवस बहुधा माझ्या पूर्ण पराभवाचा असणार. मी पूर्ण निरुत्तर झालो. आता एका डॉक्टरला समजावणे भाग होते. तेही करीत राहिलो. माझं बोलणं त्या कुणा थिटे नावाच्या विद्यार्थिनीला कितपत कळलं हे मला कळत नव्हतं तरी मी बोलत गेलो. औषध असे सारखे सारखे बदलू नये म्हणून सांगितलं. वेळ आली तर उषाताईंना मानसोपचार द्यावा हेही सांगितलं. फोनवर पलीकडे अगदी शांतता होती. जणू काळोख. तरी मी तिला समजावत राहिलो. नवीन औषध द्यायला मात्र मी पूर्ण नकार दिला. फार गमतीदार परिस्थिती निर्माण झाली होती, औषध द्यावे तरी त्रास, न द्यावे तरी त्रास! आपल्याच समजुतीच्या वेटोळ्यात अडकलेली मनं, अंधारलेली. कुणीच तयार नाही कवाड उघडायला. पेशंटला आधार द्यावा तर इथे सगळेच बुडायला आतुर!

औषध बदलायला मी साफ नकार दिला. त्यांना मी विक्षिप्त वाटलो असणार. आमचा संवाद आटला. नंतर काही उषाताईंचा फोन आला नाही. वामनरावांचाही नाही. मीही सारं विसरलो.

किती तरी महिन्यांनी वामनराव आले, एकटेच. त्यांची तब्येत तपासायला, तेव्हा कुठे मला जुने प्रसंग आठवले. वामनरावांबरोबर उषाताई नव्हत्या हेही जाणवले. मी वामनरावांना तपासलं, औषधं लिहून दिली. अगदी निघता निघता मी त्यांना विचारलं, ‘काय म्हणते वहिनींची तब्येत? नंतर काहीच कळलं नाही.’

वामनरावांनी ओशाळल्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं. म्हणाले, ‘ठीक आहे आता ती. बी पी चं औषध तुम्ही बंद केलंत त्यानं फार नाराज झाली ती तेव्हा. जवळच्या डॉक्टरकडून आणलं शेवटी काही तरी औषध. सध्या बरी आहे.’ असं म्हणून ते बाहेर पडले.

त्यानंतर आज किती तरी वर्षं झाली. वामनराव माझॆ नियमित पेशंट आहेत. पण आताशा ते एकटेच येतात. त्यांच्या बरोबर उषाताई असतात, पण त्या बाहेर थांबतात, आत येत नाहीत. आमच्यात आता एक अबोल दुरावा आहे. त्याला जबाबदार कोण? आणि उषाताई बऱ्या झाल्या म्हणजे तरी नक्की काय झाले? कुठल्या आजारातून त्या बऱ्या झाल्या? आणि त्यांना जो झाला होता तो काही मानसिक आजार होता की हट्टीपणा निव्वळ? आणि तोही त्यांचा की माझा?

सगळं अवघड आहे खरं.

डॉ संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०




1 comment:

  1. आपल्या लेखनातून कळतात ते अनेक प्रकारचे अनुभव..खरच आपल्या पेशाविषयी अनेक गैरसज असतात. पण आपल्या निर्व्याज लेखनातून ते संपतील आणि पुन्हा एकदा नवा आनंद काही होते आहे म्हणून येणा-या प्रत्येकाला होईल.
    आपल्या लेखनाचा एक चाहता.

    ReplyDelete