Saturday 25 May 2013

मातृभक्ती?



मातृभक्ती?
स्वातीचा फोन आला तेव्हा खरं तर मी अगदी पूर्ण गडबडीत होतो. समोर कुठलासा नवीन पेशंट बसलेला. डोक्यात सगळे विचार त्याचे, सुटायला कठीण असं काही तरी कोडं असतं एकेक पेशंट म्हणजे. अशा वेळी शांतपणे विचार करावा म्हटलं तर हे असे फोन मधे मधे येऊन विघ्न आणतात. विचाराची आपली एक काही दिशा असते, ती पार विस्कटून जाते अशा वेळी. थोडासा वैतागूनच मी फोन उचलला. तोही तो फोन स्वातीचा होता म्हणून. कुठला अनामिक फोन असता तर उचलू नये असंच वाटलं असतं मला. 

‘हं, बोल स्वाती,’

‘सर, तुमच्या त्या दिघे पेशंटकडे होम-विझिटसाठी आले होते,’

‘दिघे? कोण ह्या दिघे?’- माझ्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार. कुणाचीही नावं लक्षात ठेवणे, ही माझ्यासाठी एक मोठीच समस्या असते. हे असं एक नाव ऐकलं की एखादं मधमाश्यांचं मोहोळ उठावं तसे निरनिराळे चेहरे उधळल्यासारखे होतात. असंख्य चेहऱ्यांची एक अविरत मालिका. ह्या दिघे की त्या दिघे, हे पवार की ते पवार. हे कुठले जोशी? वगैरे. आधी नाव आठवायचं, मग त्यामागचा चेहरा, मग त्यामागचा आजार मग त्याचे वैद्यकीय संदर्भ, सामाजिक संदर्भ आठवायचे. मग त्यांच्या नव्यानं निर्माण झालेल्या अडचणी समजावून घ्यायच्या आणि त्यावर तत्काळ तोडगा शोधायचा. आणि हे सगळं करायचं तेही एका फोनवर. एक अवघड परीक्षाच असते ही.

‘सर, त्या दिघे आजी नाहीत का, मनोज सोसायटीतल्या? मागे एकदा त्या घरी पडल्या होत्या तेव्हा मला तुम्ही असंच होम-विझिटसाठी पाठवलं होतं, त्यांच्या घरातले सगळेच जण तुमचे खूप जुने पेशंट आहेत. अगदी किरकोळ डायबेटीस आहे त्यांना?’

स्वाती बिचारी मनापासून प्रयत्न करत होती, माझ्याच पेशंटची आठवण मला करून देण्याचा.
गेली साताठ तरी वर्षं स्वाती माझ्याबरोबर आहे. माझ्या सगळ्या पेशंटना गरजेप्रमाणे वेळोवेळी घरी भेट देणे, त्यांची तपासणी करणे, त्यांना लागेल ती वैद्यकीय मदत घरपोच देणे, त्यांच्या आजाराची मला कल्पना देऊन त्यावर माझा सल्ला घेणे आणि तो पेशंटपर्यंत पोचवणे. अतिशय सफाईदारपणे ही कामे ती आजवर करत आलेली आहे. माझ्या किती तरी पेशंटना माझ्यापेक्षा जास्त तीच ओळखते आजकाल. आता हेच पहा, दिघे आजी आजारी पडल्या तर मलाही कळवण्याआधी त्यांनी स्वातीला परस्पर फोन लावला असणार, म्हणून तर ही तिथे पोचली, थेट, होम-विझिटला! 

‘अच्छा, त्या दिघे होय. त्या तर नुकत्याच इथे माझ्याकडे दवाखान्यात येऊन गेल्या होत्या. तेव्हा तर अगदी ठीक होत्या. रूटीन तपासणीसाठी आल्या होत्या. त्यांना कशाला एकदम होम-विझिट?’

‘नाही सर, गेल्या पंधरा दिवसात बरीच खराब झालीये त्यांची तब्येत. ताप येतोय, बराच दमही लागतोय, ब्लडप्रेशरही वाढलंय. खूप पेल वाटतात. कुठून तरी ब्लीडिंग होत असणार बहुतेक. मला तरी असं वाटतंय की परिस्थिती गंभीर होतीये. मी त्यांना सांगितलंय की त्यांनी हॉस्पिटलमध्ये अॅङमिट व्हावं. हा काही घरच्या घरी मिटेल असा प्रॉब्लेम दिसत नाही मला.’

‘ठीक आहे. दे तशी चिट्ठी तू त्यांना आणि व्हा म्हणावं अॅङमिट. मी बघीन त्यांना थोड्या वेळानं हॉस्पिटलमधे जाऊन.’ मी फोन ठेवण्याच्या गडबडीत होतो. समोरचा पेशंट ताटकळत होता. 

‘नाही सर, मी त्यांना सांगितलंय तसं, अॅङमिट व्हा म्हणून, पण मला नाही वाटत त्या अॅङमिट होतील म्हणून. घरच्या घरीच काय होईल तर बघा असा धोशा लावतायत त्या. काय व्हायचं असेल ते घरीच होऊ द्या म्हणे! आणि सर, त्यांच्या घरचेही तसंच म्हणतायत. नाही इच्छा आजींची तर कशाला त्यांना त्रास. असं म्हणतायत तेही. काय करू?’

‘स्वाती, घरच्या घरी काही करता येणार नाही असा हा आजार आहे अशी खात्री आहे ना तुझी?’
‘हो सर, घरी काही शक्य नाही. त्यांना हॉस्पिटलमधेच ठेवायला लागेल, कदाचित आय. सी. यू. सुद्धा लागेल. ही सगळी कल्पना दिलीय मी त्यांना. पण आजींचा अगदीच हट्ट दिसतो, नाहीच होणार म्हणतात मी अॅङमिट. आणि घरचे सगळेसुद्धा नं सर, त्यांनाच साथ देतायत. नकोचे अॅङमिशन त्यांनासुद्धा.’

‘पण याला आपण काय करू शकतो. तू त्यांना अॅङमिशनची चिट्ठी देऊन टाक आणि नीघ तिथून. अॅङमिट व्हायचं की नाही ते ठरवू दे त्यांचं त्यांनाच.’

कधी एकदा हा फोन ठेवतो असं मला झालेलं. समोर बसलेला तो पेशंट. त्याच्या कपाळावर चढत असलेली एक सूक्ष्म आठी. सगळं मला साफ दिसत होतं. 

मी फोन खाली ठेवला आणि त्या समोरच्या पेशंटशी संवाद पुन्हा सुरु केला. पुन्हा एकदा एक नवी समस्या. नवा निर्णय. काही क्षणातच मी पुन्हा एकदा समोरच्या पेशंटमधे गुंतलो. दिघ्यांना जणू साफ विसरून. मनात मला पूर्ण खात्री होती, दिघे आजी अॅङमिट होणार आणि मला त्यांना तपासायला हॉस्पिटलमधे जावं लागणार. 

गेल्या किती तरी वर्षांचा माझा परिचय होता दिघे कुटुंबाशी. अगदी त्यांचे आजोबा होते तेव्हापासून. इतका जुना काळ की तेव्हा अशा होम-विझिट मी स्वतः करीत असे. माझ्या स्कूटरवर जाऊन. काही काही कुटुंबं आरोग्याविषयी अगदी जागरूक असतात. दिघे मंडळी त्यापैकी. अगदी नियमितपणे येणार, भेटणार, तपासून घेणार. तपासण्यांचे रिपोर्ट स्वतः वाचणार, समजावून घेणार. तपासणीचे निष्कर्ष नॉर्मल येणार ही जणू रीत आणि बघून आनंदी होणे हा जणू त्यांचा हक्क. अशी आजवरची परंपरा. म्हणजे तसं म्हटलं तर आजींचं हे पहिलंवहिलं खरंखुरं आजारपण. त्याच्या उपचाराला कोण नाही म्हणेल. मला खात्री होती, दिघ्यांसमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. ‘अॅङमिट व्हा’ म्हटल्यावर ‘नको’ म्हणणे हा पेशंटचा मूलभूत हक्कच असतो, त्याचे पालन आजी करत होत्या. पण यथावकाश अॅङमिशन अटळ होती.  

दिघे आजींना मनातून तूर्त काढून टाकून मी माझ्या कामाला लागलो. 

बरेच दिवस गेले असावेत. दिघ्यांची मला पुन्हा आठवण आली ती स्वातीचा पुन्हा एकदा असाच कासावीस फोन आल्यावर.

‘सर, त्या दिघे आजींकडे आले होते, होम-विझिटला. मधे नाही का मी तुम्हाला फोन लावला होता, आपण त्यांना अॅङमिट व्हायला सांगितलं होतं, आठवतं? 

‘हो, पण त्या- ‘

‘नाही, त्या तेव्हा अॅङमिट झाल्याच नाहीत आणि म्हणूनच मला आज त्यांनी पुन्हा बोलावलं होतं, विझिटला. आज अगदीच गंभीर परिस्थिती दिसतीये सर, बेशुद्ध आहेत, कसातरी श्वास चालू आहे. मी पुन्हा एकदा त्यांना सांगितलंय की प्रकृती गंभीर आहे, अॅङमिट करण्याशिवाय पर्याय नाही. पण तरी ते म्हणतात घरीच करा, काय करायचं ते. आजींची इच्छा नव्हती अॅङमिट होण्याची. आम्हाला अॅङमिशन नको.’

फोन माझ्या हातात तसाच होता, वरच्या वर धरलेला, ताटकळत. आठवणींची चक्र भरारा फिरू लागलेली. किती दिवस झाले असतील, स्वातीचा मागे फोन येऊन गेला त्याला?- दहा? पंधरा? की तीन-चार आठवडे? जाम आठवेना, पण बरेच दिवस झाले होते हे नक्की आणि इतका कसा पुरता विसरलो मी, दिघे आजींना आणि त्यांना आम्ही अॅङमिट व्हायला सांगितलं होतं त्याला? आणि आजींच्या हट्टासाठी दिघे मंडळींनी त्यांना इतके दिवस घरीच ठेवलं होतं, उपचाराशिवाय? तसंच असणार, नाही तर घरी उपचार देणारा दुसरा डॉक्टर मिळाला असता तर आज पुन्हा स्वातीला कशाला फोन केला असता? 

‘बाप रे, मी विसरलोच होतो, आजी अॅङमिट झाल्या नाहीत ते. इतके दिवस केलं काय त्यांनी घरी?’ मी म्हणालो.

‘काही नाही, सर, त्या पडूनच होत्या घरी. आता अगदीच कसं तरी करायला लागल्या म्हणून बोलावलं त्यांनी मला. मी त्यांना पुन्हा सांगतेय तरी अॅङमिट करायला नाहीच म्हणताहेत ते.’

‘ठीक आहे, नसतील करत तर तू किंवा मी काय करू शकतो? पुन्हा एक अॅङमिशनची चिठ्ठी दे आणि नीघ तिथून.’ मी म्हणालो. मी थंडपणाने म्हणालो. थंडपणाने असं मी म्हणतो खरं पण मला माहित नाही मला जी झाली होती ती भावना केवळ थंडपणाची होती की आणखी कशाची होती. त्यात एक उद्वेग होता, निराशा होती. अगतिकता होती. राग होता. दुःखही असावं त्यात. आपला इतकं जुना पेशंट, जणू एक नातं निर्माण झालेला असा पेशंट. किती तरी वर्षं आपल्याकडे नेमाने येत असणारा. त्याच्या एकुलत्या एक आणि कदाचित अखेरच्या आजारपणात अशी अवस्था यावी की आपण काहीच करू शकू नये? अगदी हातावर हात बांधून शांतपणे बघत राहावं? एक, दोन नाही चांगले पंधरा दिवस- तीन आठवडे रेंगाळणारा आजार पण अगदी काहीही तपासण्यासुद्धा न करता मरणाच्या दारापर्यंत जाऊ द्यावा? डॉक्टरचा आपल्या पेशंटवर किती कमी हक्क असतो, हे मला जाणवलं तेव्हा.

मी फोन ठेवला. पण मनात अस्वस्थता होतीच. त्यातून बाहेर पडणे आवश्यक होते. दिघे प्रकरणातून मनाला सोडविणे आवश्यक होते. अलिप्त राहणे आवश्यक होते. समोर दुसरा पेशंट होताच. त्यात मन गुंतवू लागलो. पण आजींचा विचार मनातून जाईना. त्या मरणाच्या दारात आहेत हे मनातून जाईना.
काही वेळ गेला असेल. एक व्यावहारिक शंका माझ्या मनात जागी झाली. दिघे आजी आता जाणार, मग त्यांच्या मृत्यूच्या दाखल्याचे काय? तो कोण देणार? कसा देणार? आणि त्यात आजाराचे निदान तरी काय देणार?

मी तत्काळ फोन उचलला. स्वातीला जोडला.

‘स्वाती, एक अडचण होणारे. आजींच्या मृत्यूनंतर त्यांचा दाखला आपण कसा देणार? त्यात आजाराचं निदान काय टाकणार? मला वाटतं, दिघे मंडळींना ही स्पष्ट कल्पना देणं गरजेचं आहे की अशा परिस्थितीत आजींच्या मृत्यूचा दाखला देणं आपल्याला शक्य होणार नाहीये.’

‘सर, मी आत्ताच त्यांच्या घरून बाहेर पडलीये पण मी परत जाऊन त्यांच्या मुलांशी हे सगळं स्पष्टपणे बोलते. बघू त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी.’

गडबडीनं तिनं फोन ठेवला. मी माझ्या पुढच्या कामाला लागलो.

काही मिनिटं गेली असतील नसतील, पुन्हा माझा फोन वाजला. स्वातीचा फोन. काही तरी अप्रिय संवाद होणार याची जणू खात्रीच असल्यासारखा कडवटपणे मी तो उचलला.

‘मि. दिघे तुमच्याशी बोलतायत, सर,’ इतकंच बोलून स्वातीनं फोन त्यांच्या हातात दिला. आता फोनवर आजींचा मुलगा असणार.

‘डॉक्टर, तुमच्या या स्वाती डॉक्टर आमच्याशी आत्ताच बोलल्या. आश्चर्य आहे, आज आपला इतक्या वर्षांचा परिचय. आणि तुम्ही आजींच्या मृत्यूच्या दाखल्यासाठी खळखळ करावीत.’ क्रुद्ध आवाजात दिघे बोलत होते. हा हल्ला मला अपेक्षित होता पण तो इतका थेट आणि प्रखर असेल असं मात्र वाटलं नव्हतं, पण दिघ्यांच्या बाबतीत नाही तरी आत्तापर्यंत कुठली गोष्ट अपेक्षेबरहुकूम झाली होती?
‘मि. दिघे, असं पाहा, वैद्यकीय दाखला देण्यासाठी माझ्या हातात काही तरी तसा पुरावा नको का की ज्या आधारे मी आजींच्या आजाराचे निदान लिहू शकतो? अगदी एकही तपासणी न करता इतके दिवस रेंगाळत चाललेल्या आजाराची आणि त्याच्या मृत्यूची जबाबदारी मी कशी घेऊ? कुणास ठाऊक, आजींचा आजार कदाचित बरा होऊ शकलाही असता.’

‘म्हणजे, डॉक्टर, केवळ मृत्यूचा दाखला मिळावा म्हणून मी आईला अॅङमिट करावं असं म्हणायचंय का तुम्हाला?’

‘तुमच्या आईंना उपचारासाठी अॅङमिट होण्याची गरज आहे, असं माझं वैद्यकीय मत आहे,’ डोकं शक्य तेवढं थंड ठेवण्याचा प्रयत्न करीत मी म्हणालो.

‘आणि उपचार म्हणजे तरी काय? तुम्ही सुया टोचणार, सलाईन लावणार, ऑक्सिजन लावणार. हेच ना?’ दिघे म्हणाले. वैद्यकीय उपचारांची ते जणू खिल्ली उडवताहेत असा भास मला त्यांच्या या बोलण्यातून झाला.

‘पेशंटला उपचार म्हणून जे जे आवश्यक वाटेल ते सर्व आम्ही करणार.’ मीही निक्षून म्हणालो.

‘ठीक आहे, अगदी अशीच अडवणूक होणार असेल तर करतो मी माझ्या आईला अॅङमिट. होऊ दे तुमच्या मनासारखं. फार तर काय, होईल बिल हॉस्पिटलचं. भरू तेही तुमचीच तशी इच्छा असेल तर.’
दिघ्यांचा राग त्यांच्या त्राग्यातून स्पष्टपणे माझ्यापर्यंत पोचला. माझा नाईलाज होता. मी अडवणूक करून जणू पैशाच्या लालसेनं आजींना अॅङमिट करायला भाग पाडत होतो अशी त्यांची भावना झाली होती. मलाही समजेना मी कुठल्या धर्मसंकटात अडकत चाललो होतो? कारण आता दिघे आजी नाईलाजाने अॅङमिट होतीलही कदाचित पण अशा नाराजीनं अॅङमिट झालेल्या पेशंटला मी कसा उपचार देणार होतो? त्यांच्या कुटुंबियांशी कसा संवाद साधणार होतो?

खिन्न होऊन मी वाट पाहत राहिलो, दिघे आजी अॅङमिट होतील याची. पण सुदैव माझे, त्या अॅङमिट झाल्या नाहीत. माझं धर्मसंकट जणू आपोआपच टळलं.

किती तरी दिवसांनी असंच इकडून तिकडून मला समजलं, दिघे आजी घरीच कालवश झाल्या होत्या. आमचे संवाद झाले त्यानंतरही एखाद-दुसरा दिवस त्या घरीच होत्या. त्यांच्या मृत्यूच्या दाखल्याचं नेमकं काय झालं याची मला कल्पना नाही.

आपल्या आईची इच्छा म्हणून तिचा मृत्यू सुकर करणारे दिघे, ही त्यांची मातृभक्ती म्हणावी का? आणि तसं असेल तर माझी अडवणूक(?) त्यावर मात करू शकली नाही हे सुदैव की दुर्दैव?

डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०



1 comment:

  1. Sir I also feel the same on that day .now I realise how u think about yr pts.that day the decision was very difficult for u but it sticks to ur medical ethics.

    ReplyDelete