Saturday 27 April 2013

प्रेमाची गोष्ट



प्रेमाची गोष्ट
सातव म्हणजे एकदम दिलखुलास मनुष्य. गोल चेहरा, कल्लेदार मिशा आणि त्याही इतक्या कल्लेदार की पूर्वी कुणी म्हणत तशी एक-दोन लिंबंसुद्धा त्यात सहज लपावीत. हसरे बोलके डोळे. सगळ्या अंगावर, चेहऱ्यावर एक प्रकारचा तेलकट रापलेपणा. डोक्यावर केस तसे फारसे दाट नाहीतच, पण आहेत तेही तेलानं चापून चोपून बसवलेले. दवाखान्यात येतील तर तेही एखाद्या झंझावातासारखे. दरवाजा जणू दुभंगून टाकत. चालण्या-बोलण्यात, हसण्यात किंवा सगळ्याच त्यांच्या हालचालीत एक प्रकारचा आडदांडपणा असे. साधे बोलतील तर वाटेल आपल्या अंगावरच येतात की काय, हसतील तर तेही असं की वाटावं जणू ढगच गडगडतायत. पेशंट तपासायची माझी खोली अगदी अंतर्भागात होती, बाहेरच्या वेटिंग रूम पासून अगदी स्वतंत्र. अशासाठी की इकडचा आवाज तिकडे जाऊ नये. पण मला खात्री आहे की सातवांचा आवाज ह्या सगळ्या सीमा पार करून अगदी बाहेरपर्यंत स्पष्ट ऐकू जात असणार. असं सगळं असलं तरी माणूस भोळसट वाटावा इतका साधा. संपूर्ण पारदर्शक. सरकारी वनखात्यामधे नोकरी करता-करता तिथला वन्यपणा जणू त्यांनी स्वतःत भिनवला होता. रुजवला होता. त्यांच्या या एकूण आविर्भावाकडे पाहून मला नेहमी वाटे की सातव आपल्या कामाशी तद्रूप झाले असणार. हा एक प्रकारचा कृति-वृत्ती संगम असावा.

सातवांना आजार म्हणावा तर काहीच नव्हता. तरी त्या काळी ते अगदी नेमानं मला भेटायला येत. काही तरी किरकोळ तक्रारी सांगत. तपासून घेत. काही तरी किरकोळ औषधं लिहून घेत. चार गप्पा-गोष्टी करून जात. निरोगी सातवांच्या या भेटींचं मला मोठं कुतूहल होतं. म्हणजे पूर्ण निरोगी पेशंट बघण्याची मला सवय नव्हती असं नव्हतं. असतात, असे कित्यॆक पेशंट असतात, अगदी कितीही शोधलं तरी सुतळीच्या तोड्याइतकाही आजार सापडू नये आणि तरीही अगदी नेमाने डॉक्टरला मात्र भेटणार असे किती तरी पेशंट असतात. किंबहुना अशा पेशंटची वाढती गर्दी हे डॉक्टरच्या भरभराटीचे लक्षण (आणि एका अर्थी कारणही!) असते. पण अशा पेशंटचा एक वेगळा वर्ग असतो. ते उच्चभ्रू असतात. आर्थिकदृष्ट्या संपन्न गटात मोडणारे असतात. अधून मधून डॉक्टरला भेटणे हा त्यांच्या षौकीन जीवनशैलीचा अविभाज्य भाग असतो, ते जणू त्यांचे ‘फॅशन स्टेटमेंट’ असते. सातव त्या कुळातले नव्हते. गावाकडचे वाटावेत असे होते. वन खात्यात पोलिसाचे किंवा तत्सम काम करणारे होते. पण खात्यातल्या चार अधिकाऱ्यांबरोबर त्यांची उठबस होती. त्यातून त्यांना या शहरीपणाचा सुगावा लागला असावा. मोठ्या शहरात येऊन शहरी डॉक्टरकडून आपली तपासणी करून घेणे हा त्यांच्या षौकाचाच भाग असावा. 

‘त्याचं काये, सायेब, आता बोलायला काय हरकत न्हाई, पण मी सांगतो, आमच्या खात्यात अशी परस्थती हाय की काय बी नाय म्हटलं ना तरी, चार पैशे इकडून तिकडून सुटतात. खोटं कशाला बोलू. सगळ्या लोकांना असा वरचा पैका भेटतो. आज म्हागाई पहा कशी झाली, असा पैका मिळाल्याबिगर थोडंच चालतंय कुणाचं बी.’

सातवांच्या आर्थिक यशाचं हे गणित त्यांनी मला असं बोलता-बोलता सहजच सांगून टाकलं होतं. या प्रामाणिक विधानानं मी तर चपापलोच होतो. पण तेव्हाही गंमत अशी की या त्यांच्या विधानातून मला दिसला तो त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची पारदर्शकता. त्यांचा भ्रष्टाचार नव्हे. तो तर मी जणू सर्वत्र गृहीतच धरला होता. सातव प्रामाणिक होते, पारदर्शक होते, असं आधी मी जे म्हणालो त्याला याच विधानाचा संदर्भ होता. 

असेच एकदा मधे सातव आले, यावेळेला त्यांनी त्यांच्या सहधर्मचारिणीला बरोबर आणलं होतं.
‘ह्या आमच्या मिसेस, काय ना काय तक्रारी असतात यांच्या नेहमी. म्हटलं येकडाव आपल्या डाक्तरना दावून टाकू. नाय तरी कधीच आल्या नव्हत्या त्या माझ्या संगं. जरा घ्या बघून काय प्रॉब्लेम हाय तरी काय.’ 

सातवांच्या पत्नी त्यांच्यासारख्याच पूर्ण निरोगी! गावाकडच्या साध्या वळणाच्या. नऊ वारी साडी, डोक्यावर पदर. कपाळावर भला मोठा कुंकवाचा टिळा. ‘डागदरकडं आली, म्हनुनश्यान पार बुजलेल्या.’ शे-पन्नास निरर्थक तक्रारी सांगत आपलं निरोगीपण अधोरेखित करणाऱ्या. 

‘अवो, ती पाठ दुखत्ये, ती सांगाल न्हवं’ - ‘आन् मधी मधी त्ये डोस्कं दुखतंय, त्ये बी सांगाल न्हवं - बोला समदं बिगी बिगी, नाय तर घरी गेल्यावं निस्ता गोंधुळ घालाल.’ - असं म्हणत सातव त्यांना बोलतं करत होते. ‘बोलतं करत होते’ असं आपण म्हणायचं पण वस्तुस्थिती अशी होती की त्याचा परिणाम होऊन त्या फक्त घाबरत होत्या. कमालीच्या घाबरत होत्या. प्रत्येक छोटी तक्रार सांगितली की त्या सातवांकडे पाहत, जणू त्यांची संमती घेत. सातवांचा आपल्या कुटुंबावर भारी प्रभाव होता एवढेच काय ते ‘रोगनिदान’ मी तेव्हा करू शकलो. या असल्या रोगावर उपचार तो कसला असणार? आपलं आपणच ‘बराय’ म्हणत राहायचं असतं. एवढ्या वर्षांच्या यशस्वी सांसारिक तपश्चर्येनंतर सो. सातवांना एवढी समज नक्कीच आली असणार आणि ती समज आताही त्यांच्या सोशिक चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसत होती.

त्यानंतर मधे एकदा सातव आपल्या थोरल्या मुलीला घेऊन आले. यशोदा. बारावीच्या परीक्षेला बसणारी मुलगी. आपल्याकडे ‘दहावी- बारावी’ असा एक आजार असतो. घरातलं एखादं अपत्य दहावीच्या किंवा बारावीच्या परीक्षेला बसणार असलं की या आजाराची सुरवात होते. मुळात आईपासून या आजाराची सुरवात होऊन तो क्रमानं स्वतः परीक्षार्थी मुला-मुलीला आणि त्यानंतर अख्ख्या कुटुंबालाच ग्रासतो. सातवांच्या मुलीला तो झाला होता बहुधा.

माझ्यासमोर गप-गुमान मान खाली घालून बसलेली मुलगी. तिनं जणू पण केला होता, समोर न बघण्याचा. पूर्ण वेळ तिनं खालच्या फरशीचं सखोल निरीक्षण चालू ठेवलं होतं आणि बाजूनं सातव बरसत होते.  

‘’जरा दिखील अभ्यासात ध्यान नाही व्हं हिचं. दिसच्या दिस नुसती बसती. पुस्तक नको की वही नको. आता बघा हिला मी क्लास लावलाय. चांगला मोठा क्लास लावलाय. पन थितून बी तीच तक्रार. क्लासला जायाला नको. कधी डोस्कं तर कधी पोट. काय ना काय तरी दुखताय हिचं. बोलावं तर ही अशी मुंडी घालून बसल्याली. निस्ती रडतीय. काय सुचंना झालंय बघा.’

या आजाराला वेगळ्या निदानाची गरज नव्हती. प्रश्न होता उपचार कुणावर आणि कसा करावा याचा. समोर बसलेली यशोदा हीच पेशंट आहे असं सातवांचं मत होतं आणि माझं वैद्यकीय ज्ञान मला सांगत होतं की उपचाराची जास्त गरज सातवांनाच होती. 

प्रसंग बाका होता. खरी भूमिका घ्यावी तर गाठ सातवांशी होती. आपल्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका काही असू शकते हे सातवांना पटवणं अशक्य होतं. भलताच संघर्ष ओढवून घेण्यासारखं होतं. बरं तेही करायला माझी हरकत नव्हती, पण त्यातून यशोदाचं काहीच भलं होणार नव्हतं. मी शांत राहिलो. ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेतली. काही किरकोळ औषधं लिहून यशोदाच्या हातात ठेवली. तिला वरकरणी समजावलं. सातवांच्या चेहऱ्यावर आता विजयाचं हसू उभारून आलं होतं. त्यांनाही हळूच बाजूला घेतलं. ‘मुलीचं वय अडनिडं आहे, जरा सबुरीनं घ्यावं’ हे सांगितलं. त्यांना हे सगळं किती पटलं ते काही समजलं नाही, पण त्यांनी विरोध केला नाही एवढं मात्र खरं आणि हीसुद्धा एक जमेची बाजूच म्हणायची, नाही का?.

सातव बाहेर पडले. एका आपत्तीतून जणू मीच बचावलो असा आनंद मला झाला.
पण हे फार दिवस टिकलं नाही. सातव पुन्हा आलेच. अशी समस्या घेऊन आले की मला भूमिका घेणं टाळताच येणार नव्हतं. आता जेव्हा ते आले तेव्हा नेहमीसारखे वादळी नव्हते. वरकरणी शांत वाटावे असे  होते. मधे काही आठवड्यांचाच काय तो काळ गेला असेल पण तेवढ्यात जणू म्हातारपण आल्यागत त्यांची अवस्था झाली होती. जर्जर. विकलांग.

‘डॉक्टर, अवो भलतंच की वो काय तरी घडलं.’ ते म्हणाले आणि त्यानंतर जणू एक अघटित घडलं. ते अगदी शांत बसले. सातव शांत बसले. खाली पाहात. सातवांचा शांतपणा म्हणजे अघटितच होतं. थोडा वेळ शांततेत गेला. मी वाट पाहत होतो, सातव पुढे काय बोलतात याची.

‘काय सांगू डाक्तर, आमच्या यशोदीनं भलताच की वो घुटाऴा केला. अवो मागं नाय का तुमच्यासमोर आणून घातली व्हती तिला. सारखी आजारी पडत हुती म्हनून. पण त्ये तसलं काय बी नव्हतं. नुसती सुम बसायची. आपण औशीद देतुय, पण गुण काय न्हाई. म्हनून परवाच्याला जरा खडसावली तर म्हणती की प्रेमात पडली, कुठल्या पोराच्या म्हणून. लगीन करणार म्हणं त्येच्याशी. आता आली का पंचाईत. ही असली बारकुटी पोर आन् अशी वो कशी काय प्रेमात पडली?’

पुन्हा थोडी शांतता. मी सातवांकडे बघत होतो. त्यांची नजर खाली झुकलेली. 

‘पडली प्रेमात तर असू दे की. कोण आहे तरी कोण हा मुलगा,’ मी विचारलं. तशी सातव उसळलेच.

‘आवो, कसला पोरगा न् कसलं काय. न्हाय जातीचा की न्हाय पातीचा. शेजारचंच हाये त्ये बेणं. कुठं कालिजात शिकतुय म्हणं. अवो, माझं तर डोस्कंच फिरलंया. मी म्हनतो, मी काय म्येलो व्हतो की पोरीनं ह्ये असं वंगाळ करावं, बोला ना मी काय म्येलो व्हतु का?’

‘अहो, पोरीचं वयच तसं आहे. आवडला असेल कुणी पोरगा, तुम्ही चौकशी तरी केली का? असेलही पोरगं चांगलं. पाहिलंय का तुम्ही त्याला?’ मी विचारलं. 

‘त्येच्यात काय पहायचंय? अवो, दीड वितीची पोर ती, तिला काय अक्कल असतीया व्हय? पोरगा कुठचा बघतो. दिसला तर तंगडीच तोडून ठिवीन. हां. स्पष्ट बोललोय मी तिच्याशी. म्हटलं, ती बारावी गेली चुलीत. आता गुमान घरी बसायचं, घरामंदी कामात मदत करायाची. बास झालं, ती शाळा नगं की क्लास नगं.’ इतक्या रागानं सातव बोलले की त्यांना दम लागला. 

‘पण यशोदा काय म्हणते? ऐकतिये का तुमचं?’

‘ऐकण्याचा प्रश्नच कुटं येतू डाक्तर, मी तर चांगली बडवून कोंडूनच घातलीय न्हवं घरामंदी. लय कालवा केला पयल्यानं, रडली, भेकली, मायच्या गळ्यात पडली. म्या काय असा ऐकतु व्हय? आता झाली गप आन् बसलीय एका कोपऱ्यात. खात नाय की पीत नाय. मी काय म्हनतो, म्येली तं म्येली पोर. पण ही  असली थेरं नाय चालणार. प्रेमात पडती म्हणं. लाज नाय वाटत आपल्या बापाला सांगायला?’ 

सातवांचा राग अनावर झाला होता. पोरीला खाऊ की गिळू झालं होतं त्यांना. मला यशोदेची कीव आली. परवा-परवा इथं आली होती, माझ्यासमोर इथं बसली होती. सगळं कसं अगदी ताजं होतं माझ्या आठवणीत. तेव्हा मी अगदीच वेडा ठरलो, मला वाटलं ही परीक्षेच्या दडपणात आहे. किती पूर्वग्रहदूषित होतो मी. दुसरा कुठला विचारही करू शकलो नाही. मलाच लाज वाटली. तेव्हाच मी थोडा विचार करायला हवा होता. तिला बोलतं करायला हवं होतं. सगळंच चुकलं तेव्हा आणि आता तर हे भलतंच धर्मसंकट जणू येऊन उभं राहिलं. बापाच्या तावडीतून पोरीला वाचवण्याचं. 
 
सातवांची सरबत्ती चालूच होती.

‘मी काय म्हनतो, मी तिला पुन्हा येकदा इकडं घिऊन येतो. तुम्हीच समजवा आता ल्येकीला. म्हणावं, बापाचं ऐक. त्यानंच तिचं कल्याण हुयील. काय?’

आता मात्र मी खरा घाबरलो. म्हणजे मुलीचा प्रेमभंग करण्याची सुपारी ते मला देऊ करत होते. त्यांच्या स्वतःच्या आक्रस्ताळेपणाचं वकीलपत्र मी घ्यावं अशी त्यांची इच्छा होती. ही म्हणजे आणीबाणीच झाली. आता मला स्पष्टच बोलायला हवं होतं.

‘अहो, असं पाहा, मुलगी प्रेमात पडली तर एवढं अस्वस्थ होण्यासारखं काय आहे त्यात. तुम्हीच बोला तिच्याशी. त्या मुलाला पण बोलवा. बसा ना समक्ष एकमेकांसमोर. कुणास ठाऊक, तुम्ही स्वतः बघाल तर तुम्हालाही आवडेल तो पोरगा. प्रश्नच मिटेल. आणि हे पाहा, हे असं मुलीला मारणं, तिला दम देणं, घरात कोंडून तिच्यावर सक्ती करणं – सगळं चूक आहे हो. अगदी चूक आहे. पोरगी अशानं हातची जाईल. उद्या जीवाचं काही बरं वाईट करून बसेल. तुम्हालाच केवढा मनस्ताप होईल. काही झालं तरी पोटची पोर आहे. ती काय वैरीण असते का आपली.’

‘अवो, वैरीण नाय तं काय, वैरीणच की वो ती. मी तं म्हणतु, वैरीण परवडली न्हवं, पर ह्ये आसलं नगं’

सातव काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. मी जे म्हणत होतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचणंच शक्य नव्हतं. मी सबुरीचा सल्ला देत राहिलो. ते वारंवार हल्ले करत राहिले. असा किती वेळ गेला, ठाऊक नाही. आम्ही एकमेकांना कंटाळलो असणार कारण अखेर सातव माझ्या समोरून उठले आणि बाहेर पडले. मी त्यांच्या बाजूनं उभा राहिलो नाही, उलट त्यांच्या लेकीची, तिच्या प्रेमाची बाजू घेतली याचं मोठं शल्य बहुधा त्यांच्या मनात राहिलं. ते गेले आणि तेव्हाच मी ताडलं ही आमची शेवटची मुलाखत ठरणार होती. डॉक्टर म्हणून मी त्यांच्या कसोटीला उतरलो नव्हतो. नापास झालो होतो. घडलंही तसंच. सातव पुन्हा माझ्या दवाखान्यात आले नाहीत. यशोदेचं काय झालं याची माझी उत्सुकताही यथावकाश शिळी होत गेली.

परवा परवाची गोष्ट. हॉस्पिटलचा माझा राउंड चालू होता. सकाळची ही वेळ नेहमीच गडबडीची असते. 

‘सर, चौथ्या मजल्यावर एक पेशंट पहायचीये. तरुण बाई आहे. आपल्याला पाहायला सांगितलंय. काही तरी मेडिकल प्रॉब्लेम आहे.’ हाउसमन म्हणत होता.

‘अरे, आत्ता इतक्या उशिरा काय सांगता रे. आक्खा राउंड संपत आला. अगदी खाली तळमजल्यावर आलो आणि आता पुन्हा चौथा मजला म्हणजे-‘ मी वैतागत म्हणालो.

‘नाही, सर, कॉल आत्ताच आलाय.’

नाराजीनं चार मजले चढणं आलं. पण इलाज नव्हता. मी वेग पकडला आणि पायीच चढत चौथा मजला गाठला. पेशंटपाशी पोहोचलो.

तीस-पस्तीस वर्ष वयाची विवाहिता. डोकेदुखीसारखी लक्षणं. तपासण्या चालू होत्या. यथावकाश निदान होईल अशी परिस्थिती. मला कळेना, यासाठी मला आत्ता बोलावण्याचं कारण काय असावं. पण वेळ गडबडीची होती. काम लवकर संपवून पुढे जाणं गरजेचं होतं. कसाबसा केसपेपर शोधला आणि नोट्स लिहिणार तोच -

‘नमस्कार, डाक्तरसाहेब,’ मागून हाक आली. मागं वळून बघितलं. ओळखीचा वाटावा असा गोल चेहरा. कल्लेदार मिशा बऱ्याचशा पांढऱ्या झालेल्या. चेहऱ्यावर परिचयाचं गोड हसू. कोण बरं असावं असा विचार करतो तर त्यांनी पुन्हा विचारलंच , ‘काय, ओळखलं का नाय?’

आवाज ऐकला आणि एकदम प्रकाश पडला. सातव. किती वर्षांनी भेट. दहा-बारा तरी सहज असतील.
‘अरेच्चा, सातव. सातव ना तुम्ही?’

‘येकदम बरुबर. मी म्हटलंच डाक्तर काय विसरायचं न्हाईत.’

‘पण तुम्ही? इकडे कुणीकडे?’

‘आवं, आत्ता तुम्ही पाह्यली ती माझीच प्वार न्हवं. इथं आणली तवाच ठरिवलं, येक डाव तुमाला बी दाखवून घ्यायाची. तिचं डोस्कच ऱ्हाइना व्ह. म्याच म्हटलं आमच्या डाक्तरास्नी बोलवा म्हून.’
आता उलगडा होत होता. केसच्या निदानासाठी नाही, सातवांचा हट्ट म्हणून मला बोलावलं होतं. मी सुखावलो. सातव अजून माझी आठवण ठेवून होते तर आणि एका क्षणात आठवलं, शंका आली- ‘ही यशोदा तर नाही?’

अगदी अभावितपणे मी म्हणालो, ‘म्हणजे ही ती तुमची –‘

मी माझं वाक्य पूर्ण करायच्या आत सातवांनी माझा हात धरून मला जवळ-जवळ ओढलंच. आपल्या तोंडावर हात ठेवत त्यांनी मला गुप्ततेचा इशारा केला. त्यांच्या ओढण्यानं पार फरफटलोच मी. काय ताकद होती त्यांच्यात. या वयातसुद्धा.

पेशंटपासून पुरेशा अंतरावर येत त्यांनी अगदी हळू खाजगी आवाजात मला सांगितलं, ‘व्हय, तीच हाय ती. यशुदा.’

‘अरे वा, लग्न वगैरे झालं वाटतं तिचं.’ मीही हळूच विचारलं.

व्हय, झालंय तर. दोन पोरं बी हायत तिला आता.’ 

‘कुणाशी झालं? त्याच पोराशी का?’ माझी उत्सुकता अगदी अनावर झाली होती. सातवांचीच पोरगी ती. मला खात्री होती, नमवलंच असणार तिनं आपल्या बापाला.

‘न्हाय, वो त्यो कसला. ह्यो दुसराच हाय. म्याच शोधून दिलेला. त्या आदिच्याला दिला नव्हं हाकून’ मिश्किल हसत सातव म्हणाले. डोळे मिचकावून आणि माझ्या हातावर टाळी देत.

‘आता लई झकास चाललंया. ह्ये आताच काय ते आजारपण आलं म्हून. नाय तर येकदम झकास हाय सगळं.’

मी गप्प झालो. सातवांनी जिकली होती. मला वाटलं माझाच पराभव झाला. प्रेमाचा पराभव झाला. आपण ज्याला ‘सारासार विवेक’ म्हणतो, ज्याला सभ्यता म्हणतो, ज्याला माणुसकी म्हणतो त्या सगळया सगळ्याचा सपशेल पराभव झाला.

यशोदाच्या खोलीत मी पुन्हा एकदा जाऊ लागलो. तिला नव्यानं पाहण्याची उत्सुकता आता मला वाटत होती. तोच सातवांनी माझा हात घट्ट पकडला आणि नजरेनं आणि आवाजानं जणू दरडावलं, ‘तिला याचं काय बी बोलू नका बरं का.’

मी मान हलवली आणि आत हळूच डोकावलं. अंथरुणावर यशोदा होती. अंगानं भरलेली. हसऱ्या चेहऱ्याची. मागं एवढं काही रामायण-महाभारत घडलेलं, त्याची कुठलीच आठवण तिच्यावर नव्हती. आता दिसत होती फक्त सुखी संसाराची आंधळी तृप्ती. तिनं माझ्याकडं पाहिलं, सौम्य हसू आलं तिच्या ओठांवर. ओळखलं असणार तिनंही मला बहुतेक.

मला विषय वाढवायचा नव्हता. जुन्या आठवणीही जागवायच्या नव्हत्या. उलट पावली मी खोलीबाहेर आलो. मन मात्र शंकाकुल झालं होतं. हे असं कसं घडू शकतं आणि तेही इतकं सहज आणि नैसर्गिकपणे? कुठलाच खेद नाही. खंत नाही. आता सातवांशी बोलण्यात मला रस नव्हता, एका परीनं मला त्यांची चीड आली होती. त्यांचा जणू विजय झाला होता. तो विजय किती खरा किती खोटा, मला सांगता येत नव्हतं, पण तो विजय झाला असं सातवांना वाटत होतं आणि मला नेमकी याचीच चीड होती. 

खोलीतून बाहेर पसलो तेव्हा मी विचारातच पडलो होतो, खरंच जिंकलं कोण?- सातवांचं पुत्रप्रेम? आणि समजा असेल ते जिंकलं, तरी ते का प्रेम होतं? आणि हरलं तरी कोण? यशोदा आणि तिचा प्रियकर यांचं प्रेम? आणि समजा ते हरलं असेल तरी तेही का प्रेम होतं?


डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष ९४०५०१८८२० 




2 comments:

  1. गोष्ट अतिशय सुंदर आहे . हे वास्तव आहे आणी असे घडू शकते ह्यावर सुरुवातीला विश्वास बसला नाही. पण जरा विचार करता असे वाटले कि ---- हल्ली वयात आलेल्या प्रत्येक मुला - मुलीला आणी तिच्या आई वडिलाना अश्या प्रसंगातून जावेच लागते . तो ते कसा हाताळतात हे महत्वाचे आहे.
    शहरात रहाणारे -- मुलांच्या कलाने, त्याना समजून , समजाउन , counselling करून , ही वेळ आणि सगळीच परिस्थिती सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतात . असे करताना मुले आणी आई- वडील , यांचे संवाद कसे आहेत ह्यावर सामंजस्या ने निर्णय होतो. कधी कधी घरातील तणावाचे वातावरण , मोठ्यांचे आडमुठे स्वभाव ह्यामुळे शहरातील मुले पालकांचे ऐकत नाहीत आणी कठीण परिस्थिती निर्माण होते. आणि घटस्फोट सारख्या विचित्र न्यायालयीन चक्रात आयुष्य वेगळ्याच मार्गाला जाते.
    ह्या उलट गावाकडे "वडील" हा एकाच कायदा असतो. जर सातव सारखे सुज्ञ वडील असतील तर त्यानी त्यांचा निर्णयच बरोबर असू शकतो . हे त्यांच्या मुली कडे पाहून वाटते .( अंथरुणावर यशोदा होती. अंगानं भरलेली. हसऱ्या चेहऱ्याची. मागं एवढं काही रामायण-महाभारत घडलेलं, त्याची कुठलीच आठवण तिच्यावर नव्हती. आता दिसत होती फक्त सुखी संसाराची आंधळी तृप्ती.) सातव सारखे लोक फक्त adolescence,adolescent depression त्यावरचे योग्य मार्गदर्शन ई ई गोष्टी सांगू शकत नाहीत इतकेच .

    ह्या सगळ्याचा अर्थ एकच --वयात आलेल्या मुलाची आई वडिलांना असलेली काळजी आणी ते योग्य मार्गावर आहेत ह्याची शहानिशा आणी खात्री करणे.
    मन हेलावणारा अनुभव आहे आपला. आणी आपण तो उत्तम रीतीने मांडला आहे .

    स्मिता काळे

    ReplyDelete
  2. पालकच आपल्या मुलांना सर्वात उत्तम प्रकारे ओळखू शकतात. इतरांना ती 'केमिस्ट्री' कळणं अवघड आहे.

    ReplyDelete