Saturday, 1 December 2012

विम्याची ऐशी तैशी - ३


  मागील लेखानंतर पुढे चालू-

किस्सा दुसरा


आता मी जी गोष्ट सांगणार आहे, ती आम्हा डॉक्टरांच्या दृष्टीने अगदीच साधारण आहे, यात सांगण्यासारखे विशेष ते काय आहे, असेच एखाद्याला वाटेल. आणि असे वाटेल हेच तर खरे दुर्दैव आहे.

वीसेक वर्षाचा प्रमोद. आमच्या हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा पहाटेची वेळ होती. तातडीच्या विभागात तो आला तेव्हा आमच्या डॉक्टरने त्याला तपासले. प्रमोद तापाने फणफणलेला होता. किंचित झोपाळल्यासारखा अर्धवट जागा अर्धवट ग्लानीत असावा असा. त्याच्याबरोबर त्याची आई होती, वडील होते. दोघेही खूपच घाबरलेले होते. रात्रभर डोक्यावर पट्ट्या ठेवल्या, अंग गार पाण्याने पुसून घेतले, तरी ताप हटत नाही, ‘बघा ना आता कसंतरीच कराया लागलाय, डोळ बी उघडंना. त्येची नदर बी धड दिसंना बघा डॉक्टर. काय तरी बिगी बिगी करा, ल्येकरू बघा कसं तरीच कराया लागलंय’, असा आकांत करत त्याची आई कपाळ बडवू लागली. अर्धवट शिकलेल्या त्याच्या बापाची अवस्थाही काही फार वेगळी नव्हती. पहाटेच्या वेळेला आलेले असे सगळेच पेशंट दाखल करून घेतले जातात. तसा प्रमोद सुद्धा आमच्याकडे दाखल करून घेतला गेला.

सकाळी मी तपासायला पोहोचेपर्यंत परिस्थिती खूपच बदलली होती. प्रमोदचा ताप बऱ्यापैकी उतरला होता, तो अगदी टक्क जागा झाला होता. चहा वगैरे पिऊन हसत उठून बसला होता. नंतर काहीच विशेष घडलं नाही. किरकोळ एखादा दिवस ताप आला. काहीही खास उपचार न करताच प्रमोद बरा झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला घरीही सोडले. घरी सोडलं तेव्हा प्रमोद, त्याचे आई बाप खूष होते.

खरी गंमत नंतर झाली. प्रमोद एका कंपनीत कामाला होता. तिच्यातर्फे प्रमोदचा विमा उतरवला होता. त्याच्या हॉस्पिटलच्या बिलाचा खर्च विमा कंपनी करणार होती. त्यांनी तो करण्यास नकार दिला. विमा कंपनीचा दावा असा की प्रमोदला हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरजच नव्हती. बाहेरच्या बाहेर उपचार करून तो बरा झाला असता. त्याच्या उपचारात सलाईन लावलेले नाही, कुठलेही खास इंजेक्शन दिलेले नाही. सबब हॉस्पिटल बिलाचा परतावा देणे शक्य नाही.

प्रमोदचे गरीब कुटुंब. त्याला नुकतीच लागलेली ही अर्धवट नोकरी. हॉस्पिटलचा हा किरकोळ खर्चसुद्धा त्यांना जड झाला. बिलासाठी इकडे तिकडे हेलपाटे घालून थकले बिचारे. दहा वेळा ते मला येऊन भेटले, गयावया करू लागले. पण माझाही काहीच इलाज नव्हता. होऊन गेलेली घटना, केस पेपर वरल्या नोंदी या तर काही कुणी बदलू शकत नव्हते. विमा कंपनी सुद्धा त्यांच्या मुद्द्यावर अडकून होती, कारण तो मुद्दा त्यांच्या सोयीचा होता.

झाल्या प्रकाराने मीही थोडा नाराज झालो होतो. प्रमोदच्या आणि माझ्या संबंधात एक प्रकारची कटुता निर्माण झाली असे उगीचच मला वाटत होते. एकीकडे कमीत कमी खर्चात त्याला बरे करण्याचे काम मी केले तरी त्यात प्रमोदचे मात्र नुकसानच झाले. त्याच्या या नुकसानीला जसा काही मीच जबाबदार आहे अशी भावना माझ्या मनात येऊ लागली.

विनोद हा माझा वरिष्ठ सहकारी. अशा काही विशेष गोष्टी मी नेहमी त्याच्याशी बोलत असे. विनोद म्हणजे एकदम व्यवहार चतुर इसम. बऱ्याच वेळा त्याचा सल्ला अतिशय रोकठोक मार्गदर्शक असे. त्याला मी हा सगळा प्रसंग सांगितला. म्हणालो, ‘काय ही विमा कंपनी, काय हा अन्याय.’ तर तो हसला. मलाच वेड्यात काढत. ‘च्यायला, तू म्हणजे ना एकदम झम्पू आहेस लेका. अरे लावायचं असतं सलाईन अशा वेळी. ठोकायची ना इन्जेक्शन इकडून तिकडून. त्यानं काय मरत नाय कुणी. असंच तर चालतंय सगळीकडं’

‘अरे पण, एखाद्याला गरज नसलेलं औषध द्यायचं म्हणजे काय?’ माझी बाळबोध शंका.

‘काय राव, अश्या इंजेक्शननं तरी काय होतंय. बिनधास्त द्यायची. आणि एवढी काळजी आहे ना तुला, तर नुसतीच लिहायची पेपरवर. द्यायचीच नाहीत. नुसतेच कागदी घोडे रे! तुला काय सगळं असंच शिकवायचं का रे?-‘ त्यानं माझ्याकडं अगदी केविलवाण्या नजरेनं पाहिलं. माझी त्याला कीवच आली बहुतेक.

पण हे सगळं मला खूप भीतीदायक वाटलं, कसं तरीच वाटलं. म्हणजे बघा, खराखुरा उपचार करावा, अनावश्यक औषधे टाळावीत, पैशाची बचत करावी तर परतावा नाही. खोटे उपचार करून सलाईन लावावे, तर जास्त झालेल्या खोट्या बिलाचा परतावा मात्र मिळणार. आहे की नाही अजब न्याय!
वाईट अशाचं वाटतं की हीच आज रीत आहे. मी मघाशी म्हटलं तसं, आमच्या बहुसंख्य डॉक्टर मित्रांना वाटेल यात विशेष ते काय? ही तर अगदी सामान्य गोष्ट आहे. आणि माझ्या मते हेच तर खरे दुर्दैव आहे! 

झाल्या प्रसंगाचा विम्याच्या संदर्भात अभ्यास करू. विमा कंपनीचे ‘विमोत्सारक’ वर्तन सहजच लक्षात येईल. पण प्रमोद ज्या तातडीने रात्री आला, आमच्या कनिष्ठ डॉक्टरच्या सल्ल्याला मान देऊन हॉस्पिटल मध्ये दाखलही ही झाला, यामागे विमा प्रेरणा नव्हती का? समजा, प्रमोदचा विमा नसता तर तो इतका सहज हॉस्पिटलमध्ये राहण्यास तयार झाला असता? याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. प्रमोद विमासुर होण्याच्या प्राथमिक अवस्थेत असणार! त्याला अपयश आले ते माझ्यामुळे. मी भोळा होतो. विमाशरण होण्यापर्यंत माझी प्रगती झाली नव्हतो. त्यामुळे प्रमोद हरला. प्रमोदच्या लेखी मी एक कुचकामी डॉक्टर तर ठरलो नाही? आता पुढच्या वेळेस तो अधिक जबाबदारीने वागेल, चांगला हुशार डॉक्टर शोधेल. त्याच्या विमाडावाच्या व्यसनाची ही नांदी तर ठरणार नाही?

क्रमशः पुढे चालू-

डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०




1 comment:

  1. The evils that plague our profession and the health industry as a whole are so numerous and so well entrenched that uprooting them is difficult. However never doubt that a small number of determined individuals can bring about a change!

    ReplyDelete