Saturday, 29 December 2012

विम्याची ऐशी तैशी -७



किस्सा कितवा?
(मागील लेखावरून पुढे चालू-

विम्यासंदर्भात किती तरी किस्से मी सांगितले, इतके की कदाचित त्यात एक प्रकारचा तोच तोपणा येईल की काय अशी भीती वाटावी. कितीतरी वेगवेगळी आहेत ही माणसे, सुशिक्षित, म्हटलं तर काही अशिक्षित, वयस्कर, तरुण, समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातली ही माणसे, उत्पन्नाचा स्तरही म्हणावा तर प्रत्येकाचा वेगळा, पण विमा हा विषय निघाला की त्यांचे वर्तन कसे एका समान स्वार्थी पातळीवर येते, त्यांचे वैचारिक संतुलन कसे एकाच प्रकारे हीन होते, हे बघण्यासारखे आहे. मग तुम्ही पेशंट असा, डॉक्टर असा किंवा एखाद्या हॉस्पिटलचे चालक असा, विमा जणू एक प्रकारचे चेटूक करतो तुमच्यावर. तुम्हाला पटो अथवा न पटो, जणू एका विशिष्ट कटाचा भाग बनून तुम्हाला त्याच्या तालावर नाचणे भाग पडते.

मध्यंतरी माझ्या एका डॉक्टर मित्राचा मला फोन आला. बरीच वर्षे भारताबाहेर राहून तो भारतात परतला होता, नव्याने इथे राहून व्यवसायाची जमवाजमव करीत होता. नव्याने वैद्यकीय व्यवसायात जम बसविणे सोपे नाही आणि तेही अशा थोड्या वाढत्या वयात. साहजिकच स्वतःच्या व्यवसायाबरोबर इतरही काही उद्योग करावे लागतात. त्याचा एक भाग म्हणून तो एका विमा कंपनीसाठी वैद्यकीय सल्लागार म्हणूनही काम पाहत असे. बरेच वेळा माझ्या विषयाशी संबंधित काही बाबींवर तो माझ्याशी बोलत असे. त्या दिवशी त्याचा फोन आला तेव्हा तो थोडासा वैतागल्यासारखा वाटला.

‘अरे, ते कोण दाते नावाचे डॉक्टर माहित्येत का तुला? ते गावातच असतात, तिकडे शनिवार पेठेत का कुठे तरी जवळच त्यांचा दवाखाना आहे? बऱ्यापैकी सिनिअर असावेत, काही कल्पना आहे कसा आहे मनुष्य याची?’ त्याने विचारले.

माझ्या माहितीचे डॉक्टर दाते बरेच वरिष्ठ व्यावसायिक होते, चांगली मोठी प्रॅक्टिस असलेले, चांगले नाव कमावून असलेले. मी जेव्हा माझा व्यवसाय नव्याने सुरु करीत होतो, तेव्हा डॉ. दाते अगदी ऐन भरात असलेले डॉक्टर होते. प्रॅक्टिस असावी तर अशी, दात्यांसारखी, असे आम्हाला वाटावे असा रुबाब त्यांचा होता. मित्राच्या बोलण्यात उल्लेखलेले डॉक्टर हे तेच होते अशी खात्री मी करून घेतली. पण मला हे कळेना की हा त्यांचा असा एकेरी उल्लेख का करत असावा? असे चिडण्यासारखे काय झाले असावे?

‘च्यायला, काय माणूस आहे रे. अरे, त्यांची नुकतीच हार्टची बायपास झालीये, माहित्ये का तुला?’

मला ही कल्पनाच नव्हती.

‘हो?, काही कल्पना नाही बुवा.’ मी उत्तरलो.

‘अरे त्यांची बायपास झाली, त्याची कागदपत्रं आलीयेत माझ्यासमोर. अरे काय वाटेल तशी बिलं लावलीयेत माहित्ये? सर्जनची फी सुद्धा त्याच्या नेहमीच्या फीपेक्षा किती तरी जास्त आणि अॅन्टिबायोटिक्सचा खर्च तर काही विचारूच नकोस, कुठलीही औषधं, कुठल्याही डोसमध्ये वापरल्यासारखी दिसतात. अरे यांना काय वाटतं, आम्हाला काय डोकी नाहीत का काय? आता सांग, कुठला सर्जन अशा सिनिअर डॉक्टरला आपली फी लावेल? पण ठीक आहे, आहे विमा म्हणून लावली फी, तर ती अशी लावेल, नेहमीच्या दीडपट? आणि ही असली इतकी औषधं? ते बिल पाहिलं अन डोकंच सरकलं राव माझं. साले नुसते लुबाडायलाच बसलेत. मी सांगतो, मी तर सॉलिड कात्री लावलीये त्या बिलावर. बघतो काय बोंबा मारतो ते. जाऊ दे ना अपिलात. बघूच काय होतंय.’
दोस्त चांगलाच चवताळला असावा. दात्यांचं बिल जणू एक आव्हान म्हणून त्यानं स्वीकारलं असावं असं वाटलं मला. मी चकित झालो. फारशी प्रतिक्रिया न देता मी फोन खाली ठेवला. काय झाले आहे हे समजणे काही अवघड नव्हते. डॉ. दात्यांनी आपल्या व्यवसायाचा, आपल्या प्रतिष्ठेचा वापर करून बिल आपल्या सोयीनुसार बनवले होते. आपलं आजारपण म्हणजे जणू लागलेली लॉटरी अशी भावना. वेळ आली की डॉक्टर कसा विमासुर बनतो हेच जणू दात्यांनी सिद्ध केलं होतं!

किती तरी महिन्यांनी मी माझ्या दोस्ताजवळ चौकशी केली. डॉ. दात्यांनी काही निषेध केला का, गेले का कुठे अपिलात वगैरे. मला एक खवचट उत्सुकता होती. पण दात्यांनी पुढे काहीही केले नव्हते. विमा कंपनीने जो काही परतावा दिला, तो विना तक्रार स्वीकारला होता. आपल्या गुन्ह्याची ही अप्रत्यक्ष कबुलीच त्यांनी दिली अशी मला वाटले किंवा कदाचित असेही असेल की विम्याचे म्हणून जे काही पैसे मिळाले तेही ‘चोराच्या हाताची लंगोटी’ अशा भावनेने त्यांनी घेतले असतील. एकदा विमाडाव खेळायचेच असे ठरवल्यावर असल्या किरकोळ मानापमानांची ती काय मातब्बरी? वैद्यकीय व्यवसायातल्या खाचाखोचांचा दात्यांचा अनुभव मोठा, माझा मित्र भले कितीही फुशारक्या मारो, दात्यांनी त्यांच्या बिलाचा व्यवहार त्यांच्यादृष्टीने पूर्ण फायद्याचाच केला असणार, अगदी कंपनीच्या नाकावर टिच्चून!

माणसाचा स्वभाव, त्याचे वर्तन एकेक वेळेला कमालीचे स्वार्थी असते. अगदी टोकाच्या स्वार्थाचे दर्शन घडवणारी एक म्हण मराठीत आहे, ‘मेल्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे.’ ही वृत्ती म्हणजे मानवी अधःपाताचा नीचांक अशी समजूत तेव्हा असावी, जेव्हा या म्हणीची रचना कुणा द्रष्ट्या रचनाकाराने केली. डॉ. दात्यांची ही वागणूक पाहिली तर ही म्हणही फिकी पडेल असे नाही वाटत?

आरोग्य विम्यासंदर्भात माझी मते थोडीशी टोकाची विरोधात्मक आहेत आणि आरोग्य विमा हे आजचे दुर्दैवी वास्तव आहे, ती पाश्चात्य संस्कृतीची देणगी आहे. जे जे पश्चिमेकडून येते ते उत्तम असते अशी परतंत्र मानसिकता असणारा आपला समाज आणि हा समज आपल्या मनात दृढ करणारी सरकारी प्रचार यंत्रणा असे असल्यावर याहून वेगळे ते काय घडणार?

‘विमा खपविण्यात सरकारला तो काय रस असणार? आपले सरकार तर लोककल्याणकारी लोकनियुक्त सरकार आहे. विमा हा अर्थ नियोजनाचा भाग आहे. आरोग्य विमा उतरवून लोकांनी आर्थिक नियोजन करावे आणि आजारपणाच्या अडीअडचणीच्या वेळी रास्त आर्थिक लाभ उठवावा अशी लोकहितकारी भावना विम्यामागे आहे, तूच त्याविषयी विनाकारण उलटा विचार करतो आहेस.’ असे म्हणून मध्यंतरी माझ्या मित्राने मला समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा त्याच्या हे लक्षात आले नव्हते की विम्याच्या हप्त्याद्वारे मिळणारा निधी मोठ्या प्रमाणात सरकारी कर्ज रोखे आणि सरकारी योजनांमध्ये गुंतविणे विमा कंपन्यांवर बंधनकारक असते. आणि जेव्हा जेव्हा सरकारी महसुलाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तेव्हा नैतिकता किंवा लोक कल्याणाला तिलांजली देत आर्थिक महसुलाला प्राधान्य देणारे निर्णय तथाकथित लोककल्याणकारी सरकारकडून घेतले जातात. नाही तर मटका बंद करून सरकारी लॉटरी चालू राहिली नसती, एकीकडे बैलांच्या शर्यती बंद करताना घोड्यांच्या शर्यतीला सरकारी प्रोत्साहन मिळाले नसते. व्यसनांकडे सहज झुकू शकणाऱ्या समाजात दारू निर्मितीला परवानगी मिळू शकली नसती. सिगारेट बनवणाऱ्या कंपन्यांना केवळ वैधानिक इशारे लिहून सिगारेट निर्माण करता आली नसती आणि एकदा सरकारी प्रचार सुरु झाला की आजकाल कुठल्याही गोष्टीला जणू धार्मिक सत्याचे स्वरूप येते. मग तो आयोडीन युक्त मिठाचा आग्रह असो किंवा पोलिओ मुक्तीच्या दोन थेंबांचा प्रचार असो. त्याच पवित्र भावनेने समाज विम्याच्या सरकारी आग्रहाकडे बघणार. एके काळी धर्म संस्थांना समाज मनात जे स्थान होते ते आज सरकारी संस्थांना आहे. ती लोकशाहीची गरजही आहे, पण दुर्दैवाने तेव्हाही धर्मसंस्था लोकहितकारी नव्हत्या आणि आजही सरकार लोकहितकारी असेलच अशी खात्री देता येत नाही अन्यथा ज्यातून खूप मोठा वैद्यकीय भ्रष्टाचार निर्माण होतो, वैद्यकीय सेवांच्या किमती वाढतात आणि त्या सेवा सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातात अशा आरोग्य विम्याला अशी सरकारमान्यता मिळालीच नसती, त्याला लगेचच अधिक चांगला पर्याय शोधला गेला असता.
सरकारी प्रचार यंत्रणा जेव्हा आरोग्य विम्याचा प्रचार करते तेव्हा आरोग्य विमा हे एक स्वतंत्र मूल्य होते, त्याला सामाजिक अधिष्ठान प्राप्त होते आणि पर्यायाने लोक विमाशरण होतात. त्याची एक दोन उदाहरणे सांगून हे विमाख्यान आटोपते घेतो.

माझी एक डॉक्टर मैत्रीण आहे. बराच काळ दुबईला राहणारी. मध्यंतरी भारतात आली होती. एक दिवस घाबऱ्या घुबऱ्या अवस्थेत तिचा मला फोन आला. भारतात आल्यावर इतकी गडबड झाली, धावपळ झाली की तिच्या आरोग्य विम्याचे नूतनीकरण करायचे राहूनच गेले. आणि ते करायला जावे तर विमा कंपनी बऱ्याच जाचक अटी लावू पाहत होती. नव्याने वैद्यकीय तपासणी, वाढीव विमा हप्ता असा भूर्दंड तिला पडणार होता. या प्रकाराने ती व्यथित तर होतीच, पण झाल्या प्रकारात विमा कंपनी तिला फसवीत असल्याची भावनाही तिच्या मनात होती. ‘आता मी काय करू?’ असा तिचा एकूण प्रश्न.

मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, यात विमा कंपनी तिला फसवत असण्याचा प्रश्न नव्हता. तिचा जुना विमा आता कालबाह्य झाला होता आणि आता जो विमा उतरविला जाईल त्याचे संदर्भ नवीन असणार होते. तिचे वय आता पन्नाशी ओलांडून पुढे गेले आहे तेव्हा आता नव्याने विमा उतरविताना तो असाच महाग पडणार होता. ‘विमा कंपनीचा आग्रह मान्य करून नव्याने विमा उतरवावा लागणार याला पर्याय एकच, तो म्हणजे विमा न उतरविणे!’

 माझा हा अजब पर्याय ऐकून ती चमकलीच. विम्याशिवाय जगणे कसे शक्य आहे असा यक्षप्रश्न जणू तिच्यासमोर उभा राहिला होता.

तिला समजावताना मी तिला विचारले,’ किती वर्षं झाली तुला हा विमा उतरवल्याला? कल्पना कर, हेच पैसे आज जर तू एखाद्या बँकेत तुझ्याच नावाने गुंतविले असतेस तर अशी वेळ आली असती का? ते पैसे कायम तुझे तुझ्या नावाने तुझ्या पूर्ण अधिकारात तुझ्याजवळ राहिले असते. आजवर तू भरलेल्या विम्याच्या हप्त्यांचे आजचे फलित शून्य आहे हा केवढा तरी तोटा नाही का?’

माझ्या या प्रश्नाने शक्यतांचे एक नवेच दालन जणू तिच्यापुढे उघडले गेले.

 ‘अगो बाई, हा विचारच मी आधी कधी केला नव्हता. आता तू म्हणतोस तसेच करते, नव्याने विमा चालू करण्यापेक्षा बँकेत खातेच उघडते!’ मी खुश झालो, कुणी तरी आपले ऐकले, माझा मुद्दा प्रभावी ठरला याचा आनंद! माझा विजय झाला होता जणू!

मधे बरेच दिवस गेले. ती परत दुबईला गेली असणार. तिच्या विम्याचा विषयही माझ्या डोक्यातून गेला होता, तेव्हा तिचा परत असाच फोन आला. ख्यालीखुशालीचं बोलणं झालं, तेव्हा माझं कुतूहल पुन्हा एकदा जागं झालं.

‘काय झालं गं तुझ्या त्या विम्याचं?’ मी तिला विचारलं.

‘अरे काही विशेष नाही. मी काढलाच शेवटी तो विमा! म्हणजे कायेना, माझ्या नवऱ्याचा विमा होता, आमच्या अनिकेतचाही होता. म्हणजे फक्त माझाच नाही असं झालं असतं ना. मग शेवटी काढलाच मी विमा! शेवटी कशाला उगीच रिस्क घ्यायची, नाही का?’

तिनं विमा काढला याचं मला विशेष आश्चर्य नाही वाटलं, हा एकेकाचा दृष्टीकोन असू शकतो, पण त्यामागे जे कारण तिनं दिलं ते केविलवाणं होतं, वैचारिक दारिद्र्याचं निदर्शक होतं. विमाशरण अवस्था मी जी म्हणतो ती हीच!

आणखी एक प्रसंग आहे. एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये उच्च पदस्थ डॉक्टरांची बैठक चालू होती. हॉस्पिटलची आर्थिक धोरणे ठरविण्याचा कार्यक्रम चालू होता. प्रश्न होता, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना  हॉस्पिटलद्वारे मिळणारी वैद्यकीय सेवा मोफत करावी का या विषयीचा. चर्चा बरीच खळबळजनक होती. दोन गट पडले होते, एकाचं मत होतं, ही सेवा मोफतच असावी. कारण डॉक्टर मंडळी हॉस्पिटलसाठी इतकं काही करतात, तेव्हा कुठं ते व्यवस्थित चालतं, तेव्हा मोफत सेवा हा त्यांचा हक्कच आहे वगैरे.

दुर्दैवाने हॉस्पिटलच्या संचालकांचं मत वेगळं होतं. त्यांच्या मते अशी काहीच गरज नव्हती. ‘प्रत्येक डॉक्टरने आपापला विमा उतरवावा आणि पैसे विमा कंपनीकडून घ्यावेत. विमा प्रोसेस करण्याची मदत फार तर हॉस्पिटल करील.’

काही डॉक्टरांनी याला विरोध केला, विमा काढण्याची सक्ती हॉस्पिटल करू शकत नाही, असा तांत्रिक मुद्दा काढला, तेव्हा मात्र संचालक संतापले आणि म्हणाले-‘ हा विषय याहून अधिक चर्चेला येऊ नये. ज्या डॉक्टरांना आपल्या प्रकृतीची चिंता आहे, जे आपल्या आरोग्याची कदर करतात, ते विमा काढतील, ज्यांना ती कदर नसेल ते नाही काढणार. हॉस्पिटल याहून अधिक काही करणार नाही.’

ही म्हणजे अगदी गंमतच झाली. उत्तम आहार, विहार, व्यायाम यातून आरोग्य राखले जाते, ही एके काळची(?) आमची कल्पना, ती आता जणू कालबाह्य झाली आहे आणि त्या ऐवजी आरोग्य विमा काढणे हीच जणू आरोग्याची गुरुकिल्ली आहे असे झाले आहे काय? आणि हे असे एका हॉस्पिटलच्या डॉक्टर संचालकाचे मत असावे ही किती गंभीर आणि विनोदी गोष्ट आहे. समाज किती विमाशरण होत चालला आहे, याचे याहून समर्पक उदाहरण दुसरे कुठले असेल?
(समाप्त)
 डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०

1 comment:

  1. विम्याचे किस्से आवडले. माझ्या पोलिस बिनतारी विभागातील सेवेत मला हार्ट अटॆक च्या वेळी ( १९९२ साली )मेडिकल रिएंबर्समेंट या प्रकाराचा अतिशय टिपिकल सरकारी वाईट अनुभव आला.ससून ने बिल नाकारले. निदान मायोकार्डियल इन्फार्कशन असे हॊस्पिटलने लिहिले होते. जीआर मधे मायोकार्डियल इन्फार्क्षन असे लिहिले नव्हते माझ्या डॊक्टरने मायोकार्डियल इन्फार्क्षन व हार्ट अटॆक एकच आहे असे सर्टिफिकेट देउनही काम होईना. शेवटी ससून मधे लाच द्यावी लागली.मग ज्या कागदावर नामंजूर लिहिले होते त्यावरच मंजूर असे लिहून दिले. त्यानंतर मग पुढे पोलिस महासंचालकांच्या कारकुनांनी आडवे लावले. कागदी घोड्यात बराच त्रास दिला. कागदपत्र गायब केले व नंतर विचारले ओरिजिनल ड फॊर्म जोडावा जो त्यांनीच गायब केला असावा. कारण कागदांचा प्रवास अनेकदा वेगवेगळ्या कार्यालयातून झाला होता. शेवटी वैतागून मी पोलिस महासंचालकांना लिहिले कि मला आता तुमची मेडिकल रिएंबर्समेंट नको आहे. भीक नको पण कुत्रे आवर. लाच म्हणुन दिलेले पैसे तत्वचूती म्हणून छ्ळत राहिली. वर तेले गेले तुप गेले हाती धुपाटणे आले. या देशात स्वच्छ राहायचे म्हणजे फार तर लाच मी घेणार नाही असे म्हणता येते जे मी केले पण लाच देणार नाही असे म्हणुन जगता येत नाही.
    असो आपला ब्लॊग वाचून आम्ही तर आपले फॆन झालो बुवा!

    ReplyDelete