मागील लेखावरून पुढे चालू-
किस्सा तिसरा
डॉ. खरे. शहरातले
प्रतिष्ठित नावाजलेले डॉक्टर. वयाने माझ्याशी वडिलकीचे नाते असलेले. ते नुसतेच
डॉक्टर नव्हते, तर डॉक्टर असलेले सामाजिक कार्यकर्तेसुद्धा होते. आपल्या
व्यवसायाइतकाच वेळ ते अशा वैद्यकीय सामाजिक कामांना देत. कित्येक वैद्यकीय
संघटनांमध्ये ते सक्रिय असत. व्यक्तिगत पातळीवर काय किंवा सार्वजनिक पातळीवर काय,
कुठेही डॉक्टरवर अन्याय झाला किंवा होण्याची शक्यता जरी दिसली तरी अशा वेळी डॉ. खरे
सामोरे येत, त्या अन्यायाला योग्य त्या पातळीवर वाचा फोडत आणि संबंधितांना न्याय
कसा मिळेल हे पाहत. अशा वेळी ते आम्हा डॉक्टर मंडळींचे जणू तारणहार असत. साहजिकच
डॉक्टरांना वैद्यकीय वर्तुळात खास स्थान होते. एक वेगळाच आदर होता त्यांच्याविषयी.
डॉ. खरे यांचा आणि माझा
परिचय अशाच कुठल्या तरी अन्यायजनक परिस्थितीत झाला. त्यावेळी त्यांनी जी मदत केली,
ज्या हिरीरीने न्यायाचा पाठपुरावा केला ते पाहून मी फारच प्रभावित झालो होतो. तो
काळ असा होता की मी त्यांच्या प्रभावाखालीच होतो जणू. न्यायाची जाणीव, त्यासाठी
लढण्यासाठी लागणारी अंगभूत धमक आणि यातून दिसणारा त्यांचा धाडसी आणि प्रेमळ स्वभाव - मला ते आदर्श
व्यक्ती वाटत. आपला त्यांच्याशी खास परिचय आहे याचाही एक अभिमान वाटे. आमचा जसा
परिचय झाला तसा मीही त्यांच्या अगदी खास वर्तुळात ओढला गेलो. त्यांचा माणूस झालो.
त्यांचा फोन त्या दिवशी
हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा मी अगदी बाहेर पडण्याच्या विचारातच होतो. अचानक ह्या
वेळेला त्यांचा कसला फोन असं विचार करतच मी फोनपाशी गेलो.
‘डॉक्टर, एक छोटंसं काम
आहे. माझे एक स्नेही आहेत दिवसे नावाचे. त्यांना ८-१० दिवसात परदेशात जायचं आहे. काही
तरी कामासाठी. मोठी असामी आहे. मोठ्या
हॉटेलचे मालक आहेत. जरा गडबडीत आहेत. त्यांचा प्रवास विमा करायचा होता. तर आत्ता
पाठवू का? म्हणजे काय आहे- अशा लोकांना
वेळ नसतो हो फारसा. म्हणून म्हटलं, आधी तुमच्याशी बोलून घ्यावं, तुम्हाला वेळ असेल
तर लगेच पाठवतो. काय?’ डॉक्टर म्हणाले.
किचित त्रासलो मी. पण ते
आतून. घरी जाण्यासाठी एकीकडे उत्सुक आणि म्ह्टलं तर हे असलं विम्याचं फालतू काम.
खरं ते संध्याकाळपर्यंत कधीही माझ्या सोयीच्या वेळेत होऊ शकलं असतं. असल्या
कामासाठी उगाच थांबून राहायचं म्हणजे – पण काही बोलण्याची परिस्थितीच नव्हती. डॉ.
खरे विनंती करतात आणि त्याला आढेवेढे? नाराजी गिळून थांबण्याखेरीज आणि दिवस्यांची
वाट पाहण्याखेरीज मी काय करू शकत होतो?
‘हो,हो, पाठवा नं, अगदी जरूर
पाठवा. मी इथेच हॉस्पिटलमध्ये आहे. अनायासे घरी जायला निघण्यापूर्वीच तुमचा फोन
आलाय. थांबतो मी. लगेचच पाठवा त्यांना.’ मी म्हणालो. एरवी डॉ. खरे आपल्यासाठी
धावपळ करतात, आज आपण त्यांच्यासाठी एवढे साधे काम करू नये? आपल्या मनात किंतु
यावा? या विचारानेच खरं तर मी आतल्या आत खजील झालो. हॉस्पिटलमधेच थांबून वाट पाहत
राहिलो. जे कोण दिवसे येऊ घातले होते त्यांची.
माझ्या मनाची एक खासियत
आहे. कुठल्याही कामासाठी कुणी माझ्याकडे आलं, कुठलाही बडेजाव नको, अभिनिवेश नको,
नुसतं काम घेऊन आलं तरी मी त्याचं काम करतो. जमेल तेवढ्या प्रेमानं, आपुलकीनं
करतो. पण एखाद्या साध्या कामासाठी कुणी गरजेपेक्षा जोर लावतोय, उगीचच बडेजाव मिरवू
पाहतोय अशी भावना आली की मग मात्र आखडतोच मी. दिवस्यांवर मी त्यामुळेच थोडा खार
खाऊन होतो. अगदी पूर्वी, माझी ही प्रतिक्रिया जाणवावी अशी स्पष्ट असे. ती कुणाला
दुखावून जाईल इतकी प्रखर असे. पण दिवस्यांचा हा प्रसंग घडला तेव्हा हे सगळं मनात
ठेवून वरकरणी प्रेमभरानं वागू शकेन इतपत बनेल मी झालो होतो. डॉ. खरे मला आदरणीय
होते. दिवसे त्यांचे खास स्नेही होते. यासाठी सुद्धा त्यांची ही मानभावी वर्तणूक
मला मान्य होती. अगदी मुद्दाम थांबून वेळात वेळ काढून त्यांचे विम्याचे काम मी
करणार होतो. त्यासाठी दिवस्यांची कितीही वेळ वाट पहावी लागली तरी मी तयार होतो.
जवळ जवळ अर्धा तास गेला
असेल. दिवस्यांचा पत्ता नाही. मी थोडा अस्वस्थ होऊ लागलो. आधीच फालतू कामाला नसती
घाई करायची आणि वर कुणा दुसऱ्यांचा त्यासाठी वेळ खायचा. काय करावे? थांबावे की
जावे सरळ निघून असा बंडखोर विचार माझ्या मनात येऊ लागलेला, तोच एक कुणी गणवेशधारी
इसम, ‘डॉक्टर कुठायत’, अशी चौकशी करत हॉस्पिटलमध्ये आला. दिवसे माझ्या
माहितीप्रमाणे एका मोठ्या हॉटेलचे मालक होते. ते अशा अवतारात येतील असे मला वाटले
नव्हते. काही तरी घोटाळा दिसतोय असा मी विचार करेतो तो मनुष्य समोरच येऊन उभा
राहिला.
‘डॉ. मंगरुळकर?’, त्याने
प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले. मी होकारार्थी मान हलवताच त्याने आपल्या
काखेतल्या पिशवीतून एक चिट्ठी काढून माझ्या हातात दिली. ‘सरांनी दिलीय.’ तो
म्हणाला.
मी चिट्ठी घेतली. एक
कागदाचा चिठोरा होता तो. त्यावर फक्त ‘श्री.
दिलीप दिवसे. वय ५५’ एवढाच मजकूर होता. मी वर पाहिलं. माझ्या चेहऱ्यावरील प्रश्न
बहुधा त्यानं वाचला असावा. ‘दिवसे सायबांनी चिट्ठी दिलीय, आणि यावर सही मागितलीय.’
असं म्हणून त्यानं विम्याची कागदपत्रं माझ्यासमोर टाकली. आता माझ्या लक्षात आलं.
समोर उभा असलेला मनुष्य दिवस्यांचा बहुधा शिपाई होता. दिवसे कामात व्यग्र होते.
त्यांना बहुधा वेळ नव्हता. सबब दिवसे या व्यक्तीला न तपासताच आणि न बघताही मी
त्यांचे त्यांनी दिलेले नाव त्या कागदपत्रांवर टाकून सही करायची होती फक्त. किती
किरकोळ काम!
मराठीतल्या काही म्हणी फार
अर्थवाही आहेत. वेळ येते तेव्हाच त्यांच्यामागच्या सखोल विचाराचा प्रत्यय येतो.
‘तळपायाची आग मस्तकात जाणे’ हीही एक अशीच म्हण. ती कशी आणि किती सार्थ आहे हे मला
त्या दिवशी तेव्हा तिथल्या तिथे पूर्णपणे जाणवलं. माझ्याबाबतीत जेव्हा ते घडलं
तेव्हाच खरंखुर जाणवलं. दिवस्यांची वागणूक मला पूर्ण अरेरावीचीच वाटली. किती गृहीत
धरतो हा मनुष्य! एक तर विनाकारण घाई करून फुकटात काम करून घ्यायचं आणि तेही असं.
स्वतः समक्ष येऊन भेटण्याची तसदीसुद्धा न घेता? अगदी विनाकारण खोटेपणा करायचा आणि
दुसऱ्यालाही करायला लावायचा? माणूसही न बघता, न तपासता चक्क कागदावर सही घ्यायची?
डॉक्टर म्हणजे काय वाटतो तरी काय यांना? काही कारण नसताना उगाच कुणी तरी येऊन कानाखाली
वाजवून जावे असेच तेव्हा मला वाटले. डॉ. खऱ्यांचा मोठेपणा, त्यांचे आणि माझे
परस्पर संबंध यांचा किती दुरुपयोग करतात हे? डॉक्टर या एकूण संस्थेचीच कुणी थट्टा
करतंय अशी भावना आली माझ्या मनात.
एवढे क्रांतिकारी विचार
माझ्या मनात आले खरे, पण तरी मी वरकरणी शांत असल्याचा आविर्भाव मात्र टिकवून होतो.
जणू जे काही घडत आहे ते अगदीच साधे सोपे आणि सरळ आहे असा तो आविर्भाव.
‘साहेबांना स्वतःला यावं
लागेल हो इथे. त्यांना तपासावं लागेल. इ.सी.जी. लागेल. त्याच्याशिवाय कसं होणार?’
मी म्हणालो.
‘नाही, सायबांना वेळ नाही.
गडबड आहे. ते खरे डॉक्टरांशी बोललेत. खरे डॉक्टर म्हटले, मी बोललोय डॉक्टरांशी. तू
सरळ लगेचच जाऊन आण सही डॉक्टरांची म्हणून.’
आता मात्र कमाल होती. डॉ.
खऱ्यांना हे लगेचच कळवले पाहिजे. ते तर चिडतीलच, हे ऐकून. पेशंटसुद्धा न जाता सही
घ्यायची म्हणजे?-
मी ताडकन फोन उचलला. खरे
लाईनवर आलेच.
‘सर, तुमचे ते दिवसे.
त्यांच्याकडून कुणी मनुष्य आलाय. नुसतीच सही मागतोय. दिवसे आलेलेच नाहीत.’ मी
म्हणालो.
पलीकडून मोठा हसण्याचा आवाज
आला. ’डॉक्टर, मघा मी तुम्हाला म्हटलं ना, ते खूप बिझी आहेत. त्यांना वेळ नाही.
अहो, नुसती सही तर आहे. टाका करून. आपलाच माणूस आहे.’
अरे बाप रे, म्हणजे हा जो
प्रकार चालू होता, तो डॉ खरे यांच्या संमतीने, नव्हे प्रेरणेने चालला होता. स्वतः
डॉ. खरे यांनाही यात काही वावगं वाटत नव्हत तर. मी चक्रावलो.
‘नाही, म्हणजे, ते बिझी
असतील तर त्यांना आपण आल्याआल्या तपासू आणि पाठवू. त्यांचा वेळ जाणार नाही असं
पाहू. अगदी हव तर घरी पाठवतो मी कुणाला तरी,’ मी प्रतिवाद केला.
“नको हो, कशाला उगाच व्याप
वाढवताय. नुसती टाका सही अन द्या सोडून. कुठं फालतू गोष्टीत वेळ घालवता?’ डॉक्टर
म्हणाले.
मी बधणार नव्हतो. ‘पण सर,
त्याला इ.सी.जी. लागतो. तो तर काढावा लागेल ना.’ माझ्या मते मी रामबाण अडचण
सांगितली होती. इ सी जी साठी तर दिवस्यांना यावे लागेलच ना, त्याचे काय?
पण खरेही ऐकणार नव्हते.
‘अहो, हॉस्पिटलमधेच आहात नं
तुम्ही. तिथे असेलच ना कुणाचा तरी इ.सी.जी. टाका लावून आणि द्या सही’ ते म्हणाले.
प्रसंगाचा इथून पुढचा भाग
फारसा वर्णन करण्याजोगा नाही. मी अर्थातच याला नकार दिला. दिवसे यांना यावे लागेलच
यावर ठाम राहिलो.
‘ठीक आहे, पटवतो मी
त्यांना,’ असें म्हणून डॉक्टरांनीही फोन ठेवला.
नंतर मी वाट पहिली. दिवसे
आले नाहीत. डॉ खरे काही पुन्हा बोलले नाहीत. नंतरही डॉ. खरे आणि मी एकमेकांना किती
तरी वेळा भेटलो. हा विषय बोलण्याचे धैर्य ना मला झाले, ना त्यांना त्याची काही गरज
वाटली. आमच्या दोघांच्या संबंधात मात्र एक अबोल दुरावा त्यानंतर आलेला मला जाणवत
राहिला.
विमा आणि त्यातून
उफाळणाऱ्या मानवीय दुष्प्रवृत्ती या संदर्भात मला हा किस्सा महत्त्वाचा वाटतो.
सामाजिक कार्यामध्ये अग्रसर असणाऱ्या एका विचारी डॉक्टरची विम्यासंदर्भात अशी घसरण
होते तर सामान्य इतरेजनांची काय कथा.
या किश्शाला विम्यापलीकडेही
एक संदर्भ आहे. ‘नरेची केला हीन किती नर’ अशी आणखी एक अर्थवाही म्हण मराठीत आहे. इथे
एका डॉक्टरांनीच डॉक्टरांना, त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाला किती खालच्या, हीन पातळीवर
आणून सोडलं होतं. त्यासाठी कुठली म्हण आहे ?
क्रमशः पुढे चालू-
डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०
No comments:
Post a Comment