मागील लेखावरून पुढे चालू-
पहिला किस्सा
श्री. नगरकर, वय वर्षे
सुमारे अठ्ठावन. नगरकरांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. माझ्याकडे
हॉस्पिटलमध्ये दाखल होते. वेळीच औषधोपचार झाले. अगदी कुठल्याही विशेष अडचणी न होता
नगरकर बरे झाले. आपला पेशंट असा विना तक्रार बरा झाला की डॉक्टरला एक समाधान असतं,
त्या समाधानात मी होतो. आज नगरकरांना डिस्चार्ज देणार होतो. हार्टचा पेशंट बरा
होतो, घरी जातो, ही घटना डॉक्टर म्हणून आम्हाला विशेष नव्हे, पण पेशंटच्या,
त्यांच्या नातलगांच्या दृष्टीने ती एक मोठी घटना असते, तो एक सुवर्णक्षणच वाटतो त्यांना.
आपल्याला बरे करणाऱ्या डॉक्टरविषयी अतिशय कृतज्ञ वाटावे असा काळ असतो तो.
‘डॉक्टर, तुम्ही होतात म्हणून बर’, ‘तुमच्यामुळेच बर का, मी नेहमीच हिला म्हणतो, आपले डॉक्टर आहेत ना, तोवर आपल्याला काही काळजी नाही’ असले उद्गार ऐकायचे, आणि त्यावर काही तरी आध्यात्मिक प्रतिक्रिया द्यायची- ‘त्यात कायेहो, डॉक्टर म्हणून आमचं कामच असतं ते.’ ‘शेवटी डॉक्टरच्या तरी काय हातात असतं, जे काय व्हायचं ना ते सगळं वर ठरतं, आम्ही काय नावाचे धनी फक्त’ असलं काही तरी साचेबंद उत्तर द्यायचं अशी प्रथा. कितीही निरिच्छतेचा आव आणला, वर्षानुवर्षे हेच काम करून कितीही निगरगट्ट झालो म्हटले तरीही असे चार उद्गार ऐकल्याशिवाय चैन पडू नये इतकी त्यांची सवय झाली असते.
नगरकरांच्या खोलीत गेलो
तेव्हा माझी अशीच अपेक्षा असणार. पण आजचा दिवस वेगळा होता. माझी अपेक्षा पूर्ण न
करणारा होता.
मी नेहमीच्या सराईतपणे खोलीत
गेलो. नगरकर, त्यांच्या पत्नी माझी वाटच पाहत होते.
‘काय म्हणतेय तब्बेत?
ठणठणीत दिसते. जायचंय ना घरी? की आवड लागली हॉस्पिटलची? राहणार इथेच?’ मी माझ्या
नेहमीच्या थट्टेखोर आवाजात विचारले. यावर अपेक्षा अशी की नगरकरांनी, त्यांच्या
पत्नीने एक सुरात ‘छे छे डॉक्टर, तुमचीच
तर वाट पाहतोय सकाळपासून, कधी एकदा घरी जातोय असं झालंय आम्हाला.’ असं म्हणावं आणि
मग मी खुदकन हसून ‘हो’ म्हणावं. नेहमीचाच लपंडाव. पण मी मघा म्हटलं ना, तसा आजचा
दिवस वेगळा होता. नगरकर काय, किंवा त्याच्या सौ. काय, कुठल्याच विनोदी मनःस्थितीत
नव्हते. थोडे गंभीरच होते. घरी जाण्याची लालूच त्यांना खूष करू शकली नाही.
‘नाही, ते ठीक आहे, डॉक्टर,
पण हल्ली हार्ट पेशंटची ती काय ‘angiography ’करतात ती नाही का करायची आपण?
कुणी तरी म्हणत होतं की ती एकदा केली की बर असतं. म्हणजे काय की मनात शंका नको. जे
काय व्हायचं ते लगेचच होऊन जाईल, म्हणजे समजा बायपास ऑपरेशन किंवा तसलं काही
लागणार असेल तर लगेचच होऊन जाईल. नाही का?’ नगरकरांनी मला प्रश्न केला खरा पण ती
सूचना आहे हे ओळखण्या इतपत हुशार मी नक्कीच होतो.
नगरकरांना ‘angiography’
करून घ्यायची होती हे मी ओळखले, इतकेच नव्हे, तर जरूर असेल तर बायपास ऑपरेशनसुद्धा
त्यांना हवे होते इतके सगळे ह्या बोलण्यातून मला समजले. खरं तर या सगळ्याच विषयावर
आमचं वेळोवेळी बोलणं झालेलं होतं, हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर दोन-तीन आठवड्यांनी
आपण एक stress test करणार, त्यात जर काही दोष आढळला तरच पुढच्या तपासण्या करणार हे
सगळं खरं तर त्यांच्याशी वेळोवेळी बोलून झालं होतं, ‘डॉक्टर, आम्ही काही तुमच्या
शब्दाबाहेर नाही’ असं आश्वासनही त्यावर त्यांनी मला दिलं होतं. आज अचानक हा बदल का
व्हावा हे मात्र मला कळेना. ही तर चक्क कोलांटउडीच होती. आणि त्यातूनही विशेष हे
की इथे चक्क पेशंटच हौसेनं ऑपरेशनची मागणी करत होता. डॉक्टरला आग्रह करून आडून
आडून ऑपरेशनच्या दिशेने ओढू पाहत होता. मी थोडासा वैतागलो. पुन्हापुन्हा त्याच
विषयावर तेच चऱ्हाट लावायचे म्हणजे काय? डॉक्टर म्हटलो तरी किती सहन करणार असला
काही तरी विचार माझ्या मनात आला असावा.
माझ्या कपाळावर छोटी आठी आली.
‘हे पहा, या विषयावर आपण
वेळोवेळी बोललोच आहोत. पुढच्या तपासण्या करण्याची गरज आहे किवा नाही हे ठरवायला
आपल्याला थोडा वेळ थांबावं लागणार आहे. शेवटी पुढची तपासणी काय किंवा ऑपरेशन काय,
या सगळ्यात धोका असतो, शेवटी तो जिवाचा खेळ आहे. असे निर्णय उगाच घाईने घेत
नाहीत.’ वरकरणी न रागावता मी नगरकरांना समजावले, त्यांच्या पत्नीला समजावले.
‘नाही, आम्ही काही तुमच्या
शब्दाबाहेर नाही. कुणीकुणी कायकाय बोलतं, आम्ही ते तुम्हालाच विचारणार नाही का? आणि
खरं सांगायचं तर यांच्या नोकरीचे आता दोन महिनेच उरलेत, म्हणजे तेव्हा त्यानंतर
त्यांचा विमा तेव्हा संपणार. म्हणून काही खर्च उपटणारच असेल, तर तो त्या आधी झाला
तर बरा. असा आपला आमचा विचार. पण शेवटी, काय आपली तब्बेत महत्त्वाची. त्यात थोडाच
पैशाचा विचार करून चालेल?’ सौ. नगरकर
म्हणाल्या.
आता कुठे माझ्या डोक्यात
प्रकाश पडला. म्हणजे विम्याचा परतावा मिळावा, यासाठी नगरकरांची धावपळ चालली होती,
त्यासाठी वेळ पडली तर घाई करूनसुद्धा ऑपरेशन करण्याची त्यांची तयारी होती. हे विमा
माहात्म्य मला प्रथमच समजले. पण तरीही मी त्यांना योग्य तोच सल्ला दिला आणि
त्यांनीही तो विश्वासाने मानला यात मी खूष होतो. कितीही झालं तरी ऑपरेशन कुणाला
आवडेल असा माझा कयास होता. दोन आठवड्यांनी पुढल्या तपासणीचा दिवस ठरवूनच मी
नगरकरांना घरी पाठविले.
कामाच्या गडबडीत दोन आठवडे
कसे गेले ते समजले नाही. ठरल्या दिवशी नगरकर तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आले. आम्ही
वाटच पाहत होतो. ‘चला, बेडवर तयारीसाठी या,’ असे मी म्हणतो तर नगरकर काही जागचे
हलेनात. माझ्याकडे पाहत संकोचाने उभेच राहिले. काही तरी घोटाळा असावा असे मला
वाटले.
‘करायची ना टेस्ट?’ मी म्हणालो, तसे कसेबसे पुढे होत नगरकर म्हणतात,
‘डॉक्टर, मी बराच विचार केला. मला वाटतं तुम्ही मला आपली angiogrphyचीच चिट्ठी
द्या. ही तपासणी नको. मला वाटतं थेट angiographyच करावी.
आता मात्र मी चकित झालो.
नगरकरांनी पुन्हा निर्णय बदलला होता.
‘अहो, आलाच आहात तर आधी ही
तपासणी करूनच ठरवू ना. ह्यात दोष आला तर आहेच की पुढे ती तपासणी.’ मी म्हणालो.
‘नकोच ते, डॉक्टर, ही
तपासणी चांगली आली तर? नकोच. मला तुम्ही सरळ angiographyचीच चिट्ठी द्या.
नगरकर अगदी पूर्ण ठरवून आपला
निर्णय ठामपणे घेऊनच आलेले दिसले. माझा कुठलाच युक्तिवाद त्यांच्यासमोर चालणे आता
शक्य नव्हते. एव्हाना मीही वैतागलो होतो. पिसाळलो होतो. विम्यासाठी चाललेला त्यांचा
हा खटाटोप मला असह्य वाटू लागला होता. पेशंटच्या असल्या आग्रहाला बळी पडून मी माझी
तत्त्वे सोडावीत असे मलाही वाटेना. मीही हट्टाला पेटलो.
‘मिस्टर नगरकर, मला जी चूक
वाटते, अश्या तपासणीसाठी मी तुम्हाला चिट्ठी देऊ शकत नाही. तुम्ही एक तर मी सांगतो
तसे वागा, ही stress test करून घ्या, नाही तर इतरत्र कुठेही जाऊन तुम्हाला पाहिजे
तशा तपासण्या करून घ्या.
‘पण तुमच्या चिट्ठीशिवाय
कोण करेल माझी angiography?’ नगरकर म्हणाले.
‘त्यात काहीच अडचण नाही.
कुठल्याही हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांना विनंती केलीत तर कुणीही करेल ही टेस्ट.
त्यासाठी काही माझी चिट्ठी लागत नाही.’ मी निक्षून म्हणालो. मला वाटत होतं की हा
रामबाण ठरावा. याने तरी नगरकरांचा विवेक जागा व्हावा.
पण ते होणे नव्हते. नगरकर
ताडकन उठले. काहीही न बोलता माझ्यासमोरून उठून निघून गेले. एकदाही वळून माझ्याकडे
न बघता ते निघून गेले. त्यांचा चालण्याचा वेग आणि त्वेष असा होता की मलाच अपमानित
वाटावे.
नगरकरांचे पुढे काय झाले हे
मला आजतागायत समजलेले नाही. विम्याच्या परताव्यासमोर त्यांना आपला विवेक जागवता
आला नाही. आपल्या प्रकृतीच्या सुरक्षेपेक्षा त्यांना विमा महत्त्वाचा वाटला हे
महत्त्वाचे! म्हणजे गंमत पाहा,
बायपासचे ऑपरेशन फुकट होईल ही आशा इतकी प्रबळ ठरली की त्यापुढे त्यांना इतर सगळे
तुच्छ वाटले. अगदी एखाद्या वेळेस बायपास करावीसुद्धा लागू नये अशी आपली तब्बेत असेल, इतकी
चांगली असेल ही शक्यता अजमावणे सुद्धा त्यांना धोक्याचे वाटले. तोट्याचे वाटले. हा
विमाजनक अधःपातच म्हणायचा, नाही का?
आपल्या विमा शब्दकोषात
नगरकरांची गणना आपण ‘विमासुर’ अशी करू शकतो.
क्रमशः पुढे चालू
डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०
great writing.
ReplyDeletevery common incidence nowadays.
Whats wrong in that ?
ReplyDeleteMy dad has a cancer , they did various x ray several times , then sonography then scan and then pet scan .. in x ray , when they found something some suspicious things , i request doctor to go for a city scan , but they wasted few months for some more stages,
Lets keep insurance aside, if patient is worrying about his health and want to come for a final conclusion immediately , he has a right to request a accurate test. i am sure angiography gives better results.
if you look at this case , without insurance angle, i hope u understand the concern.