किस्सा चौथा
(मागील लेखावरून पुढे चालू-
शिल्पा गावडे, सुमारे तीस
वर्षांची अविवाहित मुलगी. तिला नक्की कुणी माझ्याकडे पाठवले ते आठवत नाही. पण
कुठल्या तरी चांगल्या परिचयातून ती आली होती एवढे मात्र नक्की. शिल्पाची तब्ब्येत
बरी नसे, वारंवार उलट्या, जुलाब होत. बारीक सारीक बरेच उपचार झालेले तरीही बरे
वाटेना म्हणून एकदा माझे मत घ्यावे अशा हेतूने कुणा भल्या माणसाने तिला माझ्याकडे
पाठवले होते. (माझी गणना आता थोड्या वरिष्ठ डॉक्टरांमध्ये व्हावी अशा काळातली ही
गोष्ट आहे!)
संध्याकाळची वेळ.
दवाखान्यात फारशी गर्दी नव्हती, तेव्हा ती आली. समोरच्या खुर्चीत बसली. सावळा
वर्ण. थोडी सडसडीत पण आटोपशीर वाटावी अशी अंगकाठी. चेहऱ्यावर कुठली कुठली
सौंदर्यप्रसाधने चोपडलेली. भडक रंगाचे लिपस्टिक ओठावर. अंगावर कपडेसुद्धा थोडे भडक
रंगाचे, छानछोकीचे. सहज पाहिले तरी लक्ष वेधून घेतले जावे असा एकूण आविर्भाव.
एकटीच होती. समोर बसली तसे मी तिच्याकडे पाहिले.
‘काय खास प्रॉब्लेम?’- हाच
एक प्रश्न मी माझ्या सगळ्याचा पेशंटना प्रथम विचारतो, अशासाठी की त्यांनी बोलते
व्हावे.
‘पचनाचा प्रॉब्लेम हाये सर, कायबी पचत नाय. मधनं मधनं सारख्या उलट्या नाय तर जुलाब, उलट्या नाय तर जुलाब, असा
प्रकार चाललाया. भूक तर काडीची नाय, थोडं काय खायाला जावं तर हे निसते जुलाब, नाय
तर वांत्या. दोन तीन वरीस झाली बघा, तब्बेत सुदिक बघा ना पार उतारली,’ असं म्हणत
तिनं आपला दंड उचलून दाखवला खरा, पण कुपोषणाचं कुठलंच चिन्ह ना त्या दंडावर होतं
ना कुठं इतरत्र शरीरावर होतं. सर्वसाधारण ‘सौष्ठवपूर्ण शरीर’ असं ज्याचं वर्णन
केलं जाऊ शकेल अशा यष्टीची होती शिल्पा. तरीही वरकरणी काही प्रतिक्रिया न देता पण
सहानुभूतीने तिचा दंड पाहत मी संमतीदर्शक मान हलवली. माझ्या या सहानुभूतीने शिल्पा
खुलली, मोकळेपणाने बोलू लागली.
चौथी-पाचवी पर्यंतचं शिक्षण
झालेली, लग्न न होताच कुठल्याशा छोट्या कंपनीत जॉब ऑपरेटर सारखे अर्धतांत्रिक काम
करणारी शिल्पा. दारूची सवय असलेला बाप. धुण्याभांड्याची कामे करणारी आई. कुठल्या
तरी केबलवाल्याकडे कामाला असलेला एकुलता एक भाऊ. शिल्पाची कौटुंबिक पार्श्वभूमी ही
अशी. मुलगी मिळवती असल्यानं आई-बापाची लाडकी असणार. नाही तर थोडीच तिच्या
दुखण्याची एवढी दखल त्यांनी घेतली असती?
जास्त माहितीसाठी म्हणून
शिल्पानं तिची जुनी कागदपत्र आणली होती. कुठली कुठली चुरगाळलेली कागदपत्र,
चिठ्ठ्या चपाट्या, त्यावर लिहिलेली सांकेतिक औषधांची नावं. मेडिकल स्टोरची नावं
असलेले कागद. त्यांच्या खाली छापलेल्या जाहिराती- ‘वरील औषधे रास्त भावात मिळतील’
अशा सारख्या. असा सगळा पुरावा धुंडाळत मी बसलो होतो. कुठे काही तरी धागा दोरा
मिळतो का की जेणेकरून तिच्या आजारावर प्रकाश पडेल. पण आजारपण म्हणावे असा कुठलाच
पुरावा हाती लागेना. सगळाच नुसता डॉक्टरी कचरा.
हे असले पेशंट साधारणपणे
मानसिक विकारग्रस्त असतात. तक्रारी ऐकाव्यात तर अशा आणि इतक्या की वाटावे कसे बरे
जगत असतील हे लोक आणि खोलात जाऊन तपासावे तर आजाराचा पत्ताच लागू नये. ‘शरीरदृष्ट्या
निरोगी’ हेच खरे तर यांच्या रोगाचे निदान. पण हे त्यांना पटवायला फार अवघड. महाकठीण.
आता हे कठीण काम करायचे कसे आणि तुझी तब्बेत चांगली आहे हे शिल्पाला पटवायचे कसे -
अशा अवघड विवंचनेत मी होतो, तर शिल्पाने कागदाची आणखी एक थप्पी माझ्यासमोर टाकली. या
कागदांवर तिचा अगदी दोन दिवसांपूर्वीचा वैद्यकीय इतिहास लिहिलेला होता. कुठल्याशा
‘भास्कर’ रुग्णालयाची कागदपत्र होती ती. पुन्हा एकदा तसल्याच चिठ्ठ्या. कुठलीतरी
औषध विकत आणण्यासाठीच्या सूचना. म्हणजे शिल्पा या कुठल्या तरी हॉस्पिटलात अॅडमिट
होती तर. पण हॉस्पिटलमध्ये जाऊन राहण्याएवढा कुठलाच आजार मला दिसेना. दीड दोन वर्ष अधून मधून जुलाब, उलट्या असा
आजार, यासाठी अॅडमिट?
‘अगदी अॅडमिट होण्यासारखं
इतकं काय झालं होतं तुला? किरकोळ तर तक्रारी दिसतात’, मी पुटपुटलो अर्धवट स्वतःशी,
म्हटलं तर अर्धवट प्रश्नार्थक शिल्पासाठी उद्देशून.
‘नाय सर, मी काम करती, तिथ
त्येंनी माझा विमा काढलाय नव्ह. त्येचा पैका नाय भेटत त्येच्या बिगर. दवाखान्यात
ऱ्हावच लागतंय ना, म्हून थितं ऱ्ह्यायलेली. दवाखान्याचा मालक माझ्या भावाचा दोस्त
हाय ना त्यो म्हटला तू ऱ्हाय हिथं खाटंवर येक दोन दिसाकरता. विम्याचं मी बघतुया.
त्येची ही समदी कागदं!’
शिल्पा भाबडेपणानं सांगत
होती. आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे विम्याच्या परताव्यात सगळा खर्च
उरकून तपासण्या करून घेण्याचा ‘विमाडाव’ खेळत होते हे लोक. एव्हाना मीही अनुभवी
डॉक्टर झालो होतो. अशा युक्त्या माझ्या तत्काळ लक्षात येत असत (असं मला वाटे!).
शिल्पा आणि तिचा डॉक्टर खेळत असलेला डाव मी ओळखला यावर मी खूष झालो. कुणाचाही बनाव
ओळखला की एक मिश्किल आणि समजूतदार हसू आपल्या चेहऱ्यावर येतं तसं हसू माझ्या
चेहऱ्यावर आलं असणार. माझी उत्सुकता चाळवली. काय काय उद्योग करतात हे लोक, अशा
भावनेने मी ते कागद चाळू लागलो. तर आणखी एक धक्का माझी जणू वाटच पाहत होता. कारण त्यातल्या बऱ्याचशा कागदांवर हृदयरोगाची
औषधे लिहिलेली होती.
हे कसे शक्य आहे? एक तर
शिल्पाचा आजार पूर्णपणे पोटाच्या तक्रारींशी निगडित होता. अगदी दुरूनसुद्धा
हृदयाशी संबंध वाटावा असं त्याच्यात काही नव्हतं, आणि तीस वर्षाच्या तरुणीला थोडाच
हृदयाचा आजार होतो, तरी ह्या हृदयरोगाच्या औषधाच्या चिठ्ठ्या इथे येण्याचं काय
कारण? चुकून दुसऱ्या कुणाच्या चिठ्ठ्या तर नाही आणल्या हिने?
एव्हाना माझ्यातला गुप्तहेर
जागा झाला होता. मी त्या चिठ्ठ्या वरून खालून पडताळून पहिल्या. त्यांवरची औषधे
तपासली. वर लिहिलेले पेशंटचे नावं तपासले. सर्व गोष्टी ठाकठीक होत्या.
चिठ्ठ्यांवरील मजकुरानुसार ही सर्व औषधे शिल्पा गावडे याच पेशंटसाठी वापरलेली
होती. अगदी दोन तीन दिवसांपूर्वीच जणू हृदयाच्या आजारासाठी शिल्पा दवाखान्यात दाखल
झाली असून तिला हृदयरोग झाला असल्याचे स्पष्ट दिसावे अशी ती सर्व कागदपत्रे होती.
आता मात्र मला त्या डॉक्टरची
कीव येऊ लागली होती. कुठली लक्षणे, कुठला आजार आणि काय ही औषधे- हे असे डॉक्टर
असतात? इतके अडाणी?
‘या हॉस्पिटलमधून बाहेर
पडताना, हॉस्पिटलने तुला डिस्चार्जचे काही कागद दिले असतील. त्यावर तुझ्या आजाराचे निदान, त्यावर घेण्याची औषधे वगैरे
गोष्टी लिहिलेल्या असतात, ते कागद कुठायत?’- मी तिला विचारले.
‘त्येच्यासाठी दोन दिसांनी
बलीवलय, ते नंतर करून ठिवतो म्हनल्येत. ते विमा कंपनीला द्यायचे हाईत नं,’ शिल्पा
उत्तरली.
एव्हाना माझी मती गुंग झाली
होती. निरोगी शिल्पाच्या आजाराचे रहस्य माझ्या पूर्ण बुद्धीला व्यापून ‘दशांगुळे’
उरले होते! या रहस्यात मी असा गुंतलो की मला शिल्पाच्या मूळ आजाराचा विसर पडला.
शिल्पाशी काही तरी इकडचे तिकडचे बोललो, त्या हॉस्पिटलचे डिस्चार्ज कार्ड
मिळाल्यावर मला भेट असे तिला सांगून मी तिची बोळवण केली. आणि पुढच्या कामाला
लागलो.
काही दिवस गेले. मधून मधून
शिल्पाची आठवण येई. ती कागद पत्रे आणेल आणि मगच एकूण प्रकारावर उजेड पडेल असा
विचार करून मी माझे समाधान करून घेत होतो. पण शिल्पा काही आली नाही. तो रहस्यभेद
करण्याचे माझे स्वप्न तसेच अर्धवट राहिले.
नंतर कधी तरी माझा मित्र
विनोद मला भेटला. विनोद डॉक्टर आहे. माझ्यापेक्षा वयाने मोठा, व्यवहाराने चतुर
आहे. मला एकूणच तो ‘जगण्याला लायक’ असा वाटतो. गमतीने मी त्याला माझा ‘व्यावहारिक
गुरु’ असे म्हणतो. (इतर कुणाला जसे आध्यात्मिक गुरु असतात, तसं हा माझा ‘व्यावहारिक’
गुरु! प्रत्येकाची आपली अशी एक स्वतंत्र गरज असतेच ना. माझी गरज व्यवहार ज्ञानाची
आहे!) विनोदशी गप्पा मारत होतो. त्याला मी हा किस्सा सांगितला, ‘कसे अडाणी डॉक्टर
असतात’ अशा आविर्भावात.
किस्सा ऐकला, तसा विनोद
मोठ्याने हसूच लागला.
‘अजाण बालका, कधी रे मोठा
होणार तू? कसं सांगू तुला. कुठला डॉक्टर इतका बावळट असतो? हार्टचा आजार, पोटाचा
आजार एवढं समजू नये इतका वेडा असतो? अरे ही विमा मिळवण्याची युक्ती आहे रे. दोन
पेपर करायचे. एकावर खरा आजार आणि त्याचा उपचार लिहायचा आणि दुसरा पेपर बनावट, विमा
कंपनीसाठी. त्याच्यावर हार्टची औषधं लिहायची. नाहीतर विम्याचे पैसे कसे मिळणार? तू
लेका झंप्या तो झंप्याच! नसती चौकशी करत गेलास आता कुठची येते शिल्पा परत
तुझ्याकडे. वाट बघा वाट!’
मी अजूनही शिल्पाची वाट
पाहतोच आहे!
(क्रमशः पुढे चालू-
डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०
No comments:
Post a Comment