Tuesday, 2 October 2012

एक होती भिकारीण

एक होती भिकारीण


सांगून एखाद्याचा विश्वास बसणार नाही अशी ही गोष्ट आहे, अगदी खरी खुरी घडलेली! जेव्हा ती घटना घडत होती, तेव्हा तिचा शेवट कसा होणार याची जबरदस्त उत्सुकता माझ्या मनात दाटलेली होती. एखाद्या रहस्यकथेसारखा अगदी अनपेक्षित प्रकारे ह्या कथेचा शेवट झाला झाला तोही इतका विचित्र प्रकारे की त्याचा अर्थबोध होणेसुद्धा मुश्किल व्हावे. पहिले काही दिवस तर ‘एक विनोदी कथा’ म्हणून मी हे गोष्ट इतरांना सांगत असे, पण आता एवढे मात्र मी निश्चित सांगेन की ही कथा विनोदी नाही!
एक मोफत पेशंट म्हणून ती आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. ‘मोफत पेशंट’ या मागची कल्पना सांगितल्याशिवाय पुढची गोष्ट समजणार नाही. ज्या हॉस्पिटलमध्ये हे घडले, तिथे मी मानद वैद्यकिय सल्लागार म्हणून जात असे. एखादे हॉस्पिटल कसे चालते, त्याची बलस्थाने कुठली याचे जरासुद्धा भान नसलेली मंडळी हे हॉस्पिटल चालवत होती. साहजिकच हॉस्पिटलची आर्थिक परिस्थिती कमालीची हलाखीची होती. पेशंट फारसे येत नसत. पण हॉस्पिटल चालविणे मात्र इतर काही कारणांमुळे गरजेचे होते. अशा कुठल्या तरी बाह्य कारणासाठी चालू ठेवलेले हे हॉस्पिटल. परिस्थिती एकदा आटोक्याबाहेर जायला लागली की माणसाचा ताळतंत्र कसा सुटतो आणि मग भांबावलेल्या अवस्थेत घेतलेले निर्णय कसे आत्मघातक ठरतात याचे उदाहरण म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाने घेतलेला हा नवा निर्णय होता, मोफत रुग्णसेवेचा! यामागची कल्पना अगदी सरळ साधी आणि बाळबोध होती. हॉस्पिटलमध्ये पेशंट येत नाहीत, तर हॉस्पिटलच्या सगळ्या सेवाच फुकट करून टाका! कुठलाही पेशंट येवो, त्याने जर दावा केला की तो गरीब आहे, तर त्याला हॉस्पिटलच्या सर्व सेवा मोफत! राहण्याचा खर्च नाही, वैद्यकिय सल्ला मोफत, अगदी रक्त तपासणी, क्ष किरण तपासणी सुद्धा फुकट! एकदा का सर्व सेवा फुकट म्हटल्यावर काय वाट्टेल तेवढे पेशंट येतील, सगळं शेवटी पैशावर चालत अशी आर्थिक बाळबोध कल्पना यामागे होती. (यावरही एक स्वतंत्र आणि खराखुरा विनोदी लेख लिहिला जाऊ शकतो, पण तो विषय आत्ता नको!) तर अशा संपूर्ण मोफत योजनेखाली ही पेशंट माझ्याकडे दाखल झाली. मीही नुकताच व्यवसायात उतरलेला, मला मिळणारे कामही तेव्हा बेतास बातच असे. त्यात हा फुकट पेशंट म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशीच भावना मला आली! पण मिळेल ते काम करून हात आणि डोके चालू ठेवावे, पैसा काय नंतर कधीतरी येईल अशा त्यागी (?) भावनेने ही पेशंट मी बघू लागलो.
पहिल्याच आमच्या भेटीत मला जाणवलं, पेशंट कमालीची गरीब अगदी थोडक्यात सांगायचं तर भिकारीण होती. अंगावर धड कपडा नाही, कित्येक दिवसात अंगाला पाण्याचा स्पर्श झाला नसावा, डोके उवांनी लडबडलेले अशी. जेव्हा पहिल्या तपासण्या केल्या तेव्हा लक्षात आलं तिला मधुमेह होता. मधुमेहाच्या उपचाराचे वैद्यकिय ज्ञान मला  बऱ्यापैकी होते. ते मी तिच्यावर अर्थातच वापरू लागलो. तिला तिच्या या आजारासाठी काय पथ्य करावे लागेल ते मी समजावले, वेळच्या वेळी नियमित आणि हलका आहार घेणे कसे महत्त्वाचे आहे ते सांगितले. काही अत्यावश्यक अशी औषधे तिच्यासाठी लिहून देऊन मी बाहेर पडलो. यानिमित्ताने एक समाजसेवा सुरु केल्याचा सूक्ष्म अहंकार माझ्या मनात तेव्हा निर्माण झाला होता.
दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पुन्हा तिला भेटायला गेलो, तेव्हा बरीच काही आश्चर्ये माझ्यासमोर वाढून ठेवलेली होती. मी पोचलो तेव्हा ती नुकतीच जेवायला बसली होती. तिच्यासमोर वाढलेले अन्न म्हणजे चार घरातून मागून आणलेली भीक होती. शिळ्या भाकरीचे तुकडे, चार घरच्या शिळ्यापाक्या कालवणांचे एक अभूतपूर्व मिश्रण. ही भीकही तिला कोणी आणून दिली हे समजणे अशक्य होते. कारण कुणीच नातलग तिच्या जवळपास दिसत नसत. मधुमेह आणि त्यासाठी पथ्यकर आहार याविषयीच्या माझ्या शास्त्रीय ज्ञानाचा असा सपशेल धुव्वा उडाला. गेल्या पूर्ण दिवसात तिने मी सांगितलेले एकही औषध आणलेलेसुद्धा नव्हते, कारण ते आणायला तिच्याजवळ पैसेच नव्हते!  आता ज्याला आहारविषयक पथ्ये पाळणे जमणार नाही आणि औषधेही परवडणार नाहीत अश्या मधुमेही रुग्णाचे काय करायचे याची मार्गदर्शक तत्त्वे माझ्या अभ्यासात कधीच नव्हती, काय करावे हे मला उमगेना. पुन्हा तीच औषधे, तोच वांझ सल्ला तिच्या पेपरमध्ये लिहून मी बाहेर पडलो. सक्तीच्या समाजसेवेचा जो अहंकारी फुगा माझ्यात निर्माण होऊ घातला होता त्याला अशी पहिली टाचणी लागली होती.
दुसऱ्या (आणि नंतर तिसऱ्या आणि चौथ्यासुद्धा) दिवशी परिस्थिती तशीच कायम होती. मी नियमित भेटीला जायचे, हताशपणे जे चालू आहे ते पहायचे, औषधे लिहायची आणि परतायचे. ती हॉस्पिटलमधून घरी जाण्याचे नावही काढीना कारण राहण्यासाठी तिला बहुधा घरच नसणार. कदाचित तिची मुख्य गरज राहण्याच्या जागेचीच असावी, त्यामुळे हॉस्पिटलमधून मिळालेल्या हक्काच्या खाटेवर ती पूर्ण समाधानी होती. ज्यांना अस्तित्वासाठीच झगडावे लागते त्यांना मधुमेह आणि त्याची पथ्ये याचे काय सोयरेसुतक असणार? परिस्थितीचे दान पूर्ण प्रतिकूल पडलेल्या वंचितांचा हा अनुभव मला अगदी नवीन होता. आपण स्वतः किती कोमट आणि सुरक्षित जीवन जगत आलो आहोत याची टोकदार जाणीव करून देणारा. खरं तर ही समस्या समजण्याचा आवाकासुद्धा त्यावेळी माझ्याजवळ नव्हता. त्यामुळे एकूण परिस्थितीकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आपले काम चालू ठेवण्याचा ढोंगी अविर्भाव आणत मी माझ्या हॉस्पिटलच्या भेटी चालू ठेवल्या. पुढे अशीही परिस्थिती आली की रोज तिला जाऊन भेटण्याचे काही प्रयोजनही मला दिसेना. त्यामुळे एक-एक दोन-दोन दिवस तिला भेटण्याचे मी टाळू लागलो.
अशाच मधल्या कळत आणखी एक गंमत घडली, खरं तर ती गंमत नव्हती, पण ‘अति झालं आणि हसू आलं’ या न्यायाने आपण त्याला हसू शकतो. म्हणे एक दिवस तिचे कधी तरी पोट दुखलं. मी रोज भेटीला जात नसल्याने ते मला समजले नाही. फोन लावून मला कळवावे तर ही पडली मोफत पेशंट, तिच्यावर आणखी फोनचा खर्च कोण करणार? त्यामुळे योगायोगानेच दुसऱ्या एका पेशंटच्या भेटीला आलेल्या दुसऱ्याच एका डॉक्टरांना तिला दाखविण्यात आले. त्यांनी काहीशा नाराजीनेच तिला तपासले असणार. (बिनपैशाचा व्यवहार थोडाच कुणाला आवडतो?) त्यांनी तिला आणखी काही तपासण्या, पोटाचे फोटो वगैरे सांगितले. हे सर्व झाले, कारण ते फुकट होते. पण ते बघून त्यावर उपाय कोण करणार? तपासण्या सांगून ते डॉक्टर निघून गेलेले, त्यांना किंवा मला फोन लावण्याचा तर प्रश्नच नव्हता. मी यथावकाश जेव्हा माझ्या भेटीसाठी म्हणून गेलो, तेव्हा कुठे हा मधे झालेला प्रकार मला समजला. आणि मला तो आता समजून तरी काय उपयोग होता- मी आता जे काही सांगणार होतो त्यासाठी तरी तिच्याजवळ पैसे कुटून येणार होते. ईश्वरी कृपेने मी तिथे पोचलो तेव्हा तरी ती बरी होती, तिची पोटदुखी आपोआपच थांबली होती इतकेच! या वांझ वैद्यकिय सेवेचा एव्हाना मला कंटाळा येऊ लागलेला होता. हे प्रकरण कसे आणि कधी संपेल हे मात्र मला समजत नव्हते. कदाचित आम्ही सगळेच एकमेकांना कंटाळण्याची वाट पाहात होतो. असे किती दिवस गेले तेही आता मला आठवत नाही, पण अगदी जाणवावे इतका लांबलेला हा काळ होता एवढे मात्र नक्की.
आणि एकदाचा तो दिवस उजाडला. सकाळी मी माझ्या भेटीसाठी हॉस्पिटलला पोहोचलो तर तिथला शिकाऊ डॉक्टर धावतच येऊन मला सांगू लागला. अगदी कमालीचा उत्तेजित वाटला तो मला, कारण मला तो जे सांगणार होता ते जणू त्याच्यासाठी, माझ्यासाठी आणि हॉस्पिटलसाठी शुभ वर्तमानच होते. माझी ती पेशंट कुणाला काहीही न सांगता सवरता चक्क पळून गेली होती- नुसती पळून गेली होती असे नव्हते तर जाताना ती ज्या खोलीत राहत होती, त्या खोलीला बाहेरून कडी लावून ती पळून गेली होती. आत राहणारे इतर पेशंट त्यामुळे आतच अडकलेले राहिले. त्यांनी जेव्हा आरडाओरडी केली तेव्हा कुठे झालेला हा प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला. एक दुर्दैवी अश्राप भिकारीण पळाली ती काय, पण ती संपूर्ण हॉस्पिटलमध्ये चर्चेचा, थट्टेचा विषय बनून राहिली होती. खोलीला कडी घालून आणि इतर पेशंट आत कोंडून तिने तिच्या ताकदीने जो सामाजिक निषेध नोंदविला होता त्याची दखल कोण घेणार होते? आमच्यातल्या जवळ जवळ प्रत्येकाने तिला वेडे ठरवून तिच्याकडे, तिच्या समस्येकडे पाठ फिरविली कारण ते तसे करणे सोपे होते, सोयीचे होते. एक विनोदी खुळचटपणा अशा दृष्टीने मीही काही दिवस त्याकडे पाहात होतो. पण आता मात्र मी निश्चित म्हणेन ही गोष्ट विनोदी नाही!  

डॉ. संजीव मंगरूळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०

No comments:

Post a Comment