Tuesday, 2 October 2012

दारूविषयी

 दारूविषयी

मेडिसिन विभागात काम करताना आम्हाला दारू आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वैद्यकिय आणि इतर सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागते. आता हा आमच्या कामाचा भाग म्हणून अगदी सवयीचा झालेला प्रकार आहे, इतका की प्रत्येक नशाबाजाच्या मागे जी एक करुण कथा असते, त्यातही आता फारसा रस वाटत नाही. केवळ त्यातल्या वैद्यकिय समस्येविषयी विचार करावा, त्याला अनुरूप उपचार करावे आणि विषय सोडून द्यावा, अशी काहीशी दुर्दैवी मानसिकता होऊन बसते. ही एक प्रकारची उदासीनता जणू आमच्या व्यावसायिकतेचा भागच झालेली असते. अशा उदासीनतेतूनही काही गंमतशीर किस्से काही वेळेला लक्षात राहतात.
सुमारे साठीचे हे गृहस्थ, दारूच्या व्यसनाने ग्रस्त, आमच्या हॉस्पिटलमध्ये बरे होऊन घरी गेलेले, फेरतपासणीसाठी दवाखान्यात आले होते. आर्थिक स्थिती उच्च मध्यमवर्गीय, चेहेरा पाहावा तर मनुष्य सुशिक्षित वाटावा. तपासणीनंतर बोलू लागलो तर गृहस्थ रागावल्यासारखे वाटले. प्रकृती तर बरी होती तरी ते रागावलेले होते. त्यांना त्यांच्या वैद्यकिय खर्चाचा विमा परतावा (‘Mediclaim’) न मिळाल्याने ते रुष्ट झाले होते. (एखाद्या आजारातून बरे झाल्यावरही जर त्याच्या वैद्यकिय खर्चाचा विमा परतावा काही कारणाने मिळाला नाही तर त्या आजारातून बरे होण्याचा आनंदच नष्ट होतो, असा माझा अनुभव आहे!) माझ्या केसपेपरमध्ये तुम्हा डॉक्टर मंडळींनी माझ्या दारूच्या व्यसनाविषयी का लिहिले? त्या तसल्या उल्लेखामुळे मला विम्याचा परतावा मिळाला नाही, माझे मोठे आर्थिक नुकसान झाले असा त्यांचा सूर होता. ह्या तक्रारीसुद्धा आमच्या कामात नित्याच्या झालेल्या आहेत. त्यांना बरेच समजावण्याचा प्रयत्न केला, वैद्यकिय कागदपत्रात फेरफार करणे, वैद्यकिय निदानात खोटे दावे करणे कसे अवघड असते, ते कसे अनैतिकही आहे आणि म्हणून आमचा नाईलाज आहे इत्यादी सर्व कारणे सांगूनही गृहस्थांचे समाधान होईना, आम्ही रुग्ण केवढी अपेक्षा ठेवून तुमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होतो, एवढे साधे सहकार्य तुम्हा लोकांकडून मिळू शकत नाही, असा आक्रमक सूर ठेवूनच ते सतत बोलत होते. अशा वेळी मानसिक संतुलन कायम ठेवणे, थंड डोक्याने समोरच्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाला धक्का लागू न देता त्याला वास्तव स्थितीची जाणीव करुण देत राहणे हे सर्व अनुभवातून मी शिकलेलो आहे. किंबहुना, प्रयेक व्यसनी दारुडा हा एक रुग्ण असतो, त्याचा तिरस्कार करणे, त्याला त्याच्या व्यसनाच्या कारणाने दुखावणे चूक आहे अशीही माझी ठाम समजूत आहे, पण ह्या गृहस्थांचा अभिनिवेश माझ्या या सर्व कष्टसाध्य गुणांवर मात करणारा ठरला. आपल्या गैरकृत्यांतून निर्माण झालेल्या समस्येला सर्वतोपरी डॉक्टरला जबाबदार धरण्याचा त्यांचा प्रयत्न, एकूण प्रकरणांत त्यांचा सतत डोकावणारा अहंगंड, स्वतःच्या वर्तनाविषयी पूर्ण पश्चात्तापशून्यता सारे काही विलक्षणच होते. कितीही व्यावसायिक असला तरी डॉक्टर एक मनुष्यच असतो, त्यालाही त्याचा आत्मसन्मान असतो, ही गोष्ट कशी नजरेआड करता येईल? त्यातूनही स्वतःला  सुशिक्षित म्हणवणाऱ्या या गृहस्थांचा मानभावीपणा मला खूप त्रासदायक वाटला. त्यातून मी जे बोलून गेलो ते काहीसे माझ्याही मर्जीविरुद्ध होते.
किंचित संतापानेच मी त्यांना म्हणालो, “आजवर तुम्ही जी दारू पीत आला, त्याचा परतावा तर कुणी तुम्हाला देत नव्हते ना? तरी तुम्ही दारू पीत गेलात, कारण दारूतून मिळणाऱ्या आनंदासाठी तुम्हाला ती रास्त किंमत वाटली. दारू पिऊन तुमची प्रकृती खराब झाली, त्याचीही पर्वा न करता तुम्ही दारू पीत गेलात, कारण दारूतून मिळणाऱ्या आनंदाची, नशेची ती तुम्हाला रास्त किंमत वाटली. प्रकृतीची ही किंमत खरं तर किती तरी जास्त होती, तीही तुम्ही आनंदाने मान्य केली. मग आता बिघडलेल्या प्रकृतीसाठी जेव्हा तुम्हाला खर्च येतो, तो तेवढा विमा कंपनीने म्हणजे पर्यायाने समाजाने तुमच्यासाठी उचलावा आणि तुमच्या व्यसनाला हातभार लावावा असे तुम्हाला वाटते काय? आपल्या षौकाची किंमत म्हणून तूम्हीच ह्या बिलाचा खर्च उचलणे योग्य नाही का? यासाठी तुम्हाला मदत म्हणून मी खोटेपणा करणे आणि त्याचा भूर्दंड म्हणून समाजाने त्याची किंमत चुकविणे यापेक्षा तुम्हीच ही किंमत उचलणे रास्त राहील. कदाचित या खर्चाला बिचकून तुम्ही व्यसनमुक्त झालात तरी तो मोठाच लाभ ठरेल! केवळ पेशंट म्हणून तुम्ही माझ्याकडे येत राहावे यासाठी एवढी तडजोड करण्याची माझी तयारी नाही!”
अजून मला आटवते माझे हे बोलणे ऐकून त्यांचा चेहरा केवढा क्रुद्ध झाला होता, किती ताडकन ते गृहस्थ माझ्यासमोरून उठले. मला म्हणाले, “आज तुम्ही डॉक्टरच्या खुर्चीत आहात म्हणून मी फार बोलत नाही. एक दिवस याचे उत्तर देणे मला नक्कीच  आवडेल!”
मला आजही माहीत नाही, मी जे बोललो ते बोलणे यौग्य होते की कसे. एरवी खूप थंड डोक्याने काम करण्याची सवय असूनही तेव्हा मी असा रोकठोक कसा झालो? मला त्यांचा एवढा राग का आला? त्यांचा सुशिक्षित मानभावीपणा मला  खुपला की व्यसनापाठोपाठ त्यांचे झालेले संपूर्ण नैतिक स्खलन मला त्रास देऊन गेले? अशा बोलण्याचा त्यांच्या वर्तणुकीवर काही अनुकूल परिणाम होईल की ते अधिकच सराईत मानभावी बनतील?
सात आठ वर्षे झाली असतील या घटनेला, अजून मी त्यांच्या उत्तराची वाट पाहतोच आहे.

डॉ. संजीव मंगरूळकर
दूरभाष : ९४०५०१८८९०

No comments:

Post a Comment