Saturday, 13 October 2012

कट कट



कट कट
हॉस्पिटलमधली काही किरकोळ कामे उरकून घरी पोहोचलो तेव्हा दुपारचे बारा होऊन गेले होते. अख्खी दुपार आता अक्राळविक्राळपणे मोकळी माझ्यासमोर पसरणार अशी भीती मला वाटू लागलेली. इतक्यात फोन वाजला. फोन हॉस्पिटलमधून आला होता.
‘सर, तुमचे पुरंदरे पेशंट आलेत. त्यांच्या छातीत दुखतंय, Cardiac वाटतंय. त्यांना आय.सी.यू. त घेतोय,’ पलीकडून आवाज आला. बहुधा कुणी नवीन हाउसमन असावा. मी चांगलाच चक्रावलो. नवीन पेशंट आणि तोही हृदयविकाराचा? आणि असा अगदी तडक माझ्या नावाची चौकशी करत थेट हॉस्पिटलमधे आणि दाखलसुद्धा? अगदीच कमाल होती. दवाखाना सुरु करून जेमतेम तीन महिने झाले असतील तेव्हाची ही गोष्ट आहे. एक एक पेशंट मिळविताना जे कष्ट पडत, जी पळापळ होई, ती झेलायला एक बुलंद काळीज लागावं असा तो काळ होता, काळ कसला दुष्काळच म्हणावा असा आणि त्यात कोण हे पुरंदरे चक्क माझ्याकडे दाखल होण्यासाठी स्वतःहून येतायत - माझा विश्वास बसेना. तिकडे बिचारे हे पुरंदरे छातीतल्या दुखण्याने बेजार झाले असणार आणि त्यानिमित्त मी जणू माझ्या आनंदात, अशी भलतीच विकृत परिस्थिती!
मी तडक हॉस्पिटलमध्ये गेलो. पुरंदऱ्याना तपासलं. त्यांच्या उपचाराच्या संदर्भात आवश्यक त्या सूचना देऊन बाहेर आलो. बाहेर त्यांची पत्नी, मुलगी वगैरे होते. खूपच तणावाखाली होते सगळे. त्यांना आजाराची कल्पना दिली, धोके समजावून दिले. आतून माझं मन मात्र वेगळ्याच उत्कंठेने बधीरलेलं, ‘कुठून आले हे पुरंदरे? कुणी पाठवलं असेल यांना?’ या प्रश्नाचा पुकारा माझ्या मनात चाललेला. चलाखीने बोलता बोलता शेवटी मी सारी माहिती काढून घेतली.
‘मिसेस देशपांडे तुमची बहीण ना? त्या आमच्या शेजारीच राहतात. आम्ही खरं तर एका लग्नाला म्हणून कार्यालयात गेलेलो. तिथे यांना अस्वस्थ वाटायला लागलं. तिथून जवळ कुणी डॉक्टर मेहता म्हणून आहेत, त्यांचा दवाखाना होता. त्यांच्याकडे ह्यांना नेलं, तर ते म्हणाले यांना admit करावं लागेल. ते कुठल्या तरी दुसऱ्याच डॉक्टरांच्या नावाने चिट्ठी द्यायला लागल्रे, तशी मला तुमच्या नावाची आठवण आली. अगदीच कुठल्या तरी अनोळखी डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आपल्या माहितीचे डॉक्टर बरे वाटतात नाही का? मी अगदीच मागे लागले तशी त्यांनी चिट्ठी बदलून तुमच्या नावानं नवी चिट्ठी दिली.’, मिसेस पुरंदरे म्हणाल्या. माझा जीव भांड्यात पडला, बहिणीविषयी एक वेगळीच माया माझ्या मनात उफाळून आली. कोण ते डॉ. मेहता होते, हाही भला माणूस दिसतो, ना ओळख, ना देख, तरी त्यांनी चिट्ठी बदलून माझ्या नावानं करून दिली. मी खूष झालो. ती दुपार एकूणच सत्कारणी लागली अशी भावना माझ्या मनात दाटून आली.
संध्याकाळी माझ्या दवाखान्यात बसलो होतो तेव्हासुद्धा एक खराखुरा पेशंट माझ्या नावावर हॉस्पिटलमधे दाखल असण्याचा सूक्ष्म आनंद माझ्या मनात दडून असावा. हे माझ्या कारकीर्दीचे सुरुवातीचे दिवस होते. दवाखान्यात येणाऱ्यांची संख्या अगदी तुरळक असायची. मोकळा वेळ मुबलक असायचा. कुणा सहायकाची, मदतनीसाची गरज वाटावी अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे दवाखान्यात बऱ्याचदा मी एकटाच असे, काही तरी वाचत, कोडी सोडवत किंवा अगदी निष्क्रिय असा! तसा मी बसलेलो, तर कुणी एक व्यक्ती समोर आली.
बुटकेसे व्यक्तिमत्त्व, गोरा वर्ण, मोठे थोरले टक्कल, सोनेरी काड्यांचा चष्मा, हातात एक किमती सूटकेस. अंगात सूट, गळ्यात टाय – असे प्रतिष्ठित रूप, अगदी पाहिल्याक्षणीच समजावे की हे डॉक्टर आहेत, असा त्यांचा नूर होता.
‘मी डॉ. मेहता,’ त्यांनी हस्तांदोलन करीत आपला परिचय मला करून दिला. तशी माझ्या मेंदूत गरागरा चक्रे फिरली, आणि मी निदान केले, हेच ते डॉ मेहता, ज्यांनी आपली चिट्ठी बदलून पुरंदऱ्याना माझ्याकडे पाठविले होते. भला माणूस.
‘अच्छा, अच्छा,’ मी प्रेमभराने त्यांचा हात हातात घेतला.
‘आज दुपारी मी ते पुरंदरे नावाचे पेशंट पाठविले होते, तुमच्याच नावानं चिट्ठी देऊन. आले होते का ते?’ त्यांनी विचारलं.
‘हो आले ना, हार्टचा आजार आहे. बरे आहेत. आपला काही पूर्वपरिचय नाही, त्यामुळे तुमचा फोन नंबर किंवा इतर काहीच माहिती माझ्याजवळ नव्हती, त्यामुळे इच्छा असूनही तुम्हाला काही कळवू शकलो नाही.’ मी उगाचच सफाई देत म्हणालो.
‘नाही ते ठीकच आहे’, डॉ मेहता म्हणाले. हे म्हणताना त्यांची नजर आत, अगदी माझ्या आत आत रोखून  पाहात होती. मला थोडे अस्वस्थ वाटू लागले. ते उगाचच मला जोखतायत असे मला वाटून गेले. ‘मीही तुमचे नाव ऐकून होतो. या निमित्ताने परिचय होईल, म्हणून मुद्दामच भेटायला आलो. मी इथे जवळच राहातो. येता जाता तुमच्या दवाखान्याची नवीन पाटी पाहात होतो. म्हटलं भेटावं या निमित्तानं,’ असं म्हणताना डॉक्टरांची नजर भिरभिरत होती. माझा अख्खा दवाखाना त्या नजरेतून ते न्याहाळत होते हे मला जाणवलं.
‘आज दुपारी पुरंदरे माझ्या दवाखान्यात आले, तेव्हाच त्यांची एकूण लक्षणं बघून मी ताडलं होतं, की हा हार्ट प्रॉब्लेम आहे. मी लगेचच त्यांना तुमची चिठ्ठी दिली. म्हणून मुद्दाम चौकशीला आलो, आले को नाही ते तुमच्याकडे हे पाहायला. नाही तर काय होतं, आपण एवढं पेशंटसाठी करतो, पण त्यांना कदरच नसते हो एकेकवेळी. हे असं फार वेळा होतं. म्हणजे काय, की सगळी गरज काय ती जणू डॉक्टरलाच.’ डॉक्टरांची सरबत्ती चालू होती.
मी माझ्याकडून परिस्थितीचा अंदाज घेत होतो. काय हेतू असावा मेहतांचा मला येऊन भेटण्यामागे? मेहता आर्थिकदृष्ट्या संपन्न होते हे त्यांच्या पेहेरावावरून, वागण्यातून स्पष्ट दिसत होतं. ते मध्यमवयीन, माझ्या दृष्टीने खूपच वरिष्ठ होते, याला त्यांचं टक्कल साक्ष होतं. निश्चितच ते आपल्या पेशंटची खूप काळजी घेत असणार. पुरंदरे म्हटलं तर त्यांचे अपरिचित पेशंट होते. तरीही त्यांची केवढी काळजी डॉक्टरांना वाटत होती. अगदी अपरिचित आणि नवख्या अशा मला ते समक्ष येऊन भेटत होते. मला मेहतांविषयी एकदम आदर वाटू लागला. आपणही असं वागू तर आपलंही यश हमखास, असंही मला वाटून गेलं. डॉ मेहता मला एकदम जुन्या पिढीचे आदर्श डॉक्टर असल्याची जाणीव झाली.
थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून डॉक्टर उठले. ‘बघा, आमच्या पेशंटची नीट काळजी घ्या. त्यांना सांगा मी येऊन गेलो ते’, असे म्हणून पुन्हा एकदा हस्तांदोलन करीत डॉक्टर माझ्या दवाखान्यातून बाहेर पडले.
दवाखान्याच्या खिडकीतून मी बाहेर पाहात राहिलो, तर डॉक्टर आपल्या चार चाकी गाडीत बसून ऐटदारपणे गेलेले मला दिसले.
दुसरा दिवस उजाडला. मी नेहमीप्रमाणे रिकामा माझ्या दवाखान्यात बसलो होतो, कोडी सोडवत. तर अचानक एक व्यक्ती माझ्या समोर उभी. कोडी  सोडवण्यात दंग मी वर पाहतो तर डॉ. मेहता. आपल्या कडक पेहेरावात, तीच सूटकेस घेऊन माझ्यासमोर उभे. चेहऱ्यावर मंद स्मित. हक्कानं आत येऊन माझ्यासमोरच्या खुर्चीत बसले.
‘काय म्हणतो आमचा पेशंट? बरा आहे की नाही?’ त्यांनी विचारले.
‘चांगला आहे. अपेक्षेप्रमाणे प्रगती आहे. तुम्ही येऊन गेल्याचं मी बोललो त्यांना.’ मी म्हणालो.
‘नाही, खालून चाललो होतो. म्हटलं चौकशी करावी. आपल्याला काळजी वाटतेच की हो आपल्या पेशंटची.’ डॉक्टर म्हणाले.
‘पण मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये या ना. त्यांना आणि मलाही फार बरे वाटेल.’ मी म्हणालो.
‘नाही, त्याची काय गरज आहे? आपण आपल्या पेशंटसाठी काय करतो हे नाही तरी पेशंटपेक्षा आपण डॉक्टर मंडळीच समजू शकतो. पेशंट काय शेवटी पेशंटच असतात. आपण डॉक्टरच काय ते एकमेकांना समजू शकतो, नाही का?’ डॉक्टर बोलले.
पुन्हा एकदा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आज डॉक्टरांनी माझा फोन नंबर घेतला. अगदी काळजीपूर्वक डायरीत नोंदवला. माझी आता खात्री होत चालली, डॉ. मेहता माझ्यावर खूष आहेत. डायरी मिटवून मेहतांनी वर पाहिलं, माझ्याकडे खोलवर पाहिलं, कालच्यासारखे आणि अगदी बारीक आवाजात ते म्हणाले, जणू अगदी काही तरी खाजगी गुप्त सांगितल्यासारखे- ‘ते अनुप ट्रेडर्स चे सुराणा माहीत आहेत ना, ते माझे पेशंट आहेत. त्यांना एकदा तुमच्याकडे पाठवीन म्हणतो.’ डोळे बारीक करून ते सूचक हसत बाहेर पडले. मला खात्री वाटली, डॉ. मेहता आता आपले झाले.
तिसरा दिवस उजाडला. पुन्हा मी तसाच रिकामा माझ्या दवाखान्यात बसलेलो. तर पुन्हा एकदा तेच दृश्य- हसतमुख चेहऱ्याचे डॉ. मेहता माझ्यासमोर उभे. आजचा सूट फक्त वेगळा. पुन्हा एकदा पेशंटची चौकशी. पुन्हा आपण डॉक्टर डॉक्टर कसे एकमेकांना समजू शकतो याची ग्वाही. पुन्हा एकदा सुराणा पेशंटची आठवण. हस्तांदोलन आणि डॉक्टर बाहेर पडले. आता मात्र मी साशंक झालो. डॉक्टरांचा नूर काही वेगळाच असावा. मीच अडाणी, त्यांच्याविषयी भलताच आदर बाळगून राहिलो. असे मला वाटले. मेहतांची अपेक्षा काही तरी वेगळी आहे याची जाणीव आता मला होऊ लागली. मी चिंताक्रांत झालो.
चौथा दिवस चांगला गेला. अजूनही पुरंदरे हॉस्पिटलमध्ये होते. त्यांची प्रकृती सुधारत होती. त्यांना आता माझ्याविषयी कृतज्ञताही वाटू लागली होती. आणि विशेष म्हणजे आज डॉ. मेहताही माझ्या दवाखान्यात फिरकले नाहीत. नेहमीच्या माझ्या रिकाम्या दवाखान्यातल मेहतांचं नसलेपण मला आनंद देऊन गेलं. पण हा आनंद क्षणिक होता.
पाचवा दिवस, त्याची संध्याकाळ उजाडली. आणि तो प्रसंग पुन्हा बरहुकूम तसाच घडू लागला. पुन्हा एकदा डॉ. मेहता. त्यांचा सूट. मग मंद स्मित. ते काही बोलणार, तोच मी उठलो, खिशात (माझ्या!) हात घालून पाकीट काढले. त्याच्या पुढच्याच कप्प्यात मी वेगळ्या ठेवलेल्या शंभराच्या दोन नोटा होत्या. त्या मी या प्रसंगासाठीच राखून ठेवलेल्या होत्या. त्या काढून मी मेहतांच्या हातावर ठेवल्या. मेहतांनी त्या नोटा घेतल्या, हलकेच मोजल्या. आपल्या सुटाच्या खिशात टाकल्या, माझ्याकडे निसटते पाहिले. आजच्या या नजरेत ती नेहमीची भेदकता नव्हती. ती कदाचित आता माझ्या नजरेत उतरली असावी.
एक शब्दही न बोलता मेहता माझ्याकडे पाठ करून दवाखान्याबाहेर चालते झाले. डॉ. मेहतांचा माझ्यामागचा ससेमिरा मी अशा प्रकारे सोडवला खरा, पण हा प्रसंग झाल्यावर एक प्रकारचं उदास फसवलेपण माझ्या मनाला व्यापून राहिलं. कुणी तरी दिवसाढवळ्या यावं आणि बेदरकारपणे आपल्याला लुटून जावं अशी काही तरी ती भावना होती. जणू मेहतांच्या निर्लज्जपणापुढे मी पूर्ण निष्प्रभ होतो. असहाय होतो.
मेहतांची आणि माझी ही अखेरचीच भेट ठरली.

डॉ. संजीव मंगरूळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०

1 comment:

  1. Sir, please see this article. Probably you are already aware of this case...! http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-07-07/india/40420070_1_patient-scan-maharashtra-doctor ! Best Regards, Shrikant Atre

    ReplyDelete