एका सिनेमामागची गोष्ट
मी बनविलेला सिनेमा
खपविण्याची वेळ माझ्यावर आली, त्याचीही एक गोष्ट आहे. बऱ्यापैकी मनोरंजक म्हणावी
अशी.
तसा मी काही सिनेमातला
वगैरे माणूस नाही, म्हणजे व्यवसायाने डॉक्टर असलो, तरी सिनेमा, संगीत अशा सारख्या
कलांचा आस्वाद घेऊ शकतो, पाहू ऐकू शकतो, इतपत योग्यता माझ्याजवळ आहे. सिनेमातले
नट, त्यांचे ‘glamour’, त्यांच्या ‘gossips’ या पलीकडे जाऊन सिनेमाची कथा, त्याचे
दिग्दर्शन, त्याचे संगीत, चित्रीकरण यासारख्या बाबींमध्ये लक्ष घालून प्रतिक्रिया
देण्याचे धार्ष्ट्य मी करू शकतो. आता या भांडवलावर मी चक्क सिनेमा काढायचे धाडस का
केले याला तसे खास उत्तर नाही. ही एक हौस (खाज?) असे आपण म्हणू शकतो. पण एक सिनेमा
काढावा असे मला वाटू लागले ते सुमारे ३-४ वर्षांपूर्वी.
गेली सुमारे तीन दशके
वैद्यकीय व्यवसायात घालवल्यावर, डॉक्टरकी ही एक प्रकारची अभिनय कला आहे, असे मला
कळून चुकले होते. पेशंटशी बोलणे, त्याला बोलते करून, आपल्याला आवश्यक अशी माहिती
कमीत कमी वेळात काढून घेणे, रुग्णाला त्याच्या अप्रिय निदानाविषयी त्याला फारसे न
घाबरवता (किंवा कदाचित त्याला जास्तच घाबरवून !) माहिती देणे, त्याच्या जीवनशैलीत
त्याला अप्रिय वाटणारे बदल करण्यास त्याला उद्युक्त करणे हे सगळे करण्यासाठी अभिनय
कलाच लागते, (किंबहुना वैद्यकीय ज्ञानापेक्षा अभिनयाच्या जोरावर व्यवसाय जमविणारे
काही डॉक्टर पाहून माझी याविषयीची तशी खात्रीच पटली होती.) ही कला दुर्दैवाने
आम्हाला आमच्या अभ्यासक्रमात शिकवली जात नाही, ती ज्याला त्याला आपल्या
गरजेप्रमाणे, वकुबाप्रमाणे आत्मसात करावी लागते. सततच्या गरजेपोटी प्रत्येक डॉक्टर
आपले अभिनयकौशल्य वापरून हे काम करीत असतो. पण हे काम सोपे नाही, चांगलेच अवघड
आहे. एक तर कुणाच्या आजाराविषयी बोलणे त्याला कधीच आवडत नाही, त्यातून त्याला
त्याचा आजार नुकताच समजलेला असेल तर त्याची तेव्हाची मनःस्थिती थोडीच नवीन ज्ञान
शिकण्याची असते ? तो तर तेव्हा एक प्रकारच्या बंडखोर मनःस्थितीत असतो. हे कसे शक्य
आहे, आणि हा आजार मलाच का म्हणून ? अशी बंडखोर मनस्थिती असते त्याची. आमच्या
हाताशी असलेल्या मर्यादित वेळात आम्हाला बऱ्याच वेळा त्याच्या मर्जीविरुद्ध हे लोकशिक्षणाचे
काम उरकावे लागते. साहजिकच ते तितकेसे यशस्वी होत नाही. या कामासाठी काही तरी
पर्यायी व्यवस्था असावी असे माझ्या मनात येत असे. आपण भरपूर प्रयत्न करूनही
पेशंटपर्यंत, त्याच्या विचारापर्यंत पोहोचू शकत नाही, असे मला दिसत असे. सिनेमाची
कल्पना यातून माझ्या डोक्यात आली. सिनेमातले नट, त्यांचे संवाद, त्यांच्या सवयी
कशा सगळ्यांच्या लक्षात राहातात, त्यांच्या लकबींचे कसे अनुकरण होते. हे आपण सगळेच
पाहतो. मग आरोग्यविषयक हेतू समोर ठेवून पूर्ण मनोरंजनात्मक सिनेमे काढले तर त्याचा
उपयोग होईल हा विचार त्यामागे होता. हे सिनेमे अगदी व्यावसायिक चित्रपटांसारखे
असावेत, काही झाले तरी ते documentary वाटू नयेत अशी काळजी घ्यावी असाही एक विचार
होता.
माझे एक पेशंट मित्र नंदू क्षीरसागर
चित्रपट व्यवसायात आहेत. दिग्दर्शन, पटकथा लेखन, चित्रीकरण अशा विविध अंगांनी
चित्रपटांत काम करतात, आणि मुख्य म्हणजे प्रामाणिकपणे पैशाचा विचार न करता (आणि हे
माझ्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे होते!) ते हे काम करतील असा विश्वास मला होता.
त्यांच्याशी या विषयावर बोललो. माझ्या सुदैवाने त्यांनाही ही कल्पना भावली. त्यांच्या
पाठबळावरच मी सिनेमाचा उद्योग करण्याचे ठरविले. मधुमेह हा विषय घेऊन लघुचित्रपट
काढावेत असे ठरले.
सर्वप्रथम आर्थिक अडचणींचा
सामना करणे आवश्यक होते. सिनेमा ही किती खर्चिक गोष्ट आहे, याचा मला या निमित्ताने
प्रथमच अंदाज आला. दहा ठिकाणी बोलून, चौकशी करून अखेर एका औषधनिर्मात्या कंपनीला
पैशाची गळ घालण्यात मला यश आले. एकदा आर्थिक अडचणीतून मार्ग निघाल्यावर पुढचा
मार्ग आनंददायक होता. मधुमेहासंदर्भात देण्याजोगा तपशील माझ्याजवळ होताच, लघुपटात
काय सांगायचे हे मला नेमके माहीत होते. मधुमेहाच्या पेशंटचा इन्सुलीन इंजेक्शनला
असणारा विरोध, त्या विरोधामागची कारणे आणि
त्यांचे निराकरण असे लघुपटाचे स्वरूप ठेवावे असा माझा विचार होता. यामध्ये कुठेही
प्रशिक्षणाचा आभास न होऊ देणे महत्वाचे होते. त्यात कुठल्याही किचकट तांत्रिक
गोष्टी शिकवायच्या नव्हत्या. एकूण सादरीकरण भावनेला आवाहन करीत विवेचनाकडे नेणारे
असावे असे ठरवून त्याचे पटकथेत रुपांतर करणे, चित्रीकरणाची स्थळे शोधणे, नटांची निवड
करणे ही सर्वच कामे मला खूपच नवीन होती, आनंददायक होती. नंदूच्या नेतृत्वाखाली ती
सहजच निभावली गेली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सहकार्याने हॉस्पिटलच्या आवारात
चित्रीकरणही झाले. चित्रपटाचे editing, त्याचे पार्श्वसंगीत असे सर्व सोपस्कार
होऊन सुमारे दोन वर्षांच्या परिश्रमांनंतर मधुमेहविषयक दोन लघुपट बनविण्यात आम्ही
यशस्वी झालो. तो दिवस आमच्या सर्वांच्याच दृष्टीने आनंददायक होता, आमच्या
कर्तव्यपूर्तीचा होता. चित्रपट तर झाले, आम्ही सर्वांनी ते पाहिले, त्यांच्या
निर्मितीमागचा हेतू पूर्ण होईल अशा ताकदीचे ते झाले होते. आता फक्त त्यांचे
विधीपूर्वक प्रकाशन करून, ते योग्य मंचावर प्रदर्शित करायचे अशी काहीशी भोळसट
कल्पना माझ्या डोक्यात होती. मुळात चित्रपट निर्मितीमागचा हेतू लोकशिक्षणाचा आहे,
त्याचे सादरीकरण चांगले झाले आहे, त्यामुळे त्याच्या प्रदर्शनास अशी काय अडचण येणार
असे मला वाटत होते. अगदी खरं सांगायचं तर
चित्रपटाचे वितरण हा एक महाकठीण उद्योग असतो, तो चित्रपट निर्मितीपेक्षा जिकिरीचा
असतो याचा थोडासुद्धा विचार चित्रपट बनविण्यापूर्वी मी केला नव्हता. चित्रपट
निर्मितीनंतर त्याच्या प्रदर्शनासाठी करावा लागणारा खटाटोप मला बरेच काही शिकवून
गेला.
आमच्या चित्रपटांचा प्रकाशन
समारंभ आम्ही जाणीवपूर्वक थाटात केला. प्रख्यात सिने दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल,
डॉ. श्रीराम लागू यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत तो झाला. दीनानाथ हॉस्पिटलचे
डॉ. केळकर त्यावेळी उपस्थित होते. सुमारे तीनशे लोकांच्या उपस्थितीत लघुपटांचे
सादरीकरण झाले. उपस्थित मान्यवर आणि इतरही सर्वच जणांनी लघुपटांचे मनापासून कौतुक
केले. एका अर्थाने कृतकृत्य वाटावे असा तो प्रसंग होता.
बहुसंख्य प्रेक्षकांच्या
अनुकूल प्रतिसादाने मी अगदी खुशीत होतो. पहिला छोटा धक्का मला बसला तो आमच्याच एका
सहकारी डॉक्टरांच्या प्रतिक्रियेनंतर. आमच्या लघुपटात इन्सुलीन इंजेक्शन कसे
टोचावे याविषयी माहिती नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. चित्रपटाचे स्वरूप रंजक
ठेवण्याच्या आमच्या कल्पनेला छेद देणारी
ही अपेक्षा होती आणि तीही एका तज्ज्ञ डॉक्टरकडून आलेली होती. आरोग्यविषयक असा
शिक्का घेऊन आलेल्या मनोरंजक चित्रपटाकडून अपेक्षा मात्र documentary ची केली
जाते, अशी नवी जाणीव मला त्याक्षणी झाली. लेखन, साहित्य अशा क्षेत्रात नाव राखून
असणाऱ्या एका मित्राची प्रतिक्रियासुद्धा अशीच बोलकी होती. लघुपटात सांगितलेल्या गोष्टी
सर्वसामान्यपणे माहीत असणाऱ्या आहेत असा त्यांचा आक्षेप होता. मधुमेहाचे निदान झाल्यानंतर होणारी भावनिक
ओढाताण, इन्सुलीन टोचण्याला असणारा भावनिक विरोध, त्याविषयी असणारे सार्वत्रिक
गैरसमज, इंजेक्शन घेण्याविषयी, एकूणच आजाराविषयी असणारी न्यूनगंडाची भावना आणि
यामुळे उपचारांमध्ये येणारे अडथळे याचे विवेचन लघुपटात आहे, त्याकडे या
साहित्यिकाचे दुर्लक्ष व्हावे आणि त्यांनीही अपेक्षा अधिकाधिक माहितीचीच ठेवावी हे
आश्चर्यकारक वाटले. चित्रपट क्षेत्रात ज्यांच्या नावाचा दबदबा आहे अशा एका
कलाकारांनी तर चित्रपट काढण्याचा तुम्हाला अधिकारच काय, असा काय या क्षेत्रातला
अनुभव तुम्हाला आहे की तुम्ही असे लघुपट काढावेत असा मुद्दा धरून माझी झाडाझडती
घेतली. चित्रपटाच्या गुणवत्तेविषयी मतभेद होऊ शकतात हे मान्य करूनही, केवळ या कारणासाठी
लघुपटाला विरोध करणे आततायीपणाचे वाटले.
अशा छोट्या अडचणींना दाद न
देता आम्ही आमच्या लघुपटांचे सादरीकरण चालू ठेवले. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे
घरचेच सहकार्य आम्हाला असल्याने हे आम्हाला शक्य होते. पण अडचण होती जाहिरातीची. चित्रपट
काढण्यापुरतेच आर्थिक पाठबळ आमच्याजवळ असल्याने जाहिरातीसाठी स्वतंत्र खर्च करणे
आम्हाला शक्य नव्हते. वर्तमानपत्रांमधील जाहिरातींचे दर आमच्या आवाक्याबाहेरचे
होते. सिनेमातील लोकशिक्षणाचा हेतू, त्यात कोणाचीच जाहिरात करण्याचा हेतू नाही,
कुठलाच आर्थिक लाभ अपेक्षित नाही असे वारंवार पटवूनही कुठल्याच वृत्तपत्राकडून
जाहिरातीसंदर्भात कुठलेच सहकार्य मिळाले नाही. परिणामी पहिल्या काही प्रयोगांना
आमच्या व्यक्तिगत संबंधातून मिळत गेलेला प्रचंड प्रतिसाद हळू हळू कमी कमी होत
गेला. बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचण्याची आमची अपेक्षा फोल ठरत गेली आणि हळू हळू
लघुपट दाखविणे अवघड होत गेले. हॉस्पिटलच्या आवारात भित्तीपत्रके लावणे, आमच्या
व्यक्तिगत परिचयातून निमंत्रणे करणे अशा मार्गांनी किती लोकांपर्यंत पोचणे शक्य
होते?
हे लघुपट चित्रपटगृहात
कुठल्याप्रकारे दाखवता येतील का असाही एक विचार आम्ही केला. अगदी व्यक्तिगत
परिचयातून एका चित्रपटगृहाच्या मालकांपर्यंत समक्ष बोलणी केली. चित्रपटाची एक प्रत
त्यांच्यापर्यंत पोचविली. वारंवार त्यांच्याशी संपर्क साधल्यावरही हे लघुपट पाहून
त्यावर मत देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविले नाही. यासंदर्भात इतर काही मदत करणे
तर दूरच राहिले.
लघुपटांचा संदर्भ मध्यम
वर्गीय संस्कृतीशी आहे. टीव्हीवर आजकाल बऱ्याच मराठी वाहिन्या आहेत. यापैकी
कुठल्या तरी वाहिनीस विनंती करून हे लघुपट दाखवावेत यादृष्टीनेही आम्ही काही
प्रयत्न केले. परंतु आम्ही ज्यांच्याशी संपर्क करू शकलो त्यापैकी कुठल्याच
वाहिनीच्या एकाही अधिकाऱ्याने लघुपट बघण्याचेही सौजन्य दाखविले नाही. आम्ही आमच्या
तर्फे प्रायोजक मिळवून पैसे आणावेत अशीच सर्वांची अपेक्षा होती. एक सुखद अनुभव
दूरदर्शनकडून आला. मुम्बई दूरदर्शनचे मान्यवर अधिकारी श्री सुधीर पाटणकर आणि पुणे
दूरदर्शनचे श्री अनिल गायकवाड यांनी मात्र आमचे लघुपट पहिले, मनापासून नावाजले.
आम्ही केलेले काम सर्वच दृष्टीने दर्जेदार असल्याची पावती दिली. त्यांच्या अमोल
सहकार्याने मुंबई दूरदर्शनवर एका रविवारी सायंकाळी ८ वाजता आमचे लघुपट एका खास
प्रक्षेपणाद्वारे दाखविले गेले. यासाठी अर्थातच आम्हाला काही खर्च करावा लागला. पण
दूरदर्शनकडून आमच्या लघुपटांना मिळालेल्या सहकार्याची कृतज्ञतेने नोंद करणे गरजेचे
आहे. आज टीव्हीच्या सर्वच इतर वाहिन्या या किती अर्थशरण झाल्या आहेत, आणि एकूण
सामाजिक भानाचा तेथे कसा अभाव आहे याचेच दर्शन आम्हाला या संदर्भात घडले.
एक अशी अपेक्षा होती की
विविध वैद्यकीय संघटना पुण्यात आणि महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यांच्याद्वारे
देखील या लघुपटांच्या सादरीकरणाची शक्यता असू शकते. पुण्यातील प्रमुख वैद्यकीय
संघटनेशी या संदर्भात बोलणी केली असता त्यांनीही हॉलचे भाडे आणि इतर रीतसर खर्चाची
मागणी केली. कुठल्याही इतर कार्यक्रमात औचित्य साधून या लघुपटांचे सादरीकरण
करण्यातही रस दाखवला नाही. संघटनेच्या कुठल्याच पदाधिकाऱ्यांनी हे लघुपट स्वतः
पाहण्याची तसदी घेतली नाही. एका वैद्यकीय परिसंवादासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील वैद्यकीय
व्यावसायिकांना आम्ही आमच्यातर्फे या लघुपटांची एक प्रत मोफत दिली. आजवर
त्यांच्यातर्फे कोणीही हे लघुपट स्वतः पहिल्याची अथवा त्यांच्या भागात दाखविल्याची
बातमी आमच्याकडे आलेली नाही.
लघुपटांच्या सर्वदूर
वितरणाबाबत आम्हाला आलेले हे अनुभव आहेत. आम्ही या क्षेत्रात अनभिज्ञ असल्याने
आम्ही जे मार्ग वापरले ते चुकीचे असण्याची शक्यता आहे. पण ज्या तथाकथित
मान्यवरांशी या संदर्भात आमचा संपर्क आला त्यांची एकूण अनास्था मात्र दुर्दैवी
म्हणावी अशी आहे. आजच्या युगात संपर्क साधनांची वाढ अमर्याद पद्धतीने झाली आहे असे
आपण म्हणतो. अशा काळात एखाद्या छोट्या सामाजिक कामासाठी लोकांपर्यंत पोचणे किती
अवघड झाले आहे, याची चुणूक आम्हाला आमच्या अनुभवातून मिळाली. एक विशेष गोष्ट नमूद
करण्याजोगी- ज्या औषध कंपनीच्या आर्थिक सहकार्यातून आमचे लघुपट निर्माण झाले,
त्यांनीही हे लघुपट त्यांच्याद्वारे कुणाला दाखविल्याचे ऐकिवात नाही.
आधी म्हटल्याप्रमाणे हे
लघुपट काढण्याचा माझा मुख्य हेतू लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोचण्याचा होता.
ज्यांनी हे लघुपट पहिले त्यांच्यावर याचा काय परिणाम झाला, त्यांच्या यावरच्या
प्रतिक्रिया काय होत्या, हेही पाहण्याजोगे आहे. बहुसंख्य व्यक्तींनी मी केलेल्या
या कामाची व्यक्तिगत पातळीवर दाद दिली. माझ्या वैद्यकीय कामाच्या व्यापातून मी
अश्या कामासाठी वेळ काढतो यासाठी आश्चर्य व कौतुक व्यक्त केले. कित्येकांनी लघुपटाच्या
कलामूल्यांविषयी अनुकूल मते दिली. पण हे लघुपट पाहून एकाही रुग्णाने इन्सुलीन
इंजेक्शन घेण्यास अनुकूलता दर्शविली नाही. सौम्य मधुमेहाने पीडित असणाऱ्या माझ्या
एका सुशिक्षित स्त्री रुग्णाची प्रतिक्रिया ऐकून तर मी थक्कच झालो. त्या म्हणतात- कित्ती छान काढलाय सिनेमा तुम्ही, मला तर बाई
इतका आवडला. तो पाहून मी तर ठरवूनच टाकलय, आपण असं इन्सुलीन घेण्याची वेळच मुळी
आपल्यावर येऊ द्यायची नाही!! आमच्या
लघुपटातून असा बोध व्हावा असं काहीच नसताना हा बोध कुठून उपजला?
माणसाची शिक्षण प्रेरणा ही
एक अजब गोष्ट आहे. कुठल्या घटनेतून मनुष्य काय बोध घेईल हे कित्येकदा अनाकलनीय
ठरते. माणसाचे बरेचसे निष्कर्ष स्वयंप्रेरित असतात. तुम्ही काहीही शिकवा, मी मला
हवे तेच शिकणार, अशी काही अंतःप्रेरणा असावी बहुधा! असे जर असेल तर काय उपयोग आहे,
अशा लोकशिक्षणाचा, अशा या वांझ प्रयत्नांचा? शेवटी हा सगळा खटाटोप स्वान्तसुखाय तर
नाही? मी काढलेल्या लघुपटांचा बोध हाच म्हणावा काय?
डॉ संजीव मंगरूळकर
दूरभाष ९४०५०१८८२०
खूप छान मांडलत. आपली कळकळ पोहोचतेय. आजच्या समाजाचा जणू आरसाच दाखवलात.
ReplyDeleteतुम्ही म्हणता ते अगदी पटलं >>माणसाची शिक्षण प्रेरणा ही एक अजब गोष्ट आहे. कुठल्या घटनेतून मनुष्य काय बोध घेईल हे कित्येकदा अनाकलनीय ठरते. <<<
आपली आणखीन एक नोंद खूपच पटली >>>एक तर कुणाच्या आजाराविषयी बोलणे त्याला कधीच आवडत नाही, त्यातून त्याला त्याचा आजार नुकताच समजलेला असेल तर त्याची तेव्हाची मनःस्थिती थोडीच नवीन ज्ञान शिकण्याची असते ? तो तर तेव्हा एक प्रकारच्या बंडखोर मनःस्थितीत असतो. हे कसे शक्य आहे, आणि हा आजार मलाच का म्हणून ? अशी बंडखोर मनस्थिती असते त्याची. <<< किमान माझ्याबाबतीत ते होऊ नये अशी काळजी घेईन.
अशा स्वरुपाचे लोकशिक्षण देण्यासाठी खरंतर डॉक्टर आणि पेशंट यांच्या मधे एखादी काऊंसेलर सारखी व्यक्ती असायला हवी. ज्यातून डॉक्टरांचा वेळ वाचू शकेल असे वाटते.
आपली लेखन शैली छान आहे, अवघड विषय सोपा करून सांगण्याची हातोटीही आहे.
हा चित्रपट बघायची उत्सुकता आहे.
धन्यवाद ___/\___