Tuesday, 2 October 2012

ऑक्टोंबर

ऑक्टोंबर


आता मी जो प्रसंग सांगणार आहे, तो अगदीच छोटा आहे. त्यामध्ये काही घटनांचा खास आकर्षक असा क्रम नाही, त्या प्रसंगाला विशेष अशी सुरुवात नाही की शेवटही नाही. जे काही घडलं, तो काही सेकंदांचा व्यवहार होता. अगदी एखाद्या टी. व्ही. मालिकेप्रमाणे लांबण लावत वाढवावा म्हटले तरी वाढविता येऊ नये असा एक व्यवहार. तरी त्याविषयी लिहिण्याचा एवढा सोस का वाटावा, यामागे एक सोपे कारण मला असे दिसते की या प्रसंगाने माझ्या विचारांना खाद्य पुरविले. मला अंतर्मुख बनविले. किती तरी वेळा असं घडतं, एखाद्या गोष्टीविषयी आपली एक स्वतःची अशी खास भूमिका असते, तिच्याविषयी आपली आग्रही मते असतात, पण ही भूमिका तपासण्याचे कष्ट मात्र आपण कधीच घेतलेले नसतात. आपल्या या आग्रही मतांना कधी आव्हान दिलेले नसते. जणू काही तरी असावी म्हणून असलेली अशी ही भूमिका किंवा मते आपण निर्विकारपणे बाळगत आलेलो असतो. आपल्या अशा आग्रहांनासुद्धा आरसा दाखवणे गरजेचे आहे, त्यांना तपासणे गरजेचे आहे, हे मला जाणवलं ते त्या प्रसंगामुळे. आणि म्हणूनच कितीही छोटा आणि  अनाकर्षक वाटला तरी हा प्रसंग मला सांगावासा वाटतो.
तर असा हा प्रसंग सांगायचा म्हणजे प्रथम त्याच्याशी संबंधित व्यक्तींचा पात्रपरिचय करून द्यावा लागेल. त्या परिचयाशिवाय एकूण प्रसंगाचा अर्थबोध आणि अंतर्बोध होणार नाही. प्रसंगात एकूण पात्रे आहेत तीन. पात्र क्रमांक एक, श्री. भिडे. वय वर्षे पंच्याऐंशी. भिडे हे माझे खूप जुने पेशंट आणि परिचित आहेत. माझ्या वडिलांपासून त्यांचा आणि आमच्या घराचा परिचय, अनेक धाग्यांनी बांधलेला. वयाने, अधिकाराने मला पितृतुल्य वाटावे असे हे भिडेकाका. कौटुंबिक परिचयातून पेशंट झालेले. आमच्या वयात बरेच अंतर आहे. पण तरीही अतिशय जिव्हाळ्याने आणि बरोबरीच्या नात्याने ते माझ्याशी बोलत असतात. त्यांचं मन माझ्यासमोर मोकळं करत असतात. ईश्वरकृपेने त्यांची तब्येत ठणठणीत आहे, सांगावा असा कुठलाच मोठा आजार त्यांना नाही. पण कुणीही खचून जावं अशा घटनांना सामोरे जाण्याची पाळी वारंवार त्यांच्या वाट्याला आली. अगदी तरुण वयाचा मुलगा अपघातात गेला. एक मुलगी जन्मजात व्यंग घेऊन निपजली आणि तरुण वयातच कुटुंबाला आर्थिक आणि भावनिक वेदना देत निवर्तली. एक जावई काकांच्या मते दुर्वर्तनी, हुशार पण कामचुकार व्यसनी निघाला. सासऱ्याच्या मृत्यूची वाट पाहणारा. त्याच्या इस्टेटीवर डोळा ठेवून असलेला. अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपला व्यवसाय नेकीने वाढविणारे भिडेकाका. आपल्या समस्याग्रस्त घराला त्यांनीच लीलया सावरले, पुढे नेले. अगदी आर्थिकदृष्ट्या समृद्ध म्हणावे अशा पातळीवर नेले. भिडेकाका खरे तर राजकारणात उतरून पार राज्य पातळीवरचे नेतेच व्हायचे, पण त्यंची नीतीमत्ता आड आली. त्यांचे संस्कार आड आले. त्यांच्याशी गप्पा मारणे हा मला नेहमीच एक समृद्ध अनुभव वाटत आलेला आहे. कथेच्या सुरुवातीला भिड्यांचा एवढा परिचय पुरेसा आहे.
पात्र क्रमांक दोन, माझी दवाखान्यातली सहायिका, कु. मोनिका. ही माझ्याकडे नव्यानेच कामाला लागलेली आहे. वय वर्षे वीस. नुकतीच बी.कॉम. झालेली. हिने बी.कॉम. मराठीतून केलेले आहे. (ही गोष्ट महत्त्वाची आहे.) मोनिका जवळच्याच खेड्यातून आलेली आहे. वडील निरक्षर. शेतकरी. मोठ्या शहरात क्वचितच येणारे. (ही गोष्टही महत्त्वाची आहे.) मोनिका शहरात तिच्या मामाकडे राहून शिकते. आता एम्. कॉम. करण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे. वडलांना आर्थिक भार झेपणार नाही, म्हणून अशी बाहेर कामे करून ती शिक्षण पूर्ण करत आहे. मोनिकाला कामावर ठेवून तिला तिच्या कामाचा पगार देताना मी जणू काही एक समाजकार्य करीत असल्याचा भ्रम मला व्हावा इतपत आर्थिक दुरवस्थेत मोनिका आहे. ती कामाला अत्यंत तत्पर आणि नवीन काहीही शिकायला उत्सुक अशी मुलगी आहे. खेड्यातून आल्याने मोनिकाच्या बोलण्याला एक ग्रामीण हेल आहे. पण कुणाशीही बोलताना तो अडसर ठरत नाही. कथेच्या या टप्प्यावर मोनिकाचा इतपत परिचय ठीक आहे.
तिसरे पात्र म्हणजे मी स्वतः! उच्च विद्याविभूषित डॉक्टर. मी नुसताच डॉक्टर नाही, मी साहित्यिक डॉक्टर आहे. भाषाप्रेमी (ही गोष्ट या लेखातून सिद्ध व्हावी!), सुसंस्कृत कलासक्त वगैरे असं सर्व काही आहे असा वाटावा असा डॉक्टर आहे. भाषेच्या शुद्धतेचा मला तीव्र सोस आहे. मी एके काळचा जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती धारक आहे. हे मी माझे कौतुक म्हणून अर्थातच सांगत नसून ते कथेसाठी आवश्यक म्हणूनच केवळ सांगत आहे.  कथेच्या या टप्प्यावर माझा इतपत परिचय पुरेसा ठरावा.
तर आता मूळ प्रसंगाकडे वळू. भिडेकाका माझ्याकडे त्यांच्या नियमित तपासणीसाठी आले. त्यांना खास काही आजार नाही. किरकोळ ब्लड प्रेशर वगैरे तपासून त्यांचे औषध मी लिहीत होतो, तेवढ्यात माझ्या खोलीचे दार उघडून मोनिका आत आली. सराईत सहायिकेचा सौम्य वावर अजून मोनिकाच्या अंगवळणी पडलेला नाही. एखाद्या वादळासारखी ती इकडे तिकडे फिरत असते. तर दार उघडून दाणदिशी मोनिका आत आली आणि म्हणाली, “ आधीचे पेशंट तारीख बदलून मागतायत, ऑक्टोंबर नको म्हणतायत.” मोनिकाच्या तोंडून ‘ऑक्टोंबर´हा शब्द ऐकला मात्र, भिडे काका फिसकन हसले. कुत्सितपणे त्यांनी मागे वळून मोनिकाकडे पाहिले.
‘ऑक्टोंबर?”, माझ्याकडे बघून डोळे मिचकावत भिडे काका हसू लागले. ‘ऑक्टोंबर म्हणते ही! नाव काय हिचं?’
‘मोनिका’ मी चलाखीने म्हणालो.
‘नाव नाही, आडनाव काय हिचं?’
‘नवीनच आहे. शिकतेय.’, मी प्रश्नाला बगल देत म्हणालो.
‘नाही, नुसतीचं गोरी गोमटी दिसतेय ‘ऑक्टोंबर’ म्हणे!’, भिडेकाका म्हणाले.
प्रसंगाचा, प्रश्नाचा रोख मोनिकाच्या कितपत लक्षात आला हे मला समजले नाही. काही तरी गंभीर चूक झाल्याची अपराधी जाणीव तिच्या चेहऱ्यावर उमटली. काय करावे हे न कळून भांबावल्यासारखी माझ्याकडे पाहात ती तिथेच उभी राहिली. खुणेनेच मी तिला बाहेर जायला सांगून प्रसंग तिथेच संपवला. भिडे काकांना मात्र हसू आवरणं अवघड जात होतं. हसत हसतच ते दवाखान्यातून बाहेर पडले.
माझी गोष्ट इथेच संपते.
काय आहे इतकं या प्रसंगात? काय बोध घेतला मी त्यातून?
एक तर मला खूप वाईट वाटलं. माझ्या सहायिकेचा असा अपमान व्हावा, तोही भिडेकाकांसारख्या पितृतुल्य व्यक्तीकडून व्हावा ही गोष्ट मला खटकली. वयाची पंच्याऐंशी वर्षे विविध समस्यांना तोड देत जगणारे भिडे काका, असे भिडे काका की ज्यांना सामाजिक कार्यात रस होता, राजकारणाची जाण होती, आपल्या नीतिमत्तेमुळे आपण राजकारणात गेलो नाही असे अभिमानाने सांगणारे हे भिडेकाका. एका छोट्या मुलीची इंग्रजी भाषेच्या आकलनाची अडचण ते समजू शकले नाहीत, इतकेच नव्हे तर ऑक्टोबर महिन्याला ऑक्टोंबर म्हणणे त्यांना असे आणि इतके विनोदी वाटले, की कुणाचाही अकारण त्याच्या  तोंडावर अपमान करू नये, इतक्या साध्या आणि किमान सामाजिक मूल्याचेही भान त्यांना राहिले नाही. भिडे काकांविषयी माझ्या मनात जी आदरणीय प्रतिमा होती तिला असा छेद बसावा ही दुर्दैवी घटना होती.
झाली ही भिड्यांची चूक, हे मान्य केले तरी भाषेच्या शुद्धतेचे काय? मी तर स्वतःला भाषाप्रेमी समजणारा, भाषेच्या शुद्धतेविषयी इतका आग्रही की अगदी लग्न पत्रिका जरी आली तरी त्यातल्या शुद्धलेखनाच्या चुकांना हसणारा. कुणी डॉक्टरने लिहिलेल्या अर्जातल्या चुकांची खिल्ली उडविणारा- मग मी का मोनिकाला सहन करतोय? तिची तरफदारी करतोय? हा प्रश्न काही काळ मलाही बुचकळ्यात पाडून गेला. मोनिकाला माझी सहायिका म्हणून ठेवणे मलाच लाजिरवाणे वाटावे की काय असे मला वाटून गेले.
सुदैवाने माझी ही संभ्रमित अवस्थां फार काळ टिकली नाही. शुद्धलेखनाच्या, शुद्ध भाषेच्या माझ्या आग्रहाचे मर्म मी आजवर तपासलेच नव्हते मुळी. ते तपासण्याची संधी मला आज मिळाली होती. ही संधी मला अनमोल वाटली.
भाषा शुद्ध असावी, हे खरे, पण कशासाठी? भाषेच्या आकलनासाठी खरं तर शुद्धतेची फारशी गरजच नसते. अशुद्ध भाषासुद्धा समजू शकतेच की. पण शुद्ध भाषा हे प्रतीक आहे स्वयंशिस्तीचे. एखादी गोष्ट नेटकेपणाने करण्याच्या आपल्या क्षमतेचे. ज्याची भाषा शुद्ध त्याचे सर्वच काम शुद्ध आणि नेटके असणार असा विश्वास वाटतो. शुद्ध भाषा ही अशा प्रकारे व्यक्तीचा गुण निर्देश करण्याचे काम करते.
पण हे सर्व कुणासाठी? ज्याला शिक्षणाची मुबलक संधी उपलब्ध झाली आहे अशांसाठीच. अशा व्यक्तीलाच आपण हा भाषा शुद्धतेचा निकष लावू शकतो. इंग्रजी शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या मोनिकाकडून शुद्ध इंग्रजीची अपेक्षाच करणे चूक आहे. तिच्यावर अन्याय करणारे आहे. मोनिका आपल्या कामांमध्ये निपुण आहे, खेड्यातून येऊन मोठ्या शहरात स्वतंत्रपणे राहू शकते हे तिच्या व्यक्तित्वाचे बलस्थान आहे.
भिडे काकांच्या वर्तनाचा हा एक मोठाच फायदा मला झाला. माझ्या भाषाशुद्धीच्या आग्रहाचे मर्म मला त्यांच्यामुळे समजले. त्यामुळे मी खूष आहे. मोनिकाला अजूनही आनंदाने मी कामावर ठवून आहे. ती तिच्या कामात तत्पर आहे हे मला पुरेसे आहे!

डॉ संजीव मंगरूळकर
९४०५०१८८२०

No comments:

Post a Comment