फसवणूक
कॉलेजकडे जाणारा रस्ता
चढाचा होता. सकाळचे नऊ वाजायला आलेले. लेक्चरला उशीर होणार बहुतेक अशा भीतीने
जिवाचा पार आटापिटा करत सायकल ताणत होतो. पेडलवर उभा होत दोन्ही बाजूंना झुकत
सगळ्या शरीराचं वजन टाकत गाडीला वेग देत होतो. अशा वेळेला नेमकी रस्त्यावर मरणाची
गर्दी असते. रहदारीशी आट्य़ापाट्य़ा खेळत वाट काढावी लागते. एखाद्या तीरासारखा
कॉलेजच्या फाटकातून आत घुसलो. वाहनतळावर सायकल लावली. कॉलेजच्या जिन्याच्या दिशेने
पळतच निघणार तर पाठीवर जोरदार थाप पडली. इतकी जोरदार आणि अनपेक्षित की पार
हेलपाटलोच मी. ही काय आफत म्हणून बघतो तर सम्प्या. तोंड फाकवून दातांचं प्रदर्शन
मांडीत माझ्याकडे पाहून विस्तीर्ण हसत असलेला. थोडा वैतागलोच.
‘अरे, चल जाऊ दे ना लवकर.
तिकडे मॅडमनी लेक्चर सुरुसुद्धा केलं असेल. चल चल, जाऊ या. उशीर झाला तर त्रास
देते राव ती.’ असं म्हणत मी त्याला बाजूला सारत पुढे पळू लागलो.
‘गुड न्यूज, नो लेक्चर
टुडे. मॅडम आलेल्या नाहीत, येणारही नाहीत.
अर्थात आनंदी आनंद गडे. आक्खी सकाळ रिकामी. एवं च पळणे नको. जिवाला त्रास नको.’
माझ्या जवळ येऊन खांद्यावर हात टाकून संप्यानं मला पार आवळलंच.
लेक्चर नाही म्हटल्यावर
नाही म्हटलं तरी एक सैलपणाची भावना माझ्या मनात आली. संप्याविषयी प्रेम वाटू
लागलं. आसपास सगळीकडे संगीत वाजतंय असं वाटू लागलं. कॉलेजच्या कट्ट्यावर बसलो.
आनंदभरानं आसपास पाहत होतो. केवढा तरी आनंद होता चहूकडे. आमच्या वर्गातली आनंदी
मुलं ठिकठिकाणी बागडत होती. समोर आमचं हॉस्पिटल होतं. तेही किती आनंदात होतं. एरवी
खरं तर त्या हॉस्पिटलकडे मी नीटपणे पाहिलंसुद्धा नव्हतं कधी. मेडिकलच्या दुसऱ्या
वर्षाची सुरुवात. अजून हॉस्पिटलमधल्या टर्मची सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे
हॉस्पिटल आतून नीट बघण्याची वेळच आली नव्हती. हॉस्पिटलची ती अक्राळविक्राळ इमारत
दुरून पाहून होतो. तिथली ती भीषण गर्दी आमच्या कॉलेजमधूनही दिसत असे, जाणवत असे.
अशी गर्दी की ती नुसती दुरून पाहिली तरी छाती दडपायची. नको वाटायचं. ती गर्दी
नुसती दिसायची असे नाही तर त्या गर्दीला एक वासही असायचा. घामाचा, घाणीचा, गरीबीचा
की नुसत्या वेदनेचा, कळायला खूप अवघड होतं. तो वासही अगदी इतका दूरवर आमच्या
कॉलेजपर्यंत यायचा. एकेक वेळेला शिसारी वाटायची, त्याची सवय व्हायची होती अजून. पण
आज तेच हॉस्पिटल मला आनंदी दिसू लागलं, आनंदी पेशंट, आनंदी सिस्टर्स. सगळा आनंदच
सगळीकडे. बिनलेक्चरचा सार्वभौम आनंद.
कट्ट्यावर बसून मी मोकळा
आनंद उपभोगत होतो. शेजारी संप्या. माझ्यासारखाच आनंदमार्गी! किती वेळ गेला ठाऊक
नाही. अचानक संप्याला आठवण आली.
‘तब्येत बरी नाही राव माझी.
घसा खवखवतोय. ताप येणारे बहुतेक. चल. येतोस? हॉस्पिटलला जाऊ. औषध आणू.’ संप्या
म्हणाला.
‘अरे, हे काय भलतंच. हॉस्पिटलमधे
जायचं? राजा, मला तर काहीसुद्धा माहीत नाही तिथलं, कधी आतसुद्धा गेलो नाहीये. कुठली
ओ.पी.डी. कुठाय, पेपर कसा काढायचा, कुणाला भेटायचं- काहीसुद्धा माहिती नाही. काय
बोअर आयडिया काढलीयेस. म्हणे हॉस्पिटलमधे जाऊ! त्यापेक्षा कँटीन परवडलं. चल. एक कप
चहा टाकू.’ मी विरोधाचा माफक प्रयत्न केला. पण
त्याचा उपयोग होणार नव्हता. संप्यानं सगळं काही जणू ठरवलंच होतं.
‘चल, चल. मला माहीत्ये रे
सगळं. एक-दोनदा गेलो पण आहे मी तिकडे. काय विशेष अवघड नसतं रे त्याच्यात. तुला
माहीत्ये का, आपण विद्यार्थी आहोत ना कॉलेजचे, आपल्याला फुकट असतं सगळं. नुसता
एप्रन टाकायचा अंगावर आणि चलायचं पुढे पुढे. जाम भाव असतो राव या एप्रनला,
माहित्ये? चल चल.’
माझा नाईलाज झाला. एप्रन
अंगावर चढवला आणि निघालो मागे मागे संप्याच्या मार्गदर्शनाखाली. संप्या
पहिल्यापासून थोडा जास्त शहाणा होता, धाडसी होता, इतपत मला माहीत होतं. चला,
तेवढाच त्या निमित्तानं हॉस्पिटल सफरीचा अनुभव गाठी बांधू या असा व्यावहारिक विचार
मी केला आणि हॉस्पिटलमधे घुसलो.
हॉस्पिटलच्या आवारात पाऊल
टाकलं मात्र, तिथली एकूण परिस्थिती जाम अंगावर आली. लांबून जाणवलं तो मघाचा आनंद
पार कुठच्या कुठे पळालाच जणू. कुणी तरी सरळ सरळ अंगावर हल्ला करावा असं वाटलं.
माणसांचा महासागर. मळक्या कपड्यातली माणसं. दाढीवाली माणसं. लुंगीवाली माणसं.
धोतरातली, पायजम्यातली माणसं. तशाच वेगवेगळ्या ग्रामीण पेहरावातील बायका. कुणी शेंबडी
पोरं आयांच्या कडेवर घाबरून बसलेली किंवा आयांच्या बोटांना चिकटलेली आणि फरफटत
चाललेली. कुणी रडतंय, भेकतंय. मधेच कुणी पेशंट चाकाच्या खुर्चीत बसून पळवला जातोय.
कुणी एक दोघे आडवे स्ट्रेचरवर. तो स्ट्रेचरही पळतोय. सगळीकडे एक दिशाहीन धावपळ.
गोंगाट. रांगा. पेपरसाठी रांगा. तपासण्यासाठी रांगा. सर्टिफिकेट्ससाठी रांगा. नुसत्या
माहितीसाठी रांगा. कुणा एकाच्या नाकात नळी. ती तशीच घालून तो बाकड्यावर बसलेला.
निवांत. निःसंकोच. एवढ्या बाजूच्या धावपळीतही निवांत. एक रांग अवघडलेल्या गरोदर
स्त्रियांची. त्यांच्याबरोबर त्यांच्या आया, सासवा, त्यांची मुलं. ती तिथल्या त्या
फरशीवर मजेत खेळतायत. त्यांचा निर्व्याज आनंद. तर वाहणारी भऴभऴती जखम घेऊन कुणी
उभंय. तर कुणी वेदनेनं कळवळत रडतंय. विश्वरूप दर्शन. किंमत एक एप्रन मात्र. बाकी
सब मोफत.
मी भांबावलो. संप्या एकदमच
तयार इसम निघाला. एकदम झपाटलेला इसम. सगळ्या रांगात पहिला नंबर पटकावत तो वेगानं
पुढे पुढे जात होता. त्यानं एक केसपेपर काढला. नाक-कान-घसा असं लिहिलेली ओ.पी.डी.
शोधली. तिथल्या रांगेला हुलकावणी देत तो पार तिथल्या डॉक्टरसमोर जाऊन पोचला
सुद्धा. मागे मी.
चष्मा घातलेले मध्यम वयीन
असे कुणी डॉक्टर तिथे खुर्चीत बसलेले होते. डोक्यावर अभावानेच दिसणारे केस. नीट
कातरलेल्या मिशा. चेहऱ्यावर मंदसं स्मित. एकूण ज्ञानाचं वलय त्यांच्या चेहऱ्यावर
ओसंडून वाहत असलेलं. हे नाक-कान-घसावाले डॉक्टर डोक्यावर एक वेगळाच आरसा धारण करून
बसतात. समोरच्या दिव्यातून प्रकाश परावर्तन करून ते त्या आरशातूनच पेशंटची तपासणी
करतात. हा आरसा वरखाली करण्याचीही एक खास लकब असते. त्या लकबीतून तर तुम्ही तुमचा
अनुभव, तुमचे श्रेष्ठत्त्व सिद्ध करत असता. ज्या सफाईदारपणे आमचे हे डॉक्टर तो
आरसा वरखाली करत होते ते पाहू जाता ते एकदम वाकबगार आणि अनुभवी डॉक्टर असणार यात
संशय नव्हता. डोक्यावरच्या आरशाशी चाललेला त्यांचा तो अविरत चाळा, ते अनुभवी आणि
ज्ञानी हसू पाहून मी तर खूषच झालो, इतका की पुढे आपणही नाक-कान-घसा तज्ज्ञ व्हायचं
असा माझा मनोमन निश्चयच झाला. डॉक्टरांभोवती तीन-चार शिकाऊ डॉक्टरांचा घोळका होता.
अंगावर कसेबसे चढवलेले एप्रन आणि चेहऱ्यावर अथांग जिज्ञासा धारण करणारे हे
विद्यार्थी सर देतील ते ज्ञान ग्रहण करायला अगदी उत्सुक होते. सर बोलताहेत आणि
विद्यार्थी आज्ञाधारकपणे माना हलविताहेत असे ते दृश्य. मला ग्रेट वाटलं.
डॉक्टरांनी संप्याकडे
पाहिले. वरपासून खालपर्यंत पाहिले. मग माझ्याकडे पाहिले. पुन्हा तसेच. वरपासून
खालपर्यंत. मी उगाच नखशिखांत घाबरून गेलो. आतल्या आत लटपटू लागलो. डॉक्टरांनी केस
पेपर हातात घेतला.
‘पेशंट कोण?’ त्यांनी
विचारले.
‘मी, सर’ संप्या पुढे होत
म्हणाला. काय सॉलिड गट्स आहेत राव, मला मनोमन वाटले.
‘तू? कुठल्या वर्षाचा रे
तू?’
‘सेकंड इअर, सर’
‘सेकंड इअर काय. हं. काय
होतंय तुला?’
‘सर्दी झालीय सर, नाक
वाहतंय. घसा दुखतोय. ताप पण आहे. रोज संध्याकाळी डोकं दुखतंय. अंग जड झालंय. खूप
अशक्तपणा आलाय, सर.’ संप्यानं लक्षणांची पार सरबत्तीच लावली. हा इतका आजारी असेल
मला वाटलं नव्हतं. मला तर कीवच आली बिचाऱ्याची. इतका आजारी आणि तरीही कॉलेजला
येतो. कमालच आहे म्हणायची.
सरांनी शांतपणे ते ऐकलं.
पुन्हा एकदा एका सफाईदार लकबीनं डोक्यावरचा आरसा खाली घेतला आणि ते संप्याच्या
घशाच्या अंतर्गत निरीक्षणात मश्गुल झाले. इकडून
तिकडून चहुबाजूनी निरीक्षण करून समजल्यासारखी मान हलवत ते अखेर संप्याच्या घशातून
बाहेर आले. आसपास पाहू लागले.
‘चांगलाच सुजलाय रे घसा
तुझा.’ संप्याकडे पाहत ते सहानुभूतीने म्हणाले. आजूबाजूला नजर टाकल्यावर बाजूचे ते
विद्यार्थी त्यांच्या नजरेला पडले. ते जणू भानावर आले.
‘Look here, boys, he has
acute pharyngitis. You can see the inflamed pharynx, tonsils. Come, all of you
have a look.’
सरांनी हे नुसते म्हणायचा
अवकाश की ते चारही विद्यार्थी अधाशासारखे पुढे सरसावले. पुन्हा एकदा सरांनी
शैलीदारपणे डोक्यावरचा आरसा फिरवला, अशा नेमकेपणे की त्या उजेडात संप्याचा घसा
अंतर्बाह्य जणू उजळून निघाला. सरांच्या मागच्या बाजूला दोन विद्यार्थी, बाजूने
आणखी दोन विद्यार्थी. सगळ्यांनी संप्याच्या घशाचे मनसोक्त निरीक्षण केले. सारखा ‘आ’
करून संप्याचा घसा परत वेगळ्या प्रकाराने दुखणार की काय असे मला वाटू लागले.
बिच्चारा. काही क्षण असेच गेले. निरीक्षण झाले. सगळ्यांचे पूर्ण समाधान झाले याची
खात्री झाल्यावरच सरांनी पुन्हा एका सफाईदार हालचालीत डोक्यावरचा आरसा वर ढकलला
आणि अखेर संप्याला तोंड मिटायची परवानगी दिली. इतका वेळ उघडे ठेवलेले तोंड मिटायला
संप्याला क्षण दोन क्षण जास्तच वेळ लागला की काय अशी शंका मला वाटली. पण तो भास
असावा.
तपासणी झाली. संप्या उठला.
सरांनी त्याच्या हातात केस पेपर दिला. त्यावर त्यांनी काही औषधे लिहिली होती.
संप्यानं तो कागद हातात घेतला.
‘चल,’ असे मला नजरेनेच
खुणावले आणि झपाटल्यासारखा तो खोलीतून बाहेर पडला. त्याच्या मागोमाग मी. इथून
पुढचा संप्याचा झपाटा विलक्षणच होता. एखाद्या विजयी योद्ध्यासारखा तो तिथून
निघाला. हॉस्पिटलची ती गर्दी त्याला थोपवू शकली नाही. मधे मधे लुडबुडणारी लहान
पोरं त्याचा मार्ग रोखू शकली नाहीत. मधून मधून आडवे येणारे स्ट्रेचरसुद्धा त्याचा
वेग कमी करू शकले नाहीत. पार दमछाक झाली माझी त्याच्या मागे धावता धावता.
आजारपणातही इतके बळ. कमालच म्हणायची. वेगाने आम्ही कुठल्याशा रांगेजवळ गेलो.
पुन्हा एकदा एप्रनचा प्रभाव दाखवत पहिला नंबर मिळविला. तिथे कागद दाखवून संप्यानं
त्याची औषधं मिळवलीसुद्धा. फारसं काही कळायच्या आत आम्ही हॉस्पिटलच्या बाहेरसुद्धा
पडलो.
कॉलेजात आमच्या नेहमीच्या
कट्ट्यावर जाऊन पोचलो तेव्हा कुठे संप्या स्थिरावला. कट्ट्यावर विसावला. आणि अचानक
मोठमोठ्याने हसू लागला. खिंकाळू लागला. त्याचं हसणं इतकं वाढलं की मला काय करावे
हेच कळेना. आजारासाठी औषधं मिळाली आणि तीही फुकटात, याचा आनंद आणि तोही इतका. या
संप्याला झालंय तरी काय? मला कळेना. संप्या हसत होता, हसता हसता उठत होता, लोळत होता.
त्याच्या डोळ्यातून नाकातून पाण्याच्या नुसत्या धारा लागलेल्या. मी भांबावून पाहत
होतो. आता याचे काय होणार अशी काळजी मला लागलेली. याला परत हॉस्पिटलात न्यावे
लागते की काय असे मला वाटून गेले. ‘हर्षवायू’ म्हणतात तो तर हा नव्हे. माझे
वैद्यकीय ज्ञान तेव्हा यथातथाच होते म्हणून असली काही तरी भन्नाट शंकाही माझ्या
मनात येऊन गेली.
थोडा वेळ गेला. संप्या
हळूहळू शांत झाला. अगदी अधून मधून एखादा हसण्याचा हुंदका येण्याइतपत त्याची प्रगती
झाली.
‘च्यायला, काय झालंय तरी
काय लेका तुला. वेडबीड लागलं का काय?’ मी विचारलं. तसा संप्या उठला. कट्ट्यावर ताठ
उभा राहिला. खाली बसून मी वर त्याच्याकडे पाहत राहिलेलो. तर त्याने पुन्हा एक
सणसणीत धपाटा माझ्या पाठीत घातला आणि तो म्हणाला, ‘अरे साल्या, सॉलिड कमाल झाली
राव. अरे मी आजारी नव्हतोच. सर्दी झालीय माझ्या बहिणीला. आज वेळ होता, म्हटलं, बघू
जमलं तर तिला औषध नेऊ फुकटात. म्हणून गेलो तिथं. मी सांगितली ना ती लक्षणं माझी
नव्हतीच. माझ्या बहिणीची होती.’ असं म्हटला आणि पुन्हा एकदा तो हसत सुटला. अविरत
हसत सुटला.
डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०
No comments:
Post a Comment