अध्यात्म
माझ्या नेहमीच्या
सवयीप्रमाणे मी खोलीच्या दारावर टकटक केलं आणि मग दरवाजा ढकलला, तेव्हा ते समोर
खाटेवर बसलेले मला दिसले. माझे नवे पेशंट, स्वामीजी. वय पन्नाशीच्यापेक्षा कमीच
असणार. उन्हाने रापलेला वाटावा असा काळवंडलेला चेहरा, अर्धवट वाढलेले विस्कटलेले
पांढरे केस. तसेच अर्धवट वाढलेले पांढरे दाढीचे खुंट. त्यांच्या अंगावर मळलेला असा
पुरातन शर्ट होता. इतका मळलेला की तो कधी धुतला होता अशी शंकाही येऊ नये. त्यातच
भर म्हणून त्याच्यावर ठिकठिकाणी सांडलेला भंडारा. त्यांच्यातल्या आध्यात्मिकतेची
साक्ष देणारा. तसलंच मळकट धोतर नेसलेलं. नुसतेच पाहिले असते ते तर ते मला धनगरच
वाटले असते. पण मी त्यांना बरोबर ओळखलं, ते स्वामीजी होते. जोगळेकरांचे स्वामीजी.
अगदी सकाळीच मला
जोगळेकरांचा फोन आला होता. आमच्या स्वामीजींना अॅङमिट करतोय म्हणून. स्वतः
जोगळेकरसुद्धा माझ्या काही ओळखीचे नव्हतेच. असंच कुणी तरी डॉक्टर म्हणून माझं नाव
सांगितलं म्हणून माझ्याकडे प्रथमच येत असावेत बहुधा.
मी खोलीत पाऊल टाकलं तशी आत
मोठीच हालचाल झाली. कोणकोण तीन-चार माणसं आत होती, ती धडपडून उठली. एखादा धसका
घेतल्यासारखी. बहुतेक सगळी गावाकडची वाटावीत अशी मंडळी. त्यातून शहरी वाटावेत असे दिसणारे
कुणी गृहस्थ हसत माझ्यासमोर आले, हात पुढे करून माझा हात हातात घेत त्यांनी मला
स्वतःचा परिचय करून दिला, ‘मी जोगळेकर. आज सकाळी मीच बोललो होतो, फोनवर आपल्याशी.
आमच्या स्वामीजींना घेऊन आलोय गावावरून. काय काय बऱ्याच तक्रारी आहेत त्यांच्या.
तब्येतही उतरल्यासारखी दिसते, म्हणून मीच आग्रह करून घेऊन आलो त्यांना. ते नको-नको
म्हणतच होते. पण मीच आग्रह करून पकडून आणलंय बघा त्यांना. अगदीच स्वतःकडे लक्ष
नसतं हो स्वामीजींचं. नुसती इतरांची काळजी. यावेळी मी म्हटलं, ते काही नाही.
यावेळी मी काही तुमचं ऐकणार नाही. उठायचं आणि माझ्याबरोबर चलायचं. तेव्हा कुठे
एकदाचे आले पाहा.’
जोगळेकर बोलत होते, बोलताना
कौतुकानं स्वामीजींकडे पाहत होते. आज स्वामीजी आपल्यामुळे इथे आहेत, जणू आपल्या
ताब्यात आहेत याचा अभिमान त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसत होता.
मी हसलो. त्यांच्याशी
हस्तांदोलन केलं आणि पुढे होत स्वामीजींकडे गेलो.
‘नमस्कार, मी डॉक्टर. काय
त्रास होतोय तुम्हाला?’
‘जय बाप्पा! काय तसं खास
काय नाय बघा. हेच आपले जोगळेकर सायब म्हटलं म्हणून आलोय बघा.’
स्वामीजी हे बोलले खरं, पण
त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत कुणी स्त्री एकदमच पुढे आली, जणू अवतरली.
‘अवो, त्ये काय बी बोलत न्हाईत. मी सांगत्ये
बघा, त्येंची प्रक्रती लई खराब हाये. आन्न चालंना. योक घास सुदिक नाय चालत. सगळं
आंग दुखतंया. मधीच जीव भारी होतुया. डोस्कं बी काम कराना झालंय. त्यास्नी चांगलं
औशीद कराया झालंय. त्येंना नीट तपासा बगा, डॉक्टर सायब, चांगलं औशीद करा बगा.’
गोल चेहरा, कपाळावर
कुंकवाचा मळवट भरलेला, गोल गोल मोट्ठे डोळे, केसात भंडारा, गळ्यात मोठ्या-मोठ्या
मण्यांची भलीथोरली माळ आणि अगदी पार कोपरापर्यंत भरलेला चुडा अशा वजनदार
व्यक्तिमत्त्वाची सदर स्त्री म्हणजे स्वामींची सौभाग्यवती असणार हे माझ्या लगेचच
लक्षात आलं. आमच्या एकूण संवादात त्यांचाच वाटा मोठा होता. स्वामीजी बरेचसे
आज्ञाधारक मुलासारखे चूप बसून होते. त्यांची स्वतःची आपल्या प्रकृतीविषयी काहीच
तक्रार नव्हती. त्यांची पत्नी मात्र त्यांच्या तक्रारीचा पाढा वाचण्यात मश्गुल
होती, स्वामींची त्याविषयीसुद्धा काहीच तक्रार नव्हती. कुठलीच तक्रार करणे
त्यांच्या अध्यात्मात बसत नसल्यासारखे ते त्यापासून पूर्ण अलिप्त होते.
स्वामींना झोपण्याची विनंती
मी केली. त्यांची साधारण तपासणी केली. त्यांना विशेष काहीच आजार नव्हता. किंबहुना
ते आजारी नाहीत हेही त्यांची पत्नी सोडून बहुधा साऱ्यांनाच माहित होते. चाललेला
सगळा व्यवहार म्हणजे स्वामीजींचे कौतुक होते. जोगळेकरांनी स्वामीजींचे केलेले
कौतुक की एक प्रकारची प्रेमळ गुरुदक्षिणा? माझी डॉक्टरकी हा निव्वळ बाह्य उपचार
होता, जोगळेकरांच्या गुरुभक्तीच्या अभिव्यक्तीचे एक साधन. मला माझी ही भूमिका
पूर्ण उमगली होती. माझ्या वकुबानुसार मी ती वठवत होतो.
दुसऱ्या दिवशी मी पुन्हा
स्वामींच्या भेटीसाठी खोलीत गेलो. थोड्या फार फरकाने आतील परिस्थिती तशीच होती.
चार पाच लोकांचा एक जथ्था बसलेला, बरेचसे खेडूत, एक दोन शहरी वळणाचे लोक थोडे अलग
दुसऱ्या खाटेवर बसलेले. त्यात एक जोगळेकर. खोलीच्या एका भिंतीशी एक सतरंजी
अंथरलेली. त्यावर स्वामींच्या सौ मांडी घालून बसलेल्या. भितीलगत भिंतीच्या आधाराने
एक दत्ताची तसबीर ठेवलेली. तिला फुले वाहून त्याची पूजा केल्यासारखे दिसत होते. सौ
स्वामी चांगल्या शुचिर्भूत होत्या, ते त्यांच्या ओल्या केसांवरून दिसत होते.
तसबिरीशेजारी कुठलीतरी हलकी उदबत्ती जळत होती, तिचा उग्र वास खोलीत भरलेला होता.
एकूण वातावरण साधारण धार्मिक म्हणावे असे. हॉस्पिटलमधल्या खोलीचे म्हणून काही एक
वैद्यकीय पावित्र्य असते, ते मात्र पूर्ण हरवलेले. इतके की मलाच वाट चुकून भलत्याच
खोलीत आल्यासारखे वाटावे.
मी संकोचलो तसे स्वामीजी
खाटेवर उठून बसले. जोगळेकर उठून हसत सामोरे आले. इतरेजनांची आपसात कुजबुज सुरु
झाली. ‘डाक्तर हाइत, तपासाया आल्याती.’
‘काय म्हणत्ये तब्येत? झोप
वगैरे आली का रात्रीची?’ मी पुढे होत औपचारिक प्रश्न केला.
‘तब्बेत काय, ठीकच म्हणायची
ना बाप्पा.’ स्वामीजी कोड्यात बोलले. मीही अबोलपणे तसेच कोड्यात हसलो, त्यांची न
बिघडलेली प्रकृती तपासली.
‘काही नाही, सगळे रिपोर्ट
चांगले आलेत, अजून एक दोन तपासण्यांचे रिपोर्ट आज संध्याकाळपर्यंत येतील, पण सगळे
बहुतेक चांगलेच येणार असे दिसते. एकूण तब्येत ठणठणीत दिसते स्वामीजींची,’ मी उगीचच
प्रथा असल्याप्रमाणे त्यांना दिलासा देत म्हणालो.
‘सगळी वरची कृपा ना बाप्पा!’
स्वामीजी बोलले आणि त्यांनी वर आकाशाकडे पाहत सूचक हात उचलले खाली सतरंजीवर बसून
पूजेत मग्न असलेल्या त्यांच्या सौ एव्हाना उठल्या होत्या, माझ्या मागेच येऊन स्वामींना
जणू नव्यानेच निरखत होत्या.
‘काय तरी चांगली दवा द्या
लिवून त्येन्स्नी. चांगली भूक लागाय पायजे.’ सौंनी सूचना केली.
एव्हाना स्वामी उठले होते,
गादीवर ताठ बसत त्यांनी हात जोडले, ‘डाक्तरशी काय तरी बोलायचं म्हनतो, तवा जरा’ – असं
म्हणत त्यांनी नुसते आसपास पहिले मात्र, आसपासच्या सगळ्याच भक्त मंडळींनी त्यातून
योग्य तो बोध घेतला आणि लगोलग उठून खोलीबाहेरची वाट धरली. जोगळेकरही अस्वस्थसे
उठले, थोडे रेंगाळले पण अनुकूल प्रतिसाद न आल्याने हळूहळू खोलीबाहेर निघून गेले.
एवढ्या श्रद्धेने, प्रेमाने आपण स्वामीजींना इथे आणले, स्वखर्चाने त्यांच्या
तपासण्या केल्या आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या या गुपितात सामील करू नये, आपला
जवळिकीचा हक्क असा नाकारावा आणि आपलीही इतरेजनातच गणना करावी याची खंत त्यांच्या
हालचालीत जाणवत होती. पण स्वामींच्या इच्छेपुढे त्यांचा नाईलाज होता.
खोली क्षणात रिकामी झाली. आता
खोलीत फक्त स्वामीजी, त्यांची सौ आणि मी असे तिघेच उरलो. या गुप्ततेचा मला काहीच
बोध होईना. एका जागी खिळून जणू यंत्रवत मी तिथे उभा राहिलो.
‘डाक्तर सायेब, माझा हा येकला पोर हाय बघा, त्येला डाक्तर करायचा म्हनतो. त्येला तुमच्या दवाखान्यात ठिवा म्हनतो. तुम्ही डाक्तर लई मोठं असा. हिकडं कसा त्यो इकदम तैय्यार हुईल बगा. त्येला तुमच्याकडं ठिवा म्हनतो मी.’
स्वामींचा पोर? कुठाय? मला
कसा दिसला नाही तो? असं आश्चर्य माझ्या मनात येऊन मी आसपास पाहतो तर काटकुळं असं अगदी
बारक्या चणीचं एक पोरगं खरंच दिसलं मला, अगदी तिथेच, भिंतीलगत बसलेलं. अंग चोरून.
म्हणजे हा पोरगा कालपासून इथेच होता की काय, इतका नगण्य की अदृश्यच जणू! वय
विशीच्या आतबाहेर. तोच पारंपारिक गबाळा वेश. डोक्यावर मळकट टोपी. चेहऱ्यावर एक
अबोध अगम्य बावळटपणा. माझ्याकडे तो तिथूनच बिचकून पाहत होता.
हा मुलगा आणि डॉक्टर? हा तर
थोडा मतिमंदही दिसतो. याला डॉक्टर करायचे? स्वामीजी माझी थट्टा तर करीत नाहीत ना
अशा शंकेने भीतभीत मी त्यांच्याकडे पुन्हा पाहिले तर त्यांच्या चेहऱ्यावर अजीजी
पूर्ण दाटलेली. एका मोठ्या हॉस्पिटलमधल्या अनुभवी डॉक्टरशी आलेला हा संपर्क म्हणजे
पर्वणीच वाटली होती त्यांना. ही संधी गमवायची नाही असा निर्धार त्यांच्या त्या
नजरेतून ओतप्रोत भरलेला मला दिसत होता. जोगळेकरांचे हे आध्यात्मिक गुरु आणि
त्यांच्या चेहऱ्यावरची ही अजीजी.
हा सगळा प्रकार मला बेगडी आणि ओंगळवाणा वाटला.
कीव आली मला स्वामीजींची आणि त्यांचे शिष्य म्हणून मिरवणाऱ्या जोगळेकरांची.
अध्यात्माच्या क्षेत्रात प्रौढी मिरवणारे हे स्वामीजी त्यांची व्यावहारिक समज इतकी
तोकडी असावी? आजच्या शिक्षणव्यवस्थेविषयी हा मनुष्य इतका अनभिज्ञ असू शकतो की
डॉक्टर कसा होतो याची सर्वसामान्य समजही त्याला असू नये?
‘स्वामीजी, अजून लहान आहे
तुमचा पोर. डॉक्टर होण्याआधी बरंच काही शिकावं लागतं तेव्हा कुठे कॉलेजात अॅङमिशऩ
मिळते आजकाल. शाळेत तरी शिकलाय का हा?’ समजावणीच्या स्वरात मी त्यांना विचारले.
‘डाक्तर, आमच्या घरचीच
डाक्तरकी हाय नव्हं. झाडपाल्याची औशीदं शिकलाय न्हवं त्यो. तुमच्या हाताखालनं गेलासन
तर हुईल की तैय्यार त्योबी.’- पोराची माउली बोलली.
हा संवाद आता ह्याहून
वाढवणं मला शक्य नव्हतं. ‘छे, छे कसे शक्य आहे.’ ‘नंतर पाहू कधी तरी’ असे मोघम आणि
निरर्थक बोलून मी तिथून बाहेर पडलो. त्या अडाणी माता-पित्याची जणू मीच फसवणूक केली
अशी खंत उगाचच तेव्हा माझ्या मनात दाटून आली.
खोलीतून बाहेर पडलो खरं पण
जोगळेकर बाहेर वाटच पाहत थांबलेले. आत काय घडले याचे प्रचंड कुतूहल जणू त्यांना
खात असणार.
‘काय, झाली का बातचीत
स्वामींची? मर्जी दिसते स्वामींची तुमच्यावर. स्वामी म्हणजे एकदम अवलिया गृहस्थ
आहे हां. एकदम पॉवरफुल. मनात आणतील तर कुठून कुठे नेऊन सोडतील. दिसायला साधे
वाटतील, पण सामर्थ्य कसले आहे विचारता. आता तुम्ही पहालच म्हणा. एकदा जाऊ या
गावाकडच्या मठीत त्यांच्या. आता तुमच्यावर अनुग्रहच झाला म्हणजे काय बघायलाच नको,
काय?’ जोगळेकरांची चर्पटपंजरी चालूच होती.
झाल्या प्रकाराने आधीच उद्विग्न झालेलो मी. वेळेत काम आटपण्याचा बहाणा करीत पुढे
पुढे चालत राहिलो. किती तरी वेळ जोगळेकर माझ्या मागून सलगी करीत येत होते हे मला
जाणवलं पण मी माझा वेगच मुळी असा वाढवला की मला ते ऐकू येऊ नये.
त्या दिवशी संध्याकाळी
दवाखान्यात पेशंट पाहत होतो तर पुन्हा एकदा फोन वाजला, पलीकडून जोगळेकर बोलत होते.
‘नमस्कार, डॉक्टरसाहेब, मी
जोगळेकर. सकाळी आपली भेट झाली होती. आमच्या पेशंटचे रिपोर्ट काय चांगले आलेत
म्हणे.’
‘हो, ते तर अपेक्षितच
होतं.’- मी.
‘बरं झालं, ती एक काळजी
मिटली. त्यातून तुमच्यासारखे डॉक्टर असल्यावर काय म्हणा. काळजीच नको, नाही का?
शेवटी श्रद्धा असते हो एकेकाची. आता आमची हे केस म्हणजे तुमचीच झाली बघा. काही
झालं तर तुमच्याकडेच येणार आम्ही. आणि तुम्हाला काय वाटतं, आता त्यांना उद्या घरी
पाठवता येईल नाही का? कारण बिल मी भरणार आहे, त्याची तशी तयारी करून ठेवता येईल
म्हणून आधीच विचारून ठेवतो, काय? म्हणजे ऐन वेळेला धावाधावी नको.’ जोगळेकरांच्या
पाल्हाळाची आता मला सवय झाली होती.
‘होईल, नक्की उद्याच होईल
डिस्चार्ज त्यांचा,’ मी म्हणालो. घाईने
फोन खाली ठेवून अनावश्यक संवाद मी टाळू पाहत होतो, तर पुन्हा जोगळेकर काहीसे घाईने
आणि आग्रहाने बोलत राहिले.
‘आणि ते बिलाचं तेवढं
तुम्ही बघाल ना. स्वामीजी म्हणजे अधिकारी पुरुष आहे. त्यांचा थोडा वेगळा विचार
करावा लागेल नाही का? हॉस्पिटलची काय पद्धत असते हो अशा लोकांसाठी. म्हणजे काही
सवलत वगैरे मिळते का बिलात?’- जोगळेकरांचा व्यवहार आता जागा झाला होता.
‘नाही, हॉस्पिटल असा काही
वेगळा विचार करीत नाही. पण मला जमेल तशी सूट मी माझ्याकडून द्यायचं बघतो,’ असं
म्हणून मी फोन खाली ठेवला.
थोडा विचार केल्यावर मला
सगळ्याच प्रकाराची गंमत वाटली. केवढी तरी मोठी एक प्रश्नमालिकाच माझ्यासमोर आ
वासून उभी राहिली.
त्या अशिक्षित
स्वामीजींमध्ये जोगळेकरांनी असे काय पाहिले की त्यांनी त्यांना आपले आध्यात्मिक
गुरु मानावे? अशी ही कुठली श्रद्धा की तिच्यामुळे आपल्या गुरूला गरजही नसताना
हॉस्पिटलमध्ये आणून त्यांच्या तपासणीचा देखावा करावासा वाटावा? आणि ही अशी कुठली
गुरुदक्षिणा की त्याचा भार कुणा तिसऱ्याच डॉक्टरने विना तक्रार सोसावा, तोही
आपल्या बिलात अनावश्यक सूट देऊन?
तरीही मी काहीशा तिरीमिरीतच
हॉस्पिटलला फोन लावला. स्वामीजींना माझ्या व्यक्तिगत बिलातून काही सूट द्यायला
सांगितलं. नाही म्हटलं तरी स्वामीजींनी त्यांचं मन माझ्यासमोर उघडं केलं होतं.
त्याची सहानुभूती माझ्या मनात होतीच की.
दुसऱ्या दिवशी स्वामीजींना
घरी सोडण्यात आलं. मी माझ्या कामात व्यग्र होतो तोच समोरून जोगळेकर आले. त्यांच्या
मागणीप्रमाणे मी त्यांच्या बिलात काही सूट दिली होती. आता मला खऱ्याखुऱ्या
कृतज्ञतेची अपेक्षा होती. कालपर्यंत मी काहीच न करूनसुद्धा जोगळेकर माझं केवढे तरी
कौतुक करीत होते. मी अपेक्षेने हसत हसत जोगळेकरांकडे पाहिले. पण त्यांचा आजचा
चेहरा तडफदार होता. व्यावहारिक होता.
‘डॉक्टरसाहेब, बिल घेतलं मी
आत्ताच. अगदीच किरकोळ सूट दिलेली दिसते बिलात. अशा बाबतीत तुम्ही इतपतच सूट देऊ
शकता वाटतं?’
‘म्हणजे? मी समजलो नाही’ मी
म्हणालो.
‘नाही म्हणजे स्वामीजी
अधिकारी पुरुष आहेत, अशा अधिकारी व्यक्तींना याहून अधिक सूट देण्याची तुमची प्रथा
नसावी असं दिसतं.’ असं म्हणत त्यांनी माझ्या डोळ्यांसमोर हॉस्पिटलचं बिल फडकावलं
आणि जणू तुच्छतेने माझ्याकडे नजर टाकीत ते माझ्याकडे पाठ फिरवून चालू लागले.
पाठमोरे तडफेने चालताना मी त्यांना पाहिलं तेव्हा मला प्रथमच ते डौलदार दिसले.
त्यांच्यावरची खोटी आध्यात्मिक पिसं गळून पडल्याचा तर तो परिणाम नसेल?
डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०
A great read. I enjoyed the style and content equally. As a co-practitioner, I won't be able to cope with the Joglekars of this immaterial world. Maybe I would employ one myself.
ReplyDelete