मुलाखत
मुख्य इमारतीचॆ बांधकाम
चालू होते. त्या इमारतीच्या बाहेर दुसरी एक तात्पुरती शेडवजा किरकोळ बांधकाम
केलेली छोटी एक मजली जागा होती. बाहेरच्या बाजूला साधारण ऐसपैस वाटावा इतपत मोठा
व्हरांडा होता, तीनही बाजूंनी खुला असलेला, हवेशीर. सगळ्या डॉक्टर मंडळींच्या
मुलाखती तिथे होणार होत्या. मुलाखतीची मला सांगितलेली वेळ सकाळी नऊची होती आणि
आत्ता सकाळचा नऊ-सव्वा नऊचा सुमार असावा. पण तरीही मी तिथे पोचलो तेव्हा तिथे
पोचणारा बहुतेक पहिलाच इच्छुक डॉक्टर असणार. माझ्याशिवाय इतर कुणीच तिथे आलेले
दिसत नव्हते. नाही म्हणायला, सफाई करणारी एक स्त्री इकडे-तिकडे करत होती. बसायच्या
सगळ्या खुर्च्यांवर ती हलक्या हाताने फडके मारत होती. जमिनीवरही तिने नुकताच पोछा
मारला असावा. त्याची एक प्रकारची ओल तिथे जाणवत होती. ओळीने मांडून ठेवलेल्या
पंधरा एक खुर्च्या, बाजूला एक छोटे स्टूल, त्यावर एक पाण्याचा जग ठेवलेला. आम्हा
मुलाखतकारांसाठी हीच वेटिंग रूम असणार, हे मी ताडले. थोडासा बिचकतच पुढे झालो. त्यातल्याच
एका खुर्चीच्या दिशेने जात राहिलो. बाईशी बोलावे की न बोलावे, बोलावे तर काय
बोलावे आणि कुठल्या भाषेतून? आणि ती थोडीच कुणी जाणकार इसम असणार? इथे काही
डॉक्टरांच्या मुलाखती होणार आहेत, त्यातून या नव्या हॉस्पिटलचे नवे डॉक्टर नेमले
जाणार आहेत, इतके सगळे थोडेच तिला माहित असणार? काय उपयोग आहे तिला काही विचारून? काही
गरज नाही तिच्याशी काही बोलण्याची, तिला काही विचारण्याची. बाहेरच्या सुरक्षा
कामगाराने ज्याअर्थी इथे जायला सांगितले आहे, ज्याअर्थी इथे पंधरा खुर्च्या आहेत,
ज्याअर्थी इथे ही स्वच्छता चालू आहे आणि मुख्य म्हणजे ज्याअर्थी इथे दुसरी कुठलीच पूर्ण
बांधलेली इमारत किंवा खोली नाही त्याअर्थी आमच्या मुलाखती इथेच होणार हे अगदी
सूर्य-प्रकाशाइतके स्पष्ट असताना हिला विचारण्याची गरजच काय? असा विचार करत मी
लटक्या आत्मविश्वासाने पुढे झालो. सरळ एका खुर्चीवर बसलो. बाईने काहीच प्रतिक्रिया
दिली नाही, माझ्याकडे पाहिले नाही. आपले काम निर्विकारपणे चालू ठेवले. याचा अर्थ,
माझे तिथे येणे, तिथे बसणे तिला मान्य असणार, म्हणजे मुलाखती इथेच होणार. वाः! काय
अंदाज आहे! काय तर्कशास्त्र आहे! एक अचूक रोग निदान केल्याचा आनंद मला झाला.
काही न बोलता मी खुर्चीत
बसून राहिलो. बांधकाम जवळजवळ पूर्ण झालेली अशी नवीन हॉस्पिटलची इमारत समोरच होती.
ती न्याहाळत बसलो. सहा-सात मजली तरी बांधकाम असावे. बाहेरून गिलाव्याचे काम चालू
होते. मजल्या-मजल्यांवर कामगारांची तुरळक वर्दळ सुरु झालेली होती. डोक्यावर चकचकीत
शिरस्त्राणे घातलेले कामगार आत येऊ लागले होते. त्यांच्या बाजूबाजूने कामावरल्या
बायका, कुणाची बारकी पोरे त्यांच्या कडेवर तर कुणाची पोरे त्यांच्या मागेमागे धावत
पळताहेत. सगळे एखाद्या अदृश्य दोरीने जणू खेचल्यासारखे त्या इमारतीकडे चाललेले. बाहेरच्या
या गडबडीच्या तुलनेत मी बसलो होतो त्या जागेवरचा थंडपणा अगदी अंगात भिनावा इतका
ताकदवान होता. पुढे येऊ घातलेल्या मुलाखतीचा ताण जर नसता, तर तिथेच ताणून झोप येईल
असा तलम थंडावा होता तिथे. पण हे सगळं फक्त काही मिनिटेच टिकलं असणार. अचानक तिथली
वर्दळ वाढू लागली. कचेरीतील कारकून वाटावेत असे दोघे जण कुणी तिथे आले. थेट आतल्या
खोलीत जाऊन त्यांनी एक फाईल मिळवली. त्यातली पानं चाळत गंभीर चेहऱ्यानं ते एकमेकात
बोलू लागले.
‘गंगूबाई, जगमध्ये पाणी
भरलं का?’
‘गंगूबाई, तो पंखा चालू करा
आधी.’ एकामागून एक आदेश देत त्यांनी
चांगली वातावरण निर्मिती केली.
इतके होईतो त्यांची नजर
माझ्यावर पडली. माझ्याकडे बघत, जवळ येत त्यांनी चौकशी केली, ‘गुड मॉर्निंग सर,
आपलं नाव?’
मी सांगितलं. पुन्हा एकदा
फाईलमधे डोके घालून त्यांनी खातरजमा केली.
‘मेडिसिन ङिपार्टमेंटसाठी
अर्ज आहे ना तुमचा?’
मी मान हलवून होकार दिला.
‘बसा सर. ते काये, एक दोघा
विश्वस्तांना थोडा उशीर होणारेय, तेव्हा सगळं काम थोड्या उशिरानेच सुरु होणार.
तुम्ही बसा, आता होईलच इतक्यात चालू.’ त्यांनी मला दिलासा दिला.
मीही थोडा सैलावलो. हक्कानं
खुर्चीवरच जरा पसरून बसलो.
आता घटना वेगाने घडू
लागल्या. गळ्यात टाय अडकविलेले कुणी दोघे इंग्रजी संवाद करत लगबगीने आत आले.
माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत पलीकडच्या दोन खुर्च्यांवर बसले. त्यांची आपसात
अखंड बडबड चालू होती. ते इथल्या वातावरणात सरावलेले असणार. आपलीच निवड होणार याचा
आत्मविश्वास त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होता. एक दोन वेळा त्यांनी त्या
कारकुनाशी संवाद केले.
‘लेट ना? आजही,
नेहमीप्रमाणे? झंवरसाहेबांमुळे असणार. साहेब बिझी. सक्काळी सक्काळी सुद्धा!’
असे म्हणत त्यांनी
एकमेकाकडे पाहत डोळे मिचकावले. हसल्या न हसल्यासारखे करत कारकून मात्र आपल्या
कामात राहिला.
एव्हाना आणखीही बरेच डॉक्टर
आलेले होते. बरेचसे वयाने माझ्यापेक्षा मोठे असणार. माझ्या ओळखीचे कुणी फारसे दिसत
नव्हते. ते बहुतेक एकमेकांना ओळखत असणार. एकमेकांशी हस्तांदोलन करीत, कधी
एकमेकांच्या पाठीवर थापा टाकत तर कधी एकमेकांना टाळ्या देत त्यांच्या गप्पा सुरु
झाल्या.
‘काय राव, इथेही तुम्ही
आहातच का? एखादं तरी हॉस्पिटल सोडा ना आमच्यासाठी? जिकडे पहावं तिकडे तुमच्याच
नावाच्या पाट्या. आमच्या सारख्यांची परिस्थिती अवघड करून सोडता राव तुम्ही मंडळी
म्हणजे!’
‘पण तुम्ही त्या डायमंड
हॉस्पिटलला असता ना. मग तिथली ओ. पी. डी. शिवाय छोट्या छोट्या हॉस्पिटलमधल्या
अॅडमिशन आणि मग संध्याकाळी प्रायव्हेट मधे. ग्रेट. बरं जमतं तुम्हाला इतकं सगळं.’
‘नवीन हॉस्पिटल होतंय. इतकं
मोठं हॉस्पिटल एकदम नव्यानं सुरु होणार. जरा वेगळा अनुभव. म्हटलं भेटून तर घेऊ.
फार कंजूष आहेत म्हणे हे लोक. शिवाय कास्ट, रीजन असल्या भानगडी पण फार आहेत म्हणे.
पण मी म्हणतो, कुठे नाही हो हे? सगळेच बघतात आपापल्या लोकांकडे. आपलेच लोक दळभद्री.
जमेल तसे पाय ओढणार आपल्याच लोकांचे. बुद्धिजीवी ना. हुशार माणसं आपण.’
मी ऐकत होतो. इतक्या
मोठमोठ्या लोकांबरोबर आपला काय पाड लागणार. कोण घेईल आपल्याला इथे. दोन वर्ष
सुद्धा नाही झालेली प्रॅक्टीस चालू केल्याला. ना कुठली ओळख. ना देख. नाही
म्हणायला, कुणा एका राठी नामक विश्वस्ताची अगदी दूरची ओळख काढली होती, पण हे राठी
कोण, कुठले हेही मी पाहिले नव्हते. समोर आले तर एकमेकांना ओळखण्याचीसुद्धा पंचाईत.
पण अशा ठिकाणी जाताना अगदीच बेवारस वाटू नये म्हणून म्हणायची असली ती ओळख,
लज्जारक्षणार्थच केवळ.
मी शून्यात बघत होतो. तर
मागून पाठीवर थाप आली.
‘वाटलंच मला, तू इथे असणार
म्हणून. मागच्या त्या पी टी हॉस्पिटलमधल्या मुलाखतीनंतर आजच भेट, नाही का?’
मागे बघतो, तर आमोद. माझा
मित्र, एक थोर सर्जन. पहिल्या वाक्यातच त्याने माझ्या जखमेवरची खपली काढली. नको
तिथे नको त्या आठवणी काढण्यात हा महा-पटाईत. पी टी हॉस्पिटलच्या आघाडीवर पराभूत
झालेले आम्ही दोघेही योद्धे, पण त्याची ही आठवण इथे अशी चारचौघात आणि तेही अशा
उच्चभ्रू चारचौघात काढण्याची काय गरज होती?
मी काही बोलणार तोच आमोद
एकदम शांत झाला, गंभीर चेहेऱ्याने समोर पाहत राहिला. कोपराने त्याने मला एक सणसणीत
झटका दिल्याचा भास मला झाला. झटका असा जोरदार होता की मी ताडकन उभाच राहिलो.
त्यासरशी माझ्या अगदी कानाला लागत आमोद पुटपुटला, ‘समोर बघ, लेका, झंवर शेट आलेत.
बघ. बघ. आणि नीट उभा राहा ताठ.’
कसाबसा हेलपाटत मी उभा
राहिलो. अंगावर कडक परीट घडीचा झब्बा, तसेच शुभ्र धोतर, गोल चेहेरा आणि त्यावर
नजाकतीने चढवलेली चष्म्याची फ्रेम, सोन्याच्या काड्यांची. गळ्यात सोन्याची माळ.
बोटांवर हिऱ्यांच्या अंगठ्या. मी माझा तोल
सावरण्याच्या तारांबळीत होतो आणि तोच ही गडबड इतकी झाली की त्या अंगठ्या किती
होत्या ते मात्र मी मोजू शकलो नाही. त्यातल्याच एका अंगठीशी नाजूकपणे खेळत झंवर
शेट आले. ते आले तर तिथल्या हवेचा नूरच पालटला. मागे पुढे धावणारे दोन हुजरे.
त्यामागे आणखी दुय्यम हुजरे. असे ते झंवर शेट आले. कसे आले, कुटून आले तेही कळू
नये, असे ते आले. अवतरलेच चक्क. त्यांचा चालण्याला योग्य इतकाच वेग होता.
चेहऱ्यावर योग्य इतकेच स्मित होते. आम्हा सर्व उपस्थित डॉक्टरांकडे योग्य इतकेच
दुर्लक्ष करीत ते पुढे पुढे चालत होते. आले ते थेट आतल्या खोलीच्या दरवाजापाशीच
पोचले. कुणी तरी वेळीच तो दरवाजा त्यांच्यासाठी उघडून धरला, यंत्रवत् तत्परतेनं.
शेट आत गेले. दरवाजा पुन्हा बंद झाला आणि वातावरणातला ताणही सैल झाला. अगदी
पहिल्याइतका नाही, तरी बराच मोकळेपणा आला. मंद मंद आवाजात बातचीत सुरु झाली, कुठे
कुठे दबलेले हसू ऐकू येऊ लागले.
‘झंवर शेट म्हणजे इथले
मुख्य विश्वस्त, डोनर अर्थात सर्वेसर्वा आहेत, माहित्ये ना?’ इति आमोद.
‘माहित्ये रे,’ मी म्हणालो,
इतक्यात इतरही बरीच मंडळी लगबगीने आत येताना दिसली. पुन्हा एकदा तोच झपाटा. तोच वेग
आणि तेच सार्वत्रिक दुर्लक्ष आणि मग दरवाजाची उघडमीट. हे इतर विश्वस्त असावेत. हे
मी चाणाक्षपणे ओळखले. एव्हाना सर्व स्थिरस्थावर होते असे वाटणार तोच डॉ. अगरवाल
आले. त्यांचा वेग मात्र तुलनेने खूपच कमी होता. अंगावर पाश्चात्य पद्धतीचे कपडे.
चेहऱ्यावर सुशिक्षित हसू. एकूण
हालचालीमध्ये लक्षवेधक सफाई. डॉ. अगरवाल म्हणजे अगदी आघाडीचे फ़िजिशिअन.
त्यांच्या नावाचा दबदबा शहरभर असलेला. कित्येक हॉस्पिटलमध्ये यांचे पेशंट असत.
त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्येही कित्येक पेशंट यांचेच असत. डॉ. अगरवाल आले, तसे
आमच्यातले कित्येक डॉक्टर पुढे झाले. डॉक्टरांशी बोलण्यासाठी, त्यांच्याशी हात
मिळविण्यासाठी एक प्रकारची चढाओढच जणू सुरु झाली. डॉक्टरांनीही कुणाला नाराज केले
नाही. कित्येकांच्या हातात हात देत, कित्येकांवर त्यांच्या खास स्मिताची मोहिनी
टाकत ते संथपणे पुढे पुढे आले. ‘हॅलो, एव्हरी बडी’, असे म्हणत त्यांनी आपली मान
दिमाखदार प्रकारे डोलावली. आतल्या खोलीचा दरवाजा त्यांनी आपल्या हाताने उघडला आणि
ते खोलीत अदृश्य झाले.
‘डॉ. अगरवालना ओळखतोस की
नाही? तेच तुला पारखणार आहेत माहित्ये ना? काही ओळख बिळख काढलीस की नाही?’ आमोदचे
भेदक प्रश्न सुरु झाले. उगीचच शरमल्यासारखे वाटून मी दुर्लक्ष करीत राहिलो.
‘तुझं काही खरं नाही गड्या.
हे बाकीचे सगळे बघ, कसे जानपछानवाले आहेत. बघ, कसे पुढे पुढे करतायत. ते चालले बघ
तुझ्या पुढे, पुढे’ आमोद काही सोडेचना.
‘अरे, तू तुझं पहा ना,
माझ्या का मागे लागतोस,’ म्हणत मी त्याला फटकारणार तोच पुकारा झाला- ‘डॉ. ठिगळे –‘
कुणा डॉ. ठिगळ्यांना मुलाखतीचे निमंत्रण मिळाले. डॉ. ठिगळे हसत हसत दरवाजा उघडून
आत गेले आणि मग एका मागून एक नावांचा पुकारा होऊ लागला.
डॉ. दामले, डॉ इनामदार –
प्रत्येक पुकाऱ्यासरशी कुणी
तरी उठे, आत जाई आणि थोड्याच वेळात हसत हसत जणू यशस्वी होऊन बाहेर पडे.
बाहेरची गर्दी कमी कमी होत
चालली तसा माझ्यावरचा ताण वाढत चालला. एखाद्या परीक्षेला चालल्यासारखे मला वाटू
लागले. किती वेळ हा खेळ चालणार असा विचार मनात आला. तोच माझ्या नावाचा पुकारा
झाला. तो झाला तेव्हा मी भानावरच नव्हतो जणू. आमोदनं कोपरानं पुन्हा एकदा ढोसलं
तेव्हा कुठं मी अचानक भानावर आलो. माझी बॅग कशीबशी उचलली, तो प्रख्यात दरवाजा
उघडला आणि आतल्या खोलीत पाऊल टाकले.
बाहेरून वाटले, त्यापेक्षा
खोली बरीच मोठी होती. एक लंबगोल टेबल आणि त्याभोवती खुर्च्या अशी मांडणी.
टेबलाच्या एका टोकाशी एक खुर्ची होती. ती रिकामी होती. त्याअर्थी ती उमेदवारासाठी
असणार. मी तिथे उभा राहिलो. वाट पाहत. कुणी तरी ‘बसा’ असे म्हणेल अशा अपेक्षेत.
खोलीभर शांतता पसरलेली. मगाशी गंगूबाईंनी चालू केलेल्या पंख्याचा काय तो आवाज
होता. मंद लयीतला. खर्जातला.
‘बसा, ना बसा, तुम्ही.’
कुणी तरी बहुधा मलाच म्हटले. कुठून आवाज आला, कुणासाठी आला हे कळायच्यासुद्धा आत
मी खुर्चीवर बसलो. खोलीत उभा असा मी एकटाच असल्याने ते मलाच उद्देशून असणार असा
तर्क मी केला असावा. पण हा विचारही माझ्या मनात नंतर आला. नंतर म्हणजे अगदी नंतर,
मुलाखत पूर्ण झाल्यावर मी जेव्हा त्या सगळ्या प्रसंगाची उजळणी माझ्या मनाशी केली
तेव्हा आला. त्यावेळी मी फक्त बसलो.
संपूर्ण अपरिचित असे दहा
पंधरा चेहरे आपल्यासमोर. आपल्याकडे पाहत असलेले. न्याहाळत असलेले. त्या नजरा
इतक्या टोकदार की जणू तलवारीच आत आत खोलवर खुपसलेल्या. त्यातले कुणी दबलेल्या
आवाजात आपसात बोलताहेत. कुणी कुठल्याशा फाईलमधे डोके खुपसून निवांत. तर कुणाची नजर
पार आढ्याकडे किंवा आढ्याच्याही पार पल्याड अंतराळाकडे लागलेली. मी सगळ्यांकडे
पाहत होतो. यात कुणी राठी असतील का, असले तर मदतीला धावतील का असा विचार करीत.
‘हा, तर तू काय फ़िजिशिअन
आहेस वाटतं.’ कुणी तरी म्हटलं.
मी भानावर आलो. पाहिलं तर
डॉ अगरवाल बोलत होते आणि हे नक्कीच मला उद्देशून होतं.
‘हो सर.’
पुन्हा एकदा फायलींचा,
कागदांचा फडफडाट. खुर्च्यांमध्ये काही चाळवाचाळव. सगळ्या सदस्यांनी बहुधा फायलीतले
माझ्या नावाचे पान काढले असावे.
‘एम. डी. कधी झालास तू?’
‘दोन वर्ष झाली सर.’
‘आणि करतोस काय सध्या?’
‘प्रायव्हेट प्रॅक्टीस
करतोय, सर’.
‘इतर काही हॉस्पिटल अॅटॅचमेंट्स्
वगैरे?’
अशी काही जुजबी
प्रश्नोत्तरे सुरु झाली तोच कुणी तरी जणू शोध लावला,
‘यांना एम. डी त गोल्ड मेडल
आहे वाटतं’
मीही एकदमच भानावर आलो.
खरंच की, हे मी जणू विसरलोच होतो की काय. बरं झालं कुणी तरी हे लक्षात आणून देतंय.
हे राठीच तर नव्हेत? मी इकडे तिकडे पाहू लागलो. आवाज कुठून आला होता ते कळेना. पण
तेव्हढ्यात डॉ. अगरवाल पुन्हा बोलू लागले.
‘Yes, I have noted that.
तो मघाचा candidate कोण, तो. दामले का कोण, त्यालाही गोल्ड मेडलच होतं. हल्ली
म्हणजे असं झालंय ना की बघावं त्याला मेडल मिळतं की काय कोण जाणे’ अगरवाल असं
म्हणाले. हे म्हणताना त्यांनी त्यांच्या खास शैलीत डोळे मिचकावले. शेजारच्या खुर्चीवर
जे कोण बसले होते त्यांच्या मांडीवर जोरदार आणि प्रेमळ थाप टाकली आणि जोरजोरात हसत
त्यांनी माझ्यावर नजर टाकली. त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू आणि मी जणू जन्मजात
बधीर. प्रत्युत्तर द्यायला पूर्ण असमर्थ. एकूण परिस्थिती तंग झाल्यासारखी वाटली. पण
अगरवालांना हसू आवरेना. आपल्या विनोदावर ते प्रचंड खूष होते. कसेबसे हसू आवरत ते
माझ्याकडे पाहत थांबले, रुमालाने आपले हसरे डोळे त्यांनी पुसले आणि सहानुभूतीने माझ्याकडे
पाहत ते म्हणाले, ‘Oh, I hope you know it, I never meant to hurt you. I was just
joking.’
काही सेकंद गेले असतील
नसतील, आसपास शांतता होती. वरच्या पंख्याचा एक मात्र आवाज होता आणि तो आता मला
घणाघातासारखा वाटत होता. आसपासच्या वातावरणात एक प्रकारचा ताण होता असे मला वाटत
होते. तो तसा नसावा अशी माझी इच्छा होती. पण यावर मी काय करू शकत होतो. डॉक्टरांच्या
विनोदावर मीही जुजबी हसल्यासारखे केले आणि दुसरीकडे पाहत राहिलो.
‘डॉक्टर, आम्हाला एक सांगा,
तुमच्या नावानं किती खाटा ठेवायच्या आम्ही या हॉस्पिटलात?’ हा प्रश्न कुणा
वेगळ्याच ठिकाणाहून आला होता. प्रश्नाचा रोख मला समजेना.
‘किती खाटा? म्हणजे? सॉरी,
मी समजलो नाही.’ मी तिकडे पाहत म्हणालो.
‘डॉक्टर, आपलं हॉस्पिटल
नव्यानं सुरु होणार. ते चालायचं तर हॉस्पिटलला पैसा लागणार. कुठून यायचा हो हा
पैसा. आपल्या खाटा भरतील तर येतील पैसे ना. म्हणून म्हणतो किती खाटा टाकायच्या
तुमच्या नावावर. तेवढ्या भरवायची जबाबदारी तरी तुम्ही घ्यायला पाहिजे ना?’
अरे बाप रे, हा प्रश्नच मला
पूर्ण नवीन होता. हॉस्पिटलच्या बेड भरण्याची जबाबदारी डॉक्टरने घ्यायची? छे, हे
अशक्य होते. एक तर माझाच व्यवसाय नवीन. पेशंटच्या शोधात फिरणारा मी. ते मला
मिळावेत म्हणून हॉस्पिटल हवे तर हॉस्पिटलच मला पेशंट मागते. मला हा विरोधाभास
वाटला, विनोद वाटला. पुन्हा हसून वेळ मारून न्यावी म्हणून मी केविलवाणे हसू लागलो.
पण ही गोष्ट हसण्याची नसावी. गंभीर असावी.
“हॉस्पिटलमध्ये खाटा किती
भरवेन हे मी कसे सांगू? मी एवढी खात्री नक्की देतो की मी माझ्याकडे येतील त्या
पेशंटना जास्तीत जास्त चांगले उपचार करीन, चांगली सेवा देईन. याचा फायदा होऊन
हॉस्पिटलमधल्या खाटा भरतील.’
माझ्या मते माझा तर्क
सुसंगत होता. मुख्यतः नैतिक होता. त्याचा प्रतिवाद करणे शक्य होणार नव्हते.
‘डॉक्टर, तुम्ही काय आणि
कशी सेवा देता, याच्याशी हॉस्पिटलला काय घेणे आहे? तो विचार पेशंट करतील. आम्हाला
फक्त आकडा हवा, किती खाटा ठेवायच्या तुमच्या नावानं? बोला, आकडा सांगा, मग करू
विचार.’
हा प्रश्न जणू अखेरचा होता.
आकडा सांगितल्याशिवाय मुलाखत पुढे सरकणार नव्हती आणि असा काही आकडा देणं माझ्या
ताकदी बाहेरचं होतं आणि शिवाय ते मला खूप अनैतिक आणि हीन वाटत होतं.
मी शांत बसलो. या पलीकडे
काही बोलणं मला शक्य नव्हतं आणि या पलीकडे विचारण्याजोगा प्रश्नही त्यांच्याकडे
नव्हता बहुतेक. कारण मग सगळेच शांत बसलेले. माझ्या ओळखीचे म्हणावे असे कुणीच राठी
नव्हते बहुधा त्यांच्यात.
पुन्हा एकदा असह्य शांतता
सर्वत्र पसरली. तोच तो पंख्याचा निर्विकार आवाज. किती वेळ गेला कुणास ठाऊक.
'All right, तुम्ही जाऊ
शकता,’ कुठून तरी आवाज आला.
मी उठलो आणि शांतपणे खोलीबाहेर
पडलो.
डॉ.संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०
bapare, asehi kahi asate.
ReplyDeletei could relate with all your experiences in this blog but this one.
never had such kind of interview.