Saturday, 13 April 2013

उपरा



उपरा
अगदी सराईतपणे माझ्या दवाखान्यातल्या खोलीचा दरवाजा उघडून तो आत आला. आला तेव्हाच त्याच्या चेहऱ्यावर अगदी ओळखीचं हसू होतं. जणू माझा अगदी जवळचा मित्रच असावा, रोजच्या गाठी भेटीतला. आत येऊन त्यानं टेबलासमोरची खुर्ची मागे खेचली आणि त्यात स्वतःला ऐसपैस झोकून दिलं. टेबलाच्या कडेवर बोटं नाचवीत तो माझ्याकडे पाहत, हसत राहिला. पुन्हा एकदा तेच परिचयाचं हास्य. वय असेल साधारण तिशीतलं. काळगेलासा वर्ण. नीट कातरलेल्या मिशा. जाड फ्रेमचा चौकोनी चष्मा. डोक्यावरचे केसही असेच राठ पण तेलानं शिस्तीत विंचरून बसवलेले. कुठं बरं पाहिलं असावं याला? हा काही कुणी मित्र नव्हे. पेशंटही नव्हे. कुणा पेशंटचा कुणी नातलग? पण मग हा हसतोय का इतका? पेशंटचा नातलग इतकं कशाला हसेल? अगदी दुःखी नसला, तरी थोडा गंभीर असावा ना असा हा नातलग. पण हा तर अगदी हसतच असलेला. हसणं ही जणू त्याची अनिवार्य गरज होती. खोड होती. समोर हा हसतोय आणि मागे मी माझ्या विचारात गर्क. कोण बरं असावा हा, असा विचार करीत. 

अशा परिस्थितीत जेवढा म्हणून ठेवणं शक्य होतं तेवढा हसरा चेहरा ठेवून मी त्याच्याकडे पाहत राहिलो. 

‘ओळखलं का सर?’ 

अरेच्चा, हा तर मला चक्क ‘सर’ म्हणतोय. म्हणजे कोण बरं असावा? पण छे, तरीही उजेड पडेना.
‘मी वाघमारे, सर. तुमच्याकडे येत असतो ना. ‘मेजर फार्मा’ कडून. नाही का, गेल्याच शुक्रवारी आलो होतो.’

अच्छा, म्हणजे, हा कुणी वाघमारे दिसतो आणि तो कुठल्याशा मेजर फार्मा नामक कंपनीचा विक्रेता असावा, असं माझ्या तत्काळ लक्षात आलं. कोडं सुटलं आणि त्याबरोबर माझ्या मनावरचा ताणही सैल झाला. आता वाघमारेकडे बघून मी मोकळेपणानं हसू शकत होतो. त्याच्याशी बोलू शकत होतो. मग भले, ती कुठली मेजर फार्मा नावाची कंपनी नक्की काय बनवते हे मला आठवत नसलं तरी काय फरक पडणार होता? 

नाही, म्हणजे अगदी लगेचच नाही, पण थोड्या वेळाने ओळखलं ना मी तुम्हाला. मेजर फार्माचे ना?’ मी पुन्हा एकदा तेच म्हणालो. होकारार्थी विजयी मान हलवीत वाघमारेनं आपलं हसणं चालूच ठेवलं.
काही क्षण गेले. वाघमारे आता मात्र थोडा गंभीर झाला.

‘आज मी थोडा वेगळ्या कामासाठी आलोय, सर. पर्सनल आहे. I need your help, sir. I need your help.’ वाघमारे म्हणाला.

त्यानं आपल्या खिशातून हातरुमाल काढला. चष्मा काढून त्याची काच रुमालानं पुसली. तोच रुमाल डोळ्यावरून फिरवला. कपाळावरून फिरवला. 

‘कसं सांगू कळत नाही. सगळं नुसतं ऑड होऊन बसलंय. I am sure you can help me. Only you can help me sir.’

पुन्हा काही क्षण गेले. वाघमारे शांत. मीही शांत. 

‘माझे वडील आजारी आहेत. admit आहेत. अंगद हॉस्पिटलमध्ये. मला खूप काळजी वाटत्येय सर, I feel he is not doing well. गेले दोन दिवस त्यांची तब्येत बरोबर नाहीये सर. माणसं नीट ओळखत नाहीत ते. चुकीचं काही तरी बोलतायत. संडास, लघवीचं भान नाही. मधेच कधी तरी थोडासा ताप येतो. मधेच एखादी उलटी. पोटात अन्न नाही गेले किती दिवस. He is only on saline, sir.’
वाघमारे पुन्हा थोडा शांत झाला. रुमालानं कपाळ पुसत राहिला. मलाही सहानुभूती वाटली.

‘कोण डॉक्टर बघतायत त्यांना? आणि नेमकं झालंय तरी काय?’ मी विचारलं.

‘तोच तर प्रॉब्लेम आहे. डॉ. कवडे बघतायत त्यांना. पण त्यांना नक्की काय झालंय, कुठला आजार आहे, काहीच सांगत नाहीयेत आम्हाला ते. काहीच धड कळत नाहीये. पूर्ण अंधारात आहोत आम्ही सगळे. माझी आई, माझा थोरला भाऊ, every body is worried. मला तर वाटतंय, सर, डॉ. कवड्यांनाच अजून काही निदान झालं नाहीये. No diagnosis. नुसते प्रयोग चाललेत. सरांशी बोलावं तर ते काही सांगत नाहीत. ‘होईल, होईल’ असं म्हणत राहतात. माझा तर काही विश्वास नाही. धीर सुटल्यासारखं झालंय. I want to change the doctor, I think, I must.’

वाघमारे पुन्हा शांत झाला. शांत झाला म्हणजे फक्त बोलायचा थांबला. त्याच्या मनातली अस्वस्थता लपत नव्हती. मघाचं त्याचं ते वरकरणी हसणं, ते तर पार कुठल्या कुठे पळून गेलं होतं. परागंदा झालं होतं. 

‘सर, मी तुमच्याकडे येत असतो. नेहमी येत असतो. माझा तुमच्यावर विश्वास आहे, सर. तुम्हीही सीनिअर आहात. माझी इच्छा आहे, ही केस तुम्ही घ्या. तुमच्या हातात घ्या. मी माझ्या आईशी बोललोय, भावाशी बोललोय. त्यांना पटलंय हे सगळं. आमची इच्छा आहे, सर, तुम्ही ही केस घ्या.’
वाघमारे विनवणी करीत राहिला. मी मात्र विचारात पडलो. किती अवघड आहे हे असं काही करणं. माझा ना धड त्या कवडे डॉक्टरांशी परिचय होता, ना की त्या अंगद हॉस्पिटलशी. कुणीच ओळखत नसणार मला तिथे. अशा अपरिचित ठिकाणी असा काही गुंता करायचा म्हणजे किती अवघड होतं.
‘वाघमारे, असं पहा, एक तर डॉ. कवडे स्वतः एक सीनिअर डॉक्टर आहेत. माझ्यापेक्षा सीनिअर आहेत. आणि ते एक चांगले डॉक्टर आहेत. मी त्यांना समक्ष ओळखत नाही. पण ते चांगले डॉक्टर आहेत याची मला कल्पना आहे. अशा परिस्थितीत मी एकदम अचानक त्यांच्या एका पेशंटला तपासायला लागणं, तो पेशंट चक्क पळवून नेणं, बरं नाही दिसत हो! बरं, तुमचा एकूण प्रश्न communicationचा दिसतो. मग बोला ना तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी. कितीही घाईत असले ना ते, तरी थांबवा त्यांना आणि विचारा. आत्ता हे जे काही मला सांगताहात ना, ते सगळं त्यांना सांगा आणि विचारा खडसावून. सांगा म्हणावं मोकळेपणानी काय झालंय तरी काय माझ्या वडलांना. अहो, खडसावून विचारलं की सांगतातच सगळे डॉक्टर. आणि डॉक्टरांनासुद्धा हे लपवण्यात काही रस नसतो हो.’

‘सर, हे सगळं झालंय, विचारून झालंय, सरांच्या अगदी मागं मागं फिरलोय मी. माहिती विचारत. पण नाही, काही तरी थातूरमातूर सांगतात, चिडतात. गडबडीत आहे असं दाखवतात. खरं सांगू, सर, I hate him now, we all really hate him. हे तुमच्याशी बोलण्याआधी मी सगळ्या घरच्यांशी बोललोय, हॉस्पिटलशीसुद्धा बोललोय. तुम्ही आलात आणि माझ्या वडलांना तपासलंत तर हॉस्पिटलची काहीच हरकत नाही. तुम्ही हो म्हणालात की लगेच मी डॉ. कवडयांशी बोलणार  आहे आणि सरळ सांगणारे की आम्ही डॉक्टर बदलत आहोत.‘

लांब श्वास घेऊन इथे वाघमारे थांबला. माझ्या प्रतिक्रियेचा अंदाज घेत असावा. त्यानं आपली केस चांगली मांडली होती. त्यात त्याचा स्वतःचा एक तर्क होता, ज्याचा प्रतिवाद करणं मला अवघड जात होतं. त्यात भावनिक आवाहन होतं, ज्याला नाकारणं अशक्य होतं आणि त्याच्या सगळ्या बोलण्यातून, नजरेतून तो माझ्याविषयी केवढी तरी सद्भावना दाखवत होता. एक डॉक्टर म्हणून माझी कार्यक्षमता नावाजत होता. मी खरं तर तितकासा सीनिअर नसतानाही तो मला वारंवार मी सीनिअर असल्याची गौरवशाली जाणीव करून देत होता. माझ्याविषयी वारंवार आदर दाखवीत होता. इतक्या स्तुतीनं एखादा देवही प्रसन्न व्हायचा, तर माझी काय कथा! मी शांत राहिलो आणि माझा शांतपणा हा माझा होकार आहे असा सोयीस्कर अर्थ त्यानं घेतला. समोरच्या टेबलावर दोन्ही हात चौरसपणे ठेवत, त्यावर दाब देत तो उठला. ताठ उभं राहून त्यानं माझ्याकडं पाहिलं. त्याच्या नजरेत कृतज्ञता होती, अथांग कृतज्ञता. पुढे वाकून त्यानं माझा हात त्याच्या हातात घेतला, प्रेमभरानं तो दाबत म्हणाला, ‘Thank you, sir!  या सर, आज दुपारीच या तुम्ही. आम्ही सगळे वाटच पाहत असू तुमची तिकडे.’ तो निघाला तेव्हा त्याची चेहऱ्यावर त्याचं ते चिरपरिचित हास्य परतलेलं होतं.

अंगद हॉस्पिटल अगदीच छोटेखानी हॉस्पिटल होतं. पंधरा एक खाटा असाव्यात. मुख्य दरवाज्यापुढेच एक टेबल, त्याच्या आसपास दोन तीन प्लास्टिकच्या खुर्च्या. टेबलावर अस्ताव्यस्त पसरलेले केस पेपर, फाइली, एक बी.पी. अॅपरेटस. एक दोन इंजेक्शनच्या सुया. काही औषधाच्या बाटल्या. मागच्या बाजूला एक साधारण तरुण वयाची स्त्री. पांढरी साडी नेसलेली. त्या साडीच्या रंगावरूनच ओळखायचं की ती नर्स किवा आया (किंवा कदाचित दोन्हीही, गरजेप्रमाणे) आहे. तीच हॉस्पिटलची रिसेप्शनिस्ट असणार कारण मी जसा आत गेलो, तसं तिनं माझ्याकडे पाहत भुवया उंचावल्या, ‘कोण तुम्ही? कुणाला भेटायचंय?’ असे सगळे प्रश्न त्या उंचावलेल्या भुवईत सामावलेले होते.

‘मिस्टर वाघमारे कुठायत? त्यांना तपासायला आलोय मी.’ पुढे होत मी म्हणालो.

एकवार शोधक नजरेनं तिनं मला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं, माझ्या हातातला स्टेथोस्कोप, अंगावरचे कपडे, माझा एकूण वावर पाहून तिनं मला ओळखलं.

‘डॉक्टर? तपासायचंय नाय का? वाघमारे, ते इकडं प्रायवेट तीन मधी आहेत. या इकडं माझ्यामागून.’ 

हातातली कुठल्या इंजेक्शनची बाटली तिथेच टेबलावर ठेवून ती पुढे झाली, वाघमारे ज्या खोलीत होते तिथपर्यंत मला घेऊन गेली. पूर्ण अंधारलेला पॅसेज. एखादा मनुष्य कसाबसा जाऊ शकेल इतपतच रुंद आणि त्याच्या आजूबाजूला खोल्या. प्रायवेट रूम्स. पॅसेजच्या शेवटच्या टोकाशी असलेली ती खोली. माझे डोळे अजून अंधाराला तेवढे सरावले नव्हते, म्हणून ती धडपणे दिसलीही नाही मला. पण सिस्टरनं ती अचूक हेरली, तिचा दरवाजा उघडला आणि मला जवळ जवळ आत ढकललं ‘वाघमारे -, हे तुमचे डॉक्टर आलेत’ अशा प्रस्तावनेसह. 

खोलीत साधारण उजेड, साधारण अंधार असं मिश्रण होतं. एक ट्यूबलाईट होती भिंतीवर. तिच्या उजेडात आता मला दिसायला लागलं. खाटेवर वाघमारे पडलेले आणि त्यांचं अख्खं कुटुंब होतं त्या खोलीत. मला भेटून गेलेला त्यांचा मुलगा, ‘मेजर फार्मा’ वाला, त्याचा भाऊ, त्याची बायको आणि त्यांची आई. सगळे अगदी वाट पाहत असलेले. माझं मत घ्यायला, मी काय म्हणतो ते ऐकायला आतुर. 

मी सगळ्या नातलगांशी बोललो. आजाराचा इतिहास विचारला. एकमेकांच्या पुढे होत होत सगळ्यांनी मिळून मला माहिती पुरवली. मला जमेल ती सगळी मदत करायला तत्पर असे ते सगळे. पेशंटला तपासायला लागलो, तशी सर्वांनी मला जागा करून दिली. बाजूची एक खिडकी उघडून प्रकाश येईल अशी योजना केली. पंख्याचा वेग वाढविला. अगदी सगळं सगळं केलं की मला सोय व्हावी. माझं काम सोपं व्हावं. मघाची ती सिस्टरही एव्हाना मागे येऊन उभी राहिली होती. हातात त्यांचे केस पेपर घेऊन. 

‘सिस्टर, बी पी,’ असं मी म्हणायचा अवकाश की पळत जाऊन तिनं बी पी अॅपरेटस आणलं, त्याचा पट्टा पेशंटच्या दंडाला गुंडाळला सुद्धा. 

‘सिस्टर, टॅार्च,’ असं मी म्हणायचा अवकाश की पळत जाऊन तिनं तो आणला आणि चालू करून माझ्या हातात दिला. 

‘सिस्टर, हॅमर,’ असं मी म्हटलं मात्र पुन्हा एकदा पळापळ आणि हातात हॅमर हजर. 

असं होत होत शेवटी एकदाची माझी तपासणी पूर्ण झाली. मी खोलीत बसलो, शांतपणे सगळा केस पेपर वाचला. आजवर झालेल्या तपासण्या पाहिल्या.  

वाघमाऱ्यांच्या आजाराविषयी काही वेगळ्या शक्यता माझ्या डोळ्यासमोर आल्या होत्या. त्या दृष्टीने काही अजून तपासण्या कराव्यात असं मला वाटत होतं. मी माझ्या नोट्स सविस्तर लिहिल्या, माझी निरीक्षणं नोंदवली. नव्यानं ज्या तपासण्या कराव्यात असं मला वाटलं त्यांची यादी लिहिली. काही थोडी नवीन औषधे सुचविली. वयानं मी तसा तरुणच होतो, अगदी पानंच्या पानं भरून नोट्स लिहिताना अभिमान वाटावा असा नवथर. मनःपूत लिहीत गेलो. आपलं काम आपण मनापासून केल्याचं समाधान वाटेल इतकं लिहिलं.

मी सगळ्यांच्या मधोमध उभा. सगळे नातलग माझ्याभोवती गोळा झालेले. ती सिस्टरही हातात फाईल धरून आज्ञाधारकपणे उभी. आणखी एक कुणी आया पलीकडून मुद्दाम येऊन ऐकायला म्हणून उभी. आसपासच्या दुसऱ्या कुणा पेशंटचे आणखी कुणी नातलग असे सहजच डोकावत उभे. सगळेच जण जणू ऐकायला आतुर. मी सीनिअर झाल्याची जाणीव करून देणारा प्रसंग. मी सविस्तर बोललो, मला ज्या शक्यता वाटत होत्या त्या सांगितल्या, परिस्थिती थोडी गंभीर असली तरी हाताबाहेर गेलेली नाही हेही सांगितले. 

‘मी ज्या काही टेस्ट्स सांगितल्या आहेत त्या आज होऊ देत, त्याचे रिपोर्ट उद्यापर्यंत येतील. मी येतोच आहे उद्या दुपारी पुन्हा भेटायला. मग बोलू या सविस्तर काय ते,’ मी म्हणालो. ‘मेजर फार्मा’चा वाघमारे, त्याचा भाऊ दोघेही पुढे झाले. त्यांनी मनापासून माझे आभार मानले, कृतज्ञतेनं माझ्याशी हस्तांदोलन केलं. ‘Thank you Sir, तुम्हा आलात, इतके कष्ट घेतलेत, आम्हाला हे एवढं समजावून सांगितलंत, खूप बरं वाटलं. काळजी मिटली असंच वाटतंय.’ अगदी बाहेरपर्यंत सोडायला येईतो त्यांचे हे कृतज्ञ संवाद चालूच होते. रस्त्यावरून परत निघालो तसं एक अवघड काम समाधानपूर्वक केल्याचं साफल्य माझ्या मनात दरवळत होतं.

दिवस उलटला. नेहमीची कामं, ओ.पी.डी. चे पेशंट नेहमीसारखेच चालू होते. दूर मनात कुठे एक अस्पष्ट उत्सुकता होती. वाघमारे आणि त्यांचा आजार यांची होती ती उत्सुकता. वाघमारे ही एक अचानक निर्माण झालेली रहस्यकथा होती. तिचा शेवट काय होतो याची अपार उत्सुकता माझ्या मनात दाटलेली. 

दुपारची कामं आटोपली. ठरलेल्या वेळेला मी अंगद हॉस्पिटलमधे दाखल झालो. हॉस्पिटलचं बाहेरचं टेबल, त्यावरची कागदपत्रं कदाचित तीच, त्या मागे एक स्त्री, ती कदाचित वेगळी असावी. सरावानं मी पुढे झालो. प्रायवेट तीन च्या दिशेने त्या अंधारलेल्या बोळीत गेलो. अंधारातला तो दरवाजा आता मी अगदी सराईतपणे उघडला. आत वाघमारे होते. पेशंट वाघमारे आणि त्यांची धर्मपत्नी. बाकी कुणीच नाहीत. आत एक शांतता. त्यांच्या पत्नीनं माझ्याकडे पाहिलं. पाहून न पाहिल्यासारखं आणि ती आपल्याच कामात गर्क राहिली. मी आल्याचं तिला दिसलंच नाही जणू. मी आजूबाजूला पाहिलं. तिथे तीच एक मिणमिणती ट्यूब होती, कालचीच पण आज आता जणू अंधार बाहेर टाकत असलेली. काहीच कळू नये, दिसू नये, जाणवू नये असा एक थंडपणा सगळ्या खोलीत भरून असलेला. मला एकदम उपऱ्यासारखं वाटलं. अर्थशून्य. 

मागे वळून बघतो, तर ती बाहेरची स्त्री मागं मागं येत होती. ‘कुणाकडं आलाय जणू. कोण पेशंट हाय का जणू.’ असं विचारत.

‘मी डॉक्टर आहे. या वाघमारे पेशंटला तपासायला आलो होतो. काल आलो होतो ना. आज पुन्हा आलो होतो. सिस्टर कुठायत? त्यांचा पेपर कुठाय?’ मी विचारू लागलो.

‘आगं बया, तुमी त्ये डागदर हाय न्हव. शिस्टरला सांगत्ये, थांबा,’ असं म्हणत ती मागच्या मागं पळाली. तिच्या मागोमाग मीही बाहेर पडलो. अंधारातून उजेडात. पुन्हा एकदा त्याच टेबलापाशी. आता तिथे काहीच हालचाल नव्हती. कुणी पेशंट नव्हता. कुणी नातलग नव्हता. कागदांची एक मंद फडफड फक्त कानावर पडत होती, तीही अधूनमधून. अजिबात वाराच नव्हता ना त्यादिवशी.

किती तरी वेळ गेला. मंद मंद पावलं टाकत कालची ती स्त्री आली. तिला मात्र आता मी नक्की ओळखलं. मी हसलो. पण ती गंभीर होती. माझ्याकडे रोखून पाहत म्हणाली, ‘पेशंट नाय पाह्यला तरी चालेल म्हणून सांगितलंय. त्यांनी डॉक्टर नाय बदलला.’ असं म्हणून ती आल्या वाटेनं परत आतल्या अंधारात निघून गेली. कामात असणार बहुधा.



काही क्षण मी तिथे रेंगाळलो. याहून जास्त काही घडेल असं दिसेना. माझा नाईलाज होता. थोडा वेळ उगीच वाट पाहिल्यासारखं करून मी तिथून बाहेर पडलो. रस्त्यावर संध्याकाळची रहदारी आत्ता कुठं सुरु होत होती.  
 


डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०



2 comments: