Saturday, 11 May 2013

पितृहट्ट



पितृहट्ट
कदम हॉस्पिटलमध्ये येऊन पोचले तेव्हा रात्रीचे आठ तरी वाजले असतील. दवाखान्याचं माझं काम आटोपून मी बाहेर पडणार होतो, ‍तेव्हाच माझा फोन वाजला.
‘साधारण पन्नास वर्षांचा कदम नावाचा मेल पेशंट अॅडमिट करतोय सर, सकाळीच कधी तरी छातीत दुखून गेलं म्हणतोय. आठ-दहा तास तरी उलटून गेले असतील. इ.सी.जी. काढलाय, सर. त्याच्यात हार्ट अॅटॅक दिसतोय, पण आता एवढा वेळ गेलाय की आता औषधांनीच मॅऩेज करावा लागणार. अॅंजिओ काही शक्य नाही आणि आता ह्या क्षणी तर त्याची छातीसुद्धा दुखत नाही म्हणतोय. त्याला आय. सी. यु. मधे घेतलंय, नेहमीची औषधं चालू केलीत.’ हाउसमन डॉक्टर बोलत होता.
दिवसभराच्या कामानं आधीच थकलेला मी, अगदी घरी निघता निघता असा कॉल म्हणजे एक वैताग वाटला मला. नशीब म्हणायचं घरी पोचण्याआधी आला हा कॉल, नाही तर पुन्हा उठून हॉस्पिटलमधे यावं लागलं असतं. 
हॉस्पिटलमध्ये पोचलो तोवर कदम चांगले स्थिरावले होते. आय. सी. यु. मधे पलंगावर आरामशीर पडलेले होते. मध्यम शरीरयष्टी, थोडेसे अकाली पांढरे झालेले केस, त्यांच्या नुसत्या झिपऱ्या इतस्ततः पसरलेल्या. पाहून वाटलं त्यांना कधी पाण्याचा स्पर्श तरी झाला होता की नाही! डोक्यावरच्या केसांसारखीच अस्ताव्यस्त दाढी. राखाडी मळकट चेहरा. भुवयांचे केससुद्धा असेच राखाडी, मोठे मोठे वाढलेले. त्यांच्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला एक उग्र रागीटपणा आलेला. त्यांना पाहून ते काही आजारी असतील असं कुणाला वाटलं नसतं. वाटलं असतं रागावलेत हे कुणावर तरी. उगाचच जरब बसावी असाच चेहरा असतो काही जणांचा. कदम त्यांच्यातले.
त्यांच्या जवळ जात मी त्यांची चौकशी केली. माहिती घेतली. कधी दुखलं, कसं दुखलं, आधी कधी दुखलं होतं का – एकामागून एक विचारले जाणारे जुजबी प्रश्न. पण प्रश्नांचं हे असलं चऱ्हाट कदमांना मंजूर नसावं. अगदी नाराजीनं ते उत्तरं देत होते. उडवाउडवी केल्यासारखी. ‘हा’, ‘नाय बा’, ‘नाय तं काय’ अशा स्वरुपाची. 
‘तुम्हाला कुठल्या काही सवयी वगैरे?’
‘म्हंजे?’ एकदम वरच्याच स्वरात त्यांनी विचारलं.
‘म्हणजे, बिडी-काडी, दारू असलं काही-‘
‘न्हाय, न्हाय, तसलं न्हाय काय’- अगदी सहजपणे त्यांनी सांगितलं. इतक्या सहजपणे की माझी खात्रीच झाली, कदम खोटं बोलतायत. त्यांचं एकूण रूप, त्यांचा एकूण अवतार, त्यांची बेफिकिरी आणि निर्व्यसनी? कसं शक्य आहे.
मी आसपास पाहिलं. पलंगाच्या एका कडेला एक बाई उभ्या दिसल्या. इतका वेळ तिथंच असणार त्या पण जणू अस्तित्वशून्य. पदराचा बोळा तोंडात कोंबून उभ्या. कदमांची धर्मपत्नी. मी ओळखलं. अशा वेळी बायकांची फार मदत होते. नवऱ्यांच्या सवयी म्हणजे त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. अगदी मनापासून भडाभडा बोलतील त्या ह्या विषयावर.
‘काय हो, कसली सवय नाही म्हणतात हे.’
मी पुढे काही म्हणायच्या आत, फिसकन हसल्या बाई. नवऱ्याकडे लटक्या रागानं पाहत.
‘अवो, सांगा की वो, डॉक्टरांन्ला. सांगा न्हवं खरं काय ते,’
कदम शांत होते. शून्यात नजत लावून शांत. चाललेल्या चर्चेत जणू रसच नसल्यासारखे. पूर्ण अलिप्त. काय ओळखायचे ते मी समजलो. खोलीतून बाहेर पडलो. 
बाहेर कुणी चार-पाच माणसं वाट पाहात थांबली होती. त्यांच्याशी बोललो. समजावून सांगितलं. ‘हार्ट अॅटॅक आहे, पहिले दोन-तीन दिवस काळजीचे आहेत. इथे आय.सी.यू. त ठेवावे लागेल. मग बाहेर साध्या खोलीत काही दिवस.’ वगैरे वगैरे. त्यांनी सगळं ऐकून घेतलं, एक-दोघांनी समजल्यासारख्या माना हलवल्या. एक-दोघे संशयी नजरेनं पाहात राहिले. काही तरी न पटल्यासारखे.
‘पेशंट तुमचे कोण लागतात?’ निघता-निघता मी चौकशी केली.
‘ह्ये, आमचे पाहुणे, गाववाले न्हवं,’ त्यांच्यातल्या एकानं पुढे होत उत्तर दिलं.
‘आणि त्यांचा मुलगा -?’
‘ह्यो काय, ह्यो त्येंचा पोरगा,’ एकानं मागच्या एका तरुणाकडं बोट दाखवलं. म्हणायचा पोरगा पण हा तर पार मागं उभा. कशातच नसल्यासारखा.
‘आरं, व्हो ना म्होरं, डागदर पुसतायत न्हवं,’ असं म्हणत दोघांनी त्याला पार ढकललं तेव्हा कुठं तो समोर आला. मळकट कपडे. अगदी फाटके नाहीत पण कधीही फाटतील अशा अवस्थेतले. शर्टवर ठिकठिकाणी ऑइलचे डाग. चेहऱ्याचीही अवस्था तीच, ऑइलमय़. पोरगा मेकॅऩिक असणार कुठल्या तरी गॅरेजमधे. 
‘वडील आहेत का रे ते तुझे?’
‘होय, साहेब.’ पुढे येत तो म्हणाला.
‘आणि काम काय करतोस तू?’
‘रिक्षा चालवतो साहेब, रिक्षा आहे माझी.’
‘कुणी इतर भाऊ, बहीण वगैरे?’
‘आहेत ना साहेब, दोघं हायेत. पण त्ये बारके आहेत. शाळेत शिकतात.’
‘आणि तू? शिकला की नाही काही?’ 
‘दहावी नापास आहे साहेब’.
कदमांची कौटुंबिक परिस्थिती ही अशी. कठीण आहे. स्वतः व्यसनी. थोरला पोरगा रिक्षा चालवणार. उरलेले दोघे बारके, असेच अर्धे-कच्चे शिकणारे. 
‘वडील काय करतात तुझे?’ 
‘वडील? काय नाय साहेब. वाचमन हुते दोन वर्षापूर्वी. आता घरलाच असतात.’
म्हणजे आनंदच म्हणायचा. घराचा मिळवता पुरुष म्हणजे हा पोरगाच दिसतो, रिक्षा ड्रायव्हर. त्याचीही समज यथातथाच. बाप असा हार्टचा पेशंट आहे हे तरी त्याला समजलंय की नाही त्याचाही मला अंदाज येईना. 
कुठल्याही गंभीर आजारावर इलाज करताना ह्या आर्थिक पार्श्वभूमीचा विचार करावाच लागतो. माझ्याबरोबर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच मी हे सांगतो. पेशंटचे निदान सर्वंकष असावे. नुसते वैद्यकीय नको. त्याची कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक कुवत, सामाजिक पार्श्वभूमी सगळ्याचा विचार करून उपचार ठरवा. कुठल्याही आजाराचे उपचार आजारानुरूपच असणार हे खरं असलं तरी या बाजूच्या परिस्थितीचा त्याच्याशी संबंध असतो. किती तरी वेळा हे घटकच जास्त निर्णायक ठरतात. भले तुमच्याजवळ लाखो, करोडो रुपये किमतीचा दागिना आहे विकायला, समोरच्या माणसाच्या खिशात त्याच्या खरेदीसाठी तसा पैसा नसेल तर त्याला त्याचे काय मोल असणार? कुठल्याही आजाराचे निदान झाल्यावर त्याच्यावरच्या उपचाराने पेशंटला मिळणारा आनंद आणि त्यासाठी त्यानं मोजलेले पैसे यांचं गणित जेव्हा जमतं तेव्हाच पेशंटला अंतिम समाधान मिळतं. हे समाधान म्हणजेच डॉक्टर आणि पेशंट यांच्या परस्पर संबंधांची मुहूर्तमेढ असते.
कदमांचं आर्थिक गणित व्यस्त होतं. त्या ओढाताणीचा विचार करीतच उपाय योजना करणं गरजेचं होतं. नाही तर आजकाल हृदय विकाराच्या आजारावर कितीतरी महागड्या उपाय योजना करणं शक्य आहे. त्यांचा वापर तारतम्यानं करावं लागतो. ‘सब घोडे बारा टक्के’ असा न्याय लावणं धोक्याचं ठरतं. सुदैवानं कदमांचा आजार मध्यम तीव्रतेचा होता. जास्त महागड्या उपचारांची गरज बहुधा लागू नये असा. 
खरं तर नंतर काहीच विशेष घडलं नाही. दिवसागणिक सुधारणा होत कदम चांगलेच सुधारले. त्यांची घरी जाण्याची वेळ आली. घरी पाठवण्यापूर्वी अशा पेशंटची आम्ही स्ट्रेस टेस्ट करतो. त्यांना थोडं चालवून पाहातो. तेवढ्यानं जर त्रास झाला तरच पुढच्या महागड्या टेस्ट सांगतो. कदमांची स्ट्रेस टेस्ट झाली. चांगली झाली. नुसती औषधे घेतली तरी भागावे अशी. कदमांना हे शुभ वर्तमान मी ऐकवले. पण मला अपेक्षा होती ते समाधान काही त्यांच्या चेहऱ्यावर उमटले नाही. नाही तरी आल्या दिवसापासून मी त्यांना आधी हसल्याचे पाहिलेच नव्हते. काही लोक मृदू भावना व्यक्त करण्याच्या बाबतीत जणू अशक्त असतात. कदम तसे असणार. अगदी घरी जाण्याची वेळ आली तरी त्यांची कपाळावरची सूक्ष्म आठी कायम होती. खोलीतून मी बाहेर पडणार तोच त्यांनी विचारलं,
‘त्ये, आमचं गाववालं म्हणत हुतं, ती काय ती फुग्याची ट्रीटमेंट का नाय दिली म्हणून. ते इथले कोण हार्ट स्पेशालीस्ट बी म्हणून ऱ्हायले त्ये करावं म्हणून.’
अरे बाप रे, म्हणजे कदमांची बाहेर समांतर चौकशी चालू होती तर. त्यांना angioplasty करून हवी होती तर. मी त्यांना अशिक्षित समजण्यात चूक केली होती जणू. पुढच्या उपचाराचा पर्याय न देण्याचं माझं कारण एकच होतं की त्या पर्यायाची त्यांना गरज नव्हती आणि ते पेलवण्याची त्यांची क्षमता नाही हा मी आगाऊपणे काढलेला निष्कर्ष होता. त्यांच्या अर्धवट वयातल्या अर्धवट कमावत्या मुलाच्या नजरेतलं आर्जव मला दिसलं होतं म्हणून माझा मीच काढलेला तो निष्कर्ष होता. मी पाहिलेलं ते आर्जव तरी खरं होतं की मला झालेला भासच निव्वळ. मी गोंधळलो.
‘तुमच्या प्रकृतीला सध्या तरी त्याची गरज नाही. पुढे काही दिवसांनी पुन्हा तपासणी करू आणि गरज पडली तर करूच की ती फुग्याची ट्रीटमेंट. आणि शिवाय ही ट्रीटमेंट करायची म्हणजे बराच खर्च येईल, अगदी आम्ही बरीच सूट दिली तरी तो खर्च खूपच असेल. कसा झेपेल तुम्हाला तो? चौकशी केलीय सगळी मी तुमच्या मुलाजवळ. म्हणून तर म्हणतो खर्च जपून करू. अगदी नाईलाज झाला तरच करू.’ मी स्वच्छ व्यवहारच त्यांच्या समोर मांडला. इच्छा नव्हती इतकं स्पष्ट बोलण्याची पण आता नाईलाज होता म्हणून बोललो. 
‘पैशाची काळजी नको डाक्तर. पोट्टा काय न्हाय बोलला व्हय ट्रीटमेंटला? असा कसं बोलंल? येळ आली तं इकू दये ना ती रिक्षाबी. ’ कदम म्हणाले. 
हे मला अतर्क्य होतं. आयुष्यभर वॉचमनची किरकोळ नोकरी करायची. जमवलेला पैसा दारूत उडवायचा. पन्नाशीच्या वयात आपलं एक आजारपण झेपू नये अशी आर्थिक कुवत असणारा हा गृहस्थ. मुलाच्या रिक्षेवर डोळा ठेवून असावा, तोही अशा रिक्षेवर की जी त्यांच्या सगळ्यांच्याच चरितार्थाचे एकमेव साधन होती. धन्य आहे! पूर्वीच्या काळी विद्यादानानंतर गुरु गुरुदक्षिणा मागत असत. ही प्रथाही मला अन्यायकारक वाटे. पण त्यात तरी एक काही व्यवहार होता, देवाणघेवाण होती. कदमांची ही पितृदक्षिणा म्हणजे सगळाच एकतर्फी आतबट्ट्याचा व्यवहार होता.
‘बघू, बोलतो मी मुलाशी’ असं सांगून मी बाहेर पडलो. पण प्रकरण सोपं नव्हतं, आणि ते यथावकाश माझ्या लक्षात येत गेलं.
खोलीबाहेर ते कोण गाववाले उभेच होते. 
‘काय म्हनतो आमचा पेशंट, बरा हाय नव्हं’, एकानं पुढं होत मला जवळजवळ अडवलंच.
‘हो, चांगले आहेत, आता घरी पाठवायचं म्हणतोय आम्ही त्यांना.’ म्हणत मी पुढे चालत राहिलो.
‘न्हाय, म्हंजी, अमी काय म्हनतो, त्यांची तो फुग्यावाली ट्रीटमेंट नाय केली तुमी. करायची व्हती ना ती बी.’
‘हो, तो निर्णय काही दिवसांनी घ्यायचा असं ठरवलंच आहे आम्ही.’
‘न्हाई, म्हणजे आसं पहा डागदर, तुम्ही मस त्येंना घरी सोडलं पन थितं जाऊन काय झालं वंगाळ म्हंजी कसं व्हायचं वो. तुम्हीच इचार कराया पायजे न्हवं,’ कुणी गाववाला म्हणाला. मी थांबलो. त्याच्याकडे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यात अर्धवट शहाणपणाची आग मला स्पष्ट दिसली. इतकं सगळं छान होऊनही मलाच गुन्हेगार ठरविण्याचा त्याचा प्रयत्न होता.
‘अहो, असं कसं होईल. आपण तपासण्या केल्यायत ना त्यांच्या. सगळे रिपोर्ट चांगले आले आहेत. ते बघून तर मी सोडतोय ना त्यांना घरी.’
‘आरंच्या, म्हंजी अगदी ग्यारंटीच दिसती तुम्हाला जनू!’ हे कुणी दुसराच बोलला. त्यातला विखार झोंबणारा होता. 
चालता चालता मी थांबलो. मागे वळून पाहात थांबलो. ते सगळेही थांबले. हे कोण होते, परवाचेच गाववाले की कुणी नवेच. मला कळणं शक्यच नव्हतं. त्या सगळ्यांच्या मधून मी मागं पाहिलं. त्या गर्दीत मागे जणू लपलेला, ओशाळलेला तो मला दिसला, कदमांचा मुलगा. रिक्षा ड्रायव्हर. अगदी पार मागे, परवासारखाच दूरदूर पळू पाहात असलेला. त्याला मी खुणावलं. 
‘मुलगाच ना रे तू त्यांचा?’
'हो, साहेब.’
‘जरा मला खाली येऊन भेट एकट्यानं. बोलायचंय मला तुझ्याशी.’ मी म्हणालो.
माझी कामं होईतो चांगला तासाभराचा वेळ गेला असणार. खाली उतरून गाडीपर्यंत गेलो तर मागे-मागे येणारा तो मला दिसला. कदमांचा मुलगा. एकटाच होता. चेहऱ्यावर तोच ओशाळलेला भाव. मला जिच्यात आर्जव दिसलं ती नजर.
मी थांबलो.
‘काय, मग, करायची का पुढची ट्रीटमेंट? वडलांची इच्छा दिसते तुझ्या तशी,’ मी म्हणालो.
‘होय, साहेब, पार मागंच लागल्येत माझ्या. ती रिक्षापण वीक पण ट्रीटमेंट कर म्हणून. आता रिक्षा विकली तर खायचं काय हो. पण ऐकतच न्हाईत ते तं काय करू?’
‘आणि आत्ता वर माझ्याशी बोलले ते, ते कोण? कोण जवळचे नातलग आहेत का? आणि करणारे का कुणी त्यातलं काही पैशाची मदत तुला?’
‘त्ये, कसले हो, गाववाले नुसते. मजा बघतील. मदत कोण करणार, छे, कुनीच न्हाई’. तो म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर अपार काळजी होती. एक न सुटणारा तिढा.
‘बघू, मी आज काही घरी सोडत नाही, पुन्हा त्यांच्या छातीत दुखलं तर बघू,’ असं म्हणत मी बाहेर पडलो.
दवाखान्यात पोचलो, तर हॉस्पिटलमधून पुन्हा फोन. कुणी नगरसेवक फोनवर बोलू इच्छीत होते.
‘नमस्कार, डॉक्टरसाहेब.’
‘नमस्कार, नमस्कार,’ मी.
‘ते कोण कदम अॅडमिट म्हणे आपल्याकडे. नाराज नका हो करू त्यांना. काय म्हणतात ती करून टाकायची हो ट्रीटमेंट. आता अशा वेळी पैशाची गोष्ट करायची म्हणजे बरं नाही, नाही का. मी काय म्हणतो करून टाका काय ती ट्रीटमेंट. पैशाचं काही अडलं तर बघूच की आपण. कदम आपला माणूस आहे. काही चिंता नको, काय?’
मी अवाक. फोन हातात धरून सुन्न झालेलो. काही बोलण्यापलीकडे गेलेलो. नशीब त्यांनीच तिकडून फोन ठेवला.
कदमांची प्रकृती उत्तम असूनही मी गुन्हेगार ठरतो की काय अशी चिता मला लागून राहिली.
पण ही अवस्था फार काळ राहिली नाही. काही तासातच पुन्हा फोन आला. कदमांच्या छातीत पुन्हा दुखायला लागलं होतं. पुन्हा इ.सी.जी. काढला, त्यात काहीही बदल नव्हता, पण बदल आता माझ्यात झाला होता. मी तत्काळ पुढील आदेश दिले, त्यांची angioplsty करून घेतली.
याला काही वर्ष उलटली आहेत. कदम अजून माझ्याकडे येत असतात. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या मुलांनी रिक्षा विकली की आणखी काही विकून पैसे उभे केले हे मला समजलेलं नाही. त्यानंतर तोही मला कधी भेटलेला नाही.
कदमांच्या बरोबर हा जो काही प्रसंग झाला, त्यात मी हरलो हे निःसंशय, पण मला प्रश्न आहे तो वेगळाच, स्वतः कदम तरी जिंकले की हरले? हे कसं ठरवणार?

डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०



1 comment:

  1. एकंदरीत कदमांना निर्धास्तपणे व्यसनं करायला मोकळीक हवी होती. म्हणून फुग्याच्या ट्रीटमेंटसाठी जिवाचा आटापिटा!

    -गामा पैलवान

    ReplyDelete