Saturday 3 August 2013

आपुले मरण



आपुले मरण
दरवाजा बंद होता. नव्यानं रंगवलेलं दार. तशीच नवी कोरी रंगवलेली भिंत बाजूला. नवीन रंगाचा वासही ताजाच असावा बहुतेक. नाकाला झोंबत होता माझ्या. दरवाजावर त्याचा क्रमांक दाखवणारी पाटी. चकचकणारी धातूची. क्रमांक 301. अगदी ठळकपणे आणि निर्विकारपणे सांगत होती ती. ही खोली तीनशे एक नंबरची आहे असा तिचा अर्थ. हा आणि इतकाच अर्थ त्या पाटीचा. एखाद्या आकड्याला याहून अधिक संदर्भ तो काय असू शकतो? आणि असावा तरी का? हॉस्पिटलमधली तर एक खोली. कशाला हवेत इतके नखरे तिला- तो चकाकणारा रंग. ती चकचकीत पाटी. आणि दरवाजाची ती तसली आकर्षक आधुनिक वळणाची मूठ. अशी छान सजावट. पण किती व्यर्थ होती ती. किती खोटी. कितीही सजवा, नटवा त्या खोलीला. म्हणून आतली वेदना थोडीच शमणार आहे त्यानं की आनंदाचे, आशेचे नवीन धुमारे फुटणार आहेत त्या बंद अलिशान वातानुकूलित खोलीला. 

कपाळावर सूक्ष्म आठी घेऊन बंद दरवाजाबाहेर मी उभा. किंचित थबकून. आत कसं जावं अशा विचारात. खरं तर असं इतकं काय झालं होतं. सगळं तर मला अगदी पूर्ण माहीत असलेलं. वर्षानुवर्षांच्या सरावाचं असं. काय नवीन होतं त्याच्यात? मला माहीत होतं- आत सीमा असणार होती. ती आजारी होती. खूपच आजारी. तिला स्तनाचा कॅन्सर झाला होता. अगदी शरीरभर पसरलेला कॅन्सर. कालच तिच्या पोटावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली होती. मोठ्या आतड्याचा केवढा तरी भाग काढून टाकावा लागला होता. आणि तेव्हाच हे सगळं समजलेलं की हा कॅन्सर अगदी पोटात अगदी खोलपर्यंत पसरलेला आहे. स्तनातून निघून पार पोटापर्यंत पसरलेला कॅन्सर. पूर्ण शरीर पोखरणारा कॅन्सर. त्यातून आता परतीचा मार्ग नसणार. आता उरलाय तो फक्त एक अटळ प्रवास. जो एका अनिवार्य अंतापर्यंत खेचत नेणार तिला. वेदनांनी हेलपाटत खेचणार. जीवनाच्या अंतापर्यंत नेणार. वेदनेतूनच वेदनेच्याही पार अंतापर्यंत नेणार तो तिला. एक डॉक्टर म्हणून हे सगळं मी बघायचं फक्त. कधी काही निरर्थक औषध देत तर कधी त्याहून निरर्थक असे सल्ले देत. पण बघत राहायचं. सक्तीनं बघत राहायचं. माझ्या मदतीला ही अशी चकचकीत निर्विकार खोली. खोली नंबर 301. 

दरवाजाची मूठ मी अलगद फिरवली. हलकेच तो उघडला आणि आत शिरलो. अगदी आवाज न करता. जणू असं केल्यानं परिस्थितीत काही फरक पडणार होता.

समोर अंथरुणावर ती होती. सीमा. कमालीचा कृश देह. खप्पड बसलेले गाल. त्यातून वर डोकावणारी चेहऱ्याची हाडं. धारदार नाक. पातळ आणि रुंद जिवणी. सुकलेले निस्तेज ओठ. डोक्यावरचे केस विरळ, बरेचसे पांढुरके झालेले आणि तसेच पांढुरके असू दिलेले. कुठल्याही कृत्रिम सौंदर्यप्रसाधनांना तिचा विरोध असणार बहुतेक. असं असलं तरी केस कापलेले होते व्यवस्थित. त्यातल्या त्यात नीट विंचरलेले असे. अगदी पाश्चात्य वळणाचा बॉयकट आणि सगळ्यांमागे तिची विलक्षण अशी धारदार नजर. तुमचा-आमचा अगदी खोल वेध घेणारी नजर. इतक्या उद्ध्वस्त शरीरामध्ये तिचे डोळे हेच काय ते महत्त्वाचे इंद्रिय असल्यासारखे. त्यातूनच काय तो होणार तिचा आपल्याशी संवाद. अगदी थेट संवाद. 

मी आत गेलो. मी आल्याचं तिला समजलं. किचित मान वळवून तिनं माझ्याकडे पाहिलं. नजरेत थोडं स्मित आणि बरीचशी सोशिकता.  

‘So, How do you feel? Ok?,’ अशा अवघड वेळी इंग्लिशला पर्याय नाही. अगदी सुसंस्कृत वाटतं आणि दूरस्थही. 

‘It’s Ok Doctor. There is a lot of pain in my stomach. मला माहित्येय, कालच तर ऑपरेशन झालंय. आज ते दुखणारच. पण तरी राहवत नाही. It really hurts, you know. If you could do something about it-,’ बोलता बोलता तिचा चेहरा थोडा आक्रसला. पोटात कळ आली असणार.

मी पुढे झालो. तिचा हात पकडला. मनगट धरून तिच्या नाडीचे ठोके पाहू लागलो. जणू विचारमग्न. त्या ठोक्यातून काही तरी मूलभूत शोधत असल्यासारखा.  

सीमा माझ्याकडे पाहत होती. अगदी थेट. आरपार. ती बघत राहिली आणि मला बावळट वाटत गेलं.
‘छे, हे अशक्य आहे. हिच्यासमोर कुठलंच सोंग आणणं अशक्य आहे.’ मला वाटलं.

‘मला कल्पना आहे, डॉक्टर. आपले सर्जन, डॉ. विवेकच ना? ते बोललेत माझ्याशी. मला कल्पना आहे. मला ब्रेस्ट कॅन्सर झालाय आणि बहुधा तो पोटात पसरलाय. मला माहित्येय, तो आता बरा होणार नाहीये. What I beg of you, please make it painless for me & make it sooner, if you could!’ 

‘You seem to be running too fast, सीमा, अजून कुठलाच ठोस रिपोर्ट आलेला नाही. विवेक काय बोलला, मला माहीत नाही, पण खरं तर बायोप्सीचे रिपोर्ट येईपर्यंत काहीच बोलणं चुकीचं असेल. रिपोर्ट आल्यावर बोलू. तोपर्यंत विश्रांती.’ मी म्हणालो. जणू मुदत मागितली मी तिच्याकडे. काही निर्वाणीचं बोलण्याआधी. 

मी बोललो खरं पण ते तिला किती पटलं, कल्पना नाही. डोळे मिटून ती फक्त शांत पडून राहिली. प्रतिक्रियाशून्य. पूर्ण आत्ममग्न. मी निरर्थक तपासत राहिलो. ती जणू वाट पाहत होती, माझ्या जाण्याची. 

खोलीतून बाहेर पडलो तसा सुनील माझ्या मागे आला. खोलीचा दरवाजा हलकेच लावत. इतका वेळ मी खोलीत होतो, पण तिथे हा होता हे मला कसं समजलं नाही? मी विचारात पडलो.

‘Is it really that bad, Doctor? तिनं तर जणू धोशाच लावलाय, जाण्याचा. I feel guilty for what has happened. I am her husband. I think it was all my fault. गेली तीनेक वर्षं तरी मला माहित्येय, तिला तिथे एक गाठ आहे. मी का दुर्लक्ष केलं असेल? ती म्हणायची, ते काही विशेष नाहीये, जाईल आपोआप म्हणून. मीच मूर्ख. असा कसा काय गाफील राहिलो? माझी तर मती चालत नाही. मीच चुकलो, डॉक्टर, मी आधीच काही तरी करायला हवं होतं.’

मी चालता-चालता थांबलो. सुनील असहायपणे माझ्या मागे-मागे येत होता. केवढा तरी धिप्पाड देह. भव्य ऋषितुल्य दाढी. घारे डोळे. पाहताक्षणीच दरारा वाटेल असं व्यक्तिमत्त्व. पण आता हताश झालेला होता. पश्चात्तापानं पोळलेला.

‘मिस्टर, सुनील, आपण थोडं थांबू यात. वाट पाहू यात. मी मगाशी म्हटलं ना तेच खरं आहे. अजून कुठलाही ठोस रिपोर्ट आपल्या हातात आलेला नाही. हे सगळे जे आहेत, ते अंदाजच आहेत. रिपोर्ट हातात येईपर्यंत वाट पाहू. कुणास ठाऊक, रिपोर्टमध्ये कदाचित एखादी चांगली बातमीसुद्धा दडलेली असेल. Please wait,’ वरवर मी म्हणालो खरं, पण आतून मलाच माझी लाज वाटली. किती खोटं बोलतोय आपण. कधी शिकणार आपण उघड्या डोळ्यांनी परिस्थितीचा स्वीकार करायला. तसं केलं तर निदान उघड्या डोळ्यांनी सामना तरी करता येईल परिस्थितीचा. का हा आपला लपंडावच बरा, नेहमीच्या सवयीचा. मला कळेना. सुनीलच्या पाठीवर हलकेच थोपटत पुढे चालू लागलो. कुठली तरी घाई असल्यासारखा. पण सुनील पाठ सोडत नव्हता. माझ्या वाढत्या वेगाशी ताल साधत तो चालत राहिला. त्याला माझ्याशी बरंच बोलायचं असणार.

‘I think she had some kind of intuition.  ती म्हणायची मला नेहमीच, मी फक्त पन्नाशीपर्यंत जगणारे म्हणून. मी हसण्यावारी घ्यायचो ते सगळं पण ते चुकलंच. She did have a point in what she said. अजून पन्नाशीसुद्धा गाठली नाहीये हो तिनं आणि तेवढ्यात हा असला आजार. विलक्षण आहे हो हे सगळं,’ सुनील बोलत होता अर्धवट माझ्याशी पण खरं तर स्वतःशीच. मीही ऐकून न ऐकल्यासारखं करीत चालत राहिलो. रिपोर्ट अजून हातात आलेला नव्हता हाच काय तो दिलासा. आजचा दिवस एवढ्या दिलाशावर काढणं सहज शक्य होतं.

“What do we plan next? डॉक्टर, अगदी कितीतरी वर्षांपासून तिनं ठरवलंय, ती आयुष्यात कधी केमोथेरपी घेणार नाही म्हणून. ती तर नाही नं येणार तिच्या नशिबी?’ सुनील मला विचारत होता. दोन दिवस झाले होते. रिपोर्ट आला होता. सीमाला स्तनाचा कॅन्सर झाल्याचं निदान त्यात स्पष्ट दिलं होतं. मला आता ‘अडाणी-अडाणी’ खेळता येणार नव्हतं. पुढं होऊन उत्तरं द्यावी लागणार होती.

‘असं पहा, हा निर्णय घेणारे डॉक्टर वेगळे असतात. Oncologists. आपण त्यांचं मत घेऊ यात. इतक्या पसरलेल्या आजाराची शस्त्रक्रिया तर होऊ शकत नाही. करायची तर केमोथेरपीच करावी लागणार. पण हे माझं मत झालं. ते काही अंतिम नव्हे. आपण त्या तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवू.’ माझा पुन्हा लपंडाव सुरु. शी:!

‘डॉक्टर, तिनं तिच्या अगदी जवळच्या नातलगाला झालेला कॅन्सर पाहिलाय. ती साक्षी होती त्या सगळ्या उपचारांना. तिनं स्वतः भोगलेत त्याचे हाल. दिवसागणिक खालावत जाणारी त्याची तब्येत. त्याला लागणारा दम. रोजच्या तक्रारी. तिच्यासमोर विव्हळायचा तो वेदनांनी. रात्र-रात्र बसून काढलीये तिनं त्याच्याबरोबर. त्याचं मरण कणाकणानं जगलीय ती. तेव्हापासून तिनं ठरवलंय, मी कधी केमोथेरपी घेणार नाही म्हणून. काय पण विचित्र हट्ट. म्हणे केमोथेरपी घेणार नाही. मी हसायचो तिला तिच्या या असल्या मूर्ख निराधार हट्टासाठी, पण योगायोग पहा, तो हट्ट खरा करण्याची संधी मिळालीय तिला.’

खाली मान घालून सुनील शांत बसला. दाढीतून हात फिरवीत राहिला.

‘माझा अंदाज सांगू?’ मी सुनीलकडे रोखून पाहत विचारलं. माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत तो थांबला. ‘सीमा केमोथेरपी घेईल. नक्की घेईल. आपले प्रत्येकाचेच किती तरी छोटे-मोठे हट्ट असतात. फावल्या वेळचे. ते सगळे थोडेच आपण अगदी टोकाला जाऊन पुरवतो? लाचार असतो परिस्थितीसमोर आपण. माघार घेतोच की किती तरी वेळा. केमोथेरपी घेणार नाही असं ती म्हणायची तेव्हा तिला कॅन्सर झाला नव्हता. आता तो झाला आहे, हा मोठा फरक आहे.’ मी म्हणालो.

‘सीमाला तुम्ही ओळखत नाही, डॉक्टर. ते बेणं वेगळं आहे. She is made up of a different stuff. She is a hardcore scientist. समाजशास्त्र विषय आहे तिचा. तिच्या विषयात तिनं किती तरी पुस्तकं लिहिली आहेत. संदर्भ ग्रंथ म्हणून ती देश-परदेशात वाचली जातात. तिचे किती तरी पेपर्स वेगवेगळ्या जर्नलमधे वेळोवेळी प्रसिद्ध झालेत. तिचं काम हेच तिचं जीवन होतं कायम. Absolute workoholic. तिचं काम जर थांबणार असेल तर जगू नाही शकणार ती. त्या बाबतीत ती हट्टी आहे.’

सुनील पुन्हा शांत बसला.

‘चलतो मी, डॉक्टर. तुम्ही मंडळी कामात असता. निघण्यापूर्वी एक-दोन प्रश्न विचारतो फक्त. विचारू?’

‘जरूर विचारा’

‘कुठलेही उपचार केले, मग भले ती शस्त्रक्रिया असो, केमोथेरपी असो किंवा आणखीही काही, तरी सीमाचा आजार पूर्ण बरा होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आहे का?’

‘हो,’ मी म्हणालो.

‘अशा कुठल्याही उपचारानं तिच्या आयुष्याची दोरी थोडी फार लांबेल इतकंच ना?’

‘नक्की असंही म्हणता येणार नाही. उपचार केले तर त्याच्या साईड इफेक्टमुळे ती दोरी लवकर तुटूही शकते. पण सीमा पूर्ण बरी होणे अशक्य आहे, यातून परतीचा मार्ग नाही, एवढं मात्र नक्की खरं.’

‘How many days do you give her?’

‘असे अंदाज मी देत नसतो. मला काही लपवायचं आहे म्हणून नाही, पण हे असले अंदाज नेहमी चुकतात म्हणून. मी एवढंच नक्की म्हणेन, हा आजार बरा होणारा नाही. There is no point of return from here.’

‘तुमचं उत्तर मला समजलंय. पण शेवटी माझंही मन आहे. भावना आहेत. Could it be a few months?’

“I would consider it too optimistic if you talk in those terms,’ मी म्हणालो.

‘आणि ती म्हणते त्याप्रमाणं तिनं जर केमोथेरपी किंवा इतरही कुठलेही उपचार घ्यायला नकार दिला, तर -? तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? राग येईल तुम्हाला?’
‘राग? कशाचा राग? पेशंटनं एखादी भूमिका प्रामाणिकपणे घेतली तर मला राग येत नाही. आणि खरं सांगू, आता एवढा उशीर एवीतेवी झालेलाच आहे की कुठलाच उपचार घ्यायला कुणी कुणाला आग्रह करावा अशी परिस्थितीच उरलेली नाही. केमोथेरपी न घेण्याचा तिचा हट्टच असेल तो पुरा करायला मी तयार आहे, कारण प्राप्त परिस्थितीत कदाचित तोच योग्य निर्णय असू शकतो अशी माझीही भावना आहे. आता इथून पुढे कुठलेही उपचार करून घेणार नाही असाच तिचा जर आग्रह असणार असेल तर इतर किती डॉक्टर हे मान्य करतील, मला कल्पना नाही, पण मी तिचं समर्थन करायला तयार असेन आणि हे लक्षात असू दे, पेशंटच्या कुठल्याही अनाठायी हट्टासाठी मी कधीही शास्त्रीय तत्त्वांबाबत तडजोड करत नाही. असा संघर्ष उभा राहिलाच तर मी उपचारांमधून बाहेर पडेन पण पेशंटवर अन्याय होऊ देणार नाही. सीमानं केमोथेरपी नाकारली तरी त्यात तिच्यावर अन्याय होणार नाहीये म्हणूनच कॆवळ तिचा हा नकार स्वींकारायला मी तयार आहे.’

माझं बोलून झालं होतं. काही क्षण असह्य शांततेत गेले. सुनील उठला आणि माझ्यासमोरून उठून गेला. सीमाच्या हट्टाची भलावण करून मी त्याला दुखावलं होतं का? कुणास ठाऊक.

दुसरा दिवस. खोली क्रमांक 301. मी पुन्हा एकदा दाराशी उभा. आज आता काय घडणार अशा विवंचनेत. काही क्षण असेच अनिश्चित. पण मग हलकेच दरवाजा उघडून मी आत गेलो. आत ती होतीच. सीमा. किंचित थकलेली पण हसतमुख. चेहऱ्यावर थोडा उत्साह होता तिच्या, खराखुरा की मला उगीचच तसं वाटलं?

‘काय म्हणतीये तब्येत?’

‘ठीकच म्हणायची. I must thank you, doctor. काल तुम्ही सुनीलशी बोललात. सुनीलनं सांगितलंय मला ते सगळं. I never knew there could be doctor like you. So clear in his ideas. So compassionate. मी ठरवलंय. मी केमोथेरपी घेणार नाही.’

‘ही फार घाई होतीये. अजून आपण oncologistना बोलावलं सुद्धा नाहीये. त्यांचं म्हणणं न ऐकताच हा निर्णय कसा होऊ शकेल? डॉ. सावंत आपले oncologist आहेत. त्यांना आज बोलावणारे मी. त्यांचं मत ऐका. समजून घ्या. मगच काय तो निर्णय आपण घेऊ.’ मी म्हणालो.

‘त्याची काय गरज आहे, डॉक्टर. माझा निर्णय झालेला आहे. मला माहीत आहे, ते मला केमो घ्यायला  सांगणार. पटवणार. मी पाह्यलंय या लोकांची आशा किती दुर्दम्य असते. त्याला त्यांचा नाईलाज असतो. पण मला ते सगळं नको आहे. टाळता नाही येणार हे सगळं?’

‘टाळता येईलही कदाचित. पण मला ते टाळायचं नाहीये. त्यांना त्यांची बाजू समजावून सांगण्याचा हक्क आहे. तुम्ही तो सल्ला नाकारू शकता, पण तो न ऐकताच नाकारणं, हा अन्याय आहे. डॉक्टर सावंतांना मी बोलावणार आहे. त्यांचं ऐकून घ्या. खुल्या मनानं ऐका. मग तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता.’

एकदम शांतता. कुठलाच आवाज नाही. संमती नाही की निषेध नाही. मी चमकून पाहिलं तर सीमा डोळे मिटून जणू झोपलेली. श्रांत. अलिप्त. जणू कशाशीच काही संबंध नसल्यासारखी अलिप्त. मीही हट्टी होतो. क्षणभर रेंगाळलो आणि मग तिथून बाहेर पडलो.

डॉक्टर सावंतांचा फोन आला तेव्हा उशीर संध्याकाळ झाली होती.

‘काय हट्टी राव तुमची ही पेशंट. उलट-सुलट प्रश्नांनी भंडावून सोडलं तिनं. म्हणजे तिचा नवराच काय-काय विचारत होता. मरायची घाई झाली का हो तिला? असंच वाटलं मला तर. पटवलं शेवटी मी तिला. पण पार मगजमारी झाली राव. आज आता काही स्कॅऩ वगैरे सांगितलेत. उद्यापासून करतो चालू केमोथेरपी, काय?’

मी फोन ठेवला. सीमा हरली होती. ती हरणार होती. मला आधीच माहीत होतं. मरण अटळ आहे. मान्य आहे. पण मरणाचीही एक पद्धत आहे. शिष्टसंमत पद्धत. ती कशी टाळणार? त्याच्याविरुद्ध बंड कसं करणार? म्रूत्युचंही रेशनिंग करण्याची पद्धत आहे आजकाल. तो असा खुलेपणानं थोडाच मिळतो. रांगेनं यावं लागतं. आर्जवं करावी लागतात. तेव्हा कुठं मान्यताप्राप्त मृत्यू मिळतो. त्याचीही एक किंमत असते. ती नुसती आर्थिक नसते. त्याचं एक वेदनामूल्य असतं. हे वेदनामूल्य चुकवलं पाहिजे. एकदम असं हे थेट मरण मागणं म्हणजे अधाशीपणा निव्वळ. सीमा हरणार हे मला माहीत होतं.

नेहमीप्रमाणं मी सकाळी तिथे जाईन तेव्हा मला खात्री होती, आज 301 मधे गडबड असणार. सुयांची टोचाटोची. रक्ताच्या तपासण्या. सलाईन. ऑक्सिजन. कोण कोण नातलग येतील. मदत करायला. धीर द्यायला. केमोथेरपी हा एक सोहळाच असतो.

पण प्रत्यक्षात मी जेव्हा तिथं पोचलो तेव्हा तिथं तर तसं काहीच नव्हतं. 301 चा चकचकीत दरवाजा तसाच बंद होता. घट्ट बंद. आसपास सर्वदूर नुसती शांतता पसरलेली. दूरवर दुसऱ्या खोलीपाशी एक सिस्टर दिसली. मला पाहून लगबगीनं पुढं आली.

‘वो बोलता है, वो केमो नही लेगा. टेस्ट वगैरा नही करेगा, बोलता है वो. कुछभी दवा नही लेगा, बोलता है वो.’

मी चपापलो. ‘सीमा हे एक वेगळं बेणं आहे’ सुनील म्हणाला होता. ते मला आठवलं.

बंद दरवाजाशी मी रेंगाळलो, काही क्षण. सवयीप्रमाणं आणि मग हलकेच दरवाजा उघडला. आतलं चित्र तेच नेहमीप्रमाणं. खाटेवर सीमा. शांत, डोळे मिटून पडलेली. पलीकडच्या खुर्चीत सुनील. जणू स्वतःला लपवून अंग आक्रसून बसलेला. मागच्या खिडकीतून उगवू पाहणाऱ्या सूर्याची किरणं आत येत असलेली. त्यांना जणू कुणी मज्जाव केला होता. मागच्या अर्धवट प्रकाशामुळे सीमा थोडी जास्तच काळवंडली होती. पण मला ती करारी वाटली. भीती वाटेल अशी करारी.

‘काल तुमचे ते डॉक्टर येऊन गेले. खूप समजावलं त्यांनी तिला. आज अगदी ठरलं होतं, केमो चालू करायची म्हणून. पण ती नाही म्हणते. काहीच नको म्हणते.’ सुनील म्हणाला आणि अस्वस्थ होऊन त्यानं दाढीवरून हात फिरवायला सुरुवात केली.

सुनील बोलला तेव्हा सीमाला माझं येणं जाणवलं. किचित हालचाल करत तिनं डोळे उघडले. हाताची नकारार्थी हालचाल करत तिनं डोळे मिटले.

‘मी म्हटलं होतं डॉक्टर, मला नकोय हे सगळं. का पटवताय मला तुम्ही? yesterday he was so persuasive. That doc. पण मला नकोय हे सगळं. He sounded so confident. But I know. खोटं वाटतं मला हे सगळं. मला जाऊ दे. लवकर जाऊ दे.’

पुढे होत मी तिचा हात हातात घेतला. नाडीपरीक्षा. तिचं पोट तपासून पाहिलं. ‘श्वास घ्या, श्वास सोडा’ म्हणत छातीची तपासणी केली. हे करताना केवढा तरी वेळ मिळाला. परिस्थिती थोडी निवळली. पुन्हा एकदा शांतता. आता पुढे काय असा यक्ष प्रश्न.

तोच धाडकन दरवाजा उघडला गेला. वाऱ्याची एक मोठी झुळूकच आत आली. खांद्याभोवती शबनम घेतलेली कुणी तरुणी जणू धावत-पळत खोलीत आली. अशा वेगानं की तिच्या श्वासाचा आवाज सगळी खोली भरून ऐकू येऊ लागला. मला आत पाहून थोडी बिचकली ती. तिचा झपाटा मंदावला. काहीतरी गंभीर चाललंय याची जाणीव तिच्यापर्यंत पोचली असावी. अचानक तिनं जाणीवपूर्वक आपली हालचाल मंद केली. ‘Sorry, I disturbed you all,’ असं काही तरी पुटपुटत ती सीमाच्या खाटेशेजारी येऊन उभी राहिली, माझ्याकडे थोडं ओशाळल्यासारखं पाहत हसत राहिली. सीमाची कुणी छोटी मैत्रीण असणार. मी तर्क केला.

मैत्रिणीला पाहून सीमा क्षीणसं हसली. तिचा हात तिनं आपल्या हातात घेतला.

‘आलीस? ये, नंदू ये’ नंदू पुढं झाली. सीमाच्या हातावर हात थोपटत जवळच थांबली.

‘हे सलाईन लावलंय. ते थांबवता नाही येणार. डॉक्टर, जे काही आहे ते अगदी उघड आहे ना, ते मला माहित्येय, तुम्हाला माहित्येय. कशासाठी हा सगळा खेळ मांडतो आपण.’

परिस्थिती पुन्हा गंभीर. नंदू चपापली. लगेच उसळून म्हणाली,

‘अहो मॅडम, आम्हाला माहित्ये, सगळी कामं अगदी वेळेआधी पूर्ण करता तुम्ही. हेही काम तसंच करायचा विचार दिसतो तुमचा. पण इथे तुमचं-आमचं काही चालत नाही, माहित्ये ना?’ किती सुंदर भाबडेपणा. नितांत निरागस वाटलं मला.

सीमाही हसली. क्षीणसं. कौतुकानं तिनं नंदूकडं नजर टाकली आणि पुन्हा माझ्याकडे प्रश्नार्थक पाहणं सुरु केलं.

‘You see, after all this is a hospital. ज्यांना काही तसेच उपचार चालू आहेत त्यांनाच मी इथे ठेवू शकतो. अगदी काहीच उपचार नसतील तर आपण आपल्या घरीच नाही का राहू शकणार? हॉस्पिटलमध्ये कुणी निष्कारण नाही राहू शकत.’

क्षणभर सीमाचे डोळे लकाकले.

‘मी घरी जाऊ शकते, डॉक्टर? तुम्ही द्याल मला ती परवानगी?’

‘जरूर. तुम्हा सर्वांचं जर एकमत झालं, कुठलाही उपचार इथून पुढे कधीच घ्यायचा नाही असा ठाम निर्णय झाला तर घरीसुद्धा सोडू शकतो मी. पण हा निर्णय अवघड आहे. घेणं जमेल पण निभावणं अवघड आहे,’ मी म्हणालो.

सीमा विचारात पडली. संदिग्ध असे काही क्षण गेले. तिचा निर्णय झाला बहुधा.

‘नको, डॉक्टर, मी राहाते इथेच. चालू दे हे सलाईन.’

एवढ्या बोलण्याचाही तिला थकवा आला. शांतपणे ती डोळे मिटून पडली. आपल्याच विश्वात मग्न. मग पुढे बोलण्यासारखं काहीच उरलं नाही. मी बाहेर पडलो.

मी बाहेर पडलो तसा सुनीलही माझ्यामागोमाग निघाला.

‘मला माहित्ये, मी त्रास देतोय तुम्हाला. पण राहवत नाही हो. तुम्हाला राग येईल कदाचित, पण सीमाच्या भावाच्या ओळखीचे आहेत एक डॉक्टर. तेही oncophysician आहेत. त्यांना विचारलं. ते म्हणतात केमो नको असेल तर काही हार्मोन देता येऊ शकतील अशा पेशंटला. पण सीमाचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही म्हणलात तर –‘

‘हार्मोन देतात. थोड्या वेगळ्या संदर्भात देतात. ते द्यायला माझी काहीच हरकत असणार नाही. प्रश्न आहे, सीमा तयार आहे का? तुम्ही बोललात का तिच्याशी?’

सुनील शांत झाला. हे काम अवघड होते, त्याला त्याची जाणीव होती.

‘मी असं करतो, आज दुपारीच तिच्याशी बोलतो. उद्या तुम्ही याल तेव्हा आपण ठरवू या काय ते.’

आणखी एक दिवस. एक नवा पर्याय उपचाराचा. आशा सुटता सुटत नाही म्हणूनच केवळ. मला सुनीलची कीव आली.

दुसरा दिवस वेगळा नव्हता. सीमा तशीच अंथरुणावर पडलेली. अशक्तपणा वाढत चाललेला. अंगावर येत चाललेली सूज. फुगणारं पोट. अस्पष्ट होत चाललेलं बोलणं. मधूनच संदर्भ सुटत असे तिच्या बोलण्याचा. बारीक-बारीक तापाची सुरुवात. पण तरीही बुद्धी एकेकवेळा अति-कुशाग्र वाटावी अशी.
माझी तपासणी झाली. मी निघणार तोच सुनीलनं विषय काढला.

‘मी बोललो सीमाशी, ते हार्मोनसंदर्भात. पण नाही म्हणते त्यालाही. त्याला तर काही साईड इफेक्ट नाहीत ना डॉक्टर? तुम्ही बोललात तर-‘

मी थबकलो. ‘माझी हरकत नाही, ते घेऊन बघायला. Of course, only if she is willing-‘ मी म्हणालो.

सीमा हसली. ‘नकोय डॉक्टर, मला कुठलीच treatment  नकोय. तुम्ही त्या दिवशी म्हणलात, हा आजार बरा होणार नाही. इतरही कोणकोण डॉक्टर आले. कुणीच म्हणत नाही की यातून मी बरी होईन म्हणून. मला नुसती कामचलाऊ treatment नकोय.’

बोलता बोलता तिला ठसका लागला. डोळ्यातून पाणी आलं इतका ठसका. सुनील धावत पुढे आला मदतीला. त्याला हातानं थांबवत ती बोलत राहिली-

‘माझा केमोला विरोध नाही. मी त्याच्या साईड इफेक्टना घाबरत नाही. मला निरुपयोगी उपचार नकोत. खोटं खोटं काही नको. If my time has come, let me go into that other world. तुम्ही सगळे आहात इथे. मला मदत करा त्यासाठी फक्त.’

थकली ती हे इतकं बोलून. डोळे मिटून स्वस्थ पडून राहिली. आम्ही दोघंही अवाक. उभे. एकमेकांकडे पाहत. सुनीलच्या नजरेत आर्जव होतं.

‘पण असं पहा, Sunil is your husband. त्याचाही काही हक्क आहेच ना तुमच्यावर. आपण सीमासाठी काहीच केलं नाही अशी खंत का देता तुम्ही त्याला. होऊ दे एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी,’ मी म्हणालो.

सीमानं डोळे उघडले. कष्टानं. सुनीलकडे एकटक पाहत ती म्हणाली, ‘No, it’s wrong. सुनीलनं माझ्यासाठी सगळं केलंय. जे करणं शक्य होतं ते सगळं केलंय. I am grateful to him for all that he has done for me all his life. He need not carry that feeling’ हे म्हणताना तिच्या डोळ्यात पाणी होतं का? ती प्रेमानं त्याचा हात कुरवाळत होती. वरून मला नक्की दिसत होतं ते इतकंच.

सुनील भावनाविवश होता. त्याला प्रयत्न सोडायचे नव्हते.

‘आता इथे आपण सलाईन लावतो आहोतच ना, तसेच हार्मोन्स घेऊ,’ तो म्हणाला.

‘I am allowing saline so that the doctor should not have any problems in keeping me in this hospital. डॉक्टर म्हणाले होते ना तेव्हा. म्हणूनच हे सलाईन,’ ती म्हणाली. पुन्हा अपरंपार कष्टानं तिला दम लागला. आमच्या दोघांपासून दूर एका दिशेला तिनं तोंड फिरवलं आणि श्वास घेण्यात गढून गेली.

खोलीतून मी बाहेर पडलो तसा सुनील पुन्हा माझ्या मागे-मागे येत राहिला. आता ही जणू रोजची पद्धतच पडल्यासारखी झाली होती. मी हॉस्पिटलबाहेर पडताना सुनीलनं माझा पाठपुरावा करत राहायचं. माझा वेगळा वेळ जाऊ नये म्हणून चालता-चालताच तो त्याच्या शंका विचारणार. शंका त्याच. त्याची उत्तरही तीच. न थकता, न कंटाळता मी ती देत राहायचं फक्त. दिवसभराच्या त्याच्या सगळ्या ताणतणावाचा त्यातून निचरा होत असावा.

त्या दिवशी दुपारी विवेकचा फोन आला. त्यानं सीमावर शस्त्रक्रिया केली होती, साहजिकच तोही काळजीत असे.

‘अरे, ती पेशंट काहीच करून घ्यायला तयार नाही म्हणते. केमो नाही. सर्जरीचा तर प्रश्नच नाही. मरेल नं ती अशानं.’

‘अरे पण हे सगळं केलं तरी ते थोडंच टळणारे? नाही तिची इच्छा तर जाऊ दे ना. अगदी आग्रह करून द्यावा अशी थोडीच आहे ही treatment?’ मी म्हणालो.

‘अरे यार, ते ठीक आहे. पण तिथं त्या केस पेपरवर लिहिलंय ना त्या डॉक्टर सावंतनी. पार केमोच्या सगळ्या सूचना लिहिल्यात. आता त्यांनी असं लिहिल्यावर आपण न देणं म्हणजे, पंचाईत की रे. आपणच आडवे पडतो त्या treatmentच्या विरोधात असं काही तरी दिसायचं ना त्यातून. मला तर यार काळजी वाटते. कोण कशाचा कसा वापर करून आपल्याला गोत्यात आणील सांगता येत नाही. तिचा तो नवरा तर जाम पीडतोय, त्याला तर पटेनाच यार त्याची बायको किती आजारी आहे ते. सारखं पहिल्यापासून त्याच त्याच शंका विचारतो. त्याला हे सगळं समजतंय की नाही. मला तर त्याचीसुद्धा काळजीच वाटते.’

मी विचारात पडलो. विवेकच्या भीतीत तथ्य होतं, व्यावहारिक तथ्य. पण माझं मन मानेना. तिकडे सीमा तनमनानं संघर्ष करत होती. मृत्यू मिळावा म्हणून. वेदनेनं तडपणारं तिचं शरीर मुक्तीच्या प्रतीक्षेत मृत्यूची याचना करीत होतं आणि इकडे आम्ही त्यावेळी अशा क्षुद्र भीतीनं विवश असावं. मला कसंतरीच वाटलं. पण माझा नाईलाज झाला. व्यवहाराची जीत झाली.

दुसऱ्या दिवशी मी पुन्हा गेलो तेव्हा सीमा जागी होती. सावध होती. पण आपल्याच तंद्रीत असल्यासारखी. मला पाहून हसली बहुधा. ‘बहुधा’ असं मी म्हणतो कारण तिच्या चेहऱ्यावर तेव्हा जी भावना होती तिला नक्की ‘हास्य’ म्हणता येईल का असा मला संशय होता. खूप वेदना सोसून निर्माण झालेली सोशिकता आणि या वेदनांचा अंत जवळ येत असल्याची लागलेली चाहूल, ही चाहूल म्हणजे यशाची जणू नांदीच. म्हणजे आनंदच केवळ. अशी काही तरी भावना असावी त्यामागे.

‘So, How are you?’ मी इंग्लिश बोललो आणि ते किती निरर्थक होतं हे लक्षात येऊन ओशाळलो.
‘Not good,’ ती म्हणाली. तिचा आवाज आता कमालीचा क्षीण होता. यावर मी आता काय बोलणार? तिला तपासत राहिलो फक्त. ‘श्वास घ्या, श्वास सोडा’, म्हणत.

खोली तीच होती. तिचा रंग तसाच कोरा. मागून येणारी सूर्यकिरणं तशीच होती, खट्याळ पण चोरटी. शेजारी तोच सुनील होता. तसाच अधीर, अस्वस्थ. खोलीत एक प्रकारची दुर्गंधी मात्र होती. ती नवीन होती. मृत्युगंध.

खोलीतून मी बाहेर पडलो. दरवाजा बंद करता-करता एकदाच पुन्हा वळून पाहिलं. सीमा केव्हाची गाढ झोपलेली होती. वेदनामुक्त. ही भेट आता शेवटची तर नव्हे?

खोलीतून बाहेर पडलो. हातात केस पेपर धरून सिस्टर उभीच होती. तिला आजच्या उपचारांच्या सूचना लिहून हव्या होत्या. काय लिहिणार? कसले उपचार? आणि उपयोग तरी काय ते लिहिण्याचा? लिहिणे हाही एक उपचारच फक्त.

काही तरी खरडलं. मागे पाहिलं, तर सुनील होताच. अस्वस्थपणे दाढी कुरवाळत. त्याच्या खास लकबीनं. त्याला पाहून मला जणू नव्यानंच एक आठवण झाली. मी अस्पष्टपणे बोललो-

‘एक formality राहून गेली आहे. सीमानं एकूण सर्व बाबींचा सांगोपांग विचार करून केमोथेरपी नाकारली. हा नकार तिनं आणि पर्यायाने तुम्ही जाणीवपूर्वक आणि खुशीनं स्वीकारलेला पर्याय होता, अशी नोंद या पेपरवर होणं गरजेचं आहे. मी तशा अर्थी इथं काही वाक्यं लिहितो. You please sign on those.’

‘Oh, Yes, Sure. I can do that.’ तो म्हणाला.

मी पेपर हातात घेतला. वाक्यांमागून वाक्य लिहीत गेलो. कायदेशीर. सुरक्षित. उपचार करणाऱ्या आम्हा डॉक्टरांना, हॉस्पिटलला कुठलाच धोका राहू नये अशी योजना होती त्यात.

माझं लिहून होईपर्यंत सुनील शेजारी उभा होता. सविस्तर सगळं लिहून मी तो कागद त्याच्या हातात दिला. त्यानं वाचून त्यावर सही करावी अशी अपेक्षा. त्यानं तो कागद आपल्या हातात धरला, किंचित कापत होता त्याचा हात त्यावेळी. ते मी पाहिलं. काहीच न वाचता त्यानं मला फक्त पेन मागितलं. इतक्या सकाळी हॉस्पिटलमध्ये थोडंच त्याच्याकडे पेन असणार होतं. मी काहीही न बोलता माझं पेन त्याच्या हातात दिलं. त्यानं ते घेतलं आणि एक लफ्फेदार सही टाकली त्यावर. वर मी काय लिहिलं होतं, याच्याशी त्याचा जणू काहीच संबंध नव्हता.

‘यावर सीमाची पण सही आणू का?’ त्यानं विचारलं.

‘No, it’s Ok. That was only a formality.’ मी म्हणालो. खरं तर सीमाचीही सही मिळाली असती तर हवंच होतं मला. पण धाडस नाही झालं मला ती मागण्याचं. एवढं व्यावहारिक होणं माझ्या ताकदीबाहेर होतं.

सही दिली आणि सुनील तडक पुन्हा खोलीत गेला. आज त्याला माझ्याशी बोलावंसं वाटलं नाही.

हे झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी सीमा गेली. अगदी शांतपणानं. कुणालाही न दुखावता. एखाद्या पिसासारखी हळुवार.

ती गेली तेव्हा मी तिथे नव्हतो. सुनील होता फक्त. त्याचा मला एस.एम.एस. आला.
‘Seema passed away. A painless end. Thank you for all that you did for her’

खरंच मी नक्की काय केलं होतं तिच्यासाठी? तिच्या मरणेच्छेला सबळ आधार दिला, तिच्या इच्छेची अखेरपर्यंत सोबत केली आणि म्हणूनच कदाचित तिनं हॉस्पिटलमधे राहणं पसंत केलं आणि हे खरं असेल तर मीही तिला दिला तो का खरोखर आधार होता?

खरं तर तिचा मृत्यू पाहिला आणि मीच निराधार झालो.

डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०

8 comments:

  1. I dont know what to say but you have brought a living experience of a dead person to me. I am thankful.

    ReplyDelete
  2. नमस्ते वैद्यराज, यमराजसहोदर!

    वर CHINMAY KELKAR यांच्याशी सहमत.

    -गामा पैलवान

    ReplyDelete
  3. Sir a small request, please start to write your blogs in english also if possible.

    ReplyDelete
  4. Sir a small request, please start to write your blogs in english also if possible.

    ReplyDelete
  5. Sir a small request, please start to write your blogs in english also if possible.

    ReplyDelete
  6. ___/\___ अज्ञात सीमा, सुनिल आणि तुम्हालाही.
    नुसतं वाचतानाही असह्य झालं. प्रत्यक्ष फेस करताना अन ते सगळं शब्दात उतरवयाला केव्हढी ताकद हवी.
    व्यवहार न सोडता सहृद्य राहणं फार फार अवघड गोष्ट, ती जमवली आहे तुम्ही !

    ReplyDelete